कलारूपाला भेदणारा ‘परफॉर्मन्स’

आपल्याकडे इथल्या रीती, कर्मकांडं, मिरवणुका यातही एक प्रकारचा परफॉर्मन्स दिसून येतो.

मुंबईतील हिंसेवर भाष्य करणारा मोनाली मेहेर यांचा ‘इन डिटर्मिनेशन’ हा परफॉर्मन्स

समकालीन कलेत परफॉर्मन्स आर्ट हा बंडखोर कला प्रकार मानला जातो. त्याचं स्वरूप हे कलेच्या वर्चस्ववादी भूमिकेला प्रश्न विचारणारं आणि कलावस्तूला वरचं स्थान देणाऱ्या कलाविश्वाला आव्हान देणारं म्हणून उभं राहातं; पण बऱ्याचदा संकल्पनात्मक मांडणीमुळे त्याची भाषा काहीशी अवजड बनते. सोपे सुटसुटीत बनवण्याच्या नादात त्यातला आशय गमावला जाण्याचा धोका असू शकतो..

काही वर्षांपूर्वी जनकला प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुंबईत मानसी भट यांनी वेशांतर करून सादरीकरण केलं. ‘बुल्डोझर यात्रा’ या परफॉर्मन्समध्ये त्या एका बुल्डोझरवर स्वार होऊन बोरिवलीहून दक्षिण मुंबईमध्ये आल्या. ठोकळ्यांचे बूट आणि चकचकीत सोनेरी अंगरखा परिधान करून त्यांनी हा प्रवास पार पाडला. वाटेत थांबून त्यांनी ‘पुनर्वकिास’ केलेल्या ठिकाणी धन्यवाद देणारी पत्रके वाटली. आझाद मदानावर जाऊन मातीत छोटासा खड्डा खणून त्यात स्वत:ला गाडून घेतले व उपस्थित लोकांना त्यावर माती टाकण्याचे आवाहन केले. एकीकडे, मर्दानीपणाचे प्रतीक असलेल्या बुल्डोझरचा वापर करत त्यांनी यातून पुरुषीपणा आणि लिंगभावाच्या साचेबद्ध अधिकल्पनेवर भाष्य केले, तर दुसरीकडे विचारस्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या आणि सामाजिक चळवळींच्या आंदोलनासाठी वापरल्या जाणाऱ्या आझाद मदानावर पोहोचून पुढचा परफॉर्मन्स केला. पुढे जाऊन त्यांनी सामान्य माणसाला या शहरात स्वत:ची जागा मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीवर या कृतीतून त्यांनी उपहासात्मक भाष्य केले आणि अशी जागा केवळ मृत्यूनंतरच शक्य आहे की काय, असा अवघड प्रश्नही उभा केला.

नेहमीच्या कलाविष्कारापेक्षा इथं नेमकं काय वेगळं घडलं? या सादरीकरणात कलाकाराचं शरीर हेच तिचं माध्यम बनलं. एखादी संकल्पना, विचार किंवा कृती यातून हे सादरीकरण आकाराला आलं. त्यामुळेच परफॉर्मन्स आर्ट ही नाटक वा पथनाटय़ यापेक्षा वेगळी ठरते. काही वेळेला ती या दोन्हीच्या सीमारेषेवर कुठे तरी रेंगाळते. यात काही तरी ‘घडणं’ नसतं तर काळ आणि अवकाशाच्या परिघात ते आकाराला येतं. कलाकार आपल्या शारीर मर्यादांना आव्हान देतात. यात शरीर अभेद्य राहात नाही. ते सार्वजनिक अवकाशाचा भाग बनतं. तिथल्या गोष्टींचा सहजपणे त्यावर परिणाम होऊ शकतो. मरीना अब्रामोविचसारख्या कलाकार मानतात की ‘नाटकात घडणाऱ्या गोष्टी या नकली किंवा रचित असतात, पण परफॉर्मन्स मात्र खराखुरा, त्या क्षणी घडणारा असतो.’ त्यातली क्षणिकता ही टिपून ठेवता येणारी नसते. १९९० च्या दशकात बाबरी मशीद पाडल्यानंतर स्त्री असणं आणि मुस्लीम असणं या जाणिवेतून रुमाना हुसेनचा ‘लििव्हग ऑन द मार्जन्सि’ हा परफॉर्मन्स आकाराला आला. ‘एनसीपीए’च्या प्रांगणात हातात कापलेल्या पपईचे अध्रे तुकडे घेऊन त्यांनी हे सादरीकरण केलं. चालताना किंकाळी फोडण्यासाठी तोंड उघडं ठेवलेलं, पण प्रत्यक्षात मात्र कुठलाच आवाज येत नव्हता. अशा अवस्थेत त्या चालत राहिल्या. स्त्रीचं जगणं, त्यातून तयार झालेले दैनंदिन जगण्यातले सोपस्कार, हिंसेचा अनुभव असं सगळं एकत्र यात उमटत राहतं. त्याचे निरनिराळे आविष्कार परफॉर्मन्सच्या रूपात दिसत राहतात.

आपल्याकडे इथल्या रीती, कर्मकांडं, मिरवणुका यातही एक प्रकारचा परफॉर्मन्स दिसून येतो. जगण्यातल्या रीती-भाती, मिथकं यांची नक्कल करून त्याबद्दल मांडणी करणं, चिकित्सा करणं हे या कला प्रकारात घडताना दिसतं. मरीना अब्रामोविच यांच्याबरोबर काम केलेल्या मोनाली मेहेरसाठी हा परफॉर्मन्स म्हणजे लोकांसमोर मांडलेली तिची विचारशृंखला असते. तिच्या कामाच्या प्रक्रियेचा तो भाग असतो. रोजच्या जगण्यातले सोपस्कार त्यात उतरत राहतात; पण त्यात अब्रामोविच यांच्यासारखं स्वत:च्या शरीराला किंवा मनाला क्लेश देणं नाहीये. आजूबाजूचं क्रौर्य अशा कृतीतून उमटून त्यावर भाष्य करणं हा एक प्रकार झाला. मोनाली तसं करत नाहीत. ‘इन डिटर्मिनेशन’ हा परफॉर्मन्स मुंबईतल्या दहशतवादी हिंसेवर भाष्य करणारा होता. उंच छतावरून टांगलेल्या बादल्यांतून लाल रंगाचा द्रव जमिनीवरच्या पांढऱ्याशुभ्र कापडावर ठिपकत होता. मोनाली तो सांडणारा द्रव पुसतात, धुतात, घासून, खरवडून पृष्ठभाग स्वच्छ करत राहतात. पुन:पुन्हा केलेल्या कृतीतून उलट मानवी शरीराची सहनशक्ती प्रतीत होते. भळभळणारी जखम उघडी न पडता ती या साध्या छोटय़ा कृतींमधून भरून निघण्याची प्रक्रिया घडते.

काही समकालीन कलाकारांच्या कलाकृती पाहिल्या की लक्षात येतं की, स्वत:चं शरीर परफॉर्मन्ससाठी एक साइट म्हणून वापरतात. त्यासाठी छायाचित्र व व्हिडीओ ही दोन माध्यमं प्रामुख्याने उपयोगात आणतात. आजच्या काळातील कलाकार त्यांच्या स्मृती, आसपासची कथानकं, त्यांच्या फॅन्टसी, कल्पितं यातून मांडतात. इतिहास, मिथकं, पॉप्युलर कल्चर, अस्मिता यासारख्या अनेक विषयांवर टिप्पणी करतात. यात देहाचा माध्यम म्हणून वापर करणं आहे, त्याकरिता निरनिराळे पोशाख वापरणं, नेपथ्याची मदत घेणं आणि त्यातून वातावरणनिर्मिती करत विशिष्ट परिणाम साधणं आहे.

यातल्या एक आहेत पुष्पमाला एन. एखाद्या विषयाची अनुकृती हा त्यांच्या चिंतनाचा मुख्य गाभा राहिला आहे. चित्रपटातील नट-नटय़ा, पौराणिक व्यक्तिमत्त्वं, दाक्षिणात्य स्त्रिया, मानववंशशास्त्रीय अभ्यासातील स्त्रिया यांसारखे वेश परिधान करून त्यांनी स्वत:ची छायाचित्रे काढून घेतली आहेत. हे सगळं खरंखुरं वाटावं यासाठी त्या नेपथ्याचे बारकावे जसेच्या तसे आणण्याचा प्रयत्न करतात; पण एकीकडे हे वास्तवदर्शी दिसत असलं तरी त्यातून त्या त्यांच्या मूळ अर्थाला छेद देत आपल्यासमोर मांडतात. त्यांची ही छायाचित्रं वरवर पाहाता हास्यास्पद आणि उपहासात्मक वाटत असली तरी ती प्रेक्षकांना लिंगभाव, आधुनिकता आणि राष्ट्रवाद, वंशवाद यांसारख्या गंभीर विषयावर विचार करायला भाग पाडते. क्लेअर आर्नी यांच्यासोबत केलेल्या ‘एथनॉग्राफिक सीरिज’मध्ये त्या भारतातल्या वेगवेगळ्या भाषिक, वांशिक समुदाय, वर्ग आणि स्तरातून आलेल्या स्त्रियांप्रमाणे पेहराव घालून कॅमेऱ्यासमोर येतात. वासाहतिक काळापासून वांशिक दस्तावेजीकरणासाठी छायाचित्रीकरण हे एक साधन म्हणून कसं वापरलं गेलं, त्यातून स्त्रियांच्या साचेबंद प्रतिमा कशा तयार होत गेल्या आणि समाजमनात खोलवर रुजत गेल्या याचा शोध यातून घेतात.

दिल्लीच्या सोनिया खुराना यांचा कलाव्यवहार हा त्यांच्या स्वत:भोवतीच विकसित होत गेलाय. यांच्यासाठी कलेचा हेतू हा प्रतिरूपण करणं नसल्याने जीवनानुभूतीतून येणारे प्रत्यंतरातून त्यांच्या कलाकृती घडत जातात. त्यांचा हा शोध हा स्वत्वापासून सुरू होतो आणि त्या स्वत्वाची कथनं ही त्यांचं शरीर हेच माध्यम बनवून मांडतात. ‘बर्ड’ ही त्यांची सुरुवातीच्या काळातील फोटोमालिका. यात एका लाकडी स्टुलावर उभं राहून त्या पक्ष्याप्रमाणे भरारी घेण्याचा प्रयत्न करतात. पायाच्या चौडय़ावर उभं राहून त्या तोल सांभाळत हात हलवतात, जणू काही पंख फडफडवत आहेत. दर वेळी त्या उडायचा प्रयत्न करताना खाली पडतात. कितीही वेळा प्रयत्न केला तरी ती झेप घेणं काही शक्य होत नाही. त्यांचं शरीर गुरुत्वाकर्षणाचे नियम भेदू शकत नाही. या परफॉर्मन्स/फोटो मालिकेतून स्त्रियांना जखडून ठेवणाऱ्या आपल्या समाजव्यवस्थेवर, नियम आणि रूढींवर त्या नेमकं बोट ठेवतात. त्याचबरोबर, ठरावीक सौंदर्याच्या गृहीतकात न बसणारा त्यांचा नग्न देह आपल्या साचेबंद संकल्पनांना हादरा देतो, प्रेक्षकांना प्रक्षोभित करत विचार करायला भाग पाडतो. त्यांच्या कलाकृतीतून, त्यांच्या स्वत:च्या शरीराला माध्यम बनवून त्या स्त्री-प्रतिमा, लिंगभावाचे मुद्दे, लैंगिक भेदभाव यांसारख्या विषयांवर प्रश्न उभे करतात.

समकालीन कलेत परफॉर्मन्स आर्ट हा बंडखोर कला प्रकार मानला जातो. त्याचं स्वरूप हे कलेच्या वर्चस्ववादी भूमिकेला प्रश्न विचारणारं आणि कलावस्तूला वरचं स्थान देणाऱ्या कलाविश्वाला आव्हान देणारं म्हणून उभं राहातं; पण बऱ्याचदा संकल्पनात्मक मांडणीमुळे त्याची भाषा काहीशी अवजड बनते. सोपे सुटसुटीत बनवण्याच्या नादात त्यातला आशय गमावला जाण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे परिघावर न राहता सर्वसमावेशक दृष्टी ठेवत आणि अस्पष्टपणा काढून टाकून परफॉर्मन्स आर्ट अधिकाधिक लोकांपर्यंत एक कलाभाषा म्हणून पोहोचणं हेच त्याचं खरं यश ठरेल. तेव्हा जंतरमंतरवर शेतकऱ्यांनी कवटय़ा बांधून घेणं किंवा मणिपूरमध्ये आसाम रायफल्ससमोर नग्नावस्थेत निषेध करणं हाही एक प्रकारचा परफॉर्मन्स ठरू शकेल.

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत. ई-मेल :

noopur.casp@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nupur desai article performance art

ताज्या बातम्या