scorecardresearch

साम्ययोग : मेधा – परिपूर्ण ज्ञान वा हरिभक्ती

एखाद्या घडय़ाळाचे सर्व भाग सुटे केले की एका प्रकारचे ज्ञान होते. तेच भाग पुन्हा जोडले की दुसऱ्या प्रकारचे ज्ञान होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

– अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

न द्वेष्टय़कुशलं कर्म कुशले नानुषज्जते।

त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशय:॥

१८ – १० ॥ १०

कर्मी शुभाशुभीं जेव्हां राग-द्वेष न राखतो

सत्त्वांत मुरला त्यागी ज्ञानें छेदूनि संशय

प्रत्येक भाषेत काही विशिष्ट शब्द असतात. त्याच्याशी अनेक छटा जोडलेल्या असतात. उदाहरणार्थ इस्लाम. या शब्दाचे ‘शांतता’ आणि ‘समर्पण’ असे दोन्ही अर्थ आहेत. ईश्वराच्या बाबतीत असा उभय अर्थ असणारे शब्द कदाचितच सापडतील. आपल्याकडे ‘धर्म’ शब्द या प्रकारचा आहे. कर्तव्य ते उपासना इतका मोठा पल्ला या एका शब्दात येतो. ‘मेधा’ शब्द याच गटातील आहे.

लेखाच्या आरंभी दिलेल्या श्लोकात ‘त्यागी पुरुषा’चे वर्णन आले आहे. तथापि तिथे आणखी दोन शब्द दिसतात. ‘सत्त्वसमाविष्टो’ आणि ‘मेधावी’. या तिन्ही गुणांचे फलित म्हणजे ‘छिन्नसंशय:’. म्हणजे कोणताच संशय शिल्लक राहात नाही. या तिन्ही शब्दांचा आणि त्या पलीकडे असणाऱ्या अन्य अर्थछटांचा समावेश ‘मेधा’ या शब्दात होतो. मेधाचा आणखी एक अर्थ आहे बलिदान  (त्याग या अर्थाने). उदाहरणार्थ नृमेध. माणसासाठी त्याग. नृमेध: अतिथिपूजनम्। म्हणजे अतिथीसाठी  करायचा त्याग तो नृमेध. आकलनशक्ती असाही ‘मेधा’चा एक अर्थ आहे. अरबी भाषेत अक्ल शब्द आहे. त्याचा मूळ धातू आहे क्लन. त्याला आ उपसर्ग लागतो आणि आकलन शब्द होतो. हे आकलन म्हणजे मेधा.

एखाद्या घडय़ाळाचे सर्व भाग सुटे केले की एका प्रकारचे ज्ञान होते. तेच भाग पुन्हा जोडले की दुसऱ्या प्रकारचे ज्ञान होते. दोन्ही मिळून होणाऱ्या आकलनाला परिपूर्ण ज्ञान किंवा आकलन म्हणता येईल. असे परिपूर्ण आकलन म्हणजेच आकलन. आधुनिक परिभाषा वापरायची झाली तर अ‍ॅनालिसिस आणि सिंथसिस म्हणजे यांचे ऐक्य म्हणजे मेधा. ती ज्या व्यक्तीला प्राप्त होते ती व्यक्ती मेधावी म्हणून ओळखली जाते.

भोग आणि त्याग या दोहोंच्या मदतीने ही संकल्पना आणखी समजू शकते. शरीराकडून काम करायचे त्याला भोगानुकूल बनवावे लागते. तथापि आपण नुकतेच भोगत राहू तर आकलन शक्ती कुंठित होते. त्यागाला भोगाची जोड असेल तर त्याग आणि भोग मिळून त्या वस्तूचे परिपूर्ण ज्ञान होते.

त्याग-बुद्धी आकलन शक्ती यांच्यासोबत मेधाचे तिसरे आणि अत्यंत महत्त्वाचे लक्षण आहे ‘संशुद्धी’. म्हणजे पावित्र्य, निर्मळता. संशुद्धी हे ज्ञानाचेच लक्षण आहे. आपले डोळे, मन निर्मळ नसतील तर सृष्टीचे समग्र ज्ञान होणे अशक्य आहे. म्हणूनच त्याग आणि आकलनाला निर्मलतेची जोड हवी. या निर्मलतेला सत्त्व असे म्हणतात. आता त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी या चरणाचा अर्थ सहज समजेल.

श्रीमद्भागवद्तामध्ये हे सर्व विवेचन एका शब्दात आले आहे. ‘हरिमेधा’. ज्या व्यक्तीची मेधा हरिमय झाली आहे तिला हरिमेधा हे विशेषण लागू होते. शुकदेवांनी उद्धवासाठी तो शब्द योजला आहे. स्मृतीचे विवरण करताना विनोबांनी वीर्य शक्ती विवेक शक्ती आणि आत्मज्ञान अशी त्रिसूत्री मांडली होती. इथे त्याग, आकलन, पावित्र्य आणि हरिशरणाता या चौकोनाला पूरक अशी गोष्ट सांगितली आहे. ती आहे आहारशुद्धी. या आहारशुद्धीचा विचार अभंग व्रतामध्ये करायचा आहे. तोवर परिपूर्ण ज्ञान म्हणजेच हरिमेधा लक्षात घेऊ.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta samyog medha word in marathi harimedha god words with similar meanings zws

ताज्या बातम्या