scorecardresearch

‘..तरुण तेजांकित’

या उपक्रमाचा या वर्षीचा जागर गाजवला आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमधील १७ तरूण-तरुणींनी.

loksatta tarun tejankit information
लोकसत्ता’च्या ‘तरुण तेजांकित’

विज्ञान- तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, संशोधन, क्रीडा, सामाजिक काम, मनोरंजन.. क्षेत्र कोणतेही असो, तिथे कार्यरत असलेले तरूण म्हणजे काळाला मिळणारी नवी झळाळी असते. कारण त्यांच्याकडे असते जुन्याची मोडतोड करण्याचे धाडस आणि नवा विचार करण्याचे, समाजाला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य. आपली नवी दृष्टी घेऊन जीवनाच्या सफरीवर निघालेल्या आपल्याच नादात गुंग असलेल्या या तरुणाईला समाजाच्या कानाकोपऱ्यातून धुंडाळून तिचे लखलखते पैलू सगळ्यांसमोर आणण्याचे काम ‘लोकसत्ता’च्या ‘तरुण तेजांकित’ या उपक्रमामधून नियमितपणे सुरू आहे. या उपक्रमाचा या वर्षीचा जागर गाजवला आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमधील १७ तरूण-तरुणींनी. जगाच्या पसाऱ्यात आपले वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण करण्याबरोबरच समाजासाठी योगदान देणाऱ्या या गुणवंतांचे कौतुक म्हणजेच कल्पकतेचे, धाडसाचे, बुद्धिमत्तेचे, संवेदनशीलतेचे कौतुक..

कचरावेचकांच्या मुलांसाठी..

अद्वैत दंडवते सामाजिक काम

अ द्वैत दंडवते आणि त्यांची पत्नी प्रणाली यांनी जळगाव परिसरातील सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण उपाययोजना करण्यासाठी २५ जून २०१३ रोजी वर्धिष्णू सोशल रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला वर्धिष्णू संस्थेने जळगाव महापालिकेसोबत काम करणाऱ्या कचरा कामगारांच्या प्रश्नांचा अभ्यास केला. संस्थेच्या माध्यमातून या दाम्पत्याने अस्वच्छ काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू केले. सक्षम या उपक्रमाच्या माध्यमातून ते असंघटित कामगारांच्या स्त्रियांना रोजगारही उपलब्ध करून देत आहेत.

आनंदघराच्या माध्यमातून कचरा वेचणारे, तसेच बालमजूर मुलांना सुरक्षित व आनंददायी बालपण मिळावे, यासाठी वस्तीपातळीवर केंद्रे चालविली जातात. गेल्या सात वर्षांत ३५० पेक्षा जास्त मुलामुलींना शाळांमध्ये दाखल करण्यात  संस्थेला यश आले आहे.

संस्थेच्या माध्यमातून जळगाव शहरातील कचरावेचक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणानंतर आनंदघर या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून कचरा वेचणारे, बालमजूर मुलांना सुरक्षित व आनंददायी बालपण मिळावे, यासाठी केंद्रे चालविली जातात. गेल्या सात वर्षांच्या काळात ३५० पेक्षा अधिक मुलामुलींना शाळांमध्ये दाखल करण्यात तसेच तिथे टिकवून ठेवण्यात संस्थेला यश आले आहे.आज जळगावातील वस्तीपातळीवरील तीन केंद्रांमध्ये २५० वर मुलेमुली रोज शिक्षण घेत आहेत. टाळेबंदीच्या काळात गरीब, कष्टकरी, गरजू कुटुंबांना काही दिवसांचे धान्यवाटप करण्याचा उपक्रम के. के. कॅन्सच्या सहकार्याने राबविण्यात आला. आनंदघराच्या संपूर्ण प्रक्रियेतून मुले कचरा वेचण्याचे दुष्टचक्र मागे टाकून शाळेत जायला लागली. आनंदघरातील मुलांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही दिली जाते. सध्या जळगाव व चोपडा येथील चार आनंदघरांमध्ये दररोज अडीचशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

नवकल्पनांचा किमयागार

प्रणव सखदेव  लेखन

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून कथाबीजाचा कल्पकतेने शोध घेत ते फुलवत नेणे हा प्रणवचा हातखंडा. सफाई कामगारांसारख्या कामगाराकडे माणूस म्हणून पाहावे ही दृष्टी प्रणवची कथा वाचकाला देते. ‘काळे करडे स्ट्रोक्स’ या कादंबरीसाठी प्रणवला साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  मराठीतल्या मान्यवर प्रकाशन संस्थांशी लेखक, संपादक व अनुवादक म्हणून तो संलग्न आहे. तो भाषा सल्लागार समितीचा सदस्य आहे. त्याच्या इतर प्रकाशित पुस्तकांमध्ये ‘चतुर’, ‘९६ मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या तर ‘नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’, ‘निळय़ा दाताची दंतकथा आणि इतर कथा’, ‘दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ हे कथासंग्रह आहेत तर ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’’ हा त्याचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. 

मानवी नातेसंबंध आणि त्यातही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून कथाबीजाचा कल्पकतेने शोध घेत ते फुलवत नेणे हा प्रणवचा हातखंडा. सफाई कामगारांसारख्या कामगाराकडे माणूस म्हणून पाहावे ही दृष्टी प्रणवची कथा वाचकाला देते.

कथाकार शांताराम पुरस्कार, मुंबई साहित्य संघ, सार्वजनिक वाचनालय, नाशिक अ.वा. वर्टी कथालेखक पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांचा आशाताई सौंदत्तीकर सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय कल्याणचा दि. बा. मोकाशी कथा पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचा न. चिं. केळकर साहित्यसम्राट पुरस्कार आदी पुरस्कारांचा प्रणव मानकरी आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या अभ्यासवृत्ती अंतर्गत त्याने एलिझाबेथ विल्करसन लिखित ‘द वॉम्र्थ ऑफ अदर सन्स’ या ग्रंथाचा अनुवाद त्याने केला आहे. प्रणवने गॅब्रिएल गार्सिया मार्केझ लिखित ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’, अमिताभ घोष लिखित ‘द नटमेग्ज कर्स’, पुरुषोत्तम अग्रवाल लिखित ‘कबीर, कबीर’ या पुस्तकांबरोबरच पेरुमल मुरुगन लिखित ‘वन पार्ट वुमन’ (तमिळ माधोरुबागन) ही कादंबरी आणि डॉ. अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांची भाषांतरे केली आहेत.

कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन

कृष्णाई उळेकरलोककला

घ रातून आलेल्या लोककलांच्या परंपरेत कृष्णाईने आपल्या प्रतिभेने भर घातली आहे. आर्ली बुद्रुक (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील कृष्णाई उळेकर ही आपल्या कलाविष्काराने रंजनाबरोबरच समाजप्रबोधनासाठी कार्यरत आहे. लोककलांच्या माध्यमातून स्त्री भ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती असे समाजातील विषय लोकांच्या भाषेत हसत-खेळत मांडत त्याचे वास्तव नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या कृष्णाईच्या कलाविष्काराची तपपूर्ती झाली आहे. याच विषयामध्ये तिचे अध्यापन व संशोधन कार्यही सुरू आहे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून भारुडाचे कार्यक्रम सादर करणाऱ्या कृष्णाईला वडील प्रभाकर यांच्याकडून कलेचा वारसा लाभला.

लोककलांच्या माध्यमातून स्त्री भ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती असे विषय हसत-खेळत मांडत त्याचे वास्तव नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कृष्णाईचे कसब वाखाणण्याजोगे आहे. याच विषयामध्ये तिचे अध्यापन व संशोधन कार्यही सुरू आहे.

गावात शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एकनाथाच्या ‘बुरगुंडा’ या भारुडापासून तिने सुरुवात केली. ती आता तीन तासांचा स्वतंत्र कार्यक्रम सादर करते. त्यामध्ये गण, गवळण, पोवाडा, वासुदेव, पिंगळा अशा सर्व लोककला टाळ, तुणतुणं, संबळ, संवादिनी, तबला, ढोलकी या वाद्यांच्या साथीने सादर करणारी कृष्णाई रसिकांच्या गळय़ातील ताईत झाली आहे. नृत्य, गायन आणि अभिनयाचा त्रिवेणी संगम असलेल्या लोककलांकडे वळण्यासाठी वडिलांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी तिला निरंजन भाकरे यांचे भारूड दाखविले. भाकरे यांचा बुरगुंडा पाहून हे काही तरी वेगळे आहे याची जाणीव झाली आणि त्यातून ती भारुडाकडे वळली. कृष्णाईने  फग्र्युसन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले. २०१७ मध्ये तिने बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पहिला प्रयोग केला. बी.ए. पदवीनंतर कृष्णाई आता नाटय़शास्त्र आणि लोककला विषय घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र असलेल्या उस्मानाबाद येथे एम.ए. करत आहे. भारूड या विषयावरच तिचे संशोधन सुरू आहे.

नव्या पिढीचा हिरो

अमेय वाघ अभिनय

अभिनेता अमेय वाघने चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका आणि वेब मालिका विश्वात स्वत:चा ठसा उमटवला आहे. पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक स्पर्धेत बीएमसीसी महाविद्यालयाकडून त्याने एकांकिका सादर केल्या. त्यात ‘सायकल’ या एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक मिळाला. प्रायोगिक रंगभूमीवर गेली २१ वर्षे अमेयचे हे नाटक गाजले. व्यावसायिक नाटकांमध्ये ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘नेव्हर माइंड’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ अशी नाटके अमेयने केली. त्याशिवाय अमेयने हिंदी आणि इंग्रजी नाटकांमध्येही काम केले आहे. २००८ मध्ये अमेयने ‘जोशी की कांबळे’ या चित्रपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर ‘बिल्लू’, ‘अय्या’, ‘हायजॅक’, ‘गोविंदा नाम मेरा’ असे हिंदी चित्रपट, तर ‘फास्टर फेणे’, ‘गर्लफ्रेंड’, ‘झोंबिवली’, ‘मी वसंतराव’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’, ‘अनन्या’ हे मराठी चित्रपट त्याने केले.

टीव्ही मालिका, वेब मालिका, नाटक, चित्रपट अशा सर्व माध्यमांमध्ये अमेय वाघने विनोदी, गंभीर असे वैविध्यपूर्ण काम करून आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सध्याच्या पिढीतील आश्वासक अभिनेत्यांमध्ये अमेयचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.

दूरचित्रवाणीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील त्याची कैवल्य ही भूमिका लोकप्रिय ठरली. त्यानंतर त्याने ‘दिल दोस्ती दोबारा’ ही मालिका केली. भारतीय डिजिटल पार्टीच्या ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ या अनोख्या वेब मालिकेतून त्याचा वेबजगतात प्रवेश झाला. त्यानंतर ‘असूर’, अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘सेक्रेड गेम्स’, ‘ग्रेट इंडियन मर्डर’, ‘कार्टेल’ अशा विविध वेब मालिकांमध्ये अमेयने काम केले. अमेयला २०१५ मध्ये विनोद दोशी फेलोशिपने गौरवण्यात आले होते, तर ‘मुरांबा’ चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर पुररस्कारही मिळाला. टीव्ही मालिका, वेब मालिका, नाटक, चित्रपट अशा सर्व माध्यमांमध्ये अमेयने वैविध्यपूर्ण काम करून आपली ओळख निर्माण केली आहे. या पिढीतील आश्वासक अभिनेत्यांमध्ये अमेयचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.

संवेदनशील नाटककार

नीरज शिरवईकर – लेखन दिग्दर्शक

संवेदनशील आणि सामाजिक मूल्ये असलेली आशयनिर्मिती करत राहणं हा तरुण नाटककार नीरज शिरवईकर याचा ध्यास. मुंबई विद्यापीठातून ‘मास्टर इन थिएटर आर्ट्स’चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेला नीरज गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत आहे. आत्तापर्यंत त्याने पाच व्यावसायिक नाटकांचे लेखन, तीन नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय, एक बालनाटय़ आणि प्रायोगिक रंगभूमीवरील दोन नाटकांचेही दिग्दर्शन त्याने केले आहे.

नाटकातून आशय विषयाच्या बाबतीत सातत्याने प्रयोग करत राहणारा नीरज इतरही नवमाध्यमे चोखाळतो आहे. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवर त्याने लिहिलेल्या वा दिग्दर्शित केलेल्या सहा नाटकांचे प्रयोग सुरू आहेत. हा एक आगळा विक्रमच आहे.

आविष्कारसाठी त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘सॅड सखाराम’ या प्रायोगिक नाटकाबरोबरच ‘गोष्ट एका जंगलाची’ या त्याने दिग्दर्शित केलेल्या बालनाटय़ालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जात वेगळे काही देणारी आशयनिर्मिती नाटकातून व्हायला हवी, असं तो म्हणतो. त्यामुळे एकीकडे नाटकाची मांडणी आधुनिक असायला हवी, त्याचबरोबरीने सामान्य माणसांसारखीच रोजच्या आयुष्यात समस्यांशी झगडणारी, त्यावर मात करून आयुष्यात पुढे जाऊ पाहणारी अशी पात्रं लोकांना नाटकातून दिसायला हवीत आणि तोच नाटय़लेखन दिग्दर्शन करताना आपला प्रयत्न असतो, असं नीरज सांगतो. आशयाबरोबरच नाटकाची निर्मिती, नेपथ्य यातही वेगळेपण असायला हवं ही त्याची धडपड असते. नाटकातून आशय विषयाच्या बाबतीत सातत्याने प्रयोग करत राहणारा नीरज इतरही नवमाध्यमांचे वेगळेपण चोखाळतो आहे. त्याने ‘स्टोरीटेल’ या अ‍ॅपसाठी ‘हिडन कॅमेरा’ नावाची कथा लिहिली आहे. मराठी नाटय़ व्यवसाय आर्थिकदृष्टय़ा इतका सक्षम असायला हवा, की भविष्यातील नाटय़कर्मीना पूर्णवेळ करिअर म्हणून या एकाच क्षेत्राची निवड करता येईल, हा त्याचा आग्रह आहे. त्यादृष्टीने उच्चनिर्मितीमूल्ये आणि अनुभव देणाऱ्या नाटकांची निर्मिती हे नीरजचे ध्येय आहे.

आधार बेघर मनोरुग्णांना..

संदीप शिंदे – सामाजिक काम

करोनाकाळात बेघर, मनोरुग्ण, भिकारी यांची सर्व प्रकारची काळजी घेण्याची जबाबदारी संदीपने पत्नी नंदिनी आणि आपल्या मित्रांच्या सहकार्याने उचलली. संदीप मूळचा आर्णी तालुक्यातील चांदापूरचा. बारावीचे शिक्षण झाल्यावर यवतमाळात येऊन त्याने स्वत:चे हेअर सलून थाटले. लहान भावाच्या मृत्यूमुळे सैरभैर झालेल्या संदीपने एकटय़ानेच विविध धार्मिक स्थळांची भटकंती केली. यातूनच त्याला मनोरुग्णांच्या सेवेचा मार्ग गवसला. मनोरुग्णांना हेअर सलूनमध्ये आणून त्यांची दाढी, कटिंग करून, आंघोळ घालून देण्याची सेवा करू लागला. विदर्भातील मनोरुग्णांना शोधून मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांमध्ये त्यांना पोहोचवायला संदीपने सुरुवात केली.

मनोरुग्णांच्या सेवेसाठी संदीप व त्याची टीम सदैव तत्पर असते. रात्री-अपरात्री कधीही फोन आला तर संदीप मनोरुग्णांसाठी रुग्णवाहिका घेऊन पोहोचतो. नंददीपने आजवर ८७ मनोरुग्णांना पूर्ण बरे करून देशातील विविध राज्यात त्यांच्या घरी नेऊन सोडले आहे.

आजवर संदीपने १२१ मनोरुग्णांना राज्यातील विविध निवारा केंद्रांत सोडले आहे. या कामात त्याला मदतीचे अनेक हात पुढे आले. त्यानंतर मनोरुग्ण आढळला की संदीपला फोन हे समीकरण यवतमाळात रुळले. कालांतराने त्याने आपला सुस्थितीत चाललेला केशकर्तनालयाचा व्यवसाय भावाकडे सोपवून त्याने बेघर, मनोरुग्णांच्या जीवनात प्रकाश पेरणारी ‘नंददीप फाऊंडेशन’ ही संस्था तीन वर्षांपूर्वी यवतमाळमध्ये स्थापन केली. या कार्यात पत्नी नंदिनीची त्याला साथ आहे. यवतमाळ नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी या कार्यासाठी नगर परिषदेच्या अखत्यारीतील एका शाळेची जागा त्याला तात्पुरती  उपलब्ध करून दिली. या निवारा केंद्रात सध्या १५० निवासी मनोरुग्ण आहेत. मनोरुग्णांच्या सेवेसाठी संदीप व त्याची टीम सदैव तत्पर असते. रात्री-अपरात्री कधीही फोन आला तर संदीप स्वत: मनोरुग्णास घ्यायला आपली रुग्णवाहिका घेऊन पोहोचतो. ‘नंददीप’ने ८७ मनोरुग्णांना पूर्ण बरे करून देशातील विविध राज्यात त्यांच्या घरी नेऊन सोडले आहे.

यशस्वी रंगकर्मी

संकर्षण कऱ्हाडे – लेखन, दिग्दर्शकन, अभिनय

कवी, निवेदक, लेखक, दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता.. भविष्याची स्वप्ने घेऊन परभणीतून मुंबईत आलेल्या संकर्षण कऱ्हाडेच्या नावापुढे गेल्या १५ वर्षांत अशी अनेकविध बिरुदे लागली. त्याचा रंगमंचाशी परिचय झाला तो वयाच्या आठव्या वर्षी. पुढे बीएस्सी आणि एमबीएपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतरही त्याला अभिनयाची ओढ शांत बसू देत नव्हती. त्याने संगीतातील तीन पदव्या संपादन केल्या. २००८ साली ‘झी वाहिनी’च्या ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या स्पर्धात्मक कार्यक्रमातून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली.  ‘तू म्हणशील तसं’ या त्याने लिहिलेल्या पहिल्या व्यावसायिक नाटकात तो प्रमुख भूमिकेत असून या नाटकाची ३०० व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहे.

कवी, निवेदक, लेखक, दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता या रूपांत प्रेक्षकांना संकर्षण माहीत आहे.  तू म्हणशील तसंया त्याने लिहिलेल्या आणि त्याची प्रमुख भूमिका असलेल्या त्याच्या पहिल्या व्यावसायिक नाटकाची ३०० व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहे.

संकर्षण लिखित व दिग्दर्शित ‘सारखं काही तरी होतंय’ या नाटकात वर्षां उसगावकर आणि प्रशांत दामले असे ज्येष्ठ कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ‘लोभ असावा ही विनंती’, ‘मी रेवती देशपांडे’, ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकांत त्याने अभिनय केला आहे. ‘तू म्हणशील तसं’, ‘सारखं काही तरी होतंय’, ‘नियम व अटी लागू’ या नाटकांचे लेखन त्याने केले आहे. ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’, ‘फु बाई फु’, ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकांत त्याने अभिनय केला आहे. ‘राम राम महाराष्ट्र’, ‘आम्ही सारे खवय्ये’, ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ अशा कार्यक्रमांचे निवेदन त्याने केले आहे. राज्य नाटय़ स्पर्धा पुरस्कार, झी मराठी पुरस्कार, कामगार कल्याण पुरस्कार, मराठवाडा गौरव पुरस्कार अशा विविध

पुरस्कारांनी संकर्षणला गौरविण्यात आले आहे. तो लवकरच ऋषीकेश जोशी लिखित- दिग्दर्शित चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेले ‘नियम व अटी लागू’ हे नाटक रंगभूमीवर आले आहे.

कर्करोगावर प्रभावी संशोधन

डॉ. दर्शना पाटील – वैद्यकीय संशोधन

कर्करोगाचे निदान आणि उपचारांशी संबंधित परिस्थिती बदलण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. दर्शना पाटील द्रवरूप अर्थात लिक्विड बायोप्सी, परिसंचारी टय़ूमर सेल्स (सीटीसी) च्या संशोधनात कार्यरत आहेत. एमडी पॅथॉलॉजीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्पेनमधून मास्टर इन मॉल्युक्युलर ऑन्कॉलॉजीची पदवी प्राप्त केली. नाशिक येथील दातार कॅन्सर जेनेटिक्समध्ये त्या वैद्यकीय संचालक आहेत. त्यांच्या पुढाकारातून २०१३ मध्ये लिक्विड बायोप्सीज ही कर्करोगावरील उपचारात उपयुक्त ठरणारी पद्धती देशात प्रथमच आणली गेली. त्याचा आतापर्यंत १० हजारच्या आसपास रुग्णांना लाभ झालेला आहे. कर्करोगाचे निदान करण्यात मदत करणाऱ्या तीन वेगवेगळय़ा रक्त चाचण्यांना अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने क्रांतिकारी संशोधनाचे मानांकन दिले आहे.

दर्शना यांच्या पुढाकारातून २०१३ मध्ये लिक्विड बायोप्सीज ही कर्करोगावर उपयुक्त ठरणारी पद्धती देशात प्रथमच आणली गेली. त्याचा आतापर्यंत १० हजारच्या आसपास रुग्णांना लाभ झालेला आहे. त्या नाशिक येथील दातार कॅन्सर जेनेटिक्समध्ये वैद्यकीय संचालक आहेत. मेंदूच्या कर्करोगाचे निदान करणारी यूएसएफडीएची मान्यता मिळालेली कंपनीची ही तिसरी चाचणी आहे. प्रारंभीच्या टप्प्यात स्तन आणि प्रोस्टेट कर्करोग शोध चाचणीला हेच मानांकन मिळाले होते. कर्करोगाचे निदान केवळ रक्त तपासणीने करणारी ही पद्धती आहे. अलीकडे विकसित केलेल्या चाचणीने टय़ूमर पेशी संवर्धन आणि शोध या तंत्रज्ञानामुळे ही चाचणी मेंदूच्या टय़ूमरसारख्या अत्यंत आव्हानात्मक कर्करोगाचे अचूक निदान करू शकते, असे त्या सांगतात. मेंदूच्या कर्करोगाच्या जवळजवळ ४० टक्के रुग्णांमध्ये बायोप्सी करता येत नाही. त्रिनेत्र ग्लिओ द्रवरूप बायोप्सीचा उद्देश मेंदूच्या गाठीतून रक्तात सोडल्या गेलेल्या अत्यंत दुर्मीळ पेशी शोधणे हा आहे. लंडन येथील इम्पिरियल महाविद्यालयातील संशोधन पथकाने केलेल्या प्रोस्पेक्टिव्ह ब्लाइंडेड संशोधनाने ही चाचणी अत्यंत अचूक असल्याचे मान्य केले आहे. त्यासाठी केवळ १५ मिली रक्तनमुना घेतला जातो. या चाचणीला युरोपमध्ये सीई प्रमाणपत्रही मिळाले आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 01:27 IST

संबंधित बातम्या