रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

नंदा नाहीत, याचा एक अर्थ ‘दोन्ही हातांनी लिहिणारा’ आणि आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देणारा चालता-फिरता ज्ञानकोश आता आपल्यासोबत नाही.. पण दु:ख करावे लागेल ते आपण त्यांच्याकडून काही घेऊ शकलो नाही, तर.. 

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

नंदा खरे नावाचा मराठीतून लिहिणारा बलदंड व चतुरस्र लेखक गेला, त्याचे काय मोठे? वय वर्षे ७६. दीर्घ आजारपणामुळे गेले. त्यापूर्वी किमान चार दशके हा माणूस लिहीत होता. शिवाय हा ‘दोन्ही हातांनी लिहिणारा, लिहित्या हातांचा लेखक’. म्हणजे बरेच काही मागे सोडून गेलाय तो. मग त्याच्या जाण्याचे दु:ख तरी का करायचे?

लेखक तसा वाचकांना सोडून जात नसतोच. कदाचित हे जग सोडून गेल्यावर तो अधिकच बोलका होतो, किंवा नंतरचा काळ त्याला अधिक मुखर करतो. शिवाय आयुष्यभर विवेकवादाची साथ देणाऱ्या माणसाच्या मृत्यूकडे आपण भावनावश होऊन पाहणे बरोबर आहे का?

हे सारे मला माहीत आहे, मान्य आहे. पण नंदा गेल्याच्या धक्क्यातून मी अजून सावरलो नाही. नंदा सोबत असणे याचा अर्थ आता कुठे उलगडू लागला आहे. त्यातून मी स्वत:लाच जे काही सांगतो आहे, तेच इथे मांडतो.       

नंदा गेल्यावर त्यांच्याविषयी इतक्या लोकांनी इतके भरभरून लिहिले की क्षणभर वाटले की या प्रेमाचा अंशमात्र तरी त्यांच्या वाटय़ाला त्यांच्या हयातीत यायला हवा होता. अर्थात त्यामुळे नंदांना काहीएक फरक पडला नसता. ते त्यांचे सिनिकल हास्य हसत दुसऱ्या मुद्दय़ाकडे वळले असते, वाचनात गढून गेले असते. फारच झाले तर (पूर्वीच्या काळी) घराबाहेर पडून त्यांनी एक सिगारेट शिलगावली असती. आपल्या प्रशंसेमुळे इतका अस्वस्थ होणारा दुसरा लेखक माझ्या परिचयाचा नाही.

त्यांना ‘भाऊ पाध्ये पुरस्कार’ मिळाला, तेव्हा आम्ही एक छोटा अनौपचारिक समारंभ आमच्या घरी आयोजित केला होता. निमित्त आमच्या ‘हाऊस वॉर्मिग पार्टी’चे. अगदी निवडक, परिचित  लोक. त्यांच्या पुस्तकातल्या काही उताऱ्यांचे वाचन व एक-दोन पुस्तकांची समीक्षा एवढाच कार्यक्रम. पण नंदा कार्यक्रमभर एवढे अस्वस्थ होते की शेवटी न राहवून मी म्हणालो, ‘‘नंदा, तुम्हाला थोडं  हसायला हरकत नाही.’’ त्यानंतर त्यांना पुन्हा अशा अग्निदिव्यातून जायला सांगायचे नाही, असा मी कानाला खडा लावला. ‘‘आम्ही तुमच्या साहित्यावर एक परिसंवाद ठेवतो आहोत. तुम्हाला हा दिवस सोयीचा आहे का?’’ असे विचारणाऱ्या आयोजकांना त्यांनी ‘‘तुम्हाला हवे तर कार्यक्रम ठेवा, मी येणार नाही,’’ असे उत्तर दिले होते.

चालता-फिरता ज्ञानकोश

हा लेखक माणूसघाणा होता का? मुळीच नाही. दरबार भरवणे त्यांच्या स्वभावात नव्हते, पण गप्पांच्या छोटय़ा मैफली सजविणे त्यांना आवडत असे. विशेषत: सोबत तरुण मंडळी असली की ते अतिशय उत्साहात असत. मानवी उत्क्रांती ते दगडधोंडे (भूगर्भशास्त्र), भांडवली व्यवस्थेची निर्ममता ते त्यांचे व्यावसायिक अनुभव (‘‘मी ठेकेदार माणूस’’ अशी त्यांची सुरुवात) अशा किती तरी विषयांवर ते तासन्तास बोलत. त्यांना न आवडणारी उपमा द्यायची तर तो एक अखंड चाललेला ज्ञानयज्ञ असे. त्यात कधी श्री. अ. दाभोलकरांनी केलेल्या अनोख्या शेतीविषयक प्रयोगांचे संदर्भ येत, कधी जॉय व सुहास परांजपे यांनी सरदार सरोवराला पर्याय म्हणून सुचविलेल्या मॉडेलची चर्चा येई. फॅसिझमचे वाढते संकट व त्यामुळे आपला विवेक हरवून बसलेला मध्यमवर्ग यांविषयीच्या संतापाने त्यांची दोन्ही फुप्फुसे निकामी केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सृष्टीची व मानवाची उत्क्रांती, अंतरिक्ष विज्ञान (कॉस्मॉलॉजी), भविष्यवेध (फ्यूचरॉलॉजी) हे त्यांचे अतिशय आवडीचे विषय. त्यांच्या साऱ्या विवेचनाला मार्क्‍सवाद व पर्यावरणवादाची भरभक्कम बैठक होती. पण पढिक पांडित्याला त्यांनी कधीच थारा दिला नाही. त्यांच्या धारदार विश्लेषणाला विविध विद्याशाखांमधील ताज्या संशोधनांचा आधार असे. कधी जुन्या हिंदी चित्रपटगीतांचे राजकीय-सामाजिक संदर्भही त्याला लगडून येत. त्यामुळे तिचे स्वरूप वादसभेचे न होता रसाळ मैफलीचे होत असे. कुतूहल, माहिती व ज्ञान यांचा इतका व्यापक पट व इतक्या साऱ्या ज्ञानशाखांची इतकी सखोल जाण असणारा दुसरा कोणताही मराठी लेखक माझ्या माहितीत नाही. नंदा नाहीत, याचा एक अर्थ आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देणारा चालता-फिरता ज्ञानकोश आता आपल्यासोबत नाही, हा होतो.

प्रश्न नंदांचा, त्यांच्या लिहित्या आणि मुक्तहस्ताने देणाऱ्या हातांचा नाही, तसा तो कधीच नव्हता. प्रश्न आपल्या सर्वाच्या अक्षमतेचा व मराठी साहित्यविश्वाच्या कद्रूपणाचा आहे. ‘क’ दर्जाच्या साहित्यिकांवर येथे  पीएच.डय़ा केल्या जातात. पण खरेंच्या लिखाणाची तोंडओळख असणारे मराठी साहित्याचे विद्यार्थी सोडाच, प्राध्यापक तरी किती आहेत? लोकप्रियतेचा निकष सोडला तर चतुरस्र, गंभीर व कसदार लेखक म्हणून खरे हे नेमाडेंपेक्षा कुठेही उणे नाहीत. (‘हिंदु’वरील एक चांगली समीक्षाही खरेंच्या नावावर आहे.) पण खरेंच्या लिखाणावर साधकबाधक चर्चेची सुरुवातही मराठी साहित्यविश्वात अद्याप झालेली नाही. मराठी साहित्यात सध्या (?) सुमारांची सद्दी आहे, म्हणून सोडून देऊ. पण बाकीच्या मराठी विचारविश्वाचे काय? दोन दशकांहून अधिक काळ खरे ‘आजचा सुधारक’ या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकातून अक्षरश: अगणित विषयांवर लिहीत होते व अनेकांना लिहिते करीत होते. डिजिटल तंत्रज्ञानाचे गंभीर राजकीय-सामाजिक परिणाम, उच्च शिक्षणातील मुस्कटदाबी, मुंबईसाठी गृहनिर्माण धोरण, राष्ट्र आणि राष्ट्रवाद, शेतीची दुरवस्था, सार्वजनिक आरोग्य अशा विविध विषयांवर त्यांनी ‘आ.सु.’मधून घडविलेला विमर्श थक्क करणारा आहे. महाश्वेता देवी, रामचंद्र गुहा, मायकेल सँडल, रिचर्ड फाईनमन, जॉन कँफ्नर, कार्ल सिग्मंड, कॅथरीन पोलार्ड, स्टीव्हन पिंकर, जेरेड डायमंड, चोम्स्की.. किती नावे सांगावीत? या विचारकांच्या कामाचा परिचय नंदांनी त्यात करून दिला आहे.  आजही या नियतकालिकाचे बहुतेक अंक  aajchasudharak.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पण या ज्ञानसाठय़ाची व नंदांच्या कामगिरीची दखल मराठी पत्रकारिता, समाजशास्त्रे किंवा अन्य कोणीही घेतली नाही.

या सगळय़ा अनुभवामुळे नंदा सिनिकल झाले, पण त्यांनी कंटाळून आपले काम सोडले नाही. ‘निर्माण’ या युवकांमधील नेतृत्वगुण जागविणाऱ्या प्रक्रियेशी त्यांचे जवळचे नाते होते. त्यातील किती तरी मुलांचे मित्र-पालक-मार्गदर्शक बनून त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. विदर्भाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक कुतूहल निर्माण करण्यासाठी त्यांनी अनोखे प्रयोग केले. कधी शेती-पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आण, कधी शेतकरी-शहरी ग्राहक यांच्यात सेतूचे काम करणारे नेटवर्क उभारण्यास मदत कर, कधी वि. म. दांडेकरांच्या दारिद्र्यावरील जुन्या क्लासिक लिखाणाचे पुनर्मुद्रण करून त्यावर चर्चा घडवून आण.. असे अनेक ‘साहित्यबाह्य’ उपक्रम ते करीत असत.   

दोन्ही हातांनी लिहिणारा लेखक

हे सारे करीत असताना नंदा दोन्ही हातांनी लिहीतच होते. ते एका हाताने फिक्शन लिहितात,  दुसऱ्या हाताने नॉन-फिक्शन असे मी गमतीने म्हणत असे. त्यात डावे-उजवे करायला (कोणत्याही अर्थाने) जागा नाही. ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’, ‘उद्या’ व (अत्यंत दुर्लक्षित) ‘नांगरल्यावीण भुई’ या कादंबऱ्या कोणत्याही भाषेला अभिमानास्पद वाटाव्या अशा आहेत. ‘कहाणी मानवप्राण्याची’ हा एकच ग्रंथ त्यांनी लिहिला असता, तरी त्यांचे नाव मराठी वैचारिक साहित्यात अढळ राहिले असते. पण नंदांची ओळख केवळ ‘बुद्धिमान वाचकाचा लेखक’ अशी करणे अन्याय्य होईल. त्यांच्या प्रत्येक कृतीतून, मग ते कापसावरील पुस्तकाचा अनुवाद करणे असो, की दक्षिणायनमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे, सर्वात शोषित माणूस व मानवी संबंध यांवरील त्यांचा दृढ विश्वास झुळुझुळु वाहताना आपल्याला दिसतो.

म्हणून मला वाटते, नंदा तर गेले, त्यांचे देणे दोन्ही हातांनी देऊन गेले. त्यांचे काहीच गेले नाही. प्रश्न आपल्या कद्रूपणाचा आहे. त्यांनी आपल्याला काय दिले याची जाणीव मराठी मनाला होणार आहे का? थोडा मोकळा विचार केला तर जाणवेल की ‘अंताजीची बखर’ हा ऐतिहासिक कादंबरी/ बखरीचा घाट व अंताजीसारख्या अंत:स्थाला- ‘इन्सायडर’ला निवेदक बनवून ब्राह्मणी व्यवस्थेची आतून चिरफाड करण्याचा (‘सबव्हर्जन’चा) मराठी ललित साहित्यातील पहिला दमदार प्रयोग आहे. नंदा स्वत: गांधी व गांधीवादी यांच्याविषयी प्रेमाने बोलत नसले तरी त्यांच्या ‘उद्या’ कादंबरीत कॉर्पोरेटीकरणाच्या बुलडोझरसमोर उभे राहणारे ‘चारगाव’ हे गांधी-विनोबांच्या प्रेरणेतून साकारलेल्या मेंढा-लेखा व पाचगाव प्रयोगांचे ललित रूप आहे. या साहित्यिक प्रयोगाची देशीवादी समीक्षा व्हायला काय हरकत आहे?

मार्क्‍सवादी नंदा अखेपर्यंत लिहिणे ही राजकीय कृती जबाबदारी व निष्ठेने करीत होते. त्यांच्या जाण्याचे दु:ख तरी काय करायचे? त्यांनी भरभरून दिलेले आपल्या झोळीत आपण आताही भरले नाही, तर मात्र दु:ख करायची वेळ नक्कीच येईल.

नंदा खरे यांचे हे छायाचित्र , साहित्याचे अभ्यासक आणि  समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी टिपले आहे.  मुनघाटे यांनी   ‘लोकसत्ता’साठी लिहिलेला ‘‘उद्या’साठी वाचावेत असे नंदा खरे’ हा आदरांजलीपर लेख शुक्रवारी  loksatta.com वर प्रकाशित झाला असून  ‘विचारमंच’ विभागात तो वाचता येईल.

ravindrarp@gmail.com