निर्भयतेकडे! मुस्लिमांची  वाटचाल

सहा लोकांचा जीव घेणाऱ्या २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत..

|| इरीना अकबर

कालपर्यंत मुस्लीम समुदायाला संघटित करण्यामागे एका पक्षाच्या विरोधात मतदान हाच उद्देश होता; पण आज, अनेक मुस्लीम संकटात संधी, दुर्बलतेत शक्ती आणि भीतीमध्ये ‘आशा’ शोधू लागले आहेत..

सहा लोकांचा जीव घेणाऱ्या २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.. एक मुस्लीम म्हणून, मला त्याचे भय वाटते का? नाही! मुस्लीम समाजाने मला मते दिली नाही, तर त्यांना नोकऱ्या देणार नाही, या मेनका गांधी यांच्या वक्तव्याने मी चिंतित आहे का? तर तसे अजिबात नाही! त्यांच्या धमकीने माझे खूप मनोरंजन केले. मग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीची तुलना बजरंगबलीशी केली म्हणून मला वाईट वाटले का? छे! उलट त्यांना यमक जुळवण्यासाठी याहीपेक्षा चांगल्या ओळी मिळोत, अशी माझी सदिच्छा आहे.

बहुतेक वृत्तवाहिन्यांचे वृत्तनिवेदक (अँकर) पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थकांची भूमिका बजावतात म्हणून मी रागावलेय का? नाही! पण पत्रकारितेत असूनही ते धाडस दाखवू शकत नसल्याबद्दल मला खेद वाटतो, एवढेच.

एक भारतीय मुस्लीम म्हणून गेल्या पाच वर्षांत माझ्याविरोधात केलेल्या द्वेषाच्या राजकारणाबद्दल मला भीती वाटणे, राग येणे किंवा त्याचा त्याग करण्याच्या भावनेपासून मी खूप दूर आले आहे.

गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने मुस्लिमांची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. मुस्लिमांविरुद्धच्या हिंसाचाराला पाठीशी घालणे, झुंडशाहीचे तुष्टीकरण करणे, भाजप नेत्यांची सततची मुस्लीमविरोधी वक्तव्ये, समाजात फूट पाडण्यासाठी माध्यमांचा वापर, ‘हिंदू खतरे में है’ ही काल्पनिक भीती पसरवण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील अफवांचा कारखाना, हे सगळे कशाचे द्योतक आहे?

मुस्लिमांनी सतत भीतीच्या छायेखाली राहावे म्हणून सरकारने केलेल्या प्रयत्नांना मोठय़ा प्रमाणावर यश आले आहे. मांस घेऊन रेल्वेने प्रवास टाळणे, गाईच्या शेजारून वाहन चालवणे वा जाणे-येणे, मुले मुस्लीम आहेत, हे पटकन ओळखता येईल, अशी नावे न ठेवणे.. इत्यादी प्रकार म्हणजे सरकारच्या अशाच प्रयत्नांना आलेले यश आहे.

पण, भीतीच काय इतर भावनांचाही अखेर कधी ना कधी अंत होतोच. शिवाय प्रत्येक कठीण परिस्थिती किंवा अडचणीत एक संधी दडलेली असते. २०१७ मध्ये मोहसिन शेख, अखलाक, जुनैद आणि पेहलू खान यांचे खून पाडण्यात आले तेव्हापासून मुस्लिमांनी आपल्या मनातील भीती आणि अलिप्ततेच्या भावनेचे रूपांतर समाजाला आतून सशक्त करण्याच्या गरजेत केले. भीतीचे रडगाणे गाण्यापेक्षा आपण काय केले पाहिजे याविषयी मुस्लीम समाज बोलू लागला. हे बोलणे म्हणजे केवळ दिवाणखान्यातली चर्चा नव्हे. झोपडपट्टय़ा किंवा गावांमध्ये काही मुस्लीम गट आणि व्यक्ती समाजातील लोकांच्या सक्षमीकरणासाठी झटत आहेत.

उदाहरणार्थ, लखनऊ  या माझ्या शहरात एका मुस्लीम गटाने, जवळच्याच सीतापूर जिल्ह्य़ातील एक गाव दत्तक घेतले आहे. तेथील पालकांनी मुलांना स्थानिक शासकीय शाळेत घालावे म्हणून त्यांनी प्रबोधनाचे कार्यक्रमही घेतले. प्रौढ शिक्षणवर्गही सुरू केले आहेत. गावातील मदरशांमध्ये हिंदी आणि इंग्रजी शिक्षकांची नेमणूक केली आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्थाही केली आहे आणि महिलांसाठी स्वयंसहायता गटही सुरू केले आहेत.

व्यवस्थापनशास्त्रात पीएच.डी. केलेल्या एका मुस्लीम महिलेने पूर्व उत्तर प्रदेशातील बलरामपूर या आपल्या गावात शाळा सुरू केली आहे. तिच्या संस्थेचे कार्यकर्ते घरोघर गेले. वंचित मुस्लीम कुटुंबांतील मुलांनी शिकावे म्हणून त्यांच्या पालकांची मनधरणी केली. लखनऊमधील मुस्लीम महिलांचा एक गट स्वयंपाकघर चालवतो. तेथे समाजातील गरजूंच्या हाताला काम दिले जाते, जेणेकरून ते आपल्या मुलांना शिकवू शकतील, त्यांचे भविष्य घडवू शकतील.

हे गट किंवा व्यक्ती सरकार आणि राजकीय मदतीविना म्हणजे स्वखर्चाने सामाजिक काम करतात. आपल्या समाजाची सामाजिक-आर्थिक प्रगती करणे हे त्यांचे एकमेव ध्येय आहे. मी माझ्या शहरातली, शहराजवळची उदाहरणे देत असले तरी देशात इतरत्र असे उपक्रम सुरू असतील तर त्यात मला आश्चर्य वाटणार नाही.

आर्थिक मागासलेपणामुळे मुस्लीम समाज राजकीय हल्ल्यांना बळी पडतात. त्यांची ‘नकोशी’ किंवा ‘अप्रिय’ अशी प्रतिमा तयार करण्यामागे याच ‘मागासलेपणा’चा हात आहे. सरकार, राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे मुस्लिमांचे ‘राक्षसीकरण’ करीत असल्याने त्यांच्यापासून आपल्या भावी पिढय़ांना वाचविण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती सुधारणे हा प्राथमिक मार्ग असल्याचे मुस्लीम समाजाला वाटते.

मुस्लीम समाजाच्या विकासासाठी यापूर्वी दीर्घकालीन प्रयत्न केले गेले नाहीत, असे नाही. लखनऊमध्ये अशा किमान तीन संस्था आहेत. त्यांपैकी एक विद्यापीठ, एक महाविद्यालय आणि एक विधि संस्था आहे. मुस्लिमांनीच काही दशकांपूर्वी त्या स्थापन केल्या होत्या; पण गेल्या पाच वर्षांत अशा प्रकारच्या कामाची तातडीची निकड भासू लागली आहे. माझ्या परिचयातील प्रत्येक मुस्लीम व्यक्ती आपल्या समाजासाठी ‘काही तरी’ करू इच्छितो. ही भावना काही वर्षांपर्यंत काही ध्येयवेडय़ांपुरती मर्यादित होती; परंतु आज तळागाळातील लोकांसाठी सुरू असलेल्या कामासाठी सामान्य मुस्लीमही आपल्या कुवतीनुसार योगदान देत आहेत. काही जण निधी देतात, काही जण आपला वेळ देतात, तर काही जण कल्पना मांडतात. सामान्य मुस्लिमांचा हा दृष्टिकोन त्यांच्या आधीच्या दृष्टिकोनाशी विसंगतच म्हणावा लागेल. कालपर्यंत मुस्लीम समुदायाला एकसंध करण्यामागे भाजपविरोधात मतदान हाच उद्देश होता; पण आज, अनेक मुस्लीम संकटात संधी, दुर्बलतेत शक्ती आणि भीतीमध्ये ‘आशा’ शोधू लागले आहेत.

ही सकारात्मकता आजच्या राजकारणाचा आश्चर्यकारक पण नैसर्गिक परिणाम आहे. मोदी सरकारने आपला सांप्रदायिक अजेंडा राबवण्यासाठी झुंडींनी घडवलेल्या हत्या आणि द्वेषमूलक वक्तव्यांनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया मोठय़ा हुशारीने दडपल्या. झुंडीने केलेल्या प्रत्येक हत्येनंतर आणि प्रत्येक द्वेषमूलक वक्तव्यानंतर समजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. प्रताप भानू मेहता यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील ‘द सायलेन्स बी डॅम्ड’ या लेखात (२७ जून २०१७) केलेले विश्लेषण योग्य आहे. ते म्हणतात, ‘मोठी दंगल घडवली तर ती सर्वाचे लक्ष वेधून घेते आणि वर्तमानपत्रांच्या ‘घातक’ हेडलाइनही बनवते. संथपणे चालू ठेवलेली दीर्घकालीन दंगल वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक बळी घेते आणि तो एक रोजचाच भाग बनून जातो. अशा प्रकारच्या दंगलींविरोधात उभे राहणे कोणालाही कठीण जाते. शिवाय, फारशा तीव्र प्रतिक्रियाही उमटत नाहीत.’

समाजाला दीर्घकाळ भीतीच्या छायेखाली ठेवणे कठीण आणि अशक्य असते. अनेक मुस्लिमांनी भीती बाळगण्याची आपली क्षमता संपवली आहे. त्यांच्या मनातील भीतीची जागा आशेने घेतली आहे. सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत.

मुस्लिमांना एकटे पाडणे हा ‘हिंदू अभिमाना’ची चुकीची भावना विकसित करण्याच्या सरकारच्या योजनेचा भाग आहे. त्याची भिस्त मुस्लिमांचे ‘राक्षसीकरण’ करण्यावर अवलंबून आहे. सामान्य मुस्लिमांच्या मनात ज्याप्रमाणे भीती निर्माण झाली आहे, त्याच पद्धतीने सामान्य हिंदूंच्या मनातही मुस्लीमविरोधाची भावना वाढीस लागली असेल. कारण गेल्या पाच वर्षांत त्यांच्या विवेकावर मुस्लीमविरोधाचा मारा केला गेला.

भीतीप्रमाणे द्वेषही दीर्घकाळ टिकू शकत नाही. भीती आणि द्वेष यांना अंत असतोच. माझ्या मनातील भीतीचा अंत झाला आहे, तुमच्या मनातील द्वेषही नष्ट झाला आहे का?

अनुवाद : सिद्धार्थ ताराबाई

२०१७ मध्ये मोहसिन शेख, अखलाक, जुनैद आणि पेहलू खान यांचे खून करण्यात आले तेव्हापासून मुस्लिमांनी आपल्या मनातील भीती आणि अलिप्ततेच्या भावनेचे रूपांतर समाजाला आतून सशक्त करण्याच्या गरजेत केले. भीतीचे रडगाणे गाण्यापेक्षा आपण काय केले पाहिजे याविषयी मुस्लीम समाज बोलू लागला. हे बोलणे म्हणजे केवळ दिवाणखान्यातली चर्चा नव्हे. झोपडपट्टय़ा किंवा गावांमध्ये काही मुस्लीम गट आणि व्यक्ती समाजातील लोकांच्या सक्षमीकरणासाठी झटत आहेत.

(लेखिका उद्योजक आणि इंडियन एक्स्प्रेसच्या माजी पत्रकार आहेत.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Muslim community in india

Next Story
देणगीदारांची नावे