scorecardresearch

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ : प्रयोगशील नाटय़निर्मितीचा ध्यास कायम

आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ म्हणजे वेगळं काही करू पाहणारे कर्तृत्ववान तरुण. ‘लोकसत्ता’ अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर आणत आहे. आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..

नाटय़निर्माता राहुल भंडारे यांचा प्रयोगशील नाटय़निर्मितीचा सिलसिला आजही सुरू आहे. २०१७ चा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांतच राहुल भंडारे यांना ‘झी’कडून ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाटय़ निर्मितीसाठी विचारणा झाली. याआधी त्यांनी बालनाटय़ केले नव्हते, मात्र त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाने इतिहास घडवला. त्यानंतर त्यांनी ‘झी’बरोबर दिलीप प्रभावळकर, रवी पटवर्धन, प्रतिभा मतकरींसारख्या दिग्गज कलाकारांना घेऊन ‘आरण्यक’सारखे एक अभिजात नाटक रंगभूमीवर आणले. ‘इब्लिस’ हे रहस्यमय नाटकही त्यांनी त्याच वेळी रंगभूमीवर आणले. त्याच सुमारास भंडारे यांनी ‘बुक माय शो’बरोबर ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या दुसऱ्या बालनाटय़ाची निर्मिती केली, त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. करोनाची दीड-दोन वर्षे गेल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या नाटकांसाठी ते सज्ज झाले आहेत. ‘तात्या वन्स मोअर’ या मालवणी नाटकाची निर्मिती भंडारे यांनी केली आहे. तर अभिनेते भाऊ कदम यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘चार्ली’ या नव्या नाटकाची तयारी सुरू आहे. या नाटकाचे लेखन अरिवद जगताप यांचे असून दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे.

राहुल भंडारे लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१७

बहुआयामी गणितज्ञ

गणिताचा बागुलबुवा अनेकांच्या मनात असला, तरी हा विषय प्रत्येकाचे आयुष्य व्यापून उरतो. बंगळूरु येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये सहयोगी प्राध्यापक असणारे गणितज्ञ अपूर्व खरे याचे संशोधनही अशाच विविध क्षेत्रांना स्पर्श करणारे आहे. अपूर्व यांचे गणितातील संशोधन वित्तीय क्षेत्र, हवामान बदलासंदर्भातील अभ्यास, जैवसांख्यिकी अशा विभिन्न क्षेत्रांत उपयुक्त ठरत आहे. त्याच्या ‘पॉलिमॅथ’ प्रकल्पाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. गणिती पद्धतींचा वापर करून विविध समस्या सोडवण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.

 ‘सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिग रिसर्च बोर्ड’, अमेरिकेतील ‘द डिफेन्स अ‍ॅडव्हान्स रिसर्च एजन्सी’ आणि ब्रिटनमधील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर मॅथमॅटिकल सायन्स’ने त्याच्या अभ्यासाची दखल घेतली आहे. प्रतिष्ठित अशा स्वर्ण जयंती फेलोशिप, रामानुज फेलोशिप त्यांना प्राप्त झाली आहे. कॅनडामधील मॉन्ट्रियल, पेरूमधील कुस्को येथे आणि जगातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये त्याने मांडलेले विचार उल्लेखनीय ठरले आहेत.

अपूर्व खरे लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१८

वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात भरीव काम

पुण्यातील नीलय लाखकर यांची सिंथेरा बायोमेडिकल ही कंपनी उच्च दर्जाची कृत्रिम हाडे किफायतशीर दरांत उपलब्ध करून देते. या संशोधनाबद्दल त्यांना २०१८चा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरवण्यात आले. बोन ग्रािफ्टगचे एकस्व अधिकार आता कोरियामध्ये नोंदणीकृत झाले आहेत. तसेच बोन ग्रािफ्टगच्या प्राण्यांमधील चाचण्यांचा टप्पा पूर्ण होऊन आता त्याच्या मानवी चाचण्या सुरू आहे. हा टप्पा पूर्ण करून लवकरात लवकर हे उत्पादन प्रत्यक्ष वापरण्यासाठी उपलब्ध होण्याची नीलय यांना आशा आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या नवउद्यमी स्पर्धेत २०२१ मधील सर्वोत्कृष्ट नवउद्यमी पुरस्कार मिळाला. तसेच जखमा नीट भरून येण्यासाठीच्या मलमामध्ये वापरला जाणाऱ्या घटकाची त्यांनी निर्मिती केली. करोना काळात पृष्ठभाग ४८ तासांत संपूर्ण निर्जंतुक करू शकणारा घटक तयार केला. तसेच अशुद्ध पाणी पिण्यायोग्य शुद्ध करणारा घटक तयार करून त्याच्या एकस्व अधिकार नोंदणीचा अर्ज दाखल केला आहे.

नीलय लाखकर लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१८

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta tarun tejankit award winners journey zws 70

ताज्या बातम्या