scorecardresearch

लोकसत्ता तरुण तेजांकित : कोल्हापुरातही कामांचा धडाका

आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ म्हणजे वेगळं काही करू पाहणारे कर्तृत्ववान तरुण. ‘लोकसत्ता’ अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर आणत आहे. आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..

गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागांत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उत्तम काम करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना २०१९च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरवण्यात आले. बलकवडे सध्या कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक असून कोल्हापुरातही त्यांनी कामाचा धडाका सुरूच ठेवला आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक असताना जिल्ह्यामध्ये प्राथमिक सुविधा आणि संपर्क यंत्रणा तंत्रज्ञान सुधारण्यासाठी प्रयत्न केले. संपर्काचे सक्षम जाळे तयार झाले. रस्ते, शिक्षण, आरोग्य आदी विकासकामांनाही त्याची मदत झाली. कोल्हापुरातही त्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. सैन्यदल, निमलष्करी दल आदी ठिकाणी सेवेत असणाऱ्या सैनिकांचे गावाकडे काही विवाद झाल्यास तो चिंतेत असतो. त्यांच्या पत्राची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी विशेष कक्ष कार्यरत केला. पोलिसांचे अपघाती निधन, मनोधैर्य योजनेतील पीडिता तसेच अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याअंतर्गत भरपाईची रक्कम मिळण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला. गुन्ह्यातील सापडलेला मुद्देमाल वर्षांनुवर्षे पडून राहतो. तो सत्वर परत केला जावा यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना इष्टांक ठरून काम दिले. महापूर, करोना संसर्गकाळात सामान्य जनतेसाठी दक्ष राहून त्यांनी काम केले. उत्कृष्ट तपास व शोधकार्यासाठी देण्यात येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री पदकाने त्यांना गौरवण्यात आले आह़े

शैलेश बलकवडे  लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१९

चौफेर मुशाफिरी करत क्षितिजभरारी

आपलीच रुळलेली वहिवाट मोडून सातत्याने लेखनशैलीत नवनवे प्रयोग तो करत राहतो. एकांकिका लेखनापासून सुरू झालेला त्याचा प्रवास हिंदूी चित्रपट पटकथा लेखनापर्यंत पोहोचला आहे. किंबहुना त्याही पुढे लेखनातील नवे आयाम शोधण्याचे त्याचे प्रयत्न सुरू आहेत.  मराठी चित्रपसृष्टीत तरुण वयात पटकथा लेखक आणि गीतकार म्हणून नावलौकिक कमावणाऱ्या क्षितिज पटवर्धनला २०१९च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठीत कथा पटकथा लेखक म्हणून अनेक चित्रपट आणि उत्तम गाणी देणाऱ्या क्षितिजने हिंदूीतही गीतकार म्हणून पदार्पण केले आहे. करोनाकाळात ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटासाठी त्याने ‘फिसल जा तू’ हे पहिलं हिंदूी गाणं लिहीलं होतं. त्याने लिहिलेल्या ‘मन में है मैदान’ या गाण्याला महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभला आहे. भाषेचे बंधन न मानता हिंदूीत गीतलेखन करतानाही वेगवेगळय़ा भाषांचा त्याचा अभ्यास सुरू आहे. मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात अनुभवलेला या शहरातील बदलाचा चेहरा त्याने त्याच्या ‘आधी नींद आधा ख्वाब’ या पहिल्या हिंदूी कवितासंग्रहात टिपला आहे. त्याचा हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. मराठीतही त्याने दोन चित्रपट लिहिले आहेत. हिंदूीतही एका नामांकित निर्मिती संस्थेसाठी क्षितिज कथालेखन करतो आहे. वेबमलिकांसाठीही त्याचे कथालेखन सुरू आहे.

क्षितिज पटवर्धन  लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१९

मायेचा पाणवठाअविरत सुरू

जखमी, अपंग असलेल्या प्राण्यांवर मायेची फुंकर घालण्याचे काम ‘पाणवठा’ या संस्थेमार्फत केले जाते. बदलापूरच्या चामटोली गावातील ‘पाणवठा-अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम’ गणराज जैन चालवतात. २०१९च्या तरुण तेजांकित पुरस्काराने गणराज जैन यांना गौरवण्यात आले. अपंग प्राण्यांचा सांभाळ करणाऱ्या पाणवठा आश्रमाच्या गणराज जैन यांनी गेल्या चार वर्षांत १६० हून अधिक प्राण्यांना आसरा दिला आहे. आपल्या आश्रमाचा त्यांनी विस्तार करत अधिक प्राणी येथे ठेवता येतील अशी व्यवस्था केली आहे. त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या तीन वर्षांत ६० हून अधिक अपंग प्राण्यांना प्राणीमित्रांनी दत्तक घेतले आहे.  दोन वर्षांपूर्वी उल्हास नदीला आलेल्या पुरात स्वत:चा जीव धोक्यात घालून जैन यांनी आपल्या प्राण्यांचा बचाव केला होता. त्यांच्या या  कार्याचा विविध संस्थांनी गौरव केला आहे. नुकताच गिरिजाई प्रतिष्ठानचा मानाचा सेवाव्रती पुरस्कार गणराज जैन यांना प्रदान करण्यात आला आहे.

गणराज जैन  लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१९

प्रायोजक

*  मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) 

*  सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., वल्र्ड वेब सोल्युशन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

*  पॉवर्ड बाय :  महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta tarun tejankit winners life story zws

ताज्या बातम्या