अफाट मेहनतीने आपले गाणे घडवलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी पुढे आपल्या संगीत कारकीर्दीत के वळ आणखी गायकच नव्हे, तर रसिक श्रोतेही घडवले. शास्त्रीय संगीतातील या स्वरसूर्याला आदरांजली म्हणून लोकसत्ताने  ‘भीमसेन’ या विशेषांकाचे प्रकाश केले. निमित्त होते, पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षांचे. या प्रकाशन सोहळ्यात शब्दस्वरांचे रंग भरले ते ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर, पं. सत्यशील देशपांडे, प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यासह पंडितजींचे शिष्य उपेंद्र भट, आनंद भाटे आणि श्रीनिवास जोशी यांनी. पंडितजींच्या मैफलीप्रमाणेच ही शब्दसूरांची ऑनलाइन मैफलही सुरेल रंगली. तिचाच हा स्वरवृत्तान्त..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूरवेल्हाळ :  पं. सत्यशील देशपांडे

माझ्या वयाच्या आठव्या-नवव्या वर्षांपासून मला त्यांचा सहवास लाभला. मुंबईला आल्यानंतर ते आमच्याकडे म्हणजे वामनराव देशपांडे यांच्याकडे उतरत असत. आपल्या यजमानांचं गाणं वाढावं, अशी वत्सलाबाई यांची इच्छा होती. ‘जयपूर’ घराण्याची काही तत्त्वं त्यांच्या गायकीमध्ये येण्यासाठी त्यांनी वामनरावांशी चर्चा करावी, असे त्यांना वाटत असे. सवाई गंधर्व यांचा पगडा असल्यामुळे स्वरभाराने नत झालेले भीमसेनजी यांचे मस्तक वामनरावांच्या सहवासात, गाणे ‘जयपूर’ घराण्याच्या लयपेचाने उन्नत व्हायला लागले, असे मी एका लेखात म्हटले होते. जयपूर घराण्याचे आवर्तन भीमसेनजी यांनी आपल्या गायकीमध्ये घेतले. त्यांनी फै य्याज खाँ साहेबांची पुकार घेतली. आंतरिक उमाळा होताच. संपर्कमाध्यमे आजच्या इतकी प्रभावी नसतानाच्या काळात त्यांनी ख्यालाचा प्रचार भारतभर  केला. ख्याल हा सर्वसमावेशक आकृतिबंध आहे. पहिल्यापासून रागाची गोष्ट सांगताना भीमसेनजी आपल्याला माहीत असलेल्या आणि मनात असलेल्या गोष्टीच जास्त चांगल्या करून सांगत आहेत, असे प्रत्येकाला वाटायचे. रंगवून सांगण्याचा गोष्टीवेल्हाळपणा ही भीमसेनजी यांची खासियतच होती. रावळगाव टॉफीचा डबा आणि चांदोबा मासिक घेऊन येत असल्यामुळे लहानपणी ते माझे आवडते गायक होते. रिकाम्या वेळात ते बाबुराव अर्नाळकर वाचायचे. त्यातील छोटू आणि धनंजय त्यांच्या आवडीचे होते. इतकी प्रतिष्ठा, नावलौकिक आणि लोकप्रियता मिळाली असली तरी त्यांचे पाय मातीमध्ये रुतले होते. आपलं गाणं प्रत्येकापर्यंत पोहोचावं या मूल्यावर त्यांचा विश्वास होता. खडक फोडून झरा काढावा असा भीमसेनजी यांनी आवाज घडविला होता. ‘मी कुदरती आहे आणि तो मेहनती आहे’, असे पं. बसवराज राजगुरू त्यांच्याविषयी म्हणत असत. मेहंदी हसन आणि भीमसेनजी यांचा बोलताना आवाज वेगळा होता आणि गातानाचा आवाज वेगळा होता. लयीची आडवळणं, ठुमरीच्या हरकती असे त्यांनी कधी केले नाही. त्यांना मी ‘अहिर भैरव’, ‘भटियार’, ‘कौशी कानडा’ आणि ‘शुद्धसारंग’ हे चार राग बंदिशी सांगून शिकविले होते. मात्र, ते गात असताना मीच त्यांच्याकडून खूप काही शिकलो.

गुणग्राहक गायकी : पं. उल्हास कशाळकर

मी लहानपणापासूनच पंडितजींचे गाणे  ऐकले आहे. ऐकताक्षणी प्रेमात पडावं असेच त्यांचे गाणे होते. त्यांनी ‘सा’ लावला की मैफील त्यांच्या ताब्यामध्ये यायची. त्यामागे रियाज, मनन आणि चिंतन होते. त्यांच्याएवढा रियाज क्वचित कोणी केला असेल. ईश्वरदत्त गोड गळा नसतानाही त्यांनी मेहनतीने तो घडविला होता. त्यांची मैफील जमविण्याची एक पद्धत होती ती सुद्धा अफलातून होती.

मला काही समजत नव्हतं तेव्हापासून त्यांचं गाणं आवडत होतं. मी थोडं शिकल्यानंतर मला ते बारकाव्यांसह आणखी आवडले. गाणे शिकलेल्यांना आणि न शिकलेल्यांनाही भीमसेनजींचे गाणे आवडते, अशी आकर्षकता त्यांनी आपल्या गाण्यामध्ये आणली होती.

तसे ते किराणा घराण्याचे गायक समजले जातात. आहेतच. पण, त्यांच्यावर इतर घराण्यांचेही संस्कार होते. केसरबाई केरकर, अमीर खाँसाहेब यांच्याकडून मी घेतले असे त्यांनीच एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. मी रेडिओमध्ये असताना त्यांच्या ‘मुलतानी’ रागाचे ध्वनिमुद्रण झाले होते. ते अर्थातच छान झाले. तसे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले,  आज माझ्या डोक्यामध्ये अमीर खाँ आहेत. आवाज आणि उच्चारांमध्ये  बदल करून घेत आपलेसे करून घेण्याचे त्यांचे कसब अनेकांना शिकण्यासारखे आहे. पंडितजींना  आणि त्यांच्यामुळे आमच्या शास्त्रीय संगीताला लोकप्रियता मिळाली. त्यांच्याइतका लोकप्रिय गवई कोणीच नव्हता. शास्त्रीय संगीताला वैभव त्यांच्यामुळे लाभले. संगीत प्रसार आाणि श्रोता घडविण्याचे काम त्यांच्या हातून घडले.

स्वरसिद्ध गुरू :  आनंद भाटे 

लहानपणी मी बालगंधर्व यांची नाटय़पदे गायचो. हिराबाई बडोदेकर यांच्याकडे माझी पं. भीमसेन जोशी यांच्याशी भेट झाली होती. ‘घरी येऊन गाणं ऐकव’,असे त्यांनी मला सांगितले होते. बालगंधर्व हे त्यांचेही दैवत होते. त्या वेळी त्यांच्यासमोर गाण्याचे दडपण होते. मी हडकुळा असल्याने गाण्याबरोबर तब्येतही कमावली पाहिजे, असे त्यांनी मला सांगितले होते. ते स्वत: तरुणपणी गाण्याबरोबर व्यायामाच्या तालमीतही जात, ज्याचा त्यांना पुढे आयुष्यभर फायदा झाला. आमच्या घरी बालगंधर्व यांच्याप्रमाणेच भीमसेनजी हेही दैवतच होते. भीमसेनजींचे गाणे म्हणजे शास्त्रीय संगीत हे मनात रुजले गेले. मी शास्त्रीय राग शिकलो होतो. ‘ललत’ राग गाऊन मी संगीत शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. पूर्ण तालीम झाल्याशिवाय कार्यक्रमांच्या पाठीमागे धावायचे नाही, असे त्यांनी मला सांगितले. त्यांच्याकडे शिकायला मिळणार असल्याने मला ही अट मान्य होती.

त्यांनी वर्ष-दीड वर्ष खर्ज, ओंकारसाधना परत एकदा करून घेतले. मग ‘किराणा’ घराण्याची गायकी शिकवायला सुरुवात केली. त्या वेळी गायक म्हणून इतक्या उच्च पदावर असताना गुरू म्हणून ते परिपूर्ण गायकी शिकवायचे. सुरावट, बंदीश, रागाची बढत, आलाप, ताना-बोलताना, द्रुत बंदीश या पैलूंची तालीम त्यांनी दिली. जसं रागसंगीत शिकविले तसं मैफिलीमध्ये काय करावे, काय करू नये याबद्दल सांगायचे. ‘दिलेल्या वेळात चांगलं गाता आलं पाहिजे’, हे वरकरणी साधं वाटणारं विधान. पण, मैफिलीत त्याची अंमलबजावणी करणं अवघड आहे. ते त्यांनी लीलया साध्य केले होते. ‘स्वत:च्या आवाजात गा, माझी नक्कल करू नका’, असे ते नेहमी सांगत. स्वरसिद्धी त्यांना लाभलेली होती. मैफिलीतील गाणं असो किंवा शिकविणे, त्यांच्या सुरावटीमध्ये काही तरी वेगळं आणि चांगलं जाणवत असायचं. त्यामुळेच त्यांचं गाणं श्रोत्यांमधील प्रत्येकापर्यंत पोहोचलं. दर्दी रसिकांपर्यंत त्यातील शास्त्र पोहोचलं. ज्यांना शास्त्र कळत नव्हतं त्यांच्यापर्यंत त्यातील भाव पोहोचला. शास्त्र आणि भावपूर्णता याचा उत्तम मिलाफ त्यांच्या गाण्यामध्ये होता. सगळ्या घराण्यातील चांगल्या गोष्टी त्यांनी घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांचे गाणे सर्वदूर पोहोचले. जन्मशताब्दी वर्ष असले तरी त्यांच्यासारखी व्यक्ती अनेक शतकांतून एकदाच होत असते. अजून काही शतकेतरी त्यांचा  आवाज नक्कीच   आपल्याबरोबर राहील.

संगीताचा हिमालय  :  उपेंद्र भट

लहानपणापासून मी पं. भीमसेन जोशी यांच्या गाण्याचा वेडा होतो. माझा जन्म मंगळूरचा. माझ्या लहानपणापासून गुरुजी तेथे यायचे आणि एकदा आले की तीन महिने त्यांचे वास्तव्य असायचे. त्यांचे कार्यक्रम होत असत. १९६४ मध्ये त्यांच्याबरोबर तानपुऱ्याची साथ करण्याची संधी मला माधव गुडी यांच्यामुळे मिळाली. तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. ‘यापुढे मी मंगळूरला आलो की भट यांना तानपुऱ्यावर बसायला सांगत जा,’ असे त्यांनी माधव गुडी यांना सांगितले होते. त्या काळी शास्त्रीय संगीत ऐकायला श्रोते कमी असायचे. पण, वेंकटेश्वर मंदिरातील त्यांच्या कार्यक्रमाला दहा ते बारा हजार श्रोते जमलेले मी पाहिले आहेत. १९७१ मध्ये गुरुजींना पद्मश्री मिळाली, तेव्हा ‘मला तुमच्याकडे गाणं शिकायचं आहे,’ असे मी सहजपणे त्यांना म्हणालो. ‘आधी पाच वर्षे माधव गुडी यांच्याकडे शिका. ते मला सांगतील तेव्हा तुम्ही पुण्याला या,’ असे गुरुजींनी मला सांगितले. १९८० मध्ये गीतरामायणाचा रौप्य महोत्सव पुण्यामध्ये झाला. त्या वेळी बाबुजींनी (सुधीर फडके) मला कन्नड गीतरामायण गीते गाण्यासाठी बोलावले होते. माझ्या गाण्याच्या दिवशी अटलबिहारी वाजपेयी अध्यक्ष होते. नऊ दिवसांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पं. भीमसेन जोशी होते. गीतांच्या सादरीकरणानंतर आता मला शिकायला यायचे आहे, अशी इच्छा मी प्रदर्शित केली. ‘आता या,’ असे त्यांनी सांगितल्यानंतर १९८० पासून मी त्यांचा शिष्य झालो. भीमसेन जोशी यांच्याकडे गाणे शिकायचे म्हणजे, समुद्रातून पाणी आणा असे सांगितल्यानंतर आम्ही किती घेऊ शकतो. फार तर बादलीभर. किंवा हिमालयातून बर्फ आणा सांगितल्यानंतर किती आणू शकतो? अगदी तसेच पंडित भीमसेन जोशी यांचे गाणे आहे. शिकण्यासाठी आल्यानंतर तुम्हाला काय येतं ते म्हणून दाखवा, असे त्यांनी सांगितले. मी दहा मिनिटे त्यांना तोडी गाऊन दाखविले. ते ऐकल्यानंतर धीरगंभीर आवाजात ‘तुम्हाला माझ्याकडे गाणं शिकायचं आहे का?’ असे त्यांनी विचारले. ‘हे सगळं विसरा,’ असे सांगत त्यांनी मला भैरव रागातील आरोह-अवरोह करायला सांगितला तोही तीन महिने. तेव्हा मी परमेश्वराकडे मनातल्या मनात मागणे मागितले, ‘या जन्मात मला गाणं आलं नाही तरी चालेल, फक्त या माणसाच्या पायाशी राहण्याचे भाग्य लाभू दे,’  त्यांचे गाणे असे वेड लावणारे आहे.

पंडितजींचं गाणं म्हणजे अद्भुत अनुभव होता. दरवेळी ते मालकंस गायले असले तरी एक हजार वेळा वेगळा त्यांनी मालकंस गायला आहे. आजचा शुद्धकल्याण आणि उद्याचा शुद्धकल्याण यामध्ये जमीन-आसमानाचा फरक असायचा. असं कोणी गाऊ शकतं का? ते संगीताचे हिमालय आहेत यात काही शंकाच नाही.  हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला आणि त्यातही कंठसंगीताला भारतरत्न मिळवून देणारे पहिले गायक आहेत. या जन्मात मला जगातील सर्वश्रेष्ठ गुरू पं. भीमसेन जोशी लाभले.

रियाजाची तपश्चर्या :  आरती अंकलीकर-टिकेकर

दहाअकरा वर्षांची असताना छबिलदास सभागृहामध्ये माझे वडील एका कार्यक्रमासाठी मला घेऊन गेले होते. सभागृह श्रोत्यांनी ओसंडून वाहत होते. भारतीय बैठक होती. दोन अत्यंत सुरेल लावलेले तंबोरे होते. जेव्हा ते स्वरमंचावर बसले. तानपुरे झंकारू लागले. त्यांची धीरगंभीर मुद्रा आणि त्यांनी लावलेला पहिला स्वर अजूनही माझ्या कानात आहे. अचंबित, स्तिमित करणारे आणि अद्भुत असे त्यांचे गायन होते. केवढा दमसाँस, काय त्यांचा भारदस्त आवाज, कसा त्यांनी कमावला असेल, असे प्रश्न मला पडले. मंद्र, मध्य आणि तार सप्तक असा लीलया फिरणारा, तानेला उत्तम, आकार-इकाराला उत्तम, तानेचे आवर्तन भरताना तालाचा अंदाज हे सगळं अद्भुत करणारे होते. त्यांच्या ‘मियाँमल्हार’ च्या ताना ऐकल्या आहेत. त्यांना किमान डझनभर तरी फुप्फुसं असावीत. दाणेदार ताना, गाण्यातील भाव, मी किती बोलू आणि काय सांगू असं झालं आहे. अनेक पिढय़ांना भावणाऱ्या या स्वरांमागे अण्णांचे अपार कष्ट आहेत. रियाज, तपश्चर्या म्हणजे काय हे अण्णांच्याच गाण्यातून कळतं. त्या अपार मेहनतीबरोबर त्यांची प्रतिभा याची मोहिनी आपल्यावर आहे. या स्वरभास्कराला पाहायला आणि अनुभवायला मिळाले हे आपल्या सर्वाचे भाग्य आहे. माझे गुरुजी पं. वसंतराव कुलकर्णी यांच्या पंचाहत्तरीला ते गायला बसले आणि ‘सारंग’ रागाची आलापी सुरू होताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गाणं, बुद्धी, मन, आवाज या सगळ्याच्या पलीकडचा कमालीचा अनुभव त्यांनी आपल्याला अनेकदा दिला.

वारसा सुरांचा : –श्रीनिवास जोशी

माझ्या सुदैवाने माझ्या जन्मापासूनचा कालखंड पं. भीमसेन जोशी म्हणजे बाबांसमवेत गेला. विविध ठिकाणी त्यांच्याबरोबर प्रवास झाला. त्यांच्याकडून गायनाचे शिक्षण घेण्याचे भाग्य मला मिळाले. त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू मी अनुभवले. संगीत क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल मी काय बोलावे? पण, माणूस म्हणून त्यांच्या स्वभावाची  जी वैशिष्टय़े होती, त्याबद्दल नक्कीच बोलेन.  ते फार कमी बोलत. पण मार्मिक बोलत. सतत बोलण्याची त्यांची प्रवृत्ती नव्हती. माझे विचार ऐका, अशी खुमखुमी त्यांना कधीच नव्हती. या प्रवृत्तीवर त्यांनी विजय मिळविला होता. त्यांचं असं होतं, की जे बोलायचे ते गाण्यातूनच. त्यांच्या मौनावर ‘अजब निराला उपजा’ ही मी रचना केली. एक वेगळाच माणूस आहे. ‘ले मजा मौन रस अकेला’. मौन रसाची  अनुभूती घेत ते स्वत:च्याच आनंदात ते एकटेच बसत असत. त्याबद्दल असे सांगायला पाहिजे की जसजसे लोक प्रगल्भ होत जातात तशी बोलण्याची प्रवृत्ती कमी होते. त्यांच्या मौनाचा काय अर्थ लावायचा?  ‘करके बताये जो सुरसे’, सुरसे हे मी टोपणनाव घेतले होते. पण, सुरस गायन करून आपल्या संगीतातून त्यांनी जे सांगितले त्यांनी बोलण्यासाठी तोंड उघडले काय आणि नाही उघडले काय. या अर्थाने अजब निराला उपजा ही रचना मी बसंत मुखारी रागामध्ये बांधली.

भारताचे नाव संपूर्ण जगभरात उज्ज्वल करणाऱ्या पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरस्मृतींना ‘लोकसत्ता’तर्फे प्रसिद्ध होत असलेल्या ‘भीमसेन’ या विशेषांकामुळे उजाळा मिळेल, अशी खात्री आहे. भीमसेनजींचे स्वर आजही कानांना हवेहवेसे वाटतात. जगभरात स्वत: हिंडून मैफिली गाजवणाऱ्या या भारतरत्नाची सुरेल आठवण करून देणाऱ्या या विशेषांकात सहभाग घेता आला, याचा आम्हाला आनंद वाटतो.

गजेंद्र  पवार  (अध्यक्ष, पिनॅकल ग्रुप)

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला एक नवी ऊर्जा प्रदान करून त्याला दीर्घायू बनविण्यात पंडित भीमसेन जोशींचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भीमसेनजींच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त विशेष अंक प्रसिद्ध करून लोकसत्ताने या भारतरत्नाला आगळीवेगळी आदरांजली वाहिली आणि त्यामुळे आम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. लोकसत्ता वृत्तपत्र समूहाचे यानिमित्त विशेष आभार.

डॉ. पी. अनबलगन (मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ)

जगविख्यात गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केलेला ‘भीमसेन’ हा विशेषांक वाचनीय आणि संग्रा आहे. एवढय़ा महान कलावंताला अनेक दिग्गज कलावंतांनी शब्दांमधून दिलेला हा मानाचा मुजरा माझ्यासारख्याच, त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी अतिशय मोलाचा आहे. या उपक्रमात मला व्यक्तिश: सहभागी होता आले, याचा मला मनापासून अभिमान आहे.

– पुनीत बालन  (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पुनीत बालन ग्रुप)

शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Musical tribute to bhimsen joshi loksatta published special issue bhimsen zws
First published on: 17-10-2021 at 01:46 IST