दिल्लीवाला

दिल्लीत करोना नियंत्रणात आल्यामुळं हळूहळू जाहीर कार्यक्रम होऊ लागलेले आहेत. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये सावरकरांवरील पुस्तकांच्या प्रकाशन समारंभालाही गर्दी झालेली होती. सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते प्रकाशन होणार असल्यामुळं लोक जमणार हे साहजिक होतं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील होते. त्यांच्यामागं कामाचा व्याप दांडगा; पण संघाचा कार्यक्रम म्हटल्यावर नाही कसं म्हणणार? राजनाथ कार्यक्रमाला आले. त्यांनी सावरकरांवर भाषण केलं, ते नंतर गाजलं. वाद निर्माण झाले. त्यांच्यावर टीका झाली. खरंतर राजनाथ यांना असं काही होईल याची कल्पना नसावी. सावरकर, गांधीजी, त्यांच्यातील संबंध, त्यांच्याशी संबंधित इतिहास अशी सगळी मांडणी करण्यासाठी राजनाथ यांनी भाषणाची पूर्वतयारी केलेली नव्हती म्हणे. त्यांना वेळही मिळालेला नव्हता. पुस्तक प्रकाशनात भाषण तर करावं लागणार होतं. कार्यक्रम सुरू होण्याआधी भागवत आणि राजनाथ या दोघांचं बोलणं झालं. मग भागवतांनी त्यांच्या भाषणातील मुद्दे राजनाथ यांना देऊन टाकले. भागवतांच्या भाषणाची वाटणी झाली. मग राजनाथ यांनी सावरकरांवर भाषण दिलं. त्यानंतर भागवत बोलले.

भाषणाच्या सुरुवातीला भागवत म्हणाले की, इथे मी गंमत करू शकतो. राजनाथ खूप व्यग्र असतात, त्यांनी भाषणाची तयारी केली नव्हती. मीच म्हणालो की, माझ्या भाषणातले मुद्दे तुम्ही मांडा.. भागवत हे सगळं हसून बोलत होते आणि राजनाथांना व्यासपीठावर हसण्याशिवाय पर्याय नव्हता. भागवतांनी त्याचं गुपित उघड करून राजनाथ यांना कसनुसं करून टाकलं. भागवतांचं भाषण होताच राजनाथ पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले.

फॉर्मात कोण आलं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेले कुठं, असा प्रश्न विचारण्याची मध्यंतरी वेळ आली होती. एप्रिल-मे महिन्यापासून त्यांचा सार्वजनिक वावर इतका कमी झाला होता की, मोदींशी त्यांचं बिनसलं आहे की काय असं वाटावं. सहकारमंत्रिपद घेतलं त्याचाही गाजावाजा नाही, या मंत्रालयाचं स्वतंत्र कामकाज सुरू झालंय, खात्याचा एखादा कार्यक्रम झालाय, तो वगळता शहांकडून लक्षवेधक असं काही झालं नाही. त्यांचं कुठलं भाषण गाजलं नाही. वादग्रस्त विधान नाही, त्यावर टीका-टिप्पणी नाही. भाजपच्या प्रवक्त्यांकडून कौतुकाचे बोल नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये इतकं घमासान सुरू आहे, पण शहा शांत बसून आहेत. पावसाळी अधिवेशनात तर ते सदनामध्येदेखील फिरकले नव्हते. अधेमधे त्यांच्या प्रकृतीच्या वावडय़ा उठवल्या जातात पण त्यांची तब्येत ठणठणीत आहे. सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर कमी झाल्याचं कारण थोडं वेगळं आहे. पश्चिम बंगालनंतर निवडणुकीचा हंगाम संपलेला होता आणि दुसरा हंगाम सुरू होण्यासाठी कालावधी होता. आता शहांसाठी शांततेचा काळ संपला आहे, ते पुन्हा फॉर्मात आले आहेत. त्यांनी दौऱ्यांना सुरुवात केलीय. दिल्ली निवडणुकीत त्यांनी भाषण जिथं संपवलं होतं, तिथून त्यांनी ते पुन्हा सुरू केलं आहे. गोव्याच्या दौऱ्यात ‘सर्जिकल स्ट्राइक’वर ते बोलले, अंदमान दौऱ्यात सावरकरांवर बोलले. शहांच्या बैठकांचा मोसमही सुरू झालाय. परवा भाजपच्या अशोका रोडवरच्या जुन्या मुख्यालयात विधानसभा निवडणुकांवर त्यांनी आढावा बैठक घेतली. शहा अचानक जुन्या कार्यालयात बैठका का घेऊ लागले आहेत हे कळलेलं नाही. कदाचित दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील नव्या मुख्यालयात नेत्यांना जायला आवडत नसावं. तसं ते मुख्यालय दिल्लीच्या सत्ताभूगोलात गैरसोयीचं आहे, तिथं जाणं म्हणजे आडवाटेला जाण्यासारखं वाटू शकतं. तशी ही इमारत संघ आणि भाजपच्या प्रकृतिधर्माला साजेशी आहे म्हणा, निव्वळ भूलभुलय्या! भाजपचं मुख्यालय कुठलं का असेना; शहांचे ध्रुवीकरणाचे बोल हळूहळू कानी पडू लागलेले आहेत. नोव्हेंबरात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही होणार आहे. मग, निवडणूक प्रचाराचा धुरळा उडेल.

गाठीभेठीही हंगामीच

तसंही काँग्रेसच्या नेत्यांना सोनिया गांधींची भेट मिळणं सोपं नसतं. करोनामुळं तर नेत्यांची सोनियाभेट आणखी दुर्मीळ झाली होती. ‘जी-२३’ गटातील नाराजनेत्यांनी सोनियांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्यानंतर समेट घडवण्यासाठी एक बैठक सोनियांनी ‘दहा जनपथ’वर घेतली होती. त्यात ‘जी-२३’मधील चार-पाच नेते, राहुल-प्रियंका आणि तटस्थ कमलनाथ अशी आठ-दहा नेत्यांमध्ये पाच तास खडाजंगी झाली होती. सोनियांनी इतक्या नेत्यांची एकत्रित घेतलेली ही एकमेव बैठक होती. त्यानंतर कार्यकारिणीच्या बैठका झाल्या; पण त्या दूर-दृश्यसंवादाच्या माध्यमातून घेतल्या गेल्या. विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठकही अशी अप्रत्यक्षच झाली होती. नाही म्हणायला एकेका नेत्याला ‘दहा जनपथ’वर जाता येतं; पण करोनासंदर्भात सगळी खबरदारी घेऊनच.

शनिवारी, १६ ऑक्टोबरला पहिल्यांदाच सोनियांनी काँग्रेसच्या मुख्यालयात कार्यकारिणीची बैठक बोलावली, त्यानिमित्तानं त्यांचं निवासस्थानाशेजारी असलेल्या पक्षकार्यालयात येणं झालं. बैठकीला येण्याआधी आरटी-पीसीआर नमुना चाचणी करून करोनाबाधित नसल्याची खात्री करून नेत्यांना प्रवेश दिला गेला असं म्हणतात. गेल्या हिवाळ्यात सोनिया गांधी गोव्याला गेल्या होत्या आणि महिन्यापूर्वी सिमल्याला त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवला होता. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्या गाठीभेटी तुलनेत कमी झालेल्या आहेत, त्यांनाही हंगामी स्वरूप आलं आहे. गेल्या दीड-दोन वर्षांत शनिवारी झालेली कार्यकारिणीची बैठक हीच त्यांची प्रमुख सार्वजनिक उपस्थिती!

‘वैष्णव’ जन तो..

मंत्री बदलला की, मंत्रालयातील-त्यांच्या विभागांतील कामाची पद्धत बदलते. वागणं-बोलणंही बदलतं. केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान खात्याच्या मंत्रिपदावरून रविशंकर प्रसाद यांची हकालपट्टी झाली याचं त्यांच्या मंत्रालयातल्या वा या मंत्रालयाशी निगडित विभागांतील लोकांना काहीही वाईट वाटलं नव्हतं. रविशंकर यांच्यात अहंभाव आणि तुच्छता दोन्हीही. एका अधिकाऱ्यासंदर्भात बोलण्यासाठी गेलेल्या मराठी खासदाराचा त्यांनी त्या अधिकाऱ्यासमोरच अपमान केला होता. या खासदारासमोर अधिकाऱ्याला बोलावलं आणि खासदाराकडून कशाला शिफारस करतोस, आता तुझं काय होईल ते बघत राहा, असं फर्मावलं होतं म्हणे. आपण कशाला रविशंकर यांना भेटायला गेलो असं म्हणत स्वत:लाच बोल लावण्याची वेळ या खासदारावर आली होती. पण, दिवस बदलले, आता हे खासदार मंत्री बनलेत आणि रविशंकर प्रसाद घरी बसून आहेत! त्यांची जागा अश्विनी वैष्णव यांनी घेतलेली आहे. वैष्णव आणि त्यांचे सहकारी मंत्री राजीव चंद्रशेखर हे दोघे आपल्या सहकाऱ्यांचा सल्ला किती गांभीर्याने घेतात हे माहिती नाही, पण निदान ऐकतात तरी. रविशंकर यांच्या वागण्यामुळं त्यांना सल्ला द्यायच्या भानगडीत कोणी पडत नव्हतं. अश्विनी वैष्णव यांचं वागणं बोलणं सौम्य असल्याचं दिसतं, पण त्यांनी अधिकाऱ्यांना कामाला लावलेलं आहे. मंत्री झाल्याझाल्या वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा कारभार दोन पाळ्यांमध्ये केला. ते सुट्टी घेत नसल्यामुळं शनिवारी- रविवारीही कामाला येतात, अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावतात, बैठका घेतात. स्वत: नोंदी ठेवतात मग, वही काढून मागच्या बैठकीचा तपशील सांगतात, निर्णयावर अंमल किती झाला हे विचारतात. आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याप्रमाणं अश्विनी वैष्णव यांच्याकडून पंतप्रधान मोदींना अपेक्षा आहेत. तसंही मोदींचं अधिकाऱ्यांशी सूत अधिक जुळतं.