किन्नरी नेरुरकर
काही खेळाडूंचे आयुष्यच इतके अनपेक्षित असते की अत्युच्च यश मिळवण्यासाठी त्यांना स्पर्धा करावी लागते ती स्वत:च्याच शारीरिक मर्यादांशी. शरीराने आखून दिलेल्या खडतर सीमा ओलांडण्याची ही मनाची जिद्द जेव्हा एखादी खेळाडू व्यक्ती बाळगते तेव्हा विजयाची व्याख्याच बदलते. वयाच्या सातव्या वर्षी अचानक दृष्टी गमावली असली तरी बुद्धिबळ, जलतरण, गोलबॉल, साऊंड बॉल लाँग टेनिस, ज्युदो, गिर्यारोहण अशा विविध खेळांत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य मिळवणार्या आणि इतर दृष्टिहीन मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण देत त्यांचे खेळाचे स्वप्न साकार करणार्या नेहा पावसकर आहेत, यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.
शिकण्याच्या, खेळण्या-बागडण्याच्या वयातच नेहा यांना ‘मॅक्युलर डीजनरेशन’ आणि ‘रेटिनाइटिस पिग्मेंटोसा’ या दुर्मिळ आजारांमुळे पूर्ण अंधत्व आले. अचानक उद्भवलेल्या या दृष्टिहीनतेने नेहा मानसिकदृष्ट्या खचल्या, पण मुळातच अंगीभूत असलेल्या खिलाडू वृत्तीने त्यांना कधीच स्वस्थ बसू दिले नाही. साहस हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग. शारीरिक मर्यादांना आपल्या स्वप्नांवर स्वार होऊ न देता त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि नोकरी करत असतानाच बुद्धिबळ, जलतरण, गोलबॉल, ज्युदो, पॉवरलिफ्टिंग, साऊंड बॉल लाँग टेनिस अशा खेळात तसेच गिर्यारोहणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक पदके मिळवली.
गिर्यारोहणात त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. १९९२ मध्ये त्यांनी हिमालयातील १७ हजार २२० फूट उंच क्षितिधर शिखर सर केले, ज्याची नोंद १९९४ च्या ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये ‘पहिली दृष्टिहीन स्त्री’ म्हणून झाली. २०१४ मध्ये त्यांनी लोणावळ्यात ३५०० फूट खोल रॅपलिंग केले तसेच ८०० फुट ‘फ्लायिंग फ्रॉग’ हे कठीण व्हॅली क्रॉसिंग केले. २०१६ मध्ये हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर ४६०० फूट खोल दरीवर ‘टायरोलियन ट्रॅव्हर्स’ करत व्हॅली क्रॉसिंग केले. त्यांच्या या दोन्ही साहसाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ (२०१७), ‘ब्रावो बुक ऑफ रेकॉर्ड्स, फ्रान्स’ (२०१९) आणि ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन’ (२०१९) मध्ये करण्यात आली.
जागतिक स्तरावर दृष्टिहीन ्त्रिरयांसाठी पॅरा गोलबॉल स्पर्धांची सुरुवात १९८४ पासून झाली असली तरी २०१८ मध्ये थायलंडमध्ये झालेल्या आशिया पॅसिफिक स्पर्धेत कर्णधार नेहा पावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दृष्टिहीन महिलांचा संघ प्रथमच सहभागी झाला. २०२५ मध्ये इजिप्त येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा गोलबॉल स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशाचे नेतृत्व केले. दृष्टिहीन असूनही आपली क्रीडाआवड कायम ठेवत असू तर आपल्यासारख्याच इतर मुलींना खेळासाठी प्रोत्साहन द्यायला हवे या हेतूने त्यांनी केलेले काम विशेष आहे.
दार्जिलिंग येथील ॲडव्हेंचर कोर्समध्ये केवळ मुलांनाच प्रवेश होता, तेव्हा त्यांच्या प्रयत्नाने भारतातील १५ दृष्टिहीन मुलींना या कोर्ससाठी प्रवेश मिळाला. त्यांच्या या धाडसाची दखल तत्कालीन राष्ट्रपती आर.वेंकटरमन यांनी घेतली.
खेळाविषयीच्या आपल्या आवडीतून नेहा यांनी स्वत:साठी खेळाचे मैदान खुले केलेच, पण सोबतच ‘ऑल इंडिया अंध स्त्री हित असोसिएशन’ (अकअरऌअ) ही खेळ व साहसी खेळातून दृष्टिहीनांचे पुनर्वसन करणारी भारतातील एकमेव संस्था स्थापन केली. दीड हजाराहून अधिक दृष्टिहीन मुला-मुलींना वेगवेगळ्या राष्ट्रीय, पॅरालिम्पिक क्रीडा प्रकाराचे मोफत प्रशिक्षण देत त्यांचे क्रीडा स्वप्न साकार केले. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दृष्टिहीनांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय, पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
दृष्टिहीन मुला-मुलींना त्यांच्या क्रीडा प्रकारात मोफत प्रशिक्षण देण्यासाठी नेहा आपल्या संस्थेच्या माध्यमातून क्रीडा प्रशिक्षक, इतर प्रशिक्षण संस्था यांना प्रोत्साहित करतात. क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक असलेली साधनसामग्री, क्रीडा गणवेश, प्रवासाचा खर्च यासाठी प्रायोजक न मिळाल्यास नेहा व त्यांचे पती नलिन स्वखर्चातून सहकार्य करतात. या विधायक कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’, भारत सरकारचे दोन राष्ट्रपती पुरस्कार, ‘संविधान योद्धा’ पुरस्कार, ‘आयर्न लेडी प्राइड इंडिया सेवा रत्न पुरस्कार’ प्राप्त झाले आहेत. सध्या त्या ‘पॅरा ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशन (महाराष्ट्र)’ च्या अध्यक्षा आहेत.
प्रशिक्षण आणि मार्गदर्शनातून दृष्टिहीन खेळाडूंचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचे स्वप्न पूर्ण करणार्या नेहा पावसकर यांना ‘लोकसत्ता’चा सलाम.
नेहा नलिन पावसकर
ऑल इंडिया अंध स्त्री हित असोसिएशन (AIASHA)
संपर्क – ९८२१५८४४३६
aiashaworld@gmail.com
kinnari.nerurkar@expressindia.com
