आई आपल्या मुलांकडे  एक महत्त्वाचा वारसा देत असते. ते म्हणजे आपल्या शरीरातले, विशेषत: पोटातले जिवाणू. गर्भाशयात असताना बाळ पूर्णपणे र्निजतुक असते. मात्र बाळाचा जन्म जर नैसर्गिक न होता सिझेरिअन करून झाला तर त्याला आईचा हा वारसा मिळत नाही आणि त्याचा पहिला संपर्क इस्पितळातल्या जिवाणूंशी येतो. परिणामी त्याच्या वाढीवर आणि आरोग्यावर दूरगामी अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते, असे नव्या संशोधनात आढळून आले आहे. आज साजऱ्या होणाऱ्या मातृदिनाच्या निमित्ताने एका महत्त्वाच्या विषयाची चिकित्सा करणारा हा लेख..

योगेश शौचे
जगातल्या सर्वच संस्कृतीत आईची थोरवी मानली गेली आहे. बाळाला आधी आपल्या पोटात वाढवून त्याला जन्म देण्याच्या वेदना आणि नंतर ते स्वत:च्या पायांवर उभे राहीपर्यंत त्याचे संगोपन माता करत असते. हे फक्त माणसातच नाही तर इतर प्राण्यांतही आढळून येते. निसर्गानेच आईवर ही जबाबदारी दिलेली आहे आणि शास्त्रीयदृष्टय़ाही मुलाला आईकडून मिळणारा वारसा हा वडिलांकडून मिळणाऱ्या वारशापेक्षा खूप मोठा आहे. जीवशास्त्रीयदृष्टय़ा माणसाच्या गुणसूत्रांच्या दोन संचांपैकी एक आईकडून तर एक वडिलांकडून येतो. या गुणसूत्रांमुळे आपले सगळे गुणधर्म ठरतात. ज्यात उंची, वर्ण, केसांचा रंग, स्वभाव, काही आनुवंशिक आजार, आवडीनिवडी अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.
परंतु याशिवाय काही गोष्टी आपल्याला फक्त आईकडूनच मिळत असतात. शरीरातल्या पेशीत ऊर्जानिर्मितीचे काम करणाऱ्या तंतुणिका (मायटोकोंड्रिया)मध्ये त्यांचे स्वत:चे एक छोटेसे गुणसूत्र असते आणि पेशीतील जीवद्रव्यात अशा शेकडो तंतुणिका असतात. पुनरुत्पादनाच्या वेळी शुक्राणू आणि अंडय़ाचे जेव्हा फलन होते तेव्हा फक्त अंडय़ातच जीवद्रव्य आणि तंतुणिका असतात. शुक्राणूत न ही जीवद्रव्य असते, न ही तंतुणिका. त्यामुळे पुढच्या पिढीत तंतुणिका आणि त्यांच्यातल्या गुणसूत्रामुळे येणारे गुणधर्म हे फक्त आणि फक्त आईकडूनच येत असतात. पण ही सगळी माहिती आता पाठय़पुस्तकातही आहे त्यात काही विशेष नाही. गेल्या काही वर्षांत झालेल्या संशोधनातून असे दिसले आहे की आई आपल्या मुलांकडे अजून एक महत्त्वाचा वारसा देत असते. ते म्हणजे आपल्या शरीरातले, विशेषत: पोटातले जिवाणू.
ऐकायला आश्चर्य वाटेल, पण जशी पृथ्वीवर माणसांची वस्ती आहे तशीच आपल्या शरीरावर जिवाणूंची वस्ती आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत सगळीकडे हे जिवाणू नांदत असतात. आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची कल्पनाही येत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जिवाणू, विशेष करून आपल्या पोटातले जिवाणू आपल्या आईकडूनच आपल्याला मिळत असतात. म्हणजे शास्त्रीयदृष्टय़ादेखील आपल्या जीवनातले आईचे योगदान फार फार मोठे आहे. केवळ संख्येचा विचार केला तर आपल्या शरीरात फक्त १०% मानवी पेशी तर उरलेले ९०% जिवाणू आहेत. म्हणजे आपल्याला माणूस का म्हणायचे हाच प्रश्न आहे. आपल्या शरीरात मानवी पेशींच्या दसपट जिवाणू आहेत हे लक्षात घेता आईची ही देणगी फार महत्त्वाची आहे.
आईकडून मुलांकडे जिवाणू जाण्याची ही परंपरा फक्त माणूस आणि सस्तन प्राण्यातच नाही तर अगदी डांस, इतर किडे, जळवा यांच्यातही दिसते. आपल्या शरीरातले विशेषत: पोटातले जिवाणू आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पोट किंवा आतडी म्हणजे मुंबईसारखे दाट लोकसंख्या असलेले शहर म्हणता येईल. माणसाचे एकंदर आरोग्य, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, आतडय़ांची सूज यांसारखे आजार, इतकेच नाही तर आपल्या मानसिक स्थितीवरही पोटातल्या जिवाणूंचा मोठा प्रभाव पडतो हे नवीन संशोधनात दिसत आहे. सध्याचे निष्कर्ष प्राथमिक स्वरूपाचे आहेत आणि या विषयाचे पूर्ण ज्ञान होण्यास अजून बरीच वर्षे जावी लागतील.
आईच्या पोटात वाढताना गर्भ हा पूर्णपणे जिवाणूविरहित असतो. त्यामुळे त्याच्यात जिवाणूंचे संक्रमण कुठून होते हा प्रश्न शास्त्रज्ञांना बरेच दिवस सतावत होता. आपल्या पोटात ३०००-५००० वेगवेगळ्या जातींचे जिवाणू आढळतात आणि त्यातले बहुसंख्य प्रयोगशाळेत वाढवता येत नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही माहिती मिळणे केवळ अशक्य होते. परंतु गेल्या काही वर्षांत अशा जीवाणूंविषयी ते प्रयोगशाळेत न वाढविताही त्यांच्या डी.एन.ए.चा क्रम तपासून त्यांच्याबद्दल माहिती मिळविण्याचे तंत्र विकसित झाले आणि अशा प्रश्नांची उत्तरे सापडणे शक्य झाले. आईकडून बाळाकडे जिवाणूंचे संक्रमण होण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत.
नव्या संशोधनात असे आढळून आले आहे की गर्भाशयात असताना बाळ पूर्णपणे र्निजतुक असते. शरीराच्या इतर भागांसारखीच योनीतही विशिष्ट अशी जीवाणुसृष्टी असते. नैसर्गिक प्रसूती होताना बाळ जेव्हा योनीमार्गातून पुढे सरकते तेव्हा त्याचा संपर्क योनीतील जीवाणुसृष्टीशी येतो आणि हे जिवाणू त्याच्या शरीराचा एक भाग बनतात. बाळाचा जन्म जर नैसर्गिक न होता सिझेरिअन करून झाला तर त्याला आईचा हा वारसा मिळत नाही आणि त्याचा पहिला संपर्क इस्पितळातल्या जिवाणूंशी येतो आणि हे जिवाणू मित्र जिवाणू असतील याची काहीच शाश्वती नसते. म्हणजेच आईकडून वारसा म्हणून येणाऱ्या जिवाणूंऐवजी इस्पितळातल्या जिवाणूंची बाळाच्या शरीरावर वस्ती झाल्यामुळे त्याच्या वाढीवर आणि आरोग्यावर दूरगामी अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते.
आईच्या दुधाला अमृताची उपमा दिली गेली आहे. या दुधातून बाळाला पोषण, रोगप्रतिकारक शक्ती मिळते हे आजपर्यंत माहीत होतेच; पण याच दुधातून जिवाणूंचेसुद्धा संक्रमण होते हे आपल्याला गेल्या दोन वर्षांत समजले आहे. यापूर्वी आईचे दूध हे र्निजतुक असल्याचा समज होता. पण तो आता मोडीत निघाला आहे. आईच्या दुधात शेकडो जातींचे जिवाणू असतात आणि ते बहुधा तिच्या पोटातूनच स्तनापर्यंत येतात आणि मग दुधातून बाळाच्या पोटात जातात, असे नवे संशोधन आपल्याला सांगते. एवढेच नाही तर दुधातले काही घटक असे असतात जे फक्त मित्र जिवाणूंच्या वाढीला मदत करतात. अपायकारक जिवाणूंना ते मदत करत नाहीत. आणि त्यामुळेच नैसर्गिक प्रसूती आणि आईचे दूध यांना आणखी जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. गरज नसतानाही सिझेरिअनद्वारे बाळाला जन्म देऊन त्याचे आपण फार मोठे नुकसान करत आहोत हे भावी माता आणि त्यांच्या कुटुंबाने लक्षात घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आईचे दूधही बाळाला देणे आवश्यक आहे. दोन्हींपैकी एक जरी झाले नाही तरी बाळाच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो, मग दोन्ही जर मिळाले नाहीत तर त्याचे किती नुकसान होईल याची कल्पनाच करणे बरे.