मक्याची शेती

सांगली जिल्हयात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, गहू, मका ही तृणधान्ये शेतीमध्ये उत्पादित केली जातात

दिगंबर शिंदे digambar.shinde@expressindia.com

मका हे आता नगदी पीक ठरत असून त्यामुळे शेतक ऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदतच होणार आहे. सांगली जिल्ह्य़ातील जत तालुक्यातील  शेतकरी समूहांनी मक्याचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी केले आहेत. मक्याच्या निर्यातीतूनही अर्थार्जन होत आहे.

शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा राजकीय व्यासपीठावरून झाली असली तरी याला प्रत्यक्ष शेतीत मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न जत तालुक्यातील १२ गावातील शेतकरी समूह करत आहेत. मका या तृणधान्याचे एकरी उत्पन्न सरासरी २२ क्विंटल असताना जत तालुक्यामध्ये एकरी ६० क्विंटल उत्पन्न काढण्याचा  प्रयोग यंदाच्या खरीप हंगामात हाती घेण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘आत्मा’ने पुढाकार घेतला असून या शिवारात मका पीक जोमदार आले आहे.

बेभरवशाचा उद्योग म्हणजे शेती असे अलीकडच्या काळात दिसत असले तरी या उद्योगालाही शाश्वत उत्पन्नाचे साधन बनविण्याचे प्रयत्न शेतकरी करीत असतात. अशाच प्रयत्नांना शासनाचा कृषी विभाग शास्त्रीय जोड देण्याचा प्रयत्न करत असतो. असाच प्रयत्न प्रकल्प संचालक मनोज वेताळ यांनी जत तालुक्यातील १२ गावात करण्याचा निर्धार केला. यासाठी प्रारंभी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी विविध ठिकाणी शेती कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेतून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि गरजांचा विचार करून तज्ज्ञामार्फत मार्गदर्शन वर्ग भरविण्यात आले. या वर्गातून पारंपरिक पध्दतीने शेती तर करायचीच मात्र, त्या कृतीला वैज्ञानिक व संशोधनातून सिध्द झालेल्या उत्पन्न वाढीच्या प्रयोगाला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला.

शेती हा भारतीयांचा मूळ व्यवसाय आहे. मात्र, नैसर्गिक लहरीपणा या व्यवसायाला अशाश्वत बनवत असला तरी याला आपणच कारणीभूत आहोत हे प्रयोगाअंती सिध्द झाले आहे. नैसर्गिक ऋतुमानानुसार शेती न करता बाजारकेंद्रित  शेती नगदीपणाच्या हव्यासातून करत आलो. याचे परिणाम शेतीमध्ये एक सुरी पीक पध्दतीचा अवलंब करत गेल्याने शेतीतील उत्पन्न कमी होत तर गेलेच, पण याचबरोबत तोचतोचपणा आल्याने नावीन्यही गमावत चाललो आहे. जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम सर्वानाच भोगावे लागत आहे. बेभरवशाचा पाऊस, थंडीचा अभाव, अवेळी पडणारे धुके, गारपीट या समस्या तर आता कायमसोबत राहणार आहेत. या समस्यांना सोबत घेऊनच या पुढील काळात शेती व्यवसाय करण्याची गरज अधोरेखित होत चालली आहे.

सांगली जिल्हयात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, गहू, मका ही तृणधान्ये शेतीमध्ये उत्पादित केली जातात. या तृणधान्यापैकी मका लागवडीखाली जिल्हयातील ३५ हजार ९०० हेक्टर क्षेत्र आहे. या पिकामध्येच आधुनिक आणि संकरित वाणाचा उपयोग केला तर उत्पन्न वाढ होऊ शकते का याचा अभ्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेती शाळेत शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून केला. बाजारात उपलब्ध असलेले बियाणे हमखास जादा उत्पन्नाचे आहे असे सर्वच बिजोत्पादक कंपन्या सांगत असतात. मात्र या कंपन्याचे संशोधन कोणत्या प्रयोगशाळेत झाले आहे, कोणत्या वातावरणात झाले आहे यावर उत्पन्नाचे ठोकताळे अवलंबून असतात. यामुळे प्रारंभी कंपन्याकडूनच बियाणांची क्षमता, उत्पन्न याची माहिती घेण्यात आली. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन लागवडीनंतर काढणी होईपर्यंतचे संगोपन कसे करायचे याचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून देण्यात आले.

मका लागवडीसाठी जत तालुक्यातील जाडर बोबलाद, बिळूर, अचकनहळ्ळी, अंत्री खुर्द, खलाटी, पांढरेवाडी, येळवी, खंडनाळ, कोळगिरी, बनाळी, वाळेखिंडी, शेगाव आदी १२ गावातील ९०  शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. सुमारे १००  एकर जमिनीवर प्रायोगिक मका लागवड करण्यात आली असल्याचे कृषी अधिकारी एच.एस. मेडिदार यांनी सांगितले. या प्रयोगासाठी एकरी ६०  क्विंटल उत्पन्नाची हमी देणाऱ्या  कंपनीचे बियाणे निवडण्यात आले.

मक्यासाठी जमिनीची चांगली नांगरट करण्यात आली. लागवड करीत असताना दोन ओळीतील अंतर ६० सेंटीमीटर म्हणजे दोन फूट व दोन रोपातील अंतर २० सेंटीमीटर म्हणजे नऊ इंच राहील अशी लागवड करण्यात आली. एकरी आठ किलो बियाणे आवश्यक असून एकरी ३३ हजार ३३३ मका रोपे बसतात. एका थाटाला दोन कणसे आणि प्रत्येक कणसापासून दोनशे गॅ्रम मका उत्पन्न होईल असे गणित मांडून एकरी ६०  क्विंटल उत्पन्नाची  खात्री करण्यात आली.

 जून ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ामध्ये पेरणी करण्यात आली. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करण्यात आली. यासाठी बुरशीनाशक व्हिटाव्हॅक्स पावर ३ ग्रॅम प्रति किलो बियाणास चोळले. याचबरोबर गाऊची ३ मिली दिले. यानंतर अ‍ॅझेटाबॅक्टर जिवाणू संवर्धन प्रति किलो २५ गॅम दिले.  अधिक उत्पादनासाठी पेरणीपूर्व मशागतीवेळी शेवटच्या कुळवाच्या पाळीच्यावेळी एकरी ४  टन म्हणजे दहा गाडय़ा शेणखत किंवा कपोस्ट खत जमिनीत मिसळले. पेरणीच्यावेळी १२ किलो नत्र,२८ किलो पालाश म्हणजेच १०८ किलो १०-२६-२६ या मिश्रखतासोबत ३ किलो युरियाचा वापर करण्यात आला. सूक्ष्म मूलद्रव्य झिंक सल्फेट एकरी १०  किलो वापरण्यात आले. तणाचा बंदोबस्त करण्यासाठी अँट्राटॉप ५० टक्के एक किलो २०० लिटर पाण्यातून पेरणीपाठोपाठ फवारण्यात आले. गरजेनुसार एक-दोन कोळपणीच्या पाळ्याही करण्यात आल्या. पीक संरक्षणासाठी २०  दिवसांनी निंबोळी अर्क फवारणी करण्यात आली. त्यानंतर दशपर्णी अर्काची फवारणी १०  दिवसांनी करण्यात आली. गरजेनुसार ६०  दिवसांनी इमामेक्टीन ४ गॅम १०० लिटर पाण्यातून करण्यात आली. पीक वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यात जलव्यवस्थापनही करण्यात आले. रोपाला चार पाने असताना पहिले पाणी, रोप आठ पानाचे झाल्यावर दुसरे, तुरे आल्यावर तिसरे आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत चौथे पाणी देणे आवश्यक आहे. लागवडीनंतर १२० दिवसात पीक तयार होते.

मक्यावर लष्करी अळींचा हल्ला होऊ शकतो. याचा बंदोबस्त करण्यासाठी कामगंध, प्रकाश सापळे लावून करता येऊ शकतो. याशिवाय या लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मका पिकाच्या भोवती नेपियर म्हणजेच घोळ जातीच्या गवताची लागवड केली तर लष्करी अळी या गवताकडे आकर्षति होऊन तिची अंडय़ातून बाहेर पडणारी अळी अवस्थेत केसाळ गवतात अडकून  नष्ट होऊ शकतात. मका पिकाचा खाद्य म्हणून केवळ १०  टक्केच वापर होतो. सांगली जिल्ह्य़ातून उत्पादित होत असलेला मका आता निर्यातही होऊ  लागला असल्याचे श्री. वेताळ यांनी सांगितले. गेल्या वर्षी आखाती देशात सांगली जिल्ह्य़ातून २० हजार मेट्रिक टन मका निर्यात करण्यात आला. मका निर्यात प्रामुख्याने कंपन्यांकडून झाली असली  तरी भविष्यात शेतकरी कंपन्याही या स्पर्धेत उतरू शकतात. उत्पादित होणाऱ्या ७०  टक्के मक्याचा वापर हा औद्योगिक क्षेत्रात होत असल्याने हे नगदी पिक ठरत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maize cultivation corn farming sweet corn cultivation maize farming zws

Next Story
देणाऱ्यांचे हात हजारो..
ताज्या बातम्या