भावना दुखावण्याच्या आजारावर औषध!

परिस्थिती शरणता आणि परिस्थिती बदलावी म्हणून कर्मकांडे, त्यामधून येणारी फसवणूक, हे सारे सुरू होते. डॉ. बेक यांनी हा भावना दुखावल्या जाण्याचा जो आजार आहे

|| डॉ. हमीद दाभोलकर

‘भावना दुखावण्या’चे परिणाम वाईटच : अपमान / अपयश / टीका सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन, टोकाचे पाऊल उचलले जाते… हे व्यक्तींच्याच नव्हे, तर समाजांच्याही बाबतीत होऊ शकते. या आजारावर मात कशी करायची, याची पद्धती शोधणारे डॉ. आरॉन बेक नुकतेच दिवंगत झाले…

डॉ. आरॉन बेक या जगविख्यात मनोविकारतज्ज्ञाचे नुकतेच फिलाडेल्फिया येथील राहत्या घरी निधन झाले. शंभर वर्षांचे अत्यंत अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्य त्यांना मिळाले. मानवी मनाची ‘अव्यक्त मन आणि व्यक्त मन’ अशी मांडणी करणारा सिग्मंड फ्रॉइड आपल्याला थोडाबहुत माहीत असतो; पण डॉ. आरॉन बेक आणि त्यांचे मनोविकार क्षेत्रातील काम यांविषयी आपण ऐकले किंवा वाचले नसणे अगदी स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर मानवी मनाचे आणि वर्तनाचे आकलन मूलगामी पद्धतीने बदलणाऱ्या डॉ. आरॉन बेक यांचे काम समजावून घेणे हे त्यांचे स्मरण करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे असे वाटते. त्यांच्या कामाला आपल्या काळाचादेखील एक अत्यंत महत्त्वाचा संदर्भ आहे. एवढ्या तेवढ्या कारणांवरून भावना दुखावल्या जाणाऱ्या कालखंडात आपण सगळे जगात आहोत! केवळ त्या भावना स्वत: दुखावून घेऊन आपण थांबत नाही तर सगळ्या समाजाला आपल्या दुखण्यासाठी वेठीस धरण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झाली आहे. अशा कालखंडात तर, ‘भावना दुखावण्याच्या आजारावर औषध शोधणाऱ्या’ डॉ. आरॉन बेक यांचे विचार खूपच अधिक महत्त्वाचे ठरतात. 

भावना दुखावण्याचे दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग आपण सहज आठवू शकतो. कामाच्या ठिकाणी बॉस घालून-पडून बोलतो म्हणून अस्वस्थ होणे, परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून येणारे वैफल्य, प्रेमाच्या नात्यात किंवा लग्नात अपयश आल्याने झालेले अतीव दु:ख अशा अनेक गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या स्वत:च्या आयुष्यात अनुभवत असतो. यामधून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना दुखावण्याच्या कारणांचा आपण जर लसावि काढला तर तो, ‘परिस्थिती अशी निर्माण झाली म्हणून माझ्या भावना दुखावल्या’ किंवा ‘दुसऱ्याने मुद्दामच माझ्या भावना दुखावल्या’ हा निघतो. थोडक्यात, आपल्या अस्वस्थतेसाठी दुसऱ्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोष देणे सुरू होते. याची पुढची पायरी म्हणजे, ‘समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत माझे भावनिक दुखणे दुरुस्त होणार नाही,’ अशी धारणा करून घेतली जाते. यातूनच  परिस्थिती शरणता आणि परिस्थिती बदलावी म्हणून कर्मकांडे, त्यामधून येणारी फसवणूक, हे सारे सुरू होते. डॉ. बेक यांनी हा भावना दुखावल्या जाण्याचा जो आजार आहे, त्याविषयी नवीन- कोरी करकरीत- मांडणी केली. अगदी मुळावरच घाव घातला म्हटले तरी चालेल.

त्या मांडणीनुसार, ‘कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला होणारा भावनिक त्रास हा प्रत्यक्षातील घटनेचा नसून त्या घटनेचा आपण जो अर्थ लावतो त्याचा असतो!!’ एक छोटे उदाहरण घेऊ. दरवर्षी हजारो मुले परीक्षेत नापास होतात. पण त्यामधली फारच थोडी नापास झालो म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करतात. आता याचा अर्थ सरळ आहे की, आत्महत्येचे विचार हे परीक्षा नापास होण्याच्या घटनेशी थेट संबंधित नाहीत. तसे असते तर प्रत्येक नापास मुलाने आत्महत्येचा विचार केला असता. प्रत्यक्षात असे होताना आपल्याला दिसत नाही. मग काय घडते तर ज्या मुलांचे मन असा विचार करते की, ‘आपण परीक्षेत नापास झालो म्हणजे आपण जगण्यास लायक नाही’ तीच मुले आत्महत्येचा विचार करतात. जी मुले, ‘आता नाही तर पुढच्या वेळी पास होऊ!’ असा विचार करतात; ती आत्महत्येच्या वाटेला जात नाहीत. याचाच अर्थ असा की, आपल्याला होणारा भावनिक त्रास हा त्या नापास होण्याच्या घटनेमुळे नसून त्या घटनेचा आपण जो अर्थ लावतो त्याच्याशी संबंधित आहे! म्हणजे हा ‘भावना दुखावण्याचा आजार’ नसून ‘भावना दुखावून घेण्याचा आजार’ आहे. डॉ. बेक यांच्या मांडणीतून हे सत्य पुढे आले. तेवढेच महत्त्वाचे दुसरे सत्य असे की, एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखे हे विचार आपल्या मनाच्या पटलावर उमटत असतात. त्यांच्या या स्परूपामुळे आपण असे धरून चालतो की ते विचार योग्यच आहेत. प्रत्यक्षात मात्र परिस्थितीच्या पलीकडे जाऊन, स्वत: निर्णय घेऊन आपण कुठल्याही परिस्थितीला दिलेला स्वत:चा प्रतिसाद बदलू शकतो; अधिक विवेकी आणि विधायक करू शकतो, असा त्या उपचार पद्धतीचा गाभा आहे. एकदा का आपण अशा प्रकारे ‘स्वत:चे विचार तपासायची आणि बदलायची सवय’ स्वत:ला लावली की आपल्याला परिस्थितीमधून येणारी भावनिक हतबलतासुद्धा बदलता येते. आपल्या मनावर आपला ताबा मिळवण्याच्या दृष्टीने आपले एक महत्त्वाचे पाऊल पडते. 

साधारण १९६० ते ७० च्या दशकाच्या दरम्यान ही मांडणी जेव्हा डॉ. बेक यांनी केली, तेव्हा ‘मानवी वर्तनाला त्याच्या अव्यक्त मनातील आणि बालपणातील अनेक घटनांशी संबंधित कारणे असतात,’ या स्वरूपाची सिग्मंड फ्रॉइड यांची मांडणी प्रबळ होती. मानवी मनाच्या अभ्यासात तिचे म्हणून एक स्वतंत्र महत्त्व आहे. त्या अभ्यासावर मानवी अंतर्मन आणि अव्यक्त भावना यांचा खूप मोठा प्रभाव आहे. आपल्या सर्व भावभावना या अंतर्मनाच्या गुलाम आहेत आणि अंतर्मनाचा गुंता सुटल्याशिवाय आपण आपली वर्तणूक बदलू शकत नाही, अशी एक हतबलता आणि परिस्थिती शरणता त्यामध्ये आहे. डॉ. बेक यांनीदेखील या ‘सायकोअ‍ॅनालिसिस’ (मनोविश्लेषण) म्हटले जाणाऱ्या पद्धतीचा अभ्यास केला होता. मात्र ‘सायकोअ‍ॅनालिसिस’च्या मर्यादाही लक्षात आल्यामुळे त्यांनी ही मानवी विचारांना केंद्रस्थानी ठेवणारी आणि प्रत्येक माणसाला- परिस्थिती कशीही असली तरी- आपल्या भावनांचा लगाम आपल्या हातात घेता येऊ शकेल अशी विचारनिष्ठ उपचार पद्धती शोधून काढली.

याच स्वरूपाची मांडणी आणि काम करणारे डॉ. अल्बर्ट एलीस आणि डॉ. आरॉन बेक हे दोघेही साधारणत: समकालीन होते. डॉ. एलीस यांनी ही विचार आणि उपचार पद्धती सामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांची हयात खर्च केली; तर डॉ. बेक यांनी त्याचा शास्त्रीय अभ्यास, संशोधन आणि त्याविषयी प्रशिक्षण देणे यांवर आयुष्यभर जोर दिला. 

जगप्रसिद्ध जर्नल्समध्ये साधारण ६०० शोधनिबंध आणि दोन डझन पुस्तके ह्यांच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार आणि संशोधन मांडून ठेवले आहे. आजअखेर लाखो लोकांनी मानसिक अस्वस्थतेच्या वेळी त्यांनी शोधलेल्या उपचार पद्धतीचा वापर करून स्वत:ला सावरले आहे आणि येत्या कालखंडात ही संख्या वाढतच जाणार आहे.

डिप्रेशनच्या आजाराच्या सौम्य टप्प्यावर ही उपचार पद्धती औषधांच्या इतकीच प्रभावी ठरते, असे संशोधन आता जगभर मान्य आहे. केवळ डिप्रेशन नव्हे, तर व्यक्तिमत्त्व दोष, व्यसनाधीनता यांच्यापासून ते तीव्र मानसिक आजारापर्यंत अनेक आजारांमध्ये या विचारकेंद्री उपचार पद्धतीचा वापर केला जातो.

नातेसंबंध टिकावे आणि बहरावे यासाठी त्यांनी ‘लव्ह इज नॉट इनफ!’ (केवळ प्रेम पुरेसे नाही..) अशा गंमतशीर नावाचे पुस्तक लिहिले आहे. चांगल्या आणि अर्थपूर्ण नात्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसते. त्याबरोबर मनाची संवेदनशीलता, उदारता, जबाबदारीचे भान, निष्ठावानपणा असे अनेक महत्त्वाचे गुण असतात हे डॉ. बेक यांनी आपल्या लक्षात आणून दिले आहे. एकमेकांच्यावर अतीव प्रेम करणारी अनेक नाती दीर्घकाळ का टिकू शकत नाहीत आणि फारसे प्रेम नसलेली नातीदेखील अनेक वेळा कशी दीर्घकाळ टिकतात याचे उत्तर हे पुस्तक वाचताना मिळू शकते.

डॉ. बेक यांनी दोन वेळा-  २००२ आणि २०१५ मध्ये – दलाई लामा यांच्याशी संवादाचा कार्यक्रम केला. ही विचारकेंद्री उपचार पद्धती आणि बुद्धविचार यांमध्ये मोठे साम्य असल्याचे निरीक्षण डॉ. बेक यांनी नोंदवून ठेवले आहे. विविध धर्मांमधील पुनर्जन्म, ‘मागच्या जन्मीचे पाप’, स्वर्ग-नरक या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन आपल्या जीवनातील दु:खाचे ‘स्वत:च्या आत असलेले कारण’ शोधणाऱ्या ज्या परंपरा आहेत त्यांनादेखील पुढे नेणारा हा विवेकवादी विचार आहे. केवळ वैयक्तिक दु:ख आणि भावनांचे दुखावणे नाही; तर समाजपातळीवरदेखील हे विचार खूप महत्त्वाचे आहेत. ‘शत्रूकेंद्री जगणे’ आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरण्याची जणू एक पद्धत आपल्याकडे निर्माण झाली आहे. या शत्रूकेंद्री आणि भूतकाळवादी विचारधारेला एक सशक्त पर्याय देण्याचे सामथ्र्य या ‘स्व’लक्ष्यी, विचारनिष्ठ आणि वर्तमानाला महत्त्व देणाऱ्या पद्धतीमध्ये आहे.

शेवटपर्यंत कार्यरत राहिलेल्या डॉ. बेक यांचे काम हे आता बेक इन्स्टिट्यूटच्या (स्थापना : १९९४) माध्यमातून पुढे जात राहील. ‘मनाच्या पृष्ठभागावरदेखील खूप काही असते- आपण केवळ डोळे उघडून बघायला हवे,’ हा डॉ. बेक यांचा संदेश आपण ध्यानात घेतला पाहिजे. आपले स्वत:चे, आपल्या कुटुंबाचे आणि एकुणात समाजाचे खूप भले करण्याची ताकद या विचारात आहे!

लेखक मानसोपचारतज्ज्ञ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ता आहेत.

 hamid.dabholkar@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Medicine for emotional pain sigmund freud world renowned psychiatrist died dr aaron beck akp

Next Story
देणगीदारांची नावे
ताज्या बातम्या