scorecardresearch

कृषी हवामान अंदाजासाठी ‘महावेध’ प्रकल्प!

‘महावेध’ या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील प्रत्येक महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित केले आहे.

दयानंद लिपारे dayanand.lipare@expressindia.com

शेतीमध्ये हवामान अंदाजाला खूप महत्त्व असते. शेतकऱ्यांना हवामानविषयक अचूक अंदाज मिळावा यासाठी स्कायमेट या हवामान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेबरोबर राज्य शासनाने करार केला आहे. यातूनच ‘महावेध’ हा प्रकल्प आकारास आला आहे. या अंतर्गत राज्यातील प्रत्येक महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित केले जात आहे. या योजनेविषयी..

हवामान बदल हा कृषी क्षेत्राच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. बेभरवशी पावसामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून चिंतातूर बसलेला असतो. तर कधी कमी कालावधीत तुफान पाऊस होऊन हातचे पीक वाया जाते. अशा दुर्धर परिस्थितीला सामोरे जाताना शेतीचे अतोनात नुकसान होते. यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना हवामानविषयक अचूक अंदाज मिळावा यासाठी स्कायमेट या हवामान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेबरोबर करार केला आहे. ‘महावेध’ या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील प्रत्येक महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित केले आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला लाभ होत असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत.

हवामान घटकातील दिवसाचे किमान व कमाल तापमान, वातावरणातील सापेक्ष आद्र्रता, पडणाऱ्या पावसाचे प्रमाण आणि तीव्रता, वाऱ्याचा वेग या महत्त्वाच्या हवामान घटकांना पिकांची निवड करणे, तसेच पीक वाढीच्या कालावधीमध्ये त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे यासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागतिक वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामानाच्या या घटकातील चढ-उतार हा पिकांची पेरणी, त्याची वाढ, पिकासाठी खतांचे नियोजन, त्याचबरोबर पिकांवर पडणारे कीड-रोग यापासून पिकांचे संरक्षण करणे, पिकांचे सिंचन व्यवस्थापन, पिकाच्या काढणी बरोबरच त्याची साठवणूक यामध्ये या हवामान घटकांचा मोठय़ा प्रमाणावर परिणाम होत असतो.

या हवामान घटकांची योग्य आणि खात्रीशीर माहिती शेतकऱ्याला त्याचा पीक उत्पादनावरील खर्चात बचत करायला व अधिकाधिक उत्पन्न घ्यायला मदत करू शकेल. प्रधानमंत्री पीकविमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना या दोन्ही विमा योजनांमध्ये हवामान घटकांची स्थानिक माहिती नुकसान भरपाई निश्चित करताना उपयुक्त ठरते. शेती हा सर्वाधिक जोखमीचा व्यवसाय. निसर्गाच्या आणि सरकारच्या बेभरवशी कारभारावर आयुष्याचे गणित बांधणाऱ्या या जोखमीबद्दल किमान आज तरी बोलले पाहिजे. निसर्गातील अनियमिततेमुळे निर्माण होणाऱ्या उत्पादनविषयक जोखमीबरोबरच सरकारच्या अवाजवी नियंत्रणांमुळे निर्माण झालेल्या बाजारपेठीय आणि वित्तीय जोखीमेमुळे आज शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बियाणे, खते, कृषी माल खरेदी-विक्री यांसारख्या शेतीविषयक बाबींमधील सरकारी गोंधळ दूर झाला पाहिजे. शेतीतील जोखीम कमी करून शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य करण्याचा हाच रास्त मार्ग म्हणता येईल. हवामान बदलामुळे भारतीय शेतीतील उत्पादनांचे धोके अधिक वाढले आहेत. ‘आयपीसीसी’च्या (इंटरगव्हर्नमेन्टल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) भारताबाबतच्या अंदाजानुसार दख्खन पठाराआसपासच्या पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांना दुष्काळाचा सामना करावा लागेल. भारतीय कृषी संशोधन परिषदेने  (आयसीएआर) भारतीय शेतीवरील हवामान बदलांच्या प्रभावाकडे  लक्ष देण्यासाठी २०११ मध्ये कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि आयसीएआरचे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय देखरेख समिती द्वारे ‘नीकरा’ या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. ज्यामध्ये केंद्र  सरकारच्या वेगवेगळय़ा मंत्रालयांचे प्रतिनिधित्व निमंत्रित सदस्यांनी केले. या समितीने  बदलत्या हवामानानुसार भारतीय शेती अधिक परिस्थिती अनुरूप लवचिक बनविण्यासाठी एनआयसीआरएच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय एखादी तज्ज्ञ समिती नियमितपणे या प्रकल्पाचा आढावा घेते आणि विविध बाबींवर सल्ला देते.

असा साकारला महावेध

शेतकऱ्यांना हवामानाबाबत आश्वस्त करणारा एक प्रकल्प राबविण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन होते. यानुसार २०१७ साली राज्य शासनाने निविदा मागवल्या होत्या. हा प्रकल्प राज्य शासनाची जागा आणि संबंधित कंपनीची यंत्रसामग्री असा संयुक्त भागीदारीत आहे. याअंतर्गत स्कायमेट वेदर सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली या राष्ट्रीय पातळीवर हवामानविषयक काम करणाऱ्या संस्थेची निविदा मंजूर झाली. राज्यात २०६१ मंडळांमध्ये प्रत्येकी एक प्रमाणे ५ बाय ७ मीटर जागेमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभे करण्यात आले आहे. हवामान सल्ला केंद्र विकसित करणे, कृषी हवामान सल्ला केंद्र विकसित करणे, आपत्ती व्यवस्थापन संशोधन आणि विकास तसेच राज्यात कल्याणकारी विकास योजना राबवण्यास सहाय्यभूत होणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ‘वेध हवामानाचा.. शेतकरी कल्याणाचा’ हे या प्रकल्पाचे उद्देश दर्शवणारे ब्रीदवाक्य आहे. पुढील १५ दिवसांमध्ये या हवामान घटकांची स्थिती काय राहणार आहे. याविषयीची माहिती देखील शेतकऱ्यांना मिळू शकते. त्यानुसार या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाची निवड, लागवड, त्याचे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन त्याचबरोबर कीड व रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव याच्या दृष्टीने घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना अशा विविध शेती व्यवस्थापनाशी निगडित बाबींवर निर्णय घेऊन आपला पीक उत्पादनाचा खर्च कमी करून अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतो. स्कायमेटकडील माहितीचा स्रोत पीकविमासारख्या कंपन्यांना होतो. त्यातून कंपनीला उत्पन्न मिळते, पण शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मोफत मिळतो.

राज्यात हवामान स्वयंचलित हवामान केंद्राचे जाळे उभारले असून त्याद्वारे पर्जन्यमान, तापमान, हवेतील सापेक्ष आद्रता, वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याच्या दिशा या वातावरणातील घटकांचे मोजमाप केले जाते. जमा झालेली हवामानविषयक माहिती ही हवामान आधारित पीकविमा योजना, हवामान अंदाज, पीकविषयक सल्ला, हवामानविषयक संशोधन आणि इतर कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सहाय्यभूत ठरत आहे. या प्रकल्पाचा कालावधी ७ वर्षे आहे. आत्तापर्यंत तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. हा सर्व डाटा मोबाईलद्वारा  पुणे येथील कृषी महाविद्यालयात पाठविला जातो. तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांना अ‍ॅपद्वारा हवामान बदलाचा अचूक अंदाज मिळतो. पाऊस येणार असल्याची शक्यता वर्तवली गेली की अनेक शेतकरी महागडय़ा कीटकनाशकांची फवारणी करण्याचे टाळतात. असे अनेक फायदे या उपक्रमातून झाले असल्याचे शेतकऱ्यांनी आम्हाला कळवले आहे.

–  योगेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्कायमेट, पुणे

या हवामान केंद्राच्या माध्यमातून सॅटेलाईटद्वारे विविध हवामान घटकांची माहितीही संगणकाला नियमित प्राप्त होत असते. आणि हीच आकडेवारी शासनाच्या महसूल, मदत आणि पुनर्वसन, कृषी व इतर  विभागांना प्रमाणभूत माणण्यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत. प्रधानमंत्री पीकविमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना या दोन्ही विमा योजनांमध्ये हवामान घटकांची या प्रकल्पातून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. शेतकऱ्यांना नजीकच्या स्वयंचलित हवामान केंद्रातील हवामान घटकांची झालेल्या नोंदींची माहिती स्कायमेट वेदर अ‍ॅपद्वारे त्यांच्या मोबाइलवर मोफत मिळू शकते. त्या स्वयंचलित हवामान केंद्राच्या ठिकाणचे कमाल व किमान तापमान, सापेक्ष आद्र्रता, वाऱ्याचा वेग व पर्जन्यमान या ४ घटकांची माहिती प्रत्येक तासनिहाय मिळू शकते. तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी स्कायमेट वेदर अ‍ॅप डाऊनलोड करून त्या माहितीचा आपल्या शेती नियोजनामध्ये प्रभावीरीत्या वापर करावा.

विनयकुमार आवटे, मुख्य सांख्यिक, कृषी विभाग पुणे 

महावेध प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ७६ कृषी मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या अंतर्गत दर्शवण्यात आलेले हवामानाचे अहवाल बरेच अचूक ठरत आहेत. याचा सामान्य शेतकऱ्यांना चांगला लाभ होत असल्याचे दिसून आले आहे.

ज्ञानदेव वाकुरे, कृषी अधीक्षक, कोल्हापूर

हवामान बदलाचा शेतीला मोठा फटका बसतो. हे लक्षात आल्याने स्वत:च्या शेतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र सुरू केले आहे. याचा चांगला लाभ आमच्याकडे ४५ एकर बागायती शेतीला होत आहे. विशेषत: फळबाग आणि भाजीपाला या पिकांची उगवण होऊन बाजारात जाईपर्यंतच्या प्रक्रियेत हवामान केंद्राचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. याच्या जोडीला स्वत:चे जीवाणू तयार करणारी प्रयोगशाळा तयार केली आहे.

राहुल रसाळ, शेतकरी, निघोज (ता. पारनेर)

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra government skymet join hand for automatic weather stations zws

ताज्या बातम्या