मुकुंद संगोराम

पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांनी लताबाईंचे वर्णन ‘उस्तादों की उस्ताद’ या शब्दांत करतानाच म्हटले होते की, ‘‘कंबख्त कभी बेसुरीही नहीं होती!’’ शब्दांच्या शरीरात अनाहत असलेले भाव सहज चिमटीत पकडून त्यांना स्वरांनी पेलण्याचे अजब कसब लताबाईंनी कमावले होते..

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

साऱ्या भारतवर्षांला सुरेलपणा म्हणजे काय, हे आपल्या तरल, गोड आणि भावभावनांनी भरलेल्या आवाजाने समजावून सांगणारी कलावती म्हणून लता मंगेशकर यांनी सात दशकांहून अधिक काळ केलेली अचाट, अफाट आणि समृद्ध कामगिरी ही या देशाची सांगीतिक क्षेत्रातील सगळय़ांत मोठी खूण मानली गेली. ज्या काळात भारतीय अभिजात संगीतामध्ये नवनव्या प्रयोगांची मालिका घडत होती, अनेक नव्या कलावंतांच्या प्रतिभेला बहर येत होता, त्या काळात तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या चित्रपट या माध्यमाने कलांच्या क्षेत्रात अक्षरश: खळबळ माजवली होती. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मराठी संगीत नाटकांच्या परंपरेला १९३२ मध्ये आलेल्या ‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटाने घरघर लागली. अनेक नाटक कंपन्या कर्जबाजारी होत बंद पडू लागल्या आणि संगीताच्या रसिकांना चटपटीत, तरीही अभिजात, अशा चित्रपट संगीताची भुरळ पडू लागली.

बलवंत संगीत नाटक मंडळी हे नाव मराठी संगीत नाटकांच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचे. मास्टर दीनानाथ (१९००-१९४२) यांनी सुरू केलेल्या या संस्थेने सादर केलेल्या संगीत नाटकांना त्या काळात रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. नटसम्राट बालगंधर्व यांच्या लोकप्रियतेच्या काळात स्वत:ची नाटक कंपनी स्थापन करणे, हेच मुळी अतिशय धारष्टय़ाचे होते. आपल्या वेगळय़ा आणि तडफदार गायकीने मा. दीनानाथ यांनी आपली स्वतंत्र छाप उमटवली आणि स्वत:चा खास चाहता वर्ग निर्माण केला.

मा. दीनानाथ आणि माई मंगेशकर यांना पाच अपत्ये. लता, आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ. हे सगळे जण भारतीय ललित संगीताच्या दुनियेतील जादूगार ठरले. प्रत्येकाने आपापली स्वतंत्र ओळख निर्माण करून आपले अधिराज्य निर्माण केले. लता मंगेशकर यांच्या वयाच्या तेराव्या वर्षी मा. दीनानाथ यांचे अतिशय हलाखीत निधन (१९४२) झाले. साहजिकच संपूर्ण घराची जबाबदारी चिमुकल्या लतावर पडली. त्या वेळी या कुटुंबास नवयुग चित्रपटाचे मालक असलेल्या मा. विनायक यांनी आधार दिला. मा. दीनानाथ, बापूसाहेब पेंढारकर आणि चिंतामणराव कोल्हटकर या त्या काळातील ज्येष्ठ कलावंतांच्या निधनानंतर त्यांच्याच मुलांनी एकत्र येऊन राम गणेश गडकरी यांच्या ‘भावबंधन’ या नाटकाचे प्रयोग केले. त्यामध्ये लताबाई, भालचंद्र पेंढारकर आणि चित्तरंजन कोल्हटकर यांनी भूमिका केल्या होत्या.

अगदी लहानपणापासूनच गायक होण्याचे स्वप्न पुरे करणे हे त्या काळातील एकूण संगीताच्या क्षेत्रातील अतिशय अवघड काम होते. लता मंगेशकर यांनी, त्याच वर्षी म्हणजे १९४२ मध्ये ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटात भूमिका केली. त्यातील ‘नाचू या गडे खेळू सारी’ हे गीत त्यांनी स्वत:च गायले होते. १९४७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आप की सेवा में’ या चित्रपटासाठी त्यांनी प्रथमच पार्श्वगायन केले. त्यातील ‘पा लागू कर जोरी रे’ हे त्यांचे गीत त्याही काळी गाजले. तरीही चित्रपटाच्या दुनियेत ओळख निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होतेच. १९४९ मध्ये आलेल्या ‘महल’ या चित्रपटातील ‘आएगा आनेवाला.. आएगा’ या गीताने लता मंगेशकर यांनी प्रथमच आपली स्वरओळख करून दिली.

त्यानंतरची सहा दशके ही केवळ ‘लता मंगेशकर’ या एकाच नावाभोवती फिरत राहिली. एवढा प्रदीर्घ काळ सातत्याने आपले स्थान केवळ कलागुणांवर टिकवून ठेवण्याचे शिवधनुष्य पेलताना त्यांना प्रचंड कष्ट करावे लागले. मानापमानांबरोबरच दारिद्य्र आणि चिंतेच्या वातावरणातही केवळ धीराने आणि प्रयत्नपूर्वक त्यांनी आपले स्थान अबाधित ठेवले. कलांच्या क्षेत्रात वशिलेबाजी चालत नाही. तिथे नाणे केवळ खणखणीतच असावे लागते. त्यामुळे या सहा दशकांत अनेक कलावंतांनी लताबाईंशी बरोबरी करण्याचे हरप्रयत्न केले, मात्र लताबाईंचे स्थान त्यांच्या कलेतील समर्पणामुळे अबाधित राहिले. जगण्याच्या प्रत्येक क्षणी कोटय़वधी भारतीयांना दिलासा देणारे त्यांचे स्वर हे प्रत्येकासाठी सुखनिधान ठरले. आनंद, दु:ख, करुणा, प्रेम, वात्सल्य, व्यथा, अवखळपणा, लडिवाळपणा, प्रणयाराधन, आर्जव अशा सगळय़ा भावनांना आपल्या स्वरांच्या कुशीत घेऊन, थेट रसिकाच्या हृदयापर्यंत पोहोचणारा त्यांचा स्वर ही भारताचीच खरी ओळख ठरली.

लताबाईंचे संगीताचे सुरुवातीचे शिक्षण अमानत अली खाँ यांच्याकडे झाले. स्वातंत्र्यानंतर ते पाकिस्तानात गेल्यानंतर अमानत खाँ देवासवाले आणि नंतर पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक बडम्े गुलाम अली खाँ यांचे शिष्य पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडे झाले. जन्मत: असलेल्या सुरेलपणाला दागिन्याप्रमाणे अभिजाततेचे तास द्यावे लागतात. लताबाईंनी ते सगळे अगदी मनापासून केले.

दिवसातल्या प्रत्येक क्षणी स्वरसाथ करणारा त्यांचा स्वर असंख्यांसाठी आश्वासक सोबतीचा ठरला. संगीताची ही जादू अलगदपणे पाखडणाऱ्या या कलावतीने आयुष्यात केवळ आणि केवळ संगीतच केले. त्यातील सगळय़ा प्रकारच्या आव्हानांना समर्थपणे पेलले आणि काळाबरोबर राहण्याच्या शर्यतीत दमछाक होत असतानाही, आपली ऊर्जा टिकवून ठेवली. तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या प्रचंड आव्हानांना तोंड देण्यासाठी आपले सारे आयुष्य पणाला लावणाऱ्या या कलावतीने प्रत्येकाच्या जीवनात तेवत राहणारा एक सुरेल नंदादीप उजळवत ठेवला. वडील मा. दीनानाथ यांच्याकडून मिळालेल्या अल्पकाळातील शिक्षणानंतर त्यांनी अनेक दिग्गज गायकांकडून संगीताचे धडे घेतले. निसर्गत: कमालीच्या सुरेल आवाजावर या शिक्षणाने झालेले परिणाम त्यांच्या गायनातून सहज दिसतात. मात्र लताबाईंनी लक्षपूर्वक आणि कष्टपूर्वक संगीतातील प्रत्येक पायरीवर जिंकण्यासाठीच अतिशय सावधानतेने पाऊल ठेवले.

एकेका गीताच्या ध्वनिमुद्रणासाठी दिवसदिवस घालवून शेवटच्या प्रयत्नातही आपला स्वराभिनय तसूभरही कमी न होता, ते प्रत्येक गीत म्हणजे स्वरांच्या इतिहासातील सुवर्णपानच व्हावे, ही जिद्द बाळगणाऱ्या लताबाईंना आजच्या कलावंताच्या तुलनेत खूपच अधिक कष्ट घ्यावे लागले. गायक आणि वादक यांनी एकत्रितपणे ध्वनिमुद्रण करताना, त्यातील एकानेही जराशी चूक केली, तर पुन्हा पहिल्यापासून ध्वनिमुद्रण करणे भाग पडत असे. अशा वेळी न कंटाळता लताबाई पुन्हा पुन्हा जणू पहिल्यांदाच गात आहोत, अशा उत्कटतेने ते गीत सादर करत. आजच्या ध्वनिमुद्रण तंत्रज्ञानात प्रत्येक सहभागी कलावंताला स्वतंत्रपणे गायन-वादन करता येते. त्यामुळे सगळय़ाच कलावंतांना एकत्र येण्याची गरज नसते. शिवाय पुन्हा पुन्हा ध्वनिमुद्रणही करावे लागत नाही. या तंत्रज्ञानामुळे गायनातील एखादा सूक्ष्म कणस्वरही दुरुस्त करता येतो. ही अशी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसतानाच्या काळात लताबाई त्या तंत्रावर स्वार झाल्या आणि त्यावर विजय संपादन केला. संगीतकार आणि गायक हेमंतकुमार यांच्या पहिल्या ‘आनंदमठ’ या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना पाचारण करण्यात आले होते. हा चित्रपट फिल्मिस्तानतर्फे तयार होत होता आणि त्याचे मालक शशधर मुखर्जी हे लताबाईंचे टीकाकार होते. त्यांनी हेमंतदांना बजावले होते, की या गीताचे किमान पस्तीस वेळा ध्वनिमुद्रण व्हायला हवे. गीत होतं.. ‘वंदे मातरम’. आजारी असतानाही लताबाई वेळेत पोहोचल्या आणि नव्या संगीतकाराला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी तेवढय़ा वेळा ध्वनिमुद्रण केलेही. नंतर हे गीत कालातीत होऊन गेले.

हिंदी चित्रपटसृष्टीच नव्हे, तर सारा देश लता मंगेशकरांच्या जादुई कंठाने मंत्रमुग्ध झाला. त्या सुवर्णयुगातील सगळय़ा प्रतिभावान संगीतकारांच्या मनातले गाणे लताबाई आपल्या गळय़ातून लीलया सादर करत होत्या. त्यामध्ये स्वत:च्या प्रतिभेने भरही घालत होत्या. त्या सगळय़ांसाठी लताबाईंचे असणे हेच फार आश्वासक होते. त्यांच्या मनातला हा विश्वास लताबाईंनीही सार्थ करून दाखवला. नौशाद, शंकर-जयकिशन, सी. रामचंद्र, अनिल विश्वास, एस. डी. बर्मन, मदन मोहन, रोशन, हेमंत कुमार, सलील चौधरी, जयदेव, खय्याम, वसंत देसाई यांच्यासारख्या कमालीच्या सर्जनशील संगीतकारांनी आपले सारे संगीत लताबाईंच्या भरवशावर निर्माण केले. हा स्वर त्या प्रत्येक संगीतकाराला त्याच्या ईप्सित परिणामापर्यंत नेण्यास नेहमी सज्ज राहिला. सारा देश त्या काळात लताबाईंच्या स्वरांत चिंब भिजत होता आणि कैवल्याच्या आनंदात न्हाऊन निघत होता.

लताबाईंना संगीतकाराच्या मनातले संगीत ओळखता येत होते, याचे कारण त्या स्वत: प्रतिभावान संगीतकार होत्या. ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे’ यासारख्या अस्सल मराठी मातीतल्या गीताची स्वररचना त्यांची. चित्रपटांच्या बाजारात ‘आनंदघन’ या नावाने त्यांनी निर्माण केलेले संगीत अनेक कारणांनी अजरामर ठरले. त्या संगीताची खास अशी ओळख आहे. त्यातील स्वररचनेला अभिजाततेचा, त्यातील लयकारीचा आणि वेगळेपणाचा एक अप्रतिम गंध आहे.

चित्रपट संगीताला अनेक प्रकारच्या मर्यादा असतात. एकतर ते संगीत चित्रपटातील कथानकाशी जोडलेले असते. एका अर्थाने ते उपयोजित संगीतच. त्या कथेतील भूमिकेची एक खास मागणी असते. ती आधी गीतातून व्यक्त होते. असे गीतकार हेही भारतीय चित्रपटसृष्टीने खास वेगळेपण. शब्दांना स्वरांचे पंख लावून त्यांना उंच आकाशात विहार करायला लावणाऱ्या संगीतकारांची परीक्षा गीतानंतर सुरू होत असे. गीताला एक सहजपणे चिकटलेले स्वरधुनेचे अस्तर असते. ते शोधू शकणारा संगीतकार त्या गीताला सहज न्याय देऊ शकतो. परंतु कित्येक वेळा संगीतकाराच्या मनात कुठलीतरी धुन तयार होत असते. तिला योग्य शब्दांची आणि कथानकाची वाट पाहात बसावी लागते. मदनमोहन यांच्या ‘नैना बरसे’ या गीताची स्वरावली कितीतरी आधी तयार झाली. परंतु बराच काळ तिला वाट पाहावी लागली. लताबाईंना प्रत्येक संगीतकाराच्या सगळय़ा खाणाखुणा पक्क्या माहीत होत्या. प्रत्येकाच्या संगीताची आपल्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे, याची अतिशय स्पष्ट जाणीव त्यांना होती. त्यामुळे सुवर्णकाळातील प्रत्येक संगीतकाराला ही कलावती फक्त आपल्याच गीताला अतिशय सौंदर्यपूर्ण बनवू शकते, असे वाटत असे. लताबाईंचे वेगळेपण असे की, प्रत्येक गीतातील प्रत्येक शब्दाला समजावून घेत, त्यांच्या उच्चाराकडे बारकाईने लक्ष देत, त्यातील भाव शोधत ते स्वरांच्या साह्याने पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे कमालीची प्रतिभा होती. केवळ आवाज सुरेल आहे, एवढय़ा भांडवलावर चित्रपटांच्या रुपेरी दुनियेत कुणीच कलावंत इतक्या उंचीवर पोहोचू शकत नाही. त्यांचा आवाज केवळ सुरेल होता असे नाही, तर त्या आवाजातील कमालीचा लवचीकपणा प्रत्येक संगीतकारासाठी हवाहवासा होता. या शब्दसंगीताला लताबाईंनी भारतीय संगीताच्या क्षेत्रात फार उंचीचे स्थान मिळवून दिले.

केवळ चित्रपटांसाठीच गायचे, अशी भूमिका त्यांनी कधीच घेतली नाही. भावगीते, भक्तिगीते, अभंग, लावणी अशा कितीतरी प्रकारांमध्ये लताबाईंनी कामगिरी केली. ‘अल्बम’ या संकल्पनेचा उगम होण्यापूर्वीही लताबाईंनी अशा अनेक ध्वनिमुद्रिकांसाठी काम केले. ‘शिवकल्याण राजा’ , संत मीराबाईंच्या विराण्यांवरील ‘चाला वाही देस’, त्याहीआधी ज्ञानेश्वरी, ‘अभंग तुकयाचे’, ‘आदिनाथाची गाणी’, भगवत गीता, गालिबच्या रचना, ‘सजदा’ (जगजीत सिंग यांच्यासह) सर्वमंगल गणेश, ‘राम शाम गुण गान’ (पं. भीमसेन जोशी यांच्यासह) यांसारख्या अनेक ध्वनिमुद्रिकांनी लोकप्रियतेची नवनवी शिखरे पादाक्रांत केली. त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी केलेली ही कामगिरी अपूर्वाईचीच म्हटली पाहिजे.

पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांनी लताबाईंचे वर्णन ‘उस्तादों की उस्ताद’ या शब्दांत करतानाच म्हटले होते की, ‘‘कंबख्त कभी कभी बेसुरीही नहीं होती!’’ शब्दांच्या शरीरात अनाहत असलेले भाव सहज चिमटीत पकडून त्यांना स्वरांनी पेलण्याचे अजब कसब लताबाईंनी कमावले होते. त्यांनी गायलेल्या प्रत्येक गीतावर त्यांची लफ्फेदार स्वरस्वाक्षरी ही त्यांची निजखूण. या स्वराभिनयामुळे शब्द संगीताच्या क्षेत्रात त्यांनी जो मानदंड प्रस्थापित केला, त्यामुळेच हे संगीत अधिक बहरले आणि फुलले.

**********

लताताई गेल्या, या बातमीवर प्रथम विश्वास ठेवणं कठीण गेलं. भारतीय संगीतातील एक श्रेष्ठ आवाज हरपला. त्यांचा आदर्श समोर ठेवून अनेक गायिका घडल्या. मानवी जीवनातील साऱ्या भावना त्यांच्या गीतांमधून प्रतििबबित झाल्या. आम्ही दोघींनी एकच गाणं एकत्र गायलं. ‘चाँद’ चित्रपटामध्ये. अनेकदा रसिकांनी त्यांच्या-माझ्या आवाजाची गल्लतही केली. त्या मला नेहमीच आदरस्थानी होत्या. महाराष्ट्र शासन आणि मध्यप्रदेश शासन यांचे  त्यांच्या नावाने दिले जाणारे सर्वोच्च पुरस्कार मला मिळाले, हे माझं भाग्य. मी अतिशय दु:खी मनाने त्यांना श्रद्धांजली वाहते.

सुमन कल्याणपूर

**********

लताजींचा आणि माझा प्रत्यक्ष असा फारसा संबंध आला नाही. पण त्यांच्या आवाजामुळे त्या सतत माझ्याबरोबर आहेत. संगीताच्या क्षेत्रात न कळत माझं पाऊल पडलं होतं त्या काळात ज्या कलाकारांचे माझ्यावर संस्कार झाले त्यात बडे गुलाम अली खाँ, सिनेअभिनेत्री नूरजहाँ तशाच लताजीही होत्या. संगीत प्रस्तुतीमध्ये आवाजाचं माध्यम कसं असायला हवं, याची जाणीव या कलाकारांच्या स्वरांनी मला करून दिली. आवाजाची फेक, शब्दांचे उच्चार, भावनिर्मिती अशा किती तरी गोष्टींचा त्यामुळे मी विचार करायला लागले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीत ही मुळात एक कला आहे, ते केवळ शास्त्र नाही, हे ध्यानात घ्यायला हवं. शास्त्रीय संगीत हे शास्त्र दाखविण्यासाठी नसतं. तिथे राग सौंदर्याचं दर्शन होणं अपेक्षित असतं. लताजींचा आवाज, सादरीकरण यामुळे शास्त्रीय संगीताचा पोत, लालित्य, भाव अशा गोष्टींकडे कलाकार अधिक लक्ष देऊ लागले आहेत. लताजींचं गाणं हे खऱ्या अर्थानं भारताचं रत्न आहे.

डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका

**********

कविता, शब्दकळांच्या आधारे ओसाड माळरानावर जगणाऱ्याला स्वरांनी ‘चिंब पावसाने आबादानी’ करणारा स्वरांचा युगान्त,असं आहे लतादीदीचं जाणं. निष्पर्ण, शुष्क भागात येणारं गोड सीताफळ हे विपरीत परिस्थितीशी झुंजतं, म्हणून अजिंठा डोंगरातील शेतीतील सीताफळाच्या झाडाला लतादीदीचं नाव दिलं होतं. वयाच्या १० व्या वर्षांपासून लढणारी, धनादेशाऐवजी रोखीत कमी पैसे मिळाले तर घर भागेल म्हणून गाणारी लता, ही अशीच सीताफळासारखी अवीट गोडी टिकविणारी. बागेतल्या सीताफळाला लतादीदीचं नाव देण्यामागे ही भूमिका होती. ‘जैत रे जैत’ची गाणी करताना त्यांनी विश्वास दाखवला. स्वातंत्र्य दिलं. तुमच्या शब्दकळा तशाच राहू द्या, कारण त्या मातीशी जोडलेल्या आहेत, असं त्या म्हणत. १९ ते २१ मार्च १९७७ मध्ये तीन दिवस प्रभुकुंजवर बसून अनुभवलेले क्षण माझ्या खडकाळ जीवनाचं सोनं करणारे होते. त्यांनी स्वरांनी जग जिंकलं होतं. पण त्यांच्यातील माणूसपण खूप मोठं आहे. गाण्यातील कवितेवर प्रेम करताना तुम्ही कविता लिहा, तुमचं लोकसंगीत मांडा,असं सांगणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी खूप कविता गायल्या. अगदी राधाकडूनही ‘सुटला अंबडा बांधु दे सावरिया, चाफ्याची शुभ्र फुले माळू दे सावरिया’ गाऊन घेतलं. खरंतर आपल्यासाठी आठ-दहा गाणी करू असं लतादीदी म्हणाल्या होत्या. पण ते आता राहून गेलं. ‘तापी भरु दे वाहूनी’ या संकल्पनेवर आधारित सहा-आठ गाणी केली होती. अलीकडच्या काळात वाढत चाललेल्या सामाजिक कुरूपपणामुळे त्या अस्वस्थ होत. पण त्यातूनच निसर्ग, हिरवळ, पाने, फुलांशी गाण्यातून होणारी जवळीक नवे करण्याची ऊर्मी देत असत. केवळ गाणी आणि कविता म्हणून नाही, तर कौटुंबिक जिव्हाळा जपणाऱ्या लतादीदीचं जाणं स्वरांचा युगान्त आहे.

– ना. धों. महानोर, ज्येष्ठ कवी