दिवाळी सणाची मंगलमय चाहूल लागताच ग्रामीण भागातील गोठ्या-गोठ्यांतून एक पारंपरिक साद घुमू लागते ‘दिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी, गाई-म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या… लक्ष्मण कोणाचा ? आई-बापाचा… ‘आपल्या संस्कृतीत दीपावलीचा प्रारंभ वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशीने होतो. सायंकाळी रानावनातून परतलेल्या गाय-वासरांचे औक्षण करून, फराळाचा पहिला घास त्यांना भरवला जातो. दिवाळीच्या दिवसांत शेणाच्या गवळणी, गोवर्धन आणि पांडव अंगणात थापून त्यांची पूजा करण्याची आपली समृद्ध लोकपरंपरा आजही टिकून आहे. मात्र, परंपरेच्या या भावनिक आणि श्रद्धेच्या चौकटीपलीकडे जाऊन पाहिले, तर आज राज्यातील गोशाळांचे वास्तव अत्यंत चिंताजनक आणि आव्हानात्मक दिसते.
‘सरकार व्यवस्था निर्माण करू शकते, पण अवस्था बदलण्याचे काम समाज आणि संस्थाचालकांनाच करावे लागेल,’ हे महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचे प्रतिपादन गोशाळांच्या सद्यः स्थितीवर थेट बोट ठेवणारे आहे. राज्य शासनाने देशी गोवंशासाठी प्रतिदिन ५० रुपयांचे अनुदान सुरू करून महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी आणले. राज्यातील नोंदणीकृत ९८६ पैकी ६०० पात्र गोशाळांना १३२ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला; तरीही संस्थांची आर्थिक ओढाताण थांबलेली नाही. अनुदानाच्या भरवशावर गोशाळांचा प्रपंच कायमचा ओढता येणार नाही, हे ओळखूनच आयोगाने संगोपन, संवर्धन, गोमय मूल्यवर्धन, सक्षमीकरण, गोरक्षक संरक्षण, गो-शेती, गोपालक विकास, साक्षरता आणि पर्यटनाचा समावेश असलेली ‘१०-गो’ सूत्री मांडली आहे.
शेण-गोमूत्रातून समृद्धीची वाट… गोशाळांच्या स्वावलंबनाची खरी
ताकद कचरा मानल्या जाणाऱ्या शेण आणि गोमूत्राच्या मूल्यवर्धनात दडलेली आहे. राज्यातील गोशाळांमध्ये सध्या १ लाख ५३ हजार गोवंश आश्रयाला आहे. एका जनावरापासून सरासरी १० किलो शेण गृहीत धरले, तरी दररोज १५ लाख ३० हजार किलो शेण उपलब्ध होते. यातून उच्च प्रतीचे सेंद्रिय खत, बायोगॅस आणि कंप्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्प उभारणे सहज शक्य आहे. जळगावच्या आर. सी. बाफना गोशाळेने वर्षाला तब्बल दोन कोटी रुपयांच्या गोखताची विक्री करून दाखवलेला आदर्श इतर गोशाळांसाठी दिशादर्शक आहे. स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी गोशाळांनी तयार केलेल्या ‘गोकाष्ठ’ चा वापर अनिवार्य केल्यास वृक्षतोड रोखता येईल आणि गोशाळांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत मिळेल. गेल्या वर्षी राज्यात तब्बल ११ कोटींच्या गोमय गणेशमूतींची विक्री झाली असून, हे उद्दिष्ट आता २१ कोटींवर नेण्याचा मानस आहे, सांगलीतील १९ गोशाळांनी शेडवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीजबिल शून्यावर आणलेच, शिवाय अतिरिक्त वीज विकून नफा कमावला आहे.
आरोग्य व्यवस्थापन आणि शुद्ध संवर्धन…
आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रयत्नांत जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष चालणार नाही. लंपी, ब्रुसेलोसिस आणि मानवात पसरू शकणारा टीबी यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने विलगीकरण व नियमित तपासण्या आवश्यक आहेत. देशी गोवंशाच्या शुद्ध संवर्धनासाठी राज्यात लागू झालेला ‘बोव्हाइन ब्रीडिंग अॅक्ट’ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. बनावट सीमेन विकणाऱ्यांना थेट दोन वर्षाच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. हरितक्रांतीतील रासायनिक खतांचा अतिरेक आणि संकरित गायींमुळे आपला देशी गोवंश मागे पडला. राज्यातील एकूण गोवंश १ कोटी ३५ लाखांवरून १ कोटी १५ लाखांवर घसरला असला, तरी व्यापक जनजागृतीमुळे देशी गायींची संख्या १३ लाख ४१ हजारांवरून २० लाख ३१ हजारांवर पोहोचली आहे. आता विषमुक्त शेतीसाठी ‘तपकिरी क्रांती’ (ब्राउन रिव्होल्यूशन) अनिवार्य बनली आहे.
गो-पर्यटन आणि सुरक्षेबाबत धोरणात्मक निर्णय…….
नव्या पिढीत गोवंशाचे महत्त्व रुजवण्यासाठी शाळांमधून ‘गो-साक्षरता’ मोहीम राबवली जात आहे. पुण्यात कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत उभारलेले केंद्र हे पहिले गो-टुरिझम केंद्र ठरले असून, नागपूरजवळील कोराडी येथे १० एकरांवर दुसरे भव्य केंद्र साकारत आहे. दुसरीकडे, गोसंरक्षणाच्या नावाखालील खंडणीखोरी मोडून काढतानाच निष्ठावंत गोरक्षकांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. गोवंशाची तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांवर ‘मकोका’ लावून ९३ जणांना तडीपार करण्यात आले आहे. नागपूरच्या गोसंवाद यात्रेच्या सांगतेत गायींसोबतच बैल व वासरांच्या संगोपनाचे प्रश्नही ऐरणीवर येत आहेत. केवळ शासकीय मदतीच्या अपेक्षेवर न राहता गोशाळांनी सोलापूर व सांगलीप्रमाणे प्रक्रिया उद्योग, व्यावसायिक व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन स्वीकारले, तरच या संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि आपली गोसंस्कृती टिकून राहील.
शाश्वत भविष्यासाठी आर्थिक स्वावलंबनाची आवश्यकता…
राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले, ‘केवळ सेवा भाव, श्रद्धा अथवा शासकीय अनुदानाच्या कुबड्यांवर गोशाळांचा संसार दीर्घकाळ चालू शकत नाही, गोशाळांना आता आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा द्यावी लागेल. शेण आणि गोमूत्राचे मूल्यवर्धन, बायोगॅस, सौरऊर्जेचा वापर आणि शास्त्रीय आरोग्य व्यवस्थापन यांसारखा व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारल्याशिवाय देशी गोवंशाचे खरे रक्षण होणार नाही. शासन केवळ योजना आणि व्यवस्था निर्माण करू शकते; परंतु जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती बदलण्यासाठी गोशाळा चालक, शेतकरी आणि दात्यांनी एकत्र येऊन मैदानात उतरणे हीच काळाची गरज आहे.’
सोलापूरातील गोशाळा….
सोलापुरातील गोशाळा राज्याला दिशा दाखवणारे असेच काही प्रयोग सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आकारास येत आहेत. सोलापूर जिल्ल्यात नोंदणीकृत ५२ गोशाळा असून, त्यामध्ये सुमारे ६ हजार गोवंशाचे संगोपन केले जाते. येथे केवळ दानावर अवलंबून न राहता अनेक गोशाळांनी लघुउद्योगांची यशस्वी वाट धरली आहे. दक्षिण सोलापुरातील वडकबाळ येथील कट्टेव्वादेवी गोशाळेचे रुद्रप्पा बिराजदार आणि त्यांच्या भगिनी उमादेवी बिराजदार यांनी गोमय उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योगाचे मॉडेल उभे केले आहे. तेथे गोमूत्र अर्क, साबण, अगरबत्ती, शुद्ध तूप, तसेच पिकांच्या वाढीसाठी संजीवनी ठरणारे गोकृपामृत आणि सेंद्रिय खत निर्मिती केली जात आहे. दुसरीकडे, गणेश गुडमी या ध्येयवादी तरुणाने गोमय गणेशमूर्तीची निर्मिती करून पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध केला आहे. या मूर्तीना बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, याशिवाय विभूती, अर्क आणि विशेषतः धार्मिक विधी-होमासाठी छोट्या गोवऱ्या तयार करून त्या इतर राज्यांतही वितरित करण्याचे काम तो करत आहे. स्वस्तिक गोशाळेच्या माध्यमातून सुचित्रा गडद यांनी सुरू केलेले नावीन्यपूर्ण उपक्रमही उल्लेखनीय आहेत. महिला, युवकांमध्ये कौशल्य विकसीत करण्यासाठी प्रशिक्षण घेतात. ग्रामीण महिलांचे संघटन बांधून कृषी आणि अध्यात्म क्षेत्राची सांगड घालत गोसंवर्धनाला समाजकार्याची जोड दिली आहे. गोमय पासून गणेशमूर्ती निर्मिती, विविध आकारातील भिंतीवर लावण्यासाठी शोभेच्या वस्तूंसह, सौदर्य प्रसाधन व औषधी वस्तूंची निर्मिती त्यांनी केलेली आहे. सोलापुरातील ही उदाहरणे गोशाळा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण कशा होऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण आहेत.
