शास्त्रीय संगीत, ठुमरी, ध्रुपद धमार अशा संगीतप्रकारांतील प्रत्येक स्वर उजळून टाकणारे ज्येष्ठ गायक पंडित मुकुल शिवपुत्र यांच्याशी मनमुक्त गप्पांची मैफल रंगली ती ‘लोकसत्ता’ आयोजित ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर व साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी पं. मुकुल शिवपुत्र यांच्याशी संवाद साधला. या मैफलीत सूर होते कुमारजींच्या आठवणींचे, गाण्याच्या सौंदर्याचे, नादाचे-अनाहत नादाचे.. या रसभरीत मैफलीची सांगता मुकुलजींनी केली ती ‘गुरा तो जिने..’ या रचनेने. या अरभाट मैफलीस संगीत, साहित्य, नाटय़, चित्रपट अशा सांस्कृतिक विश्वातील जाणती मंडळी आवर्जून उपस्थित होती. या मैफलीची ही चित्रमय झलक..

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. मुकुल शिवपुत्र हे ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया..

‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

01

02

ही तर वेगळी पर्वणी

मुकुल शिवपुत्र हे अत्यंत विचारी व्यक्तिमत्त्व असून त्यांचे विचार ऐकणे ही एक वेगळीच पर्वणी ठरली. विचारण्यात आलेल्या साध्या व गंभीर प्रश्नांचीही उत्तरे त्यांनी मनमोकळेपणे दिली. या उत्तरांमधूनच त्यांचे वेगळे विचार पुढे आले. मुलाखतीचा नूर काहीसा गंभीर होता, तो मात्र त्याला टाळता येऊ शकला असता.   रामदास भटकळ, प्रकाशक

कलाकारातील माणूस उलगडला

‘लोकसत्ता गप्पा’ हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. मी पहिल्यांदाच या उपक्रमाला उपस्थित राहिलो. उपक्रमाच्या निमित्ताने एका कलाकारातील माणसाला उलगडताना आम्हाला पाहता आले. मुकुल शिवपुत्र यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध कंगोरे गप्पांमधून रसिकांपुढे खुले झाले आणि हे या उपक्रमाचे यश आहे.   पं. सतीश व्यास, ज्येष्ठ संतूरवादक

विद्वत्तेचे भांडार

गाण्याप्रमाणेच पं. मुकुल शिवपुत्र यांचे विचार आणि बोलणेही सुंदर आहे. त्यांच्याकडे ‘संगीत’ विषयाबाबत प्रचंड विद्वत्ता आणि भांडार आहे. त्यांचे विचार ऐकण्याची संधी मला याआधी मिळाली नव्हती ती ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमामुळे मिळाली.   राहुल रानडे, संगीतकार

मोजक्या शब्दांत विचारांची मांडणी

आपल्या संस्कृतीचे, कलेचे जतन करणाऱ्या आणि त्याचा खजिना उघडून दाखविणाऱ्या कलाकारांची मला नेहमीच आस असते. पंडित मुकुल शिवपुत्र यांना ऐकून ती आस पूर्ण झाली. अत्यंत मोजक्या शब्दांत, पण योग्य रीतीने त्यांनी आपले विचार मांडले.   अमृता सुभाष, अभिनेत्री

 

रसिक व कलाकार यांच्यात असा संवाद हवा

नाटक, चित्रपट, कला, संगीत आदी माध्यमांमधील कलाकार आणि रसिकांचा संवाद असणे आवश्यक आहे. ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रमामुळे तो शक्य झाला आहे. शिवाय मुकुल शिवपुत्र यांचे गाणे दुर्मीळ आहे. त्यांच्या विचारांच्या आणि सुरांच्या लाटेवर आम्ही तरंगत राहणार आहोत. शुभांगी गोखले, अभिनेत्री

आनंद अनुभवता आला

मी शास्त्रीय संगीताचा दर्दी आहे. संगीत ऐकून त्यातून काय प्रतीत होते व त्याचा आनंद कसा व किती घेता येतो याचा अनुभव मफलीत बसून घ्यावा लागतो. तो आज अनुभवता आला. शास्त्रीय संगीताची मफल कलाकारांच्या स्वत:च्या शोधाची आणि आपण त्या अभिव्यक्तीच्या शोधाची असा दोघांचा प्रवास एकत्र होतो हे आजच्या गप्पांमधून मला कळले.   सचिन खेडेकर, अभिनेता

समाधान मिळाले

‘लोकसत्ता गप्पा’ हा उपक्रम अत्यंत सुंदर पद्धतीने चालू आहे. या गप्पांमध्ये मुकुल शिवपुत्र यांचे गाणे ऐकून मला समाधान आणि आनंद मिळाला.  चित्रा पालेकर, अभिनेत्री व दिग्दर्शिका

उपक्रम चांगला

‘लोकसत्ता’चा हा उपक्रम उत्तम आहे. मला संगीतातील फारशी जाण नाही. एक सर्जनशील कलावंत आपल्या कलेबद्दल काय विचार करतो हे या कार्यक्रमातून जाणून घेता आले. तसेच एका कलाकाराला समजून घेण्यासाठी व आपल्या कलेत अजून काय चांगले करता येईल त्याचा मार्ग दाखविण्यासाठी प्रेरणादायी कसे ठरू शकते ते या गप्पांमधून समजले.  इला भाटे, अभिनेत्री

आनंद देणारा उपक्रम

मुकुल शिवपुत्र यांची गायकी व त्यांचा अभ्यास अध्यात्माच्या जवळपास पोहोचला आहे. शरीर व आत्मा या दोन्हींमध्ये मला त्यांची गायकी जाणवली. गप्पांचा समारोप त्यांनी ज्या भजनाने केला त्यामुळे मी सुखावलो. ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम आजच्या धावपळीच्या जीवनात दोन क्षण निवांत करणारा आणि आनंद देणारा आहे.   पुरुषोत्तम बेर्डे, दिग्दर्शक

संगीतातील मूलभूत गोष्टी कळल्या

‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात मी पहिल्यांदाच उपस्थित राहिलो. संगीतातील मूलभूत गोष्टी कळल्या आणि अनुभवताही आल्या. एकूणच सर्व पातळ्यांवर ‘गप्पा’ हा भाग कमी होत असताना एखाद्या मोठय़ा कलावंतांबरोबर अशा गप्पा होणे आवश्यक आहे.  प्रशांत दळवी, लेखक

03

05

06

07

08

प्रतिक्रिया संकलन – संकेत सबनीस, अक्षय मांडवकर 

छाया – दिलीप कागडा, प्रशांत नाडकर