मीनेश गाडगीळ

वाढते औद्योगिकीकरण, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, हवामानातील बदल आणि मजुरांची कमतरता यासारखी आव्हाने शेतीसमोर आहेतच, पण सेंद्रिय शेतीचा वापर करून उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ केली जाऊ  शकते. त्याचबरोबर शेतीचा शाश्वत विकास साधता येऊ  शकतो, यासाठी शेतकऱ्यांनी प्रयोगशील व्हायला हवे.

कोकणाला भाताचे कोठार म्हणतात. यातही रायगड जिल्ह्य़ातील कोलम हा ‘बतजिना’ या नावाने प्रसिद्ध होता. हजारो हेक्टर जमिनीवर भात लागवड केली जात होती. कालांतराने औद्योगिकीकरणामुळे बरीचशी जमीन ही संपादित होत गेली, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या, त्यामुळे शेतीकडे हळूहळू स्थानिकांचे दुर्लक्ष होऊ  लागले. तरुण पिढी शेतीला दुरावली. त्यामुळे शेतीसाठी कामगारांची कमतरता जाणवू लागली. भात पिकातून मिळणारे उत्पन्न कमी होत गेलं, त्यामुळे भात लागवडीखालील क्षेत्र घटत गेलं.

पूर्वी अनेक प्रकारची भात बियाणे या परिसरात लावली जात होती. उदा. रत्ना,जया, कोलम या जातींबरोबरच गौरीगणपतीमध्ये लवकर तयार होणारे भातही लावले जात होते. त्याकाळात फक्त शेण, लेंडी व पालापाचोळा यासारख्या खतांवरच भातशेती होत असे. कालांतराने उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खतं वापरली जाऊ लागली, तसेच अनेक हायब्रिड वाणही बाजारात दाखल झाले. यात पारंपरिक वाण नामशेष होत गेले.

‘बतजिना’सारखा कोलम तांदूळ रायगडमधून हद्दपार झाला. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे भाताच्या वाणाची उंची वाढू लागली, तसेच मातीचा कस कमी होत गेला. ऑरगॅनिक कार्बन, सिलिका याचे प्रमाण कमी होऊ  लागले, खोडाची व मुळांची जमीन पकडून धरण्याची क्षमता कमी होऊ  लागली. वारा, पावसाने हे वाण जमिनीवर पडून नुकसान होण्याचे प्रमाण वाढले. याचा परिणाम हळूहळू हे वाण न करण्याकडे होत गेला. कालावधीनंतर या भाताचे बियाणे मिळणेही बंद झाले. रायगड मधला बतजिना नामशेष झाला.

पुढच्या काळात अधिक उत्पादन देणाऱ्या व लहान दाणा आसणाऱ्या जाती संशोधित झाल्या. उदा. वाय. एस. आर., जोरदार, सौभाग्य, गंगोत्री, शुभांगी, सुगंधा, तृप्ती,दप्तरी,सोनल, मुग्धा. या नव्या भाताच्या जातींची लागवड  होऊ  लागली. युरिया, सुपरफॉस्पेट ,पोटॅश खताचा अती मारा सुरू झाला. जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढले. यामुळे ऑरगॅनिक कार्बन कमी झाला. जमिनीतील जीवाणूंचे प्रमाण कमी झाले त्यामुळे जमिनीचा भुसभुशीतपणा कमी झाला.

दुसरीकडे पिकांवर किडींचे प्रमाण वाढले. खोड किडा ,करपा, भुरा, मावा वाढू लागला. पिके लवकर तयार  होऊ  लागल्यामुळे ऐन फू ल लागण्याच्या हंगामात पाऊ स पडू लागल्यामुळे दाणा परिपक्व  होण्याचे प्रमाण घटले व (पळी) पोचा दाणा भातामधे वाढू लागला.

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमीन नापीक झालीच, पण सदर उत्पादनाचे मानवी आरोग्यावरही दुष्परिणाम वाढू लागले. कॅन्सर, हृदयविकार, मूत्राशयाचे विकार, मेंदूचे विकार वाढू लागले. भाताला फक्त नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम खतांची मात्रा जास्त प्रमाणात दिली जाते. इतर मूलद्रव्यांचा विचार कधीच केला गेला नाही जो अतिशय गरजेचा आहे. वरील एन.पी.के. बरोबर ऑरगॅनिक कार्बन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सिलीका, आयर्न, मॅग्निज, बोरॉन, सोडीयम हे घटक असणे अत्यंत गरजेचे आहे,  जे अनेक सेंद्रिय खतामुळे आपण भात पिकाला देऊ  शकतो. मुख्य शेण, लेंडी, तसेच निमकेक जे ‘एन.पी.के’चे प्रमाण पुरवू शकते. तसेच ‘ऑरगॅनिक कार्बन’ही जमिनीत वाढवू शकते. अनेक नैसर्गिक घटक जमिनीत टाकल्यास मुबलक मूलद्रव्ये मिळू शकतात. उदा. करंज झाडाच्या फुलांमधून नायट्रोजन, फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात मिळू शकतात आणि म्हणूनच पूर्वी शेताच्या बांधावर करंजाची झाडे लावलेली असत. ज्यांची फुले आपोआप शेतात पडुन कुजून योग्य घटक मातीला मिळत असत.

याप्रमाणेच शेण,गोमूत्र, बेसन, गूळ यासारखे घटक कु जवून त्याचे द्रावण भात पिकावर फवारल्यास सर्व ‘न्युट्रियंट्स’ भाताला मिळू शकतात.  त्याचबरोबर रोगावरही नियंत्रण ठेवता येऊ  शकते. शेतात राख टाकल्यास सिलीका मिळेल ज्यामुळे खोड तसेच मुळांना बळकटी प्राप्त होते.

कडुलिंबाच्या पानांचा अर्क कीडनियंत्रणासाठी उपयोगात आणला जाऊ  शकतो. याप्रमाणेच घाणेरी, करंज, रुई यासारख्या झाडांच्या पानांच्या रसांचा वापर कीडनियंत्रण व बुरशीसाठी आपण करू शकतो. एरंड, चाफा यासारख्या पानांच्या रसाचा वापर ‘स्टिकर’प्रमाणे ‘न्युट्रियंट्स’ पानावर  पकडून राहण्यासाठी होऊ  शकतो. भाताच्या तुसाचा वापर सिलिका वाढविण्यासाठी करता येऊ  शकतो. पानफु टीसारख्या पानांच्या रसातून ‘जिबरॅलिक सीड’ देऊ शकतो. गिरिपुष्पसारख्या झाडांच्या पानांचा व फुलांचा वापर करून उंदरांपासून पिकांचे रक्षण करता येऊ  शकते.

आंबा, सीताफळ, पानफुटी, करंज, चाफा, शेवगा, पपई, एरंड, घाणेरी, मेंदी, कडुलिंब, यासारख्या पानांच्या रसाच्या फवारणीने भात किंवा इतर पिकाला चांगले ‘न्युट्रियंट्स’ तर मिळतीलच पण कीड नियंत्रण करता येते.

‘धान्य अर्क’ ज्यामध्ये हरभरा, मूग, मटकी, उडीद, चवळी या धान्यांना मोड आणून सर्व धान्ये वाटून तो लगदा शेण, गोमूत्र यामध्ये कुजवून हे द्रावण पाण्यात मिसळून शेतात पिकावर फवारल्यास मोठय़ाप्रमाणात पिकाला ‘न्युट्रियंटस’ मिळतील. तंबाखू , हिंग, लाल मिरची,आले,लसूण याचा लगदा पाण्यात मिसळून त्याचे द्रावण फवारल्यास कीड नियंत्रण होईल.

अशाप्रकारे नैसर्गिक घटकांचा वापर आपण भात तसेच इतर पिकांवर करून मोठय़ाप्रमाणात ‘न्युट्रियंट्स’ पिकाला देऊ शकतो व कीड नियंत्रण करू शकतो व रासायनिक खत व पेस्टिसाइडला पर्याय देऊ शकतो. बरेचसे घटक आपण आपल्याच शेतात तयार केल्यामुळे खतांवर होणारा खर्च कमी केला जाऊ  शकतो. मिश्र पीक घेतल्यामुळे जमिनीचा पोतही सुधारेल व वार्षिक उत्पन्नही वाढेल.

एका दिवसात सेंद्रिय Rोंती नक्कीच होणार नाही, सुरुवातीला २५ टक्के सेंद्रिय खते व ७५ टक्के रासायनिक खते व कालांतराने दरवर्षी सेंद्रिय खताचे प्रमाण वाढवून ४ ते ५ वर्षांनंतर आपण पूर्णपणे शेतात सेंद्रिय खत वापरू शकतो ज्यामुळे विषविरहित उत्पादन आपल्याला मिळू शकेल.

सेंद्रिय खत वापरामुळे भात मिलमध्ये कांडताना तांदुळाचा तुकडा कमी होतो, कणी कमी पडते त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनात वाढही दिसून येते. सेंद्रिय खतामुळे तांदुळाच्या चवीत फरक पडतो, आहारात असा तांदूळ घेतल्याने  पोट भरलेले राहते.

अनेकप्रकारच्या पाला पाचोळ्याचा वापर सेंद्रिय खतासाठी केला जाऊ  शकतो, त्यासाठी लागणारी झाडे  शेताच्या बांधावरच लागवड करता येते. ज्यामुळे निसर्ग जोपासण्यासही मदत होते. शेण, लेंडीचा खत म्हणून वापर केल्याने गोपालन, बकरी पालन यासारख्या पूरक उद्योगांना चालना मिळू शकते.

अशाप्रकारे नैसर्गिक घटकांवर जर भातशेती केली,  तर आपल्या शेतजमिनीचे नुकसान आपणास टाळता येऊ  शकते. त्याचबरोबर मानवी आरोग्याचे आणि निसर्गाचेही रक्षण केले जाऊ  शकते.

वाढते औद्योगिकीकरण, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, हवामानातील बदल आणि मजुरांची कमतरता यासारखी आव्हाने शेतीसमोर आहेतच, पण सेंद्रिय शेतीचा वापर करून उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ केली जाऊ  शकते. त्याचबरोबर शेतीचा शाश्वत विकास साधता येऊ  शकतो, यासाठी शेतकऱ्यांनी प्रयोगशील व्हायला हवे.