पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
अटलबिहारी वाजपेयी हे प्रेमळ व्यक्तिमत्व होते व अजातशत्रू होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे स्नेहाचे संबंध होते. विचारांचा त्यांनी कधी दुराग्रह केला नाही. हिंदुत्वाचा अजेंडा राबविण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. विरोधकांना विश्वासात घेण्याचे त्यांच्याकडे विशेष कसब होते. नेमकी हीच बाब विद्यमान भाजप नेतृत्वाकडे आढळत नाही. १९९८ मध्ये काँग्रेस पक्षाने वाजपेयी सरकारच्या विरोधात मांडलेला अविश्वासाचा ठराव एका मताने मंजूर झाला होता. वाजपेयी यांना राजीनामा द्यावा लागला. वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान करणाऱ्यांमध्ये मी सुद्धा होते. पण याची कटुता त्यांनी कधी येऊ दिली नाही. या पराभवानंतरही त्यांनी विरोधी नेत्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवले. १९९९ ते २००४ या काळात ते पंतप्रधानपदी होते. पोखरणची अणुचाचणी हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे काम होते. अमेरिकेचा विरोध डावलून त्यांनी तेव्हा अणुचाचणी केली होती. अमेरिकन उपग्रहांची नजर चुकवून चाचणीसाठी सारी तयारी करण्यात आली होती. या चाचणीचे सारे श्रेय वाजपेयी यांनाच द्यावे लागेल.




पंडित नेहरू यांच्यापासून काँग्रेस नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. २००४ मध्ये वाजपेयी यांच्या सरकारचा पराभव झाला आणि डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले. तेव्हा आपण पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होतो. पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून वाजपेयी यांच्याशी संबंध येत असे. ते साऱ्यांनाच सहकार्य करीत. डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना ते वाजपेयी यांची भेट घेऊन चर्चा करीत असत. पी. व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान असताना संयुक्त राष्ट्रसंघात भारताची बाजू मांडण्याची जबाबदारी तत्कालीन विरोधी पक्षनेते वाजपेयी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. भारतातील सर्व पक्ष महत्त्वाच्या प्रश्नावर एक आहेते जगाला दाखवून द्यायचे होते. वाजपेयी यांनीही विरोधी पक्षनेते असूनही ती जबाबदारी स्वीकारून मोठेपणा दाखविला होता. तेव्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगळे सौहार्दाचे संबंध होते.
रथयात्रेत भाग घेतला नाही
भाजप किंवा संघ परिवाराने धार्मिक भूमिका मांडली असली तरी वाजपेयी यांनी या भूमिकेपासून फारकत घेतली होती. यामुळेच लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेत सहभागी होण्याचे त्यांनी टाळले होते. २००२ मध्ये गुजरात दंगलीनंतर वाजपेयी यांनी राजधर्म पाळण्याचा सल्ला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांना दिला होता. मोदी यांनी तो पाळला नाही हे वेगळे.
दहा वेळा लोकसभा आणि दोनदा राज्यसभेवर निवडून आलेले वाजपेयी खऱ्या अर्थाने उत्कृष्ट संसदपटू होते. भाजपमधील वाजपेयी युगाचा अस्त झाला आहे.