पंडित कुमार गंधर्व हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या सांगीतिक घडामोडींचे साक्षीदार. भारतीय संगीत निसर्गाशी तादात्म्य पावलेले असते, याचा अनुभव कुमारजींच्या गायनातून येतो. ही संगीत परंपरा पुढे नेणे आणि भारतीय अभिजात संगीताला पुन्हा रसिकांसमोर त्याच उन्मेषाने सादर करणे, हे त्यांच्या शिष्या आणि पत्नी वसुंधराताई यांनी स्थापन केलेल्या ‘कुमार गंधर्व प्रतिष्ठान’चे ध्येय आहे.

पल्या असामान्य प्रतिभेने आणि सर्जनशीलतेने भारतीय अभिजात संगीतात एक मानदंड निर्माण करणारे पंडित कुमार गंधर्व हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या सांगीतिक घडामोडींचे साक्षीदार राहिले आहेत. ज्या महान कलावंतांची नावे ऐकताच कानाच्या पाळीला हात लावून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो, अशा अनेकांना कुमारजींनी प्रत्यक्ष ऐकले, एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून शाबासकीची थापही मिळवली. एवढा प्रदीर्घ सांगीतिक प्रवास करणाऱ्या कुमारजींनी भारतीय संगीताला एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवले आणि त्यातून संगीताच्या अस्तित्वाला आणि त्याच्या भविष्याला नव्या दिशा देण्याचा प्रयत्न केला. रागसंगीताचा मुळापासून अभ्यास करणारे कुमार गंधर्व हे त्या संगीतातील सौंदर्याचे खरे उपासक होते. खरं तर संगीत ही निर्गुण, निराकार सौंदर्याचीच उपासना. हे सौंदर्य प्रत्येकाच्या ठायी पोहोचवण्यासाठी त्यांनी निवडलेलं स्वरांचं माध्यम हे तर अतिशयच तरल आणि संवेदनशील. कुमारजींनी रागसंगीतामध्ये ते जेवढय़ा ताकदीने केले, त्याला खरोखरच तोड नाही. हे संगीत आणि त्यामध्ये कुमारजींनी निर्माण केलेली शैली टिकून राहण्यासाठी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्या आणि पत्नी वसुंधराताई यांनी ‘कुमार गंधर्व प्रतिष्ठान’ची स्थापना केली. या महान कलावंताचा सांगीतिक ठेवा, त्यांचे विचार आणि त्यांचे संगीत पुढे नेण्यासाठी हे प्रतिष्ठान सतत कार्यरत राहिले आहे. भारतीय अभिजात संगीताचे शिक्षण, त्यातील संशोधन, त्यासाठीची शिबिरे, नव्या कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी स्वरमंच, तसेच त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती, संगीतविषयक ग्रंथांचे ग्रंथालय आणि भारतातील अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कलावंतांचे ध्वनिमुद्रण अशा अनेक मार्गानी कुमार गंधर्व प्रतिष्ठान काम करत आहे.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

    वयाच्या आठव्या वर्षीच कुमारजी गाऊ लागले. तो काळ ध्वनिमुद्रिकांचा होता. भारतीय संगीत अगदी शिखरावर होतं आणि निसर्गदत्त देणगीमुळे कुमारजी कोणतीही ध्वनिमुद्रिका वाजायला सुरुवात केली की त्याच्याबरोबर गाऊ लागायचे. संगीताचे कोणतेही अधिकृत शिक्षण नाही, तरीही हे सारं या लहान मुलाला कसे काय येते, याबद्दल हळूहळू साऱ्या देशभर चर्चा होऊ लागली. अनेक राजेरजवाडे त्यांना बोलावून हा स्वरचमत्कार साक्षात अनुभवण्यासाठी आतुर असत. मग त्यांना थेट मैफलींचीच आमंत्रणे येऊ लागली. आपल्यापाशी काही अद्भुत आहे, यापेक्षा आपण जे काही करतो आहोत, त्याने सारेच अचंबित होत आहेत, या कल्पनेने कुणीही हरखून जाईल. कुमारजी मात्र त्याही वयात संगीताचाच ‘विचार’ करत होते. नंतरच्या काळात मुंबईतील प्रा. बी. आर. देवधर यांच्या ‘देवधर स्कूल ऑफ म्युझिक’ या संस्थेत संगीताच्या रीतसर शिक्षणासाठी कुमारजी दाखल झाले. त्यानंतरच्या काहीच वर्षांत ऐन तारुण्यात ते एका दुर्धर आजाराने ग्रस्त झाले. कोरडे हवामान असलेल्या गावी निवास करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आणि कुमारजी मध्य प्रदेशातील देवास येथे आले. तेथे त्यांनी या दुर्धर रोगाशी सामना करत, त्यावर मात करून पुन्हा एकवार गायक कलावंत म्हणून आपल्या संगीत कलेचे अपूर्व दर्शन घडवण्याचा ध्यास घेतला. केवळ रागसंगीतच नव्हे, तर मध्य प्रदेशच्या परिसरातील माळवा प्रांतातील लोकगीतांचा त्यांनी अभ्यास केला. त्याच परिसरातील निर्गुणी भजनांच्या सांगीतिक ठेवणीतील सौंदर्यस्थळांचा त्यांनी शोध घेतला. हे सारे करत असतानाच आपल्या जन्मजात कलागुणांनी मंडित झालेल्या बालगंधर्वासारख्या कलावंताच्या संगीताचे अध्ययन केले. या सगळय़ातून जे निर्माण झाले, ते भारतीय संगीतसृष्टीची श्रीमंती वाढवणारे ठरले. ‘मालवा की लोकधुनें’, ‘गीत हेमंत’, ‘गीतवर्षां’, ‘मला उमजलेले बालगंधर्व’, ‘ऋतुराज महफिल’, ‘गौडमल्हार दर्शन’ यांसारखे अभिजाततेने नटलेले कार्यक्रम निर्माण झाले. रागदारी संगीताच्या मैफिलींसाठी देशभर दौरे करत असतानाच या विविध विषयांचा आविष्कार करणाऱ्या कार्यक्रमांचेही आयोजन होत राहिले. धून उगम राग हे जसे त्यांच्या संगीताचे वेगळेपण, तसेच लोकजीवनातील संगीताचे संदर्भ उलगडून दाखवताना लोकसंगीतातील मूळ धून न हलवता, त्यातील अभिजातता स्पष्ट करण्याचा प्रयोग, हेही एक महत्त्वाचे वैशिष्टय़ राहिले आहे. भारतीय संगीत निसर्गाशी तादात्म्य पावलेले असते, याचा अनुभव कुमारजींच्या गायनातून येतो. संगीतातील पारंपरिक बंदिशींमधील विषयांना छेद देत असताना, निसर्गाचे अप्रतिम दर्शन घडविणाऱ्या बंदिशींची निर्मिती हे त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीतील एक अतिशय देदीप्यमान कार्य ठरले आहे. ‘अनूपरागविलास’ या नावाने कुमारजींनी रचलेल्या बंदिशींचा संग्रह ग्रंथरूपात नोटेशनसह उपलब्ध आहे.

संगीताची ही भरजरी अशी नवनिर्मित परंपरा पुढे नेणे आणि एकूणच भारतीय अभिजात संगीताला पुन्हा एकदा रसिकांसमोर त्याच उन्मेषाने सादर करणे, हे ‘कुमार गंधर्व प्रतिष्ठान’ने आपले ध्येय ठेवले आहे. हे कार्य दिसायला वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे. या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. या प्रतिष्ठानने आजवरच्या काळात हर प्रकारे प्रयत्नपूर्वक आपले ईप्सित कार्य सुरू ठेवण्यात यश मिळवले आहे. या प्रतिष्ठानच्या संस्थापक कार्यकारी विश्वस्त वसुंधराताई या स्वत: उत्तम गायक कलावंत होत्या. कुमार गंधर्वानी भारतीय संगीतात सहगानाचा जो अभिनव आणि अपूर्व असा प्रयोग केला, त्यामध्ये वसुंधराताईंची संगत अतिशय मोलाची ठरली. त्यांच्या पश्चात या प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्तपदाची जबाबदारी कुमारजींच्या कन्या आणि प्रसिद्ध कलावंत कलापिनी कोमकली यांनी स्वीकारली. कुमारजींचे नातू आणि प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली प्रतिष्ठानचे सचिव असून अ‍ॅड. भरत चितळे, चित्रकार आशीष दुबे, शैलेंद्र जैन आणि विवेक बनसोड हे विश्वस्त आहेत.

या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दोन संगीत महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. जुलै-ऑगस्ट महिन्यात उदयोन्मुख कलावंतांचा दोन दिवसांचा, तर कुमार गंधर्व यांच्या स्मृतिदिनानिमित्त जानेवारी महिन्यात प्रथितयश कलावंतांचा सहभाग असलेला तीन दिवसांचा संगीत महोत्सव आयोजित केला जातो. याशिवाय ‘गुरू शिष्य परंपरा’ या शीर्षकाखाली संगीताचे शिक्षण देणाऱ्या वर्गाचेही आयोजन करण्यात येते. हे वर्ग प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने होतात. प्रतिष्ठानचे सर्व उपक्रम सध्या भाडेतत्त्वावरील जागेत होत असून तेथे गायन आणि वादन प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारी वाद्ये उपलब्ध असतात. श्रीमती कलापिनी आणि भुवनेश कोमकली मार्गदर्शनासाठी नेहमीच उपस्थित असतात. भविष्यात प्रतिष्ठानतर्फे ‘गुरू शिष्य परंपरा’ वाढीस लागण्याच्या दृष्टीने अधिक व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येणार आहेत. गायन आणि वादनाचे रीतसर प्रशिक्षण देण्यासाठी प्रतिष्ठानने सुसज्ज ग्रंथालय, ज्येष्ठ कलावंतांचे ध्वनिमुद्रण ऐकण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी योजना आखल्या आहेत. त्यासाठी संगीत क्षेत्रातील नामवंत कलावंतांना आमंत्रित करून त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग संगीताच्या विद्यार्थ्यांना करून देण्याचेही प्रतिष्ठानने ठरवले आहे. हे सारे उपक्रम सध्या भाडेतत्त्वावरील जागेत होत असले, तरीही त्यांचा अवकाश वाढवण्यासाठी संस्थेला स्वत:ची इमारत उभी करायची आहे.  ज्या कलावंताने भारतीय संगीत आपल्या प्रतिभेने काळाच्याही पुढे नेण्याचा कलात्मक पातळीवर प्रयत्न केला, त्या कुमार गंधर्वाचे पुढील वर्षी एप्रिलपासून सुरू होणारे जन्मशताब्दी वर्ष त्याच अभिजाततेने साजरे करणे, ही समस्त भारतीय रसिकांचीही जबाबदारी आहे. ही भावना मनात ठेवूनच या प्रतिष्ठानला या कार्यात यश मिळण्यासाठी अधिकाधिक निधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

ही संस्था मध्य प्रदेशमधील देवास या शहरात आहे. देवास शहरात आल्यावर चामुंडा आणि तुळजाभवानीच्या टेकडीवरील मंदिराकडे जाताना मोटारगाडीच्या रस्त्यावर ‘कुमार गंधर्व द्वार’ लागते. तेथून सरळ देवळाच्या दिशेने टेकडीच्या पायथ्याशी पंडित कुमार गंधर्व यांचा बंगला आहे. तेथेच ही संस्थाही आहे.