एखाद्या गावाच्या भूजलाचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करताना प्रथम त्या गावाचा भूजल नकाशा बनविला जातो. या नकाशावर आधी वेगवेगळ्या भूस्तरांचे विस्तार क्षेत्र व त्यांच्या रचनेसंबंधी माहिती भरली जाते.  नकाशे तयार करणे हे मूलभूत काम आहे. या नकाशांनाच टोपोशीटअसे म्हणतात..

भूजलाचे चलनवलन जमिनीखाली होत असल्यामुळे भूजल हा कायमच वलय नसलेला विषय आहे. पाण्याचा वाढलेला बेसुमार उपसा आणि त्यामुळे भेडसावणारी भीषण पाणीटंचाई यामुळे नजरेआड दडलेल्या भूजलाने आता सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केली आहे. भूजलाचे चलनवलन भूगर्भातील खडक, माती आणि स्थानिक पर्जन्यमान या सगळ्या गोष्टींवर किती अवलंबून आहे, तसेच महाराष्ट्रात प्रामुख्याने आढळणाऱ्या बसाल्ट खडकाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने पाणी व्यवस्थापन किती आवश्यक आहे, हेसुद्धा आपल्या लक्षात आले असेलच. पाणी व्यवस्थापनातील समस्यांची जटिलता, पाणीपुरवठा व मागणी यांच्यातील तफावतीमुळे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासाठीच भूजलाचे काही महत्त्वाचे गुणधर्म आणि पृष्ठजलाशी तुलनात्मक विश्लेषण आपण समजावून घेऊ या.

gadchiroli lok sabha marathi news, gadchiroli lok sabha election marathi news
७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत युद्ध क्षेत्राचा भास व्हावा…..
24 hours water supply stop to Kalyan-Dombivli Taloja and Ulhasnagar
कल्याण-डोंबिवली, तळोजा, उल्हासनगरचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
Submerged area of proposed Poshir Dam soil survey to start soon
प्रस्तावित पोशीर धरणाच्या बुडित क्षेत्र, माती सर्वेक्षणाला लवकरच प्रारंभ
  • भूजल विस्तृत क्षेत्रामध्ये जवळजवळ प्रत्येक ठिकाणी आढळत असल्याने आपल्याला सर्वात जवळ असणारा गोडय़ा पाण्याचा स्रोत आहे. स्थलपरत्वे जमिनीखाली २ मीटरपासून ते १०० मीटर खोलीपर्यंत पाणी आढळते. जर भूजल अस्तित्वात नसते तर मनुष्यवस्ती नदी-सरोवर किंवा तळी इत्यादींपुरतीच मर्यादित राहिली असती. भूजलाचा साठा जमिनीमध्ये खोलवर असल्याने त्याचा वरच्या वातावरणाशी फार काही संबंध नसतो. त्यावर ऊन व वाऱ्याचा परिणाम होत नसल्याने भूजलाचे बाष्पीभवन फारच अल्प प्रमाणात होते; तुलनेने पृष्ठजलावरील पाण्याचा बाष्पीभवनाने फार मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होत असतो.
  • भूजलाचे पुनर्भरण आणि साठा प्रामुख्याने निसर्गाकडून दरवर्षी नव्याने होत असतो. अतिउपशामुळे शोषण झालेल्या ठिकाणीच कृत्रिम पुनर्भरणाचा विचार केला जातो. पृष्ठजलाचा साठा करण्यासाठी मात्र तलाव खोदणे, बांध किंवा धरण बांधणे, त्यांची दुरुस्ती यांसाठी वारंवार खर्च करावा लागतो.
  • भूस्तराचा उंच-सखलपणा आणि त्याच्या वाहकतेनुसार भूजल स्वत:हूनच सगळीकडे पसरत राहते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भूजल वाहून नेण्यासाठी माणसाला कुठलाही प्रयत्न करावा लागत नाही. पृष्ठजल एका जागी साठवल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी छोटे-मोठे कालवे, पाट किंवा पाइपलाइन असे वेगळे प्रयत्न करावे लागतात, शिवाय या योजना प्रचंड खर्चीक असतात.
  • नव्याने खोदलेल्या विहिरीतील किंवा बोअरवेलमधील पाणी सुरुवातीला एकदा उपसून स्वच्छ केल्यानंतर पुढे नेहमीच ते निसर्गत:च गाळून येते व त्यामुळे ते स्वच्छ असते; परंतु पृष्ठजल मात्र कायमच शुद्ध करून वापरावे लागते.
  • भूजलाचे तापमान वर्षभर जवळजवळ एकसारखे राहते व वारंवार बदलत नाही. आपल्याकडे २६ ते २८ अंश सेल्सियस तापमानाचे भूजल मिळते. काही प्रदेशांत जेव्हा जमिनीवरचे पाणी हिवाळ्यात अतिथंड होते तेव्हा भूजलाचा वापर करणे सोयीचे ठरते. काही औद्योगिक प्रक्रियांमध्येही सुरुवातीला घेतलेल्या पाण्याचे (फीड वॉटर) तापमान एकसारखे असणे फायदेशीर ठरते.
  • भूजल हे खडकांमधील सूक्ष्म छिद्रे, फटी अशा लहान जागांमधून वाहत असल्याने त्याला घर्षणाचा जास्त प्रमाणात सामना करावा लागतो. त्यामुळे भूजलाची जमिनीखालून वाहण्याची गती खूप हळू असते. उत्तम पाणी देणाऱ्या वाळूच्या थरातील भूजलाची गतीही १०० ते २०० मीटर प्रतिदिन इतकी कमी असते; तर काळ्या पाषाणात ती १० ते २० मीटर प्रतिदिन इतकी संथ असते. तुलनेने नदीचे किंवा कालव्याचे पाणी एका दिवसात १०० ते १५० किलोमीटपर्यंत जाऊ शकते.

भूजलाच्या या मंदगतीचा सर्वात मोठा फायदा असा की, भूजल एका पावसाळ्यातील पुनर्भरणानंतर जवळजवळ पुढे वर्षभर जमिनीखाली टिकून राहते आणि आपल्याला मिळत राहते. पृष्ठजल त्यामानाने पावसाळ्यानंतर १-२ महिन्यांतच समुद्राकडे निघून जाते. त्यानंतरच्या काळात नदीमध्ये भूजलाचा निचरा होत राहिल्याने नदीचा प्रवाह जिवंत राहतो.

भूजल हे खूप मोठय़ा क्षेत्राखाली विखुरलेले असल्याने प्रत्येक ठिकाणी तिथल्या तिथेच (किंवा केवळ तिथेच) वापरले जाऊ शकते. भूजलाचा लाभ हा जास्तीत जास्त लोकांमध्ये वाटून घेण्याची सोय निसर्गत:च असते. याउलट, जमिनीवरील पाणी मोठय़ा क्षेत्रातून वाहून नदीच्या पात्रात व पुढे तलाव, सरोवर किंवा धरणसाठय़ामध्ये एकत्रित होते. ही एकत्र साठणारी जलसंपत्ती मुळातच फार थोडय़ा सिंचनक्षम क्षेत्रामध्ये वाटता येते. नसर्गिक उताराच्या विरुद्ध दिशेने असे पाणी न्यावयाचे झाले तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते.

हे पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की, ‘भूजल विकास आणि वापर’ याच्या नसर्गिक मर्यादा जर आपल्याला समजून घ्यावयाच्या असतील तर त्याचा शास्त्रीय अभ्यास कशा तऱ्हेने करतात हे जाणून घेणेसुद्धा जरुरीचे आहे.

सर्व जलस्रोतांचे पितृत्व वरुणदेवतेकडे असते आणि मातृत्व स्वत:च्या उदरात त्याला धारण करणाऱ्या पृथ्वीकडे. भूजलाचा अभ्यास करण्यासाठी प्रथम त्या प्रदेशातले हवामान आणि पर्जन्यमान यासंबंधी माहिती संकलित केली जाते. वर्षांतून किती काळ, किती प्रमाणात आणि कशा तऱ्हेने पाऊस पडतो, त्याचप्रमाणे बाष्पीभवनाचे प्रमाण आणि जमिनीचा चढ-उतार, या सर्व निकषांवर जमिनीमध्ये पावसाच्या पाण्यापकी किती पाणी खोलवर मुरून भूजलाचे पुनर्भरण होणार हे अवलंबून असते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तेथील भूस्तराची असलेली संरचना. भूजल हे प्रामुख्याने खडकांमध्ये आढळते आणि त्यामुळे भूजलाच्या अभ्यासामध्ये खडकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

एखाद्या गावाच्या भूजलाचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करताना प्रथम त्या गावाचा भूजल नकाशा बनविला जातो. या नकाशावर आधी वेगवेगळ्या भूस्तरांचे विस्तार क्षेत्र व त्यांच्या रचनेसंबंधी माहिती भरली जाते. नंतर त्यावर समपर्जन्यमान रेषा, जमिनीच्या महत्त्वाच्या ठिकाणांची समुद्रसपाटीपासूनची उंची, नदी, नाले, तळी, भूजलाची समपातळी दर्शविणाऱ्या रेषा, पाणथळ जागा, महत्त्वाचे झरे, वेगवेगळ्या क्षेत्रांतील विहिरींची उत्पादकता दाखवणारी माहिती वगरे सर्व उपलब्ध तपशील भरले जातात. अशा तऱ्हेचे नकाशे तयार करणे हे मूलभूत काम आहे. या नकाशांनाच ‘टोपोशीट’ असे म्हणतात. टोपोशीटवरून एखाद्या पाणलोट क्षेत्राची आखणी करता येते. मग ‘पाणलोट क्षेत्र’ म्हणजे नेमके काय? तर एखाद्या विशिष्ट भूभागावर पडणारे पावसाचे पाणी ओढे, छोटे-छोटे ओघळ आणि नाल्यांमधून वाहून नदीला येऊन मिळते, त्या क्षेत्राला त्या नदीचे पाणलोट क्षेत्र (कॅचमेंट एरिया) असे म्हणतात. पाणलोट क्षेत्र हे मुख्यत: त्या भागातून वाहणारे ओढे किंवा नाल्यांवरून (ड्रेनेज नेटवर्क) ठरविले जाते.

टोपोशीट तयार झाल्यानंतर, गावांतील पाण्याचे मुख्य स्रोत कोणते, विहिरी-बोअरवेल्स यांची संख्या, त्यातील पाण्याची पातळी, त्यांची पाणी देण्याची क्षमता, पाण्याची चव आणि गुणवत्ता या सगळ्या बाबींची मोजदाद केली जाते. पर्जन्यमापक यंत्राद्वारे पावसाची नियमितपणे मोजणी केली जाते. भूजलाच्या अभ्यासात पाण्याची गुणवत्ता हा एक महत्त्वाचा पलू आहे. जर पाण्याची गुणवत्ता चांगली नसेल तर माणसे व जनावरांबरोबर शेतीवरदेखील घातक परिणाम होऊ शकतो. खडकांमध्ये असलेल्या विविध खनिजांचा परिणाम पाण्यावर होऊन, त्यातील क्षारांचे प्रमाण वाढू शकते. काही काही भागांत आस्रेनिक, फ्लुराइडच्या पाण्यातील वाढलेल्या प्रमाणामुळे, आस्रेनिकोसिस, फ्लुरोसिससारखे आजारदेखील होतात. या आणि वर उल्लेखलेल्या बाबींचे संकलन वर्षभर करीत राहिल्यास त्या गावातल्या भूजलाच्या परिस्थितीची व्यापक माहिती प्राप्त होते आणि आपल्याला नेमके कुठे हस्तक्षेप करायचा आहे याचा आपण आडाखा बांधू शकतो.   भूजल व्यवस्थापनाची गरज, भूजलाचा ताळेबंद आणि त्यासाठी असणारी लोकसहभागाची निकड हे आपण पुढील लेखातून जाणून घेऊ या.

महाराष्ट्रातील मागास व दुष्काळी भागांमध्ये शेती, जलसंधारण, रोजगारनिर्मिती इत्यादी मुद्दय़ांवर काम करण्यासाठी आनंदवनाने हाती घेतलेला ‘आनंदवन समाजभान अभियान’ हा आऊटरीच प्रोग्राम आणि भूजल व्यवस्थापन क्षेत्रात देशपातळीवर काम करणारी डॉ. हिमांशू कुलकर्णी यांची ‘अ‍ॅक्वाडॅम’ ही नामांकित स्वयंसेवी संस्था, संयुक्तविद्यमानाने ही ‘जलनीती’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे.

संपर्क क्रमांक :  ७४४७४ ३९९०१, ९९२२५ ५०००६

अमृता कुलकर्णी-गुरव

amruta.gurav@gmail.com