scorecardresearch

‘लोकसत्ता तरुण तेजांकित : ग्रामविकासाचा ध्यास

आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ म्हणजे वेगळं काही करू पाहणारे कर्तृत्ववान तरुण. ‘लोकसत्ता’ अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर आणत आहे. आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..

समर्थ कारभारी आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ताई पवार या खालापूर तालुक्यातील मोहपाडा गावच्या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी इथपर्यंत वाटचाल केली आहे. एकेकाळी घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. परंतु ही परिस्थिती इतरांवर येऊ नये यासाठी त्यांनी सामाजिक कार्यात उतरण्याचा निर्णय घेतला. गावचे सरपंचपद मिळवले. आज या माध्यमातून त्यांनी ग्रामविकास आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी निरंतर कार्य सुरू ठेवले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाडय़ांना वीज जोडणी, अंगणवाडीचे नूतनीकरण, गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम या दोन वर्षांत राबविला. रस्ते, वीज, पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न केले. शासकीय योजनांचा लाभ वाडय़ावस्त्यांवर पोहोचला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ग्रामपंचायतीचा कारभार समर्थपणे सांभाळत आहेत.

ताई पवार  तरुण तेजांकीत २०१९

अभिनयातील दमदार वाटचाल

चतुरस्र अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी तरुण अभिनेत्री नंदिता धुरी-पाटकर.  व्यक्तिरेखा सहज अभिनयातून जिवंत करत, आवाज – भाषा यांवर विशेष प्रभुत्व राखत त्या व्यक्तिरेखा  प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात नंदिता यशस्वी ठरली आहे. नामांकित कंपनीतील नोकरी सोडून तिने नाटय़क्षेत्राकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि प्रायोगिक रंगभूमीपासून सुरुवात करत नाटक, चित्रपट-मालिकांतून नंदिताने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.  ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून घरोघरी पोहोचलेल्या नंदिताने २०१९ मध्ये दिग्दर्शक संजय जाधव यांच्या ‘खारी बिस्कीट’ आणि अभिनेता संजय दत्त याची निर्मिती असलेल्या ‘बाबा’  चित्रपटांतून प्रमुख भूमिका साकारली. ‘खारी बिस्कीट’मध्ये नंदिताने साकारलेले माई प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ‘बाबा’ चित्रपटाला एशिया पॅसेफिक चित्रपट महोत्सवात अनेक पुरस्कारही मिळाले. नंदिता २०२० पासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतून सरिता मोरे म्हणजेच सरू ही प्रमुख भूमिका करते आहे. तिच्या ‘या भूमिकेला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून देण्यात येणाऱ्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१’ चा सर्वोत्कृष्ट वहिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच या मालिकेलाही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नंदिताचे दोन चित्रपटही येत आहेत.

नंदिता धुरी-पाटकर तरुण तेजांकीत २०१८

संशोधनात मग्न

शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेल्या रुपाली सुरासे – कुहिरेयांनी शेती क्षेत्रासाठी अतिशय उत्तम असे संशोधन केले. पिकांचे वर्गीकरण आणि त्यावरील रोगांची माहिती देणारे नवतंत्रज्ञान विकसित केले. ‘सॅटेलाइट सिग्नेचर’ या संगणकीकृत उपक्रमाच्या आधारे पिकांचे वर्गीकरण आणि त्यावरील रोग यांची माहिती मिळविता येऊ शकते. या संशोधनामध्ये ज्वारी, बाजरी, मूग आणि उडीद या पिकांचा समावेश आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान नेमके मोजता येणे शक्य होईल, तसेच पीकविमा पद्धतीतही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल, असा त्यांना विश्वास आहे. हायपर स्पेक्ट्रल सिग्नेचर व सॅटेलाइटचा वापर करून हे नवतंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यापूर्वी त्या विद्यापीठाच्या माध्यमातून आपले संशोधन करीत होत्या परंतु आता मात्र त्यांनी संशोधनाचे हे काम स्वतंत्रपणे सुरु केले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अतिथी व्याख्यात्या, किंवा अतिथी प्राध्यापक म्हणूनही त्या जात असतात. विद्यार्थी आणि विज्ञानाशी असलेला संवाद तुटू न देण्याची काळजी रुपाली सुरासे-कुहिरे कायम घेत असतात.

रुपाली सुरासे-कुहिरे तरुण तेजांकीत २०२०

प्रायोजक

*  मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) 

*  सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., वल्र्ड वेब सोल्युशन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ *  पॉवर्ड बाय :  महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta tarun tejankit award winners life journey zws 70

ताज्या बातम्या