शिवसेनेतील एका वादातून महाराष्ट्रात एका नव्या पक्षाचा जन्म झाला. हा वाद विचारांचा होता की वारशाचा होता, याचे उत्तरही तमाम मराठी माणसांना मिळाले. तरीही भगव्याच्या सावलीखाली वाढलेली एक पिढी शिवसेनेतून बाजूला झाली आणि या पक्षाच्या झेंडय़ाखाली आली. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हे या पक्षाचे नाव आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय विचारांचे बाळकडू घेत राजकारणात मुरलेले त्यांचे पुतणे, राज ठाकरे हे या पक्षाचे सर्वेसर्वा.. म्हणजे अध्यक्ष आणि सारे काही! देशात आघाडी सरकारांचे युग सुरू झाले आणि प्रादेशिक पक्षांचे महत्त्व आपोआप वाढले. याच आघाडी युगाची झळाळी शिवसेनेवरही चढली आणि भाजपला साथ देणाऱ्या या प्रादेशिक पक्षाला, केंद्रात मंत्रिपदेही मिळाली. शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी तर लोकसभेचे अध्यक्ष झाले. कारण प्रादेशिक पक्षांचे बोट धरल्याखेरीज राजकारण करणे शक्य नाही, याची जाणीव राष्ट्रीय पक्षांनाही झाली आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या सर्व राज्यांतील प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. गेल्या तीन दशकांतील या परिवर्तनाचा असा सज्जड पुरावा समोर असताना, स्वत:चा राजकीय पक्ष काढणे हे फारसे धाडस नव्हतेच. राज ठाकरे यांच्या पाठीशी तर, बाळासाहेबांच्या प्रतिमेचा करिश्मा होता आणि त्यांच्या राजकारणाचे संस्कारही होते. बाळासाहेबांसारखीच छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व, त्यांच्याच वक्तृत्वाची आठवण करून देणारी भाषणशैली आणि सेनेतूनच बाहेर पडून पाठीशी उभा राहिलेला मराठमोळा लोकसंग्रह यांच्या जोरावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली, तेव्हा शिवसेनेला पर्याय मिळाला, असे अनेकांना वाटले.. बरोबर आठ वर्षांपूर्वी, ९ मार्च २००६ या दिवशी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पक्षस्थापनेची घोषणा करण्यासाठी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर घेतलेल्या पहिल्या प्रचंड जाहीर सभेतील त्यांच्या पहिल्या भाषणामुळेच, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे एक स्वप्न या नेत्याच्या डोळ्यांत आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ही आहे, अशी अनेकांची खात्रीही झाली. या सभेच्या दुसऱ्याच दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू झाली आणि सेनेच्याच अनेक शाखांवर ‘मनसे’चा झेंडाही चढला..
राजकीय पक्ष म्हणून स्वतंत्रपणे काम सुरू झाल्यानंतर पक्षाला मध्यवर्ती कार्यालय हवे, म्हणून मुंबईच्या मध्यवस्तीत आणि शिवसेनेच्याच बालेकिल्ल्यात, म्हणजे दादरलाच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मध्यवर्ती कार्यालयही सुरू झाले.. माटुंग्याच्या यशवंत नाटय़गृहावरून रुपारेल महाविद्यालयाकडे जाताना, कासारवाडी नावाची महापालिका कर्मचाऱ्यांची एकमजली बैठी वसाहत दिसते. या परिसरात मराठमोळेपण इतके भिनले आहे, की ‘बंबईया हिंदी’लाही इथे मराठीतूनच प्रतिसाद मिळतो. मुंबईच्या इतर भागांत दोन मराठी माणसंदेखील संभाषणाची सुरुवात हिंदीतून करतात आणि बोलता बोलता, आपण मराठी आहोत हे लक्षात आल्यावर मराठीवर येतात. इथे मात्र, हिंदी भाषकालाही मोडक्यातोडक्या मराठीतूनच बोलावे लागते. असा हा अस्सल ‘मराठमोळा’ परिसर.. पण या मराठीला इंग्रजीचे वावडे नाही.. या परिसरात कुणालाही ‘राजगडा’चा पत्ता विचारला, तर तो अगोदर अचंब्याने चेहरा न्याहाळतो. ‘राजगड माहीत नाही,’ असा सवाल त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेला असतो. दादर परिसरातच नव्हे, तर मुंबईतच नवा दिसतोय, अशी खात्रीही त्याच्या डोळ्यांत उमटते आणि तो पत्ता सांगतो. ‘इथून स्ट्रेट पुढे जा आणि सर्कलला लेफ्ट घ्या..’ या ‘मराठमोळ्या’ मार्गदर्शनानंतर ‘राजगड’ सापडणार नाही, असे होतच नाही.. हा राजगड म्हणजेच, राज ठाकरे यांच्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे मध्यवर्ती कार्यालय. ‘मातोश्री टॉवर्स, पहिला मजला, पद्माबाई ठक्कर मार्ग, यशवंत नाटय़गृहाजवळ, रुपारेल महाविद्यालयाशेजारी, माहीम, मुंबई-२८’ हा या कार्यालयाचा अधिकृत पत्ता.. गेल्या आठ वर्षांत, राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या रेल्वेभरती आंदोलनासारख्या अनेक घटनांचा जन्म मातोश्री टॉवरच्या पहिल्या मजल्यावरील या कार्यालयाच्या खलबतखान्यातच झाला आणि इथूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव सर्वतोमुखी झाले.
देशात सर्वच प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व व्यक्तिकेंद्रित आहे, तसेच या पक्षाचेदेखील आहे. राज ठाकरे हेच या पक्षाचे सर्वेसर्वा. पक्षात त्यांचा शब्द अंतिम आणि त्या शब्दाला पर्यायही नाही. या ठिकाणी हा शब्द घुमतो, म्हणून याचे नाव ‘राज’गड.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बांधणी शिवसेनेसारखीच आहे. मुंबईच्या पलीकडे अनेक शहरांमध्ये आणि गावागावांतही शिवसेनेच्या रचनेसारख्याच मनसेच्याही शाखा आहेत, या शाखांची जिल्हा कार्यालये म्हणजेदेखील, त्या त्या ठिकाणचे ‘राजगड’च!..
लोकसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाने ज्या ज्या मतदारसंघांत मुसंडी मारली, तेथे तेथे शिवसेना आणि भाजपच्या तोंडाला फेस आला. मुंबईत तर या युतीची दाणादाण उडाली. याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. त्यामुळेच या वेळीही राज ठाकरे यांच्या खेळीकडे राजकारणाचे लक्ष लागले आणि राजगडाला महत्त्व आले. मातोश्री टॉवरच्या आसपास वृत्तवाहिन्यांची गर्दी सुरू झाली आणि अपेक्षेप्रमाणे अनेक बातम्यांचा ओघ इथून सुरूही झाला..
पण सध्या मात्र राजगडावर शांतता आहे. मातोश्री टॉवरच्या पहिल्या मजल्यावरील दहा-बारा दालनांच्या या कार्यालयात, एखाद-दुसरे दालनच उघडलेले दिसते. सभागृहात फायलींचे ढिगारे आहेत. प्रत्येक दालनातही कागदपत्रांच्या चळती दिसतात. राज ठाकरे यांचे मुख्य दालन अलीकडे फारसे उघडले जात नाही. कारण मनसेच्या राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू सध्या राजगडावरून ‘कृष्णकुंज’वरच सरकला आहे. म्हणूनच, राजगडावर शांतता दिसते, तेव्हा कृष्णकुंजच्या परिसरात हलचल सुरूच असते..
मातोश्री टॉवरच्या जिन्याने चढून गेल्यावर समोरच्या बंद दरवाजावर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय’ अशी पाटी दिसते. रस्त्यावरच्या राजकारणातही दबदबा असलेल्या या पक्षाच्या कार्यालयाचा दरवाजा ढकलून आत गेल्यावर मात्र, दडपण दूर होते आणि हलके हलके होऊन जाते. डावीकडच्या स्वागत कक्षात बसलेला कुणी कार्यकर्ता, ओळख पटविण्याआधीच अदबीने उभा राहतो, विचारपूस करतो आणि समोरच्या सोफ्यावर बसताक्षणी पाण्याने भरलेला ग्लास घेऊन कुणी तरी अदबीने समोर उभाही राहिलेला असतो.. आजूबाजूलाही चारदोन कार्यकर्ते बसलेले असतात. पण इथे आवाज नसतो. सारे डोळे समोरच्या टेलिव्हिजनवर लागलेले असतात. ‘इथे चोवीस तास बातम्याच पाहायला मिळतात.. या टीव्हीवर करमणूक नाही..’ मनसेशी जवळीक असलेला कुणी तरी हळूच कानाशी पुटपुटतो.. ‘सध्या साऱ्या हालचाली कृष्णकुंजवरूनच होतात. कृष्णकुंज म्हणजे, राज ठाकरे यांचे निवासस्थान.. तिथेच पक्षाच्या धोरणांची आखणी होते, बैठका होतात, भेटीगाठींचे केंद्रही तेच. त्यामुळे राजगड सध्या शांत शांतच आहे. तरीही दिवसातून एखादी तरी चक्कर इथे मारलीच पाहिजे, असं अनेक ‘मनसैनिकांना’ वाटतंच.. म्हणूनच दिवसभरातून किती तरी कार्यकर्ते राजगडावर फेरफटका मारतात..’ तो कार्यकर्ताच पुढे सांगून टाकतो.
‘राजगडा’च्या पायऱ्या उतरून आपण बाहेर पडतो आणि रस्त्यावरून ‘मातोश्री टॉवर’कडे वळून पाहतो.. तिथे सारे शांत शांत असल्याचे जाणवते, पण या शांततेचा आवाज मात्र मनात घुमतच असतो..

सध्या राजगडावर शांतता आहे. मातोश्री टॉवरच्या पहिल्या मजल्यावरील दहा-बारा दालनांच्या या कार्यालयात, एखाद-दुसरे दालनच उघडलेले दिसते. सभागृहात फायलींचे ढिगारे आहेत. प्रत्येक दालनातही कागदपत्रांच्या चळती दिसतात. राज ठाकरे यांचे मुख्य दालन अलीकडे फारसे उघडले जात नाही. कारण मनसेच्या राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू सध्या राजगडावरून ‘कृष्णकुंज’वरच सरकला आहे.

kolhapur, hatkanangale, BJP, Maharashtra Kranti Sena Party, Constituent Party in mahayuti, Maharashtra Kranti Sena in mahayuti, lok sabha 2024, election 2024,
महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता; भाजपकडून मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
Chandrashekhar Bawankule,
“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”
वीस वर्षे ‘ज्या’ व्यक्तीविरोधात संघर्ष केला तिलाच राष्ट्रवादीने आयात केलं, साहजिकच विलास लांडे नाराज होतील – अमोल कोल्हे
amravati lok sabha
राणा दाम्‍पत्‍याची चहूबाजूंनी कोंडी, महायुतीतून आव्‍हान, भाजपमधूनही विरोध