चाँदनी चौकातून : ‘मामा’ की बात

पोटनिवडणुकीत मामांनी चारपैकी तीन जागा भाजपला मिळवून दिल्या, खांडवा लोकसभा मतदारसंघही जिंकून आणला.

‘मन की बात’ असते तशी ‘मामा की बात’ही असते. हे मामा अर्थातच शिवराजसिंह चौहान. मध्य प्रदेशात मामांनी पुन्हा कमाल करून दाखवली. हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना जे जमलं नाही ते शिवराजसिंह यांनी केलं. मामांचं स्वत:चं वेगळं व्यक्तिमत्त्व आहे, थोडंसं लालू प्रसाद यांच्या वळणावर जाणारं. लोकांमध्ये कधीही कुठंही मिसळणं लालूंचा ‘यूएसपी’ आहे, तसंच मामांचं! त्यामुळं कदाचित त्यांचं सूत दिल्लीशी फारसं जुळत नसावं. तसे मामा दिल्लीत येऊन आशीर्वाद घेऊन जातात; पण त्यांनाही वसुंधरा राजे यांच्याप्रमाणेच, दिल्ली रुचत नाही. परवाच्या पोटनिवडणुकीत मामांनी चारपैकी तीन जागा भाजपला मिळवून दिल्या, खांडवा लोकसभा मतदारसंघही जिंकून आणला. खांडव्यात मामा प्रचाराला आले होते, तिथं उशीर झाला. मामांनी रात्री भोपाळला जायचा बेत बदलला. आता कुठं कारनं प्रवास करायचा असं म्हणत मामांनी खांडव्यातल्या कुठल्याशा गावात राहायचं ठरवलं. मामा स्वत:ला शेतकरी मानत असल्यानं त्यांना खाटेवर झोपायला काही वाटत नाही. एका घरात राहण्याची सोय झाल्यावर मामांनी मस्त गप्पांचा फड रंगवला. चटणी-भाकरी खाल्ली, पान-सुपारी झाली. रात्री मामा झोपायला निघाल्यावर त्यांच्या कर्मचारीवर्गापैकी कुणीतरी मच्छरदाणी आणून दिली. मुख्यमंत्र्यांना डास चावून डेंग्यू वगैरे झाला तर काय या चिंतेने आधीच ही तयारी करून ठेवली होती. मामांनी शांत झोप घेतली. सकाळी खाटेवर बसल्या बसल्या पुन्हा आसपासच्या लोकांशी गप्पाटप्पा केल्या. चहा-पाणी झालं. मामांना प्रचाराला बाहेर पडायचं होतं. मग, लोकांशी हितगुज करता करता मामांनी स्वत:च दाढी केली. सगळं आवरून मामा निघून गेले. एक रात्र शिवराजसिंह यांनी सामान्य कुटुंबात कुठलाही बडेजाव न करता काढली होती.

एखाद्या गावात रात्री लोकांशी इकडच्या-तिकडच्या गप्पा मारणं हा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा ‘प्रचारा’चा भाग असेल आणि कदाचित पूर्वनियोजितही असेल! पण असं ‘सामान्य’ होणं भाजपमधल्या कोणत्या नेत्याला जमलंय? कधीकाळी कोणी चहा विकला असेलही पण त्यांनाही आता ‘सामान्य’ होणं जमत नाही!

ते पूर्वीचे दिवस!

केरळमध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर गेल्या जुलैमध्ये मुख्यमंत्री पिनरायि विजयन दिल्लीत मोदींना भेटायला आले होते. नवा मुख्यमंत्री पंतप्रधानांची औपचारिक भेट घ्यायला येत असतो. विजयन २०१६ पासून मुख्यमंत्रीच आहेत आणि यंदाच्या मे महिन्यापासून त्यांची दुसरी खेप सुरू झाली आहे. म्हणजे ते नवे नव्हेत. ते जिंकले, तेव्हा दिल्लीत करोनाच्या दुसरी लाटेनं हाहाकार माजलेला होता. सगळी भवनं आणि सदनं बंद करण्यात आलेली होती. या राज्या-राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इमारतींमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. ‘केरळ हाऊस’ जंतर-मंतरच्या जवळच आहे. तिथं जुलैमध्ये विजयवीर पी. विजयन यांचं तुलनेत जंगी स्वागत झालं. छोट्या सभागृहात त्यांचं भाषण झालं होतं. त्यांनी मोदींवर टीका केली होती; मग, ते त्यांची भेट घेऊन निघून गेले. ते विजयी मुख्यमंत्री असल्यानं माकपच्या नेतृत्वाला त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं.

… हे आठवण्याचं कारण, दोन आठवड्यांपूर्वी माकपच्या नेत्यांची काँग्रेसशी सामंजस्य करण्यावरून वादावादी झाली. माकपमध्ये दोन गट, येचुरी आणि कारात. विजयन हे प्रकाश कारात गटातील. कारात गट कडवा काँग्रेसविरोधक. त्यांनी या बैठकीत येचुरींना पुन्हा विरोध केला. कशाला हवेत काँग्रेसवाले, असा सूर होता. केरळमध्ये काँग्रेसवाल्यांना हरवून विजयन मुख्यमंत्री झाल्यामुळं त्यांचा काँग्रेसविरोध समजण्याजोगा होता. माकपकडं केरळ तरी आहे, भाकपकडं आता काही उरलेलं नाही. त्यांच्या नेत्यांना पूर्वीचे दिवस आठवत राहतात. भाजपची केंद्रात सत्ता नव्हती तेव्हा भाकपच्या मुख्यालयात इतर पक्षांचे दिग्गज नेते येत असत. उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी होऊ शकते का, याची चाचपणी करण्यासाठी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा भाकपच्या नेत्यांना फोन आलेला होता. अखिलेश यांचं म्हणणं होतं की, लखनऊला या, बोलू. मग, प्रश्न असा आला की, अखिलेश यांचं निमंत्रण स्वीकारायचं की नाही? निर्णय काय झाला माहिती नाही पण, पूर्वी भाकप-माकपशी आघाडी करण्यासाठी इतर नेते त्यांच्या दारात येत असत, त्यांना विनंती करत असत, आता कोणी फिरकत नाही. बदललेली परिस्थिती नाही म्हटली तरी थोडी मनाला लागतेच.

कोणाकडे बाहुबली जास्त?

भाजपमध्ये अभ्यासू वृत्ती, बिनचूक गृहपाठाची सवय आणि चुणचुणीतपणा अशा तीन गोष्टी कार्यकत्र्यात असेल तर त्याला पक्षात बढती दिली जाते. त्याची प्रगती बघून राष्ट्रीय कार्यकारिणीचा भागही बनता येतं. कधी सचिव म्हणून, कधी प्रभारी म्हणून. एकदा ही पदं मिळाली की निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाच्या बैठकांमध्येही प्रवेश मिळतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गेल्या महिन्यात कार्यकारिणीची छोटेखानी बैठक घेतली होती. सकाळपासून बौद्धिक सुरू होतं, त्या मंथनातून कोणतं अमृत निघालं याची माहिती दिली जाणार होती म्हणून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावलं होतं. ही बैठक इतकी लांबली की, वाटलं भाजपने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पण, अखेर कळलं की, जय पांडा बोलणार आहेत, ते आले आणि ते मोजून साडेचार मिनिटं बोलले, ते काय बोलले हे त्यांनाही बहुधा कळलं नसावं. बार इतका फुसका निघाला! चर्चा पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांवर झालेली होती. मंडळींनी रात्रीचं भोजन केलं आणि ती निघून गेली. बी. संतोष वगैरे बडी मंडळी असताना बोलणार कोण?

मग वेगळा विषय निघाला. जे बोलत होते त्यांनी गृहपाठ केलेला होता. भाजपमध्ये ही गृहपाठ केलेली मंडळी आत्मविश्वासानं बोलतात. त्यांना किती बोलायचं हे पक्कं ठाऊक असतं. नेतृत्वाचा विश्वास असल्यानं बोलण्याची थोडी मोकळीक असावी. ही मंडळी छोट्या राज्यांवर बोलत होती. बाहुबली सगळीकडे असतात, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांत असतात तसे ते छोट्या राज्यांतही असतात. ढंगात फरक असतो इतकंच. तिथं प्रत्येक पक्ष एकेका बाहुबलीला खेचण्याचा प्रयत्न करतोय, आता कोणाकडं जास्त बाहुबली तो जिंकणार, असं ही मंडळी म्हणत होती. त्यांनी ‘बाहुबली’ हा शब्द कोणत्या अर्थानं उच्चारला माहिती नाही पण, आपण तरी ‘लोकप्रिय नेता’ असा अतिसभ्य अर्थ घेतला तर कोणाचा आक्षेप नसेल.

आता तरी काम करा!

गेल्या वर्षीच्या कार्यकारिणी बैठकीतून धडा घेऊन काँग्रेसने या वेळी आतली माहिती निदान बैठक संपण्यापूर्वी तरी बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली होती. गेल्या वेळी तरुण तुर्कांमध्ये आणि म्हाताऱ्या अर्कांमध्ये जे घमासान झालं ते बैठक होत असतानाच ‘थेट प्रसारित’ होत होतं. या वेळी नेत्यांना माहितीवहनाची सर्व साधनं खोलीबाहेर ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला होता. त्यानंतर आठवड्याभरांनी झालेल्या प्रभारी आणि महासचिवांच्या बैठकीतही हा नियम पाळला गेला. दोन्ही बैठकांमध्ये सोनिया गांधींचे बोल नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना टोचणारे होते. त्यामुळं नेत्यांचं म्हणणं काय होतं हे फारसं महत्त्वाचं राहिलं नाही. ‘मीच अध्यक्ष आहे’ अशी तंबी दिली गेल्यामुळं बैठक झाल्यावरही नेते बाहेर बोलले नाहीत. दुसऱ्या बैठकीत प्रभारींना आणि राज्यातल्या नेत्यांना, तुम्ही काम करत नाही, असं सोनियांनी अप्रत्यक्ष समज दिल्यानंतर बैठकीतून बाहेर आल्यावर बोलणार काय, हादेखील प्रश्न होता. सोनियांनी नेत्यांना सदस्य नोंदणीमोहीम राबवण्यासाठी कामाला लावलेलं आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोर अजून डाळ शिजत नसली तरी सचिन पायलट वगैरे तरुण नेते नवे सदस्य जोडण्याच्या कार्यात गुंतलेले आहेत. माजी ‘कॅग’- महालेखापरीक्षक-  विनोद राय यांनी संजय निरुपम यांची लेखी माफी मागितल्यामुळं काँग्रेसजनांना, भाजपविरोधात बोलण्यासाठी हत्यार मिळालं आहे. गेल्या आठवड्यात पायलट, पी. चिदम्बरम, अजय माकन, मल्लिकार्जुन खरगे वगैरे नेते एकात दोन कामे करत होती. सदस्यनोंदणी मोहिमेचा ठिकठिकाणी शुभारंभ करणं आणि विनोद राय यांनी कथित ‘२ जी घोटाळ्या’त कसा घोळ घातला हे सांगणं! आता काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाने ‘पेगॅसस’चा मुद्दाही देऊ केला आहे. हिवाळी अधिवेशनात काँग्रेस या मुद्द्यावरून पुन्हा गोंधळ घालेल असं दिसतंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man ki bat chief minister jairam thakur chief minister pinarayi vijayan chief minister pays a formal visit to the prime minister akp

Next Story
देणगीदारांची नावे
ताज्या बातम्या