महेश तपासे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात निर्माण झालेली महाविकास आघाडी ही कितीही प्रहार झाले तरी कायम टिकेल असा विश्वास घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात वाटचाल करणार आहे. आता विरोधात बसलो तरी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास जिंकू, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही व्यक्त केला आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने आपली वाटचाल सुरू केली आहे.

शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस गेली २३ वर्षे राज्यातील पुरोगामी विचारांची जपणूक करत आहे. राज्यात २०१९ मध्ये शरद पवार यांच्या प्रेरणेतून महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात उद्धव ठाकरे आणि अजितदादा पवार यांनी अडीच वर्षे देशाला हेवा वाटेल असे काम केल्याचे आपण पाहिले आहे. सुरुवातीचा काळ करोना संकटात गेला; परंतु या संकटकाळात महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यात उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी आर्थिक स्थिती उत्तम हाताळली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मनात घर केले. सगळय़ा महाराष्ट्राच्या मनात उद्धव ठाकरे म्हणजे आपल्या कुटुंबातील व्यक्ती असल्याची भावना निर्माण केली.

या संकटात राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक हे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. त्यामुळे हे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास सर्वाना होता. सत्ता सांभाळण्याचा, विकासाचा गाडा हाकण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या शरद पवार यांचे मार्गदर्शन या सरकारला मिळत होते. त्यातूनच वाटचाल सुरू असताना राज्यात अभूतपूर्व सत्तानाटय़ घडून हा जून महिना महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. आधी राज्यसभेची आणि त्यानंतर दहा दिवसांनी विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यानंतर जे घडले ते महाराष्ट्राच्या इतिहासात ठळकपणे नोंदवले गेले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षातील सुमारे ५० आमदार फुटतात, ते प्रथम सुरतला, त्यानंतर गुवाहटीला जातात आणि मग गोव्यात हे अविश्वसनीय होते आणि आहे.

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्याला किती मंत्रीपदे?

२०१९ मध्ये तोंडचा घास हिरावून घेतला गेल्याने डिवचल्या गेलेल्या भाजपने येनकेनप्रकारेण सत्ता हस्तगत करण्याचा चंगच बांधला होता. केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप वापर करून त्याचा कहर करण्यात आला. त्यामध्ये केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीचा वापर करून तुरुंगात डांबले गेले. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खोटय़ा आरोपात गुंतवून तुरुंगामध्ये टाकले. भाजपने महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. त्यासाठी महाविकास आघाडीतील आमदारांना ईडीच्या नोटिसा पाठवून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला. असे सगळे प्रकार करूनही मजबूत असलेली महाविकास आघाडी तुटत नाही, फुटत नाही म्हटल्यावर शिवसेनेवरच घाव घातला आणि जवळपास ५० आमदार गळाला लावले. लोकशाहीत इतक्या टोकाला जाऊन राजकारण करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे.

नांदेडमध्ये मंत्रिपदासाठी सुभाष साबणे यांचे प्रयत्न

लोकशाहीची बूज राखली गेली पाहिजे असे सर्वाना वाटते, मात्र सत्तेसाठी हपापलेला भाजप लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहे. विरोधकांना संपवण्यासाठी जो खेळ केंद्रातील भाजप सरकार खेळत आहे, तो थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. मात्र भारतीय लोकशाही टिकली पाहिजे या भावनेतून शरद पवार मैदानात उतरले आहेत. सत्ता येते, जाते, परंतु या तिच्या सारिपाटात जनतेचा खेळ होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या दारात जात आहे. जनतेला जनार्दन मानून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा कामाला लागली आहे. आम्हाला विश्वास आहे, राष्ट्रवादी काँग्रेस येणाऱ्या २०२४च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेईल आणि जनतेची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळवेल. लेखक राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते आहेत.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp spokesperson mahesh tapase article praising mva government work zws
First published on: 03-07-2022 at 03:12 IST