माना वळल्या त्या कशासाठी?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचा जनाधार वाढवण्यासाठी नवे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे प्रयत्नशील आहेत. त्यांचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक प्रतिष्ठेची करूनही भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. प्रचारार्थ प्रामाणिकपणे राबणारे कार्यकर्ते हिरमुसले होते. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये चिंतन बैठक झाली. शिरस्त्याप्रमाणे पराभवाची कारणे शोधण्यात आली. त्यातील एक कारण होते घरभेद्यांचे. पक्षाचा चिंतन अहवाल तसा गोपनीय होता. पण त्यामध्ये काय आहे हे एव्हाना तळय़ातल्या कार्यकर्त्यांपर्यंतही पोहोचले आहे. साहजिकच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेत पोटनिवडणुकीत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. बावनकुळे यांच्या शेजारीच बसलेल्यांमध्ये कथित फुटीर होतेच. प्रश्न येताक्षणी अशांची मान आपोआपच नाराजीने अन्यत्र वळली. त्यांची ही देहबोली बरेच काही दर्शवणारी होती. त्यावरून माना वळल्या त्या कशासाठी? अशी कुजबुज रंकाळय़ावर जमलेल्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये सुरू राहिली म्हणे.

चुकीचे प्रायश्चित्त

सांगली जिल्ह्यातील मिरज शहर वैद्यकीय केंद्र म्हणून पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात ओळखले जाते. रुग्ण, रुग्णांचे नातलग यांची सातत्याने ये-जा या शहरात होत असते. याशिवाय सांगलीच्या बाजारात गूळ, हळद, धान्य यांची आवकही मोठी आहे. मिरज शहरात येत असतानाच वाहनांची तपासणी करण्याचा अलिखित नियम या शहरातील वाहतूक पोलिसांचा आहे. मिरजेत प्रवेश करताना महात्मा गांधी चौकात असलेला नाका वरकमाईचे महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. याच ठिकाणी दोन दिवसांपुर्वी एका वाहनधारकाला हजार रुपये दंड आकारण्यात आला. वाहनचालक गयावया करू लागला. शेवटी ऑनलाइन दंडाची आकारणी केली. परंतु यंत्रावर बटण दाबताना चुकून रोखीने हा पर्याय स्वीकारला. बिचारा पोलीस.. हजार रुपयांचा चाट. दिवसाची कमाई दंडातच गेली म्हणायचे.

मिसळीचे राजकारण

खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रनराजे भोसले हे चुलते एकमेकांवर कुरघोडी करण्याची साधी संधी सोडत नाहीत. सध्या दोन्ही बंधू भाजपमध्ये. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सातारा दौऱ्यात दोन्ही राज्यांच्या घरी जाणे भागच होते. उदयनराजे यांच्या निवासस्थानी गेले. तेथे मिसळपावचा बेत होता.  बावनकुळेंचा ताफा पुढे शिवेंद्रनराजे यांच्या राजवाडय़ावर पोहोचला. तेथे उदयनराजे यांच्याकडील मिसळीचा उल्लेख झालाच. त्यावर उदयनराजे यांनी मुद्दामहूनच मिसळ ठेवली असणार, अशी मिश्कील टिप्पणी शिवेंद्रनराजे यांनी केली. हा मिसळ बेत चर्चेत का आला? गेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्या विरोधात माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील लढले होते. तेव्हा शिवेंद्रनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील ‘मिसळ भेटी’ची खमंग चर्चा झाली होती. उदयनराजे यांच्या राजवाडय़ावरील मिसळ बेताच्या वेळी नरेंद्र पाटील हे आवर्जून उपस्थित होते. यातूनच शिवेंद्रनराजे यांनी मिसळीचा चिमटा काढला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे तसे नशीबवान लोकप्रतिनिधी आहेत. ऐनवेळी मतदारसंघ आणि पक्ष बदलूनही ते निवडून आले. त्यांची खंत मात्र वेगळीच आहे. दोन साखरसम्राट आणि दोन आजीमाजी मंत्र्यांमध्ये अडकल्याने आपल्याला डावलले जाते, दखल घेतली जात नाही, असे त्यांना वाटते. हे दोन साखरसम्राट व आजीमाजी मंत्री म्हणजे भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात. शिर्डी लोकसभा मतदारसंघात थोरात यांच्या संगमनेर व विखे यांच्या राहता विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. खासदार लोखंडे सध्या बाळासाहेबांची शिवसेनाह्ण या पक्षात आहेत. जलजीवन मिशनह्णचा शिर्डी मतदारसंघातील योजनांच्या कामाचा आढावा घेताना त्यांनी ही खंत बोलून दाखवली. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील रस्त्याच्या कामासाठी आपण केंद्र सरकारमार्फत २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. परंतु या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आपल्याला साधे निमंत्रणही दिले नाही, अशी त्यांची तक्रार आहे. पूर्वी त्यांचेह्ण (बाळासाहेब थोरात) सरकार होते,  आता यांचेह्ण (राधाकृष्ण विखे) सरकार आले आहे. त्यामुळे आपली अवस्था जिल्ह्यात इकडे आड-तिकडे विहीरह्ण अशी झाली आहे. दोन्हीमधून चालायचे आहे, तेही न पडता पुढे जायचे आहे, सुरक्षित प्रवास करायचा आहे, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.

(सहभाग : मोहनीराज लहाडे, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे, विश्वास पवार)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mps regret increase bjp base state president mla chandrasekhar bawankule effortful ysh
First published on: 15-11-2022 at 00:02 IST