scorecardresearch

रंगधानी : कलासमीक्षेची ‘गॉडमदर’

१९८१ सालचं ‘प्लेस फॉर पीपल’ हे त्यांचं प्रदर्शन कलाविश्वातील मैलाचा दगड मानला जाते.

रंगधानी : कलासमीक्षेची ‘गॉडमदर’
क्युरेटर आणि कला समीक्षक गीता कपूर यांचे संग्रहित छायाचित्र

स्वतंत्रपणे काम करताना गीता कपूर यांनी क्युरेटर-समीक्षकाला कलाक्षेत्रात स्वायत्त स्थान असतं हे पहिल्यांदा साठच्या दशकात दाखवून  दिलं. तेव्हापासून त्या समीक्षक आणि क्युरेटर म्हणून काम करीत आल्या आहेत. अलीकडच्या काळात मात्र कलासमीक्षक आणि क्युरेटरची भूमिका ही अधिक तात्कालिक बनली आहे..

एखाद्या संग्रहालयात किंवा कलादालनात पाय टाकला की तिथे मांडलेल्या कलाकृतींमध्ये बहुतेक वेळा काही तरी सूत्र असल्याचं जाणवतं. काचेच्या कपाटातल्या वस्तू असो, भिंतीवर टांगलेली चित्रं असो किंवा दालनात इतस्तत: पसरलेली मांडणी शिल्पं. त्यातला एक समान धागा ते मांडणाऱ्याच्या किंवा मांडणारीच्या डोक्यात, मनात नक्कीच असतो. बऱ्याचदा तिथं भिंतीवर डकवलेलं एखादं टिपण ते आपल्याला उलगडून दाखवतं. हे काम क्युरेटर करतात. ग्रंथालय, संग्रहालय किंवा अर्काइव्ह यांची देखभाल करणारी व्यक्ती या अर्थी सुरुवातीला ती संज्ञा वापरात आली. नंतर मात्र ती अभ्यासशास्त्र म्हणून आकाराला आलेली दिसते. या मांडणीपुरतं मर्यादित न राहता प्रदर्शन किंवा संग्रह यांचं क्युरेशन करताना त्यातनं एखादं कथन आकाराला येतं, नवा विचार पुढे येतो आणि कलेबद्दलच्या कळीच्या मुद्दय़ांबद्दल एक व्यापक भान तयार होतं. यात ठाशीव भूमिका असते, सशक्त मांडणी असते, सैद्धांतिक बैठक असते आणि प्रश्नांची उकल करणंही असतं.

भारतात असं क्युरेशन आणि कलासमीक्षेचं चर्चाविश्वासाठीचं अवकाश निर्माण करण्यात ऐतिहासिक पैलूंपासून संस्था, कलाकार आणि लेखकांचे समूह, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कलाव्यवहाराचं बदलतं स्वरूप अशा अनेकविध गोष्टी कारणीभूत ठरल्या. आपल्याकडे क्युरेशन किंवा कलासमीक्षेसाठीची पाश्र्वभूमी बनली ती वासाहतिक आणि स्वातंत्र्योत्तर काळात. यात आर्चर, बार्थोलोम्यू, वॉन लेडन या दिल्ली-मुंबईसारख्या शहरांत राहणाऱ्या कलासमीक्षकांनी मोठा वाटा उचलला. सुरुवातीच्या काळात वर्तमानपत्रं, मासिकं, जर्नल्स, तसंच प्रदर्शनाचे कॅटलॉग्स यातील लिखाणातून आधुनिक कलेचं चर्चाविश्व स्वातंत्र्योत्तर काळात आकाराला आलं. याच काळात मानववंशशास्त्र आणि कला इतिहास यापासून कलासमीक्षा हे निराळं क्षेत्र तयार होत गेलं. बार्थोलोम्यू हे सार्वजनिक अवकाशात कलेबद्दल भान निर्माण करण्यात मोठी भूमिका निभावत असताना स्वामिनाथनसारख्यांनी कलाकार-समीक्षकाची भूमिका घेतली. समीक्षक या व्यक्तिमत्त्वाबद्दल टीकेचेही सूर निघाले. त्यांना चित्रकलेचं तंत्र नीट कळत नाही, ऐतिहासिक दृष्टी कमी पडते किंवा समीक्षा करण्याचं तंत्र आणि शिक्षण त्यांना अवगत नसतं, त्यामुळे त्यांचं लिखाण अर्धकच्चं राहतं. अशा अनेक प्रकारे त्या काळात टीका झाली.

या पाश्र्वभूमीवर १९६०-७० मध्ये स्वतंत्रपणे काम करताना गीता कपूर यांनी क्युरेटर-समीक्षकाला कलाक्षेत्रात स्वायत्त स्थान असतं हे पहिल्यांदा दाखवून दिलं. तेव्हापासून त्या समीक्षक आणि क्युरेटर म्हणून कला क्षेत्रात सैद्धांतिक, वैचारिक आणि प्रत्यक्ष कलाव्यवहारात हस्तक्षेप करीत आल्या आहेत. १९६०च्या दशकांत जगभर विद्यार्थ्यांच्या चळवळींचा जोर असताना त्यांनी अमेरिका व इंग्लंडमध्ये कलेचं शिक्षण घेतलं. या जडणघडणीतून ‘इन क्वेस्ट फॉर आयडेंटिटी’ हे पुस्तक तयार झालं. उत्तर वासाहतिक काळातील कलाकार, तिसऱ्या जगाची जाणीव, त्यांचं राष्ट्र आणि राष्ट्रीय अस्मितेशी असलेलं नातं, त्यातून आकाराला आलेला कलेतील इंडिजनिझम किंवा ‘स्वदेशीवादा’ची मांडणी यात केली. ‘कंटेम्पररी इंडियन आर्टिस्ट्स’ या पुस्तकातील मांडणी समीक्षक म्हणून पुढे घेऊन जाणारी होती. केवळ कलाकार मध्यवर्ती ठेवून त्याच्या कला व्यवहाराविषयी न लिहिता समीक्षक म्हणून या कलाकृतींचे व्यापक संदर्भात अन्वयार्थ लावण्याचं काम कपूर यांनी केलं. यामुळे समीक्षात्मक लिखाणाची व्याप्ती आणि रीत दोन्ही या काळात बदलली.

१९८१ सालचं ‘प्लेस फॉर पीपल’ हे त्यांचं प्रदर्शन कलाविश्वातील मैलाचा दगड मानला जाते. अमूर्तवादाच्या जोरदार लाटेनंतर अनेक कलाकारांनी चित्रांमध्ये मानवाकृती केंद्रस्थानी मानून अभिव्यक्तिवादी दृश्यभाषेत चित्रांची मांडणी केली. कथनात्मक शैलीत व्यक्त होणारे गुलाम मोहमद शेख, भूपेन खक्कर, जोगेन चौधरी, विवान सुंदरम, नलिनी मलानी आणि सुधीर पटवर्धन हे कलाकार यात सहभागी होते. कपूर यांनी या कलाकारांच्या सहयोगातून या प्रदर्शनाची उभारणी केली होती. कलाकार आणि समीक्षक यांच्यातील वाद-संवादातून उलगडत जाणारा हा व्यवहार होता. या कलाकृतीतून लोकाभिमुखी कलेचा विचार मांडलेला होता. त्यामुळे आणीबाणीच्या पाश्र्वभूमीवर या प्रदर्शनाकडे मूलगामी लोकशाहीवादी हस्तक्षेप म्हणून पाहिले जाते. माणूस सामाजिक-राजकीय पटलावर केंद्रस्थानी येत असतानाच आणीबाणीच्या काळात संकुचित झालेल्या सामाजिक अवकाशाची फेरमांडणी या प्रदर्शनातून केली गेली. आधीच्या कलाकारांच्या शुद्धतेच्या, भारतीयत्वाच्या आणि स्वयंपूर्णतेच्या संकल्पना मोडीत काढत या कलाकारांनी समकालीन वास्तवाचा वेध घेत भारतीय व पाश्चात्त्य कला इतिहास, अभिव्यक्तिवादापासून पॉप आर्टपर्यंत आणि लघुचित्रापासून कॅलेंडर आणि पोस्टपर्यंत सर्व लौकिक गोष्टींना संदर्भ मानले. वास्तववादी चित्रणाला पुन्हा एकदा वेगळ्या नजरेतून पाहिलं जाऊ  लागलं. विवान सुंदरम यांनी सुरू केलेल्या कसौलीच्या वार्षिक कला शिबिरातून ही कल्पना आकाराला आली होती. तिथेच झालेल्या ‘मार्क्‍सवाद आणि सौंदर्यशास्त्र’ या परिषदेनंतर ‘जर्नल ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड आयडियाज’चादेखील जन्म झाला. कलासमीक्षेची तात्कालिकता टाळून समकालीन कलेच्या सैद्धांतिक मांडणीत या जर्नलने मोलाची भूमिका बजावली. यातल्या लेखांचं मिळून आधुनिक कलेची मूलभूत मांडणी करणारं ‘व्हेन वॉज मॉडर्निझम’ हे कपूर यांचं पुस्तक तयार झालं. आधुनिकतेची एकसंध मांडणी टाळून अनेकविध प्रवाहातून तयार झालेल्या आधुनिकतेबद्दल त्या यात बोलतात. आधुनिकता आणि राष्ट्राच्या उभारणीच्या पाश्र्वभूमीवर कलेतील कथनं आणि कलाकारांचे आत्मत्व यावर भाष्य करताना केंद्र आणि परिघाच्या संदर्भात आधुनिक कलेतील कळीचे मुद्दे त्यांनी पुढे आणले. राष्ट्र या संकल्पनेच्या पुढे जात जागतिकीकरणाच्या संदर्भात बहुसांस्कृतिकता आणि तिसऱ्या जगातील ‘आवां गार्द’ हे त्यांच्या मांडणीचे संदर्भबिंदू ठरले.

एकीकडे, कलासमीक्षेचं चर्चाविश्व पाश्चात्त्य सिद्धांतांवर आधारलेलं आहे. दुसरीकडे, भारतीय कलेला मग ते अमूर्त असो, फिगरेटिव्ह असो किंवा निओ तांत्रिक असो यांचं पाश्चात्त्य समीक्षकांनी सुलभीकरणही केलं. त्याकडे बारकाईने पाहात आपले स्थानिक संदर्भ आणि जाणिवा यांना समजून घेत त्यांची पुनर्माडणी करणं महत्त्वाचं आहे अशी मांडणी कपूर यांनी केली. गीता कपूर यांची आधुनिक आणि समकालीन कलेवरची ही मांडणी हे आज कलाजगताचं आधारसूत्र बनलं आहे. त्यांच्या या मांडणीचं प्रतिबिंब कला व्यवहारावरदेखील पडलेलं दिसतं. अर्थात, त्यांचं लिखाण हे ठरावीक प्रकारच्या कलेला व कलाकारांना उचलून धरणारं होतं. असं असलं तरी कलासमीक्षेचं चिकित्सक दृष्टिकोन तयार करणारं एक अवकाश त्याच्यातून उभं राहिलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लिखाण ज्या भवतालातून आकाराला आलं त्याच्याशी प्रामाणिक राहिलं.

कलाबाजार, कलादालनं यांच्या अस्तित्वामुळे अलीकडच्या काळात कलासमीक्षक आणि क्युरेटरची भूमिका ही अधिक तात्कालिक बनली आहे. क्युरेटर आणि समीक्षक हे व्यापक मुद्दय़ांपेक्षा तात्कालिक कला व्यवहाराची सांगड घालण्यात अधिक भर देतात का हेही अभ्यासण्याची गरज आहेच. कलाबाजाराचे ताणेबाणे लक्षात घेत त्यात आपली जागा प्रस्थापित करण्याचा खटाटोप क्युरेटर्स आणि समीक्षक करताना दिसतात. यात कलासमीक्षा अस्तंगत होत चालली आहे काय आणि त्यामुळे एक मोठी पोकळी तयार होतेय अशीही शक्यता आहे. विशेषणं वापरून कलाकृतीचे नसलेले अन्वयार्थ शोधणं हेही बऱ्याचदा घडताना दिसते. गीता कपूर यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतात मुळातच अशा समीक्षात्मक लिखाणाला फार सकस आणि समृद्ध असा वारसा नाही. यामुळे या क्षेत्रात चिकित्सक आकलन आणि चर्चाविश्व यांची परिणामकारकता पुरेशी नसल्याचं जाणवतं. अर्थात, रुबिना करोडे आणि गायत्री सिन्हा यांचं आधुनिक कलेचं पुनर्वाचन करणं असेल किंवा नॅन्सी अदजानिया, विद्या शिवदास, झाशा कोलाह यांच्या समकालीन कलेला नव्यानं भिडणं असेल, यांच्या कामातून या शक्यता निर्माण होताना दिसतात, हेही तितकंच खरं.

नूपुर देसाई

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-07-2017 at 02:18 IST

संबंधित बातम्या