विषारी अन्न उत्पादनात भारत स्वावलंबी
डॉ. गुरूनाथ थोंटे




अन्नधान्य व फळ/भाजीपाला उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीयांसाठी ही मान उंचावणारी बाब आहे. मात्र त्यातील ९७ टक्के उत्पादन विषारी असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही. विषारी अन्न हे दुर्धर आजाराचे स्रोत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. या प्रश्नातील दाहकता सांगणारा दुसरा भाग.
पृथ्वीला सर्वात जवळ असणारा चंद्र हा तिचाच उपग्रह आहे. सूर्यकिरण चंद्रावर पडतात. त्याची तीव्रता थोडी कमी होऊन ते पृथ्वीवर पडतात. कमी तीव्र झालेली सौर ऊर्जा किंवा चंद्र ऊर्जा सजीवांमध्ये पोषणाच्या क्रिया नियंत्रित करते. याशिवाय अवकाशातील सर्वच ग्रह गोलांपासून पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकविण्यासाठी ऊर्जा प्रक्षेपित केली जात असते. असे म्हणतात, की प्रत्यक्ष जलापासून जीवाची निर्मिती करण्यासाठी वैश्विक ऊर्जा कारणीभूत झाली. वनस्पतीच्या विविध आजारांवर वैश्विक ऊर्जासुद्धा अति महत्त्वाची आहे. अशा वैश्विक ऊर्जेद्वारे पोषणाचे प्रश्न काही प्रमाणात संशोधनाद्वारे सोडवू शकलो असतो.
खडकाची झीज होऊन जमीन तयार होते. खडक हे विविध मूलद्रव्यांचे (मिनरल्स) एकत्रित रूप आहे. याचा अर्थ जमीन हे मूलद्रव्यांचे भांडार आहे. मूलद्रव्य स्थिर स्वरूपात असतात. त्या स्वरूपात त्याचे शोषण पिके करू शकत नाहीत. त्यांना उपलब्ध स्थितीत आणावे लागते. पीक उत्पादनात जमिनीचा वाटा २० टक्के आहे. जमीन ही शेतकऱ्याच्या मालकीची आहे. दुसरीकडे प्रकाशासारखी गोष्ट ही अखर्चिक आहे. जमिनीचे भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्म महत्त्वाचे असतात. त्यावरच मूलद्रव्याची उपलब्धता अवलंबून आहे. भौतिक गुणधर्मात जमिनीचा रंग, पोत, कणाची रचना, जलधारणशक्ती, आभासी घनता, विशिष्ट घनता, सच्छिद्रतेचे प्रमाण इत्यादींचा समावेश होतो. अशा प्रकारच्या भौतिक गुणधर्मावर संशोधन करून त्याचा उपयोग पीक उत्पादनात करता आला असता.
जैविक गुणधर्मात जिवाणू, बुरशी, एक्टिनोमाइसिड्स आणि एकपेशीय वनस्पती, गांडूळ, मुंग्या, सूत्रक्रमी आणि प्रोटोझोआचा समावेश होतो. रासायनिक गुणधर्मात मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य ,जमिनीचा सामू, चुन्याचे प्रमाण, सेंद्रीय कर्ब इत्यादीचा समावेश होतो. जमीन ही सजीव आहे. जमिनीत काही जीव वास्तव्यास आहेत. ज्या जमिनीत सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण जास्त त्या जमिनीत हे जीव जास्त असतात. सर्व जीवसृष्टी स्वत:च पोषणासाठी मातीच्या कणासोबत राहते. यांच्याकडून सतत विशिष्ट प्रकारच्या क्रिया जमिनीत होत असतात. त्यामुळे त्यांची वाढ होत राहते. या त्यांच्या प्रक्रियेमुळे मातीच्या कणातील अन्नांश पाण्यात विरघळतो. हा विरघळलेला अन्नांश पिकाची मुळे शोषून घेतात. त्यामुळे पिकाची वाढ होते. यासाठी जमिनीत अनुकूलता लागते. ओलावा, हवा व सेंद्रीय पदार्थाचा अनुकूलतेत समावेश होतो. ती नसेल तर सूक्ष्म जीवाणूंच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. कारण सेंद्रीय पदार्थ हे सूक्ष्मजीवाणूंचे अन्न आहे, रासायनिक खते हे सूक्ष्म जीवाणूंचे अन्न नाही.
रासायनिक खतातील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म जीवाणूंना २८ पट अधिक ऊर्जा लागते. ही ऊर्जा सेंद्रीय पदार्थातून मिळते. म्हणजे रासायनिक खत वापरावयाचे असेल तर २८ पट अधिक सेंद्रीय पदार्थ जमिनीत असणे गरजेचे आहे. रासायनिक खतामुळे हवेचे व्यवस्थापनही बिघडते. ओलावा व्यवस्थापनावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीमध्ये ओलावा नसेल, तर रासायनिक खताची कार्यक्षमता दहा टक्क्यांपेक्षाही कमी होते. याउलट सेंद्रीय पदार्थ किंवा खत जमिनीत असेल, तर त्या जमिनीची जलधारणक्षमता वाढते. जमिनीत जसे रोग निर्माण करणारे जीवाणू राहतात, तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे ही जीवाणू राहतात.
रासायनिक शेतीत रोग निर्माण करणारे जीवाणू जास्त असतात. नैसर्गिक वा सेंद्रीय शेतीत मित्र जिवाणू जास्त असतात. रासायनिक शेतीत मूलद्रव्याचा पुरवठा रासायनिक खतातून होतो. नैसर्गिक शेतीत मूलद्रव्याचा पुरवठा सूक्ष्म जीवाणूंद्वारे मातीतून होतो. कोणत्या सेंद्रीय पदार्थामुळे सूक्ष्म जीवाणूंची कार्यक्षमता वाढते, याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. काही जिवाणू वनस्पतीच्या गरजेप्रमाणे मूलद्रव्याचे रूपांतर पाहिजे त्या शोषण करण्यायोग्य अन्नद्रव्यात करतात. अशा जिवाणूंचे प्रमाण जमिनीत वाढले, तर मूलद्रव्य कमतरतेची लक्षणे पिकावर दिसणार नाहीत. रासायनिक नत्र वापरलेल्या मातीचे परीक्षण केले, तर त्याच्यात नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंचे प्रमाण नगण्य असते. निसर्गाने पिकाच्या वाढीसाठी निर्माण केलेल्या या जिवाणूंचे काम जवळजवळ थांबूनच जाते. या ढवळाढवळीने पीक व त्याच्या मुळाच्या आसपासच्या मायक्रो क्लायमेटवर दूरगामी परिणाम होतात. पिकासहित इतर घटकांचे संतुलित पोषण यामुळे होऊ शकत नाही.
स्फुरद हे दुसरे महत्त्वाचे पिकाचे मूलद्रव्य. त्यामुळे मुळाची वाढ होते. स्फुरदामार्फत शरीराला आवश्यक असणारी, शरीरात विविध क्रिया घडवून आणण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा ही पुरवली जाते. नत्राचा प्रचंड पुरवठा झाला, तर स्फुरद उचलण्यासाठीची शक्ती कमी पडते. स्फुरदाचा अभाव असेल, तर पोटॅश, मँगेनीज उपलब्धता कमी होते. मात्र स्फुरद खते निर्माण करण्यासाठी ज्या दर्जाची रॉक फॉस्फेट लागते ते आपल्याकडे नाहीच. आपण ते सर्व आयात करतो. त्याच्यासाठी प्रचंड परदेशी चलन खर्च करतो. भविष्यात या आयातीवर प्रचंड बंधने येतील. त्याचा शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होईल. स्फुरदाचे एकूणच काम रोपांचा वा झाडांचा सांगडा तयार करण्याचे आहे. ज्याप्रमाणे आपल्या हाडात स्फुरद आहे. तसेच पिकांच्या खोड, फांद्या, मुळे इत्यादीमध्येही स्फुरद आहे. त्यामुळे स्थिर झालेल्या स्फुरदाला सक्रिय करण्यासाठी पृथ्वी तत्त्वाची प्राणशक्तीसाठी येणाऱ्या वनस्पतीचे अर्क वापरल्यास स्थिर झालेला स्फुरद हळूहळू उपलब्ध होऊ शकतो, असे संदर्भ मिळतात. या विषयी संशोधन होणे गरजेचे आहे.
ज्या वेळी फॉस्फेटपासून स्फुरद खते निर्माण होत नव्हती, त्या वेळेस स्फुरदाचा स्रोत म्हणून काय वापरत असावेत याबाबत विचार केला तर असे लक्षात आले, की जमिनीत जेवढा स्फुरद सापडते, त्यापेक्षा किती तरी जास्त स्फुरद पृथ्वीवरील जीवांच्या, वनस्पती व प्राणी यांच्या शरीरामध्येच आहे. हे जीव जेव्हा मरतात तेव्हा त्याच्यापासून स्फुरद मिळवणे सहजशक्य आहे. तो वेगाने उपलब्ध व्हावा तसेच किती बायोमासपासून किती स्फुरद मिळेल याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे.
पिकाच्या वाढीसाठी तिसरे मुख्य मूलद्रव्य म्हणजे पालाश. संश्लेषणाच्या क्रियेमध्ये या घटकाचा महत्त्वाचा सहभाग आहे. पालाश हव्या त्या प्रमाणात उपलब्ध नसेल, तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. श्वसनाची गती वाढते. या दोन घटनांमुळे पिकाच्या विविध भागाकडे जाणारा काबरेहायड्रेटचा पुरवठा कमी होतो. भारतीय जमीन ही काही हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकांमधून जी राख बाहेर पडत होती, त्यापासून तयार झालेली आहे. त्यामुळे मुळातच येथे पालाश साठे निसर्गत: जमिनीच्या पृष्ठभागाजवळच आहेत. दुसरी गोष्ट जमिनीकडून घेतलेले अन्नघटक ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात जमिनीला परत करायची येथील शेतकऱ्यांनी पूर्वपार जपलेली पद्धत. सर्वसाधारणपणे पालाश ‘केटूओ’ या स्वरूपातील पालाश लगेच उपलब्ध होऊ शकतो. जमिनीतील सेंद्रीय पदार्थ व क्ले यांच्याशी संपर्क आल्यास ‘केटूओ’ मधील ‘के’ हा दुसऱ्या आयनशी अदलाबदल होण्याच्या स्वरूपात किंवा मातीच्या द्रावणात विद्राव्य स्वरूपात घेऊन झाडाला सहज उपलब्ध होऊ शकतो. अशाप्रकारे विनाखर्च सहजासहजी पोटॅश उपलब्ध होण्याबाबत संशोधन कार्य होणे गरजेचे आहे.
काही जिवाणू वनस्पतीला कीड/रोगाबाबत आगाऊ सूचना देतात. अशा वेळेस वनस्पती स्वत:मध्ये प्रतिजैविक निर्माण करतात. अशा जिवाणूंबाबत संशोधन झाले असते, तर कृषी रसायनावरील अवलंबित्व कमी झाले असते. कृषी रसायन खरेदीसाठी लागणारे परकीय चलन वाचले असते. यामुळे अन्नसाखळीच्या माध्यमातून मानवाच्या शरीरात वाढलेल्या कृषी रसायनामुळे होणाऱ्या आजारांपासून मुक्तता झाली असती. हजारो कोटींचा आरोग्यावरील खर्च वाचला असता. शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात खूप मोठी बचत झाली असती. खर्चातील बचत हीच नगदी नफ्यातील वाढ असते.
पिकाचे संतुलित पोषण व्हावे म्हणून पिकाला किती व कुठले अन्नघटक जमिनीतून उचलणे आवश्यक आहे, हे ठरविण्याची पिकाची शक्ती जागी करणे. ती कार्यक्षमतेने वापरली जाण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. पिकाबरोबरच मातीची व मातीमधल्या जिवाणूंची अन्नघटक उपलब्ध करून देण्याची शक्तीसुद्धा वाढविता येते. यामुळे पीक व जमीन या दोघांची शक्ती व्यवस्थितपणे व्यक्त होतात व पर्यायाने उत्पन्नात भरीव वाढ होते. प्रत्यक्षात एनपीकेपैकी मुख्य अन्नघटक किंवा आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नघटक शोषून घ्यायची पिकाची शक्ती वाढविण्यासाठी कोणत्या तत्त्वाची – म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायू व आकाश – कमतरता आहे हे शोधायचे व त्या तत्त्वाद्वारे ती शक्ती भरून काढायचा प्रयत्न केला असता, तर बाहेरून कोणत्याही प्रकारचे मूलद्रव्य टाकण्याची आवश्यकता भासली नसती.