शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. संसारात तेलामीठासाठी केला जाणारा हा जोडधंदा आता मुख्य व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. कुक्कुटपालन, संकरित गायींचे पालन याबरोबरच शेळी-मेंढी पालन हाही मुख्य आणि चांगल्या अर्थार्जनाचा व्यवसाय ठरला आहे. दुष्काळी भागात तर मेंढीपालन करणे पारंपरिक मानले जाते. सांगली जिल्ह्यातील माडग्याळ या लहानच्या खेेड्यात माडग्याळी मेंढीपालन केले जाते. चवदार मांस, लोकर आणि दुधासाठी या मेढींचे संगोपन अधिक प्रमाणात व्हावे यासाठी प्रयत्नांची मात्र गरज आहे.
जत तालुक्यातील माडग्याळ हे साधारण आठ हजार लोकसंख्या असणारे सर्वसाधारण गाव आहे. याच गावातील मेंढपाळ व रामोशी समाजातील पशुपालकांनी अत्यंत नियोजनपूर्वक निवड पद्धतीने ही प्रजाती विकसित केली आहे. वेगाने होणारी वजनवाढ आणि मांसासाठी प्रसिद्ध असणारी ही मेंढी आज सर्वदूर अनेक राज्यांत पोहोचली आहे आणि पोहोचत आहे. जत तालुक्यातील माडग्याळ, सनमडी गावासह आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. अलीकडे राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील मेंढपाळांची पसंती या मेंढीला असल्याने सगळीकडे आपल्याला या मेंढ्या, मेंढे असलेले कळप दिसून येतात. कर्नाटक, आंध्र प्रदेशातील व्यापारीदेखील मोठ्या प्रमाणात या मेंढीच्या खरेदीसाठी आपल्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पशु बाजारात येत असतात.
या मेंढ्यांमध्ये प्रामुख्याने पांढर्या रंगावर तपकिरी ठिपके असतात. काही वेळा तपकिरी रंगाच्या देखील असतात. शरीराचा मर्यादित आकार, आकर्षक रोमन पद्धतीचे बाकदार नाक यामुळे पाहताक्षणी पशुपालक त्यांच्या प्रेमात पडतो. पोपटी नाक, शेपूट पातळ व मध्यम आकाराची असते. लोकर अत्यंत खडबडीत व केसाळ असते. कपाळ रुंद व फुगीर असते. पाय लांब, मजबूत व राखाडी खुरासह पातळ असतात. डोळ्याभोवती तपकिरी रंगाचे वलय असते. पाठीचा कणा सरळ असतो. नर व मादी यांच्यात शिंगे नसतात. कास गोल व सड टोकदार हे देखील एक वैशिष्ट्य आहे. कान हे लांब व लोंबकळणारे असतात.
उत्तम वजनवाढ त्यातून मिळणारे मांस उत्पादन हे याचे वैशिष्ट्य आहे. जुळी कोकरे देण्याचे प्रमाण देखील यांच्यामध्ये जास्त आहे. जन्माच्या वेळी कोकराचे वजन साधारण ३.५ ते ४ किलो पर्यंत असते. सर्व प्रकारची काळजी, उत्तम आहार दिल्यास वर्षभरामध्ये २० ते २५ किलोपर्यंत यांची वाढ होते. संपूर्ण वाढ झालेल्या मेंढ्यांचे वजन ४० ते ४५ किलोपर्यंत असू शकते. वयस्कर नर साधारण ५५ ते ६० किलो तर मादी ४० ते ४५ किलो वजनाची असते.
अत्यंत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी ही जात पशुपालकांसाठी वरदान ठरलेली आहे. विशेष म्हणजे बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता यांची खूप चांगली आहे. या सर्व कारणामुळे या मेंढ्यांचे संगोपन समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना करणे सोयीस्कर व फायदेशीर ठरत आहे. विशेष म्हणजे यांचे व्यवस्थापन करताना खास कौशल्याची गरज नाही. या मेंढ्यांच्या संगोपनासाठी सुद्धा फार आर्थिक पाठबळाची गरज नसते. सोबत करडांना बाजारपेठेत वर्षभर मागणीदेखील असते. मेंढ्यांपासून मांस हा मुख्य उत्पन्नाचा स्रोत असला तरी त्यातून काही प्रमाणात लोकर, लेंडी खत, दूध सुद्धा उत्पन्नाचे साधन आहे.
अशी ही रुबाबदार मेंढी सन २००३ मध्ये जत तालुक्यात त्यावेळी काम करणारे उमदी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीधर शिंदे आणि सोन्याळ येथे काम करणारे पशुधन विकास अधिकारी डॉ. बबन कांबळे यांच्या नजरेस पडली. स्थानिक मेंढपाळांशी चर्चा करून त्याविषयी सर्वसाधारण माहिती गोळा केली. सदर माहिती मुंबई येथे झालेल्या पैदास धोरण (ब्रिडींग पॉलिसी) संबंधित मुंबई येथील विशेष सभेत त्यावर प्रकाश टाकला आणि सदर मेंढी विभागाच्या नजरेस आणून दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाने संवर्धनासाठी प्रयत्न केले. आज त्यांची संख्या बर्यापैकी राज्यात जवळजवळ एक लाखाच्या वर गेली असल्याचे कळते.
अशा या रुबाबदार मेंढीच्या जोरावर जिल्ह्यातील अनेक पशुपालक लक्षाधीश आणि कोट्यधीश झाले आहेत. आटपाडीत सोमनाथ जाधव हे वीस वर्षापासून माडग्याळ मेंढीपालन करतात. त्यांनी बांधलेल्या बंगल्यावर मेंढ्याचा पुतळा देखील उभा केला आहे. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील अनेक मेंढपाळ आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले आहेत आणि होत आहेत.
चाणाक्ष मेंढपाळ हा ३५ ते ४० मेंढ्यांचा छोटा कळप सांभाळतो. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन देखील त्याला शास्त्रीय पद्धतीने करता येते. अशा छोट्या कळपातून वर्षाला लाखो रुपये मिळतात. माडग्याळ परिसरातील सनमडी, सोन्याळ, घोलेश्वर, आप्पाचीवाडी, कोणीकोन्नूर या गावात शुद्ध जातीच्या माडग्याळ मेंढीचे संवर्धन व संगोपन केले जाते. थेट विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात केली जाते. दर शुक्रवारी माडग्याळ गावच्या बाजारात देखील मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल ही माडग्याळ मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीतून होत असते.
माडग्याळ मेंढीचे संवर्धन व संगोपन हे जिल्ह्यातील मेंढपाळ आणि रामोशी समाजातील पशुपालकांनी निवड पद्धतीने केले आहे. त्यासाठी जवळजवळ १०० वर्षाचा कालावधी लागला आहे. या रुबाबदार व सगळ्यांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर सर्वांनीच आपापल्या परीने मदत केली आहे. पशुसंवर्धन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ गोखलेनगर पुणे यांच्यासह सर्व स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत विविध उपचार, लसीकरण, जंतनाशके पाजणे, व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करून हातभार लावला.
एक गोष्ट मात्र निश्चित, कोणतीही प्रजाती जर रुजवायची असेल, वाढवायची असेल तर त्यामध्ये पशुपालकाचा सक्रिय सहभाग खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी राज्यात सर्व देशी पशुधनाच्या स्थानिक पातळीवर जाती संवर्धन संस्था स्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. राज्यात तसा प्रयत्न महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ मार्फत सुरू आहे.
काही स्थापन झाल्या आहेत. त्यांना शासकीय पाठबळ असणे खूप महत्त्वाचे आहे. येणार्या काळात मात्र निश्चितच याबाबत ठोस कारवाई पशुसंवर्धन विभागामार्फत अपेक्षित आहे. याला अनुसरूनच माडग्याळ मेंढीसाठी राजमाता माडग्याळ शीप ब्रिडर्स असोसिएशन स्थापन करण्यात आली आहे. सदर संस्थेची स्थापना ६ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आली आहे. त्याद्वारे माडग्याळ मेंढ्याचे संवर्धन व जतन करणे, आनुवंशिक सुधारणा होण्याकरिता पैदास धोरण राबवणे, मांस, दूध आणि लोकर यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे, गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करणे, अद्ययावत तंत्रज्ञान मेंढपाळापर्यंत पोहोचवणे, चर्चासत्रे प्रशिक्षण पशू प्रदर्शने आयोजित करणे अशा प्रकारचे ध्येय व धोरणाने प्रेरित होऊन सदर संस्था सध्या काम करत आहे.
मांस, लोकर आणि दूध देणार्या माडग्याळी मेंढीचे संवर्धन करण्यासाठी आणि यातून रोजगार व उद्योगनिर्मिती होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. आजच्या घडीला आटपाडीमध्ये भरणार्या आठवडी बाजारात कोटींची उलाढाल मेंढी खरेदी-विक्रीत होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार्या या मेंढी संशोधन केंद्रावर शासनाने लक्ष केंद्रित केले तर निश्चितच लाभ होईल. – डॉ. व्यंकटराव घोरपडे, सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन.
digambarshinde64 @gmail.com
