यशस्वी पुरुषाच्या फक्त पाठीशी उभे राहण्यापेक्षा स्वत:च यशस्वी होत असलेल्या स्त्रियांना या प्रवासात अनेक प्रश्नही पडू लागले. घराबाहेरचे जग पुरुषांच्या सोयीनुसार तयार झालेले असताना त्यात स्वतचा अवकाश शोधू पाहणाऱ्या व स्थान निर्माण करणाऱ्या या स्त्रियांचे प्रश्न हे केवळ तिच्यापुरते नाही तर सामाजिक, आर्थिक, राजकीय स्तरावरचेही आहेत. धर्मापासून राजकारणापर्यंत, मनोरंजनापासून संशोधनापर्यंत, अर्थजगतापासून प्रशासकीय सेवेपर्यंत कर्ती आणि करवितीच्या भूमिकेत पोहोचलेल्या स्त्रिया ‘लोकसत्ता’ आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’च्या परिसंवादात एकत्र आल्या आणि या सर्वच विषयांवर विचारांची घुसळण झाली. या दोन दिवसांच्या परिषदेचा हा आढावा..

..तेव्हा लढा संपेल!

गेली १५ वर्षे मी या

शहरातील स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन बदलताना बघते आहे. हा बदल शहराप्रमाणेच गावातही थोडय़ाफार प्रमाणात होत असणार, असा विश्वास आहे. मात्र ज्या दिवशी स्त्रीत्व साजरे करणे संपेल, त्या दिवशी महिलांचा लढा संपेल..

‘लो कसत्ता’च्या बदलता महाराष्ट्र या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्या दिवसापासूनच दोन प्रश्न मी स्वत:ला विचारत आहे. पहिला प्रश्न म्हणजे करिअरसाठी मुंबईसारख्या शहरात एकटी आल्यानंतर स्त्री म्हणून काही वेगळे अनुभव आले का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे गेल्या १५ वर्षांत खरेच काही बदलले का?

मुंबईला येताना नायिका वगैरे होण्याचा विचार अजिबातच केला नव्हता. पण सुरुवातीच्या काळात एका दिग्दर्शकाला पडद्यावरील चाचणीसाठी भेटले. त्याने मला सांगितले की, तुला मी ऐकू शकतो. मात्र दोन तास पडद्यावर नायिका म्हणून पाहू शकत नाही. मलाही ते पटले. त्यानंतर तीन-चार वर्षांतच मला नायिका म्हणून चित्रपट मिळाला. यात, मी स्वत:ला किती सुधारले, हा भाग वेगळा. पण त्या चार-पाच वर्षांत समाजाचा दृष्टिकोन नक्कीच बदलला होता. आतापर्यंत सोशीक, सालस वगैरे महिलेलाच नायिका म्हणून स्वीकारणारा समाज माझ्यासारख्या आक्रमक मुलीलाही नायिका मानायला आणि माझे कौतुक करायला तयार झाला.

अर्थात मी शहरी मुलींचे प्रतिनिधित्व करते. ग्रामीण भागातील मुलींचा लढा खूप तीव्र असेल. ग्रामीण भागात विषमताही नक्कीच जास्त आहे. पण शहरात हा बदल होत असेल, तर त्याचे पडसाद थोडय़ा फार प्रमाणात का होईना, पण ग्रामीण भागात नक्कीच उमटले असतील. ही गोष्ट ‘छापा-काटा’च्या वेळी जाणवली. ‘छापा-काटा’ या नाटकात स्वार्थासाठी मुलीला अटकाव करणारी आई आणि मुक्त आणि चांगलं जगण्याची आसक्ती असलेली मुलगी हा संघर्ष आहे. राज्यातील वेगवेगळ्या स्तरांतील लोकांनी या नाटकाला पावती दिली.

महिला जेव्हा त्यांचे काम मनापासून करतात, तेव्हा त्या खूप सूंदर दिसतात. पण त्यासाठी महिलांनीच एकमेकींना दाद देण्याचीही गरज आहे. वेगळ्या क्षेत्रात काम करणारी म्हणून महिलेचा सत्कार होण्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रात उत्तम काम करणारी म्हणून तिचा गौरव झाला पाहिजे. कारण वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेचा सत्कार होतो, त्या वेळी आपण स्त्रीत्व साजरे करीत असतो. पण माझ्या मते, हे स्त्रीत्व साजरे करण्याची गरज संपेल, त्या वेळी स्त्रियांचा मोठा लढा संपेल आणि समानता प्रस्थापित झाली, असे म्हणता येईल.