scorecardresearch

भानु अथय्यांचा चित्रप्रवास

भानुमती गणपतराव राजोपाध्ये हे अथय्यांचे मूळ नाव. कोल्हापुरात, देवळाजवळच त्यांचे घर होते

अभिजीत ताम्हणे

भानु अथय्या या केवळ चित्रपट वा नाटकांच्या वेषभूषाकार नव्हत्या तर चित्रकारही होत्या, हे स्पष्ट करणारी त्यांची चित्रे साठ वर्षांनंतर प्रकटली आहेत. त्यांच्या एकंदर ३२ चित्रांचा लिलाव २ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार असून, या निमित्ताने भानु अथय्या यांची अप्रकाशित बाजू अभ्यासपूर्णरीत्या लोकांसमोर येते आहे..

भानु अथय्या या केवळ चित्रपट वा नाटकांच्या वेषभूषाकार नव्हत्या तर चित्रकारही होत्या, हे स्पष्ट करणारी त्यांची चित्रे साठ वर्षांनंतर प्रकटली आहेत. त्या चित्रांचा लिलाव होणार, हे दुर्दैव वगैरे अजिबात नाही, कारण खुद्द अथय्यांचीच तशी इच्छा होती. दुसरे म्हणजे, या निमित्ताने भानु यांची अप्रकाशित बाजू अभ्यासपूर्णरीत्या लोकांसमोर येते आहे. मुंबईतील ‘प्रिन्सेप्स’ या लिलाव संस्थेतर्फे एकंदर ३२ चित्रांचा किंवा रेखाटन-समूहांचा हा लिलाव २ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने होईल. त्यापैकी सर्वात पहिले चित्र हे १९३८-३९ साली, म्हणजे भानुमती राजोपाध्ये नऊ-दहा वर्षांच्या असतानाचे आहे.

भानुमती गणपतराव राजोपाध्ये हे अथय्यांचे मूळ नाव. कोल्हापुरात, देवळाजवळच त्यांचे घर होते. वडील गणपतराव ऊर्फ अण्णासाहेब प्रागतिक विचारांचे होते. या अण्णासाहेबांना चित्रकलेची, विशेषत: पाश्चात्त्य कलेची आवड म्हणून त्या वेळी त्यांच्या घरात रेम्ब्रां आदी प्रबोधनकालीन चित्रकारांच्या चित्रांची अनेक पुस्तके होती, तर प्रख्यात चित्रकार व चित्रपटमहर्षी बाबुराव पेण्टर यांच्याकडे अण्णासाहेब चित्रकलेचे धडे घेत होते. हे दोघे समवयस्क, त्यामुळे त्यांची मैत्रीच होती. बहुधा बाबुरावांच्या प्रेरणेनेच, अण्णासाहेब राजोपाध्ये यांनीही साहाय्यक दिग्दर्शक म्हणून शालिनी सिनेटोनमध्ये काम करणे सुरू केले होते आणि त्यांनी स्वत:चा ‘मोहिनी’ हा  चित्रपटही बनवायला घेतला होता. रुक्मांगद आणि मोहिनी यांच्या कथेवरील तो चित्रपट १९४० मध्ये प्रदर्शित झाला, पण अण्णासाहेबांचे त्याआधीच निधन झाले होते. भानुमती दहा वर्षांच्या असतानाच त्या व त्यांच्या पाच बहिणी पोरक्या झाल्या, पण तुलनेने घरची सुस्थिती असल्यामुळे सर्व जणी शिकल्या. पुढे यापैकी पाच जणी खासगी कंपन्यांत किंवा सरकारी खात्यांत उच्च पदांवर गेल्या.. ही सारी माहिती काही प्रमाणात भानु अथय्यांच्या, २०११ साली प्रकाशित झालेल्या ‘कॉस्च्यूम डिझाइन इन इंडिया’ या पुस्तकाच्या मनोगतामध्ये होती, पण तीत आणखी अभ्यासाने भर घालण्याचे काम प्रिन्सेप्स या संस्थेतील विषयतज्ज्ञांनी केले आहे.

वडिलांच्या प्रोत्साहनाने भानुमती चित्रे रंगवू लागल्या होत्या. त्या काळच्या बिस्किटांचे डबे आदी युरोपीय वस्तूंवरही छान दिसणारी चित्रे असत, ती बहुधा भानुमतींना बालपणी आवडत असे त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काही चित्रांवरून दिसते. ही चित्रे परभृत म्हणावीत अशी आहेत, पण बालिकेकडे कसब आहे, हे मात्र दिसते. एका चित्रात स्वतंत्र कल्पनेची भरारीसुद्धा दिसते, त्यातील मानवाकृती काहीशा बेढब असल्या तरी विषयचित्र म्हणून ते लक्षात राहणारे आहे. त्या चित्रात दोन परकऱ्या पोरी एका झाडावर दिसतात, त्या झाड हलवून फुलांचा सडा पाडत आहेत. हा सडा पारिजातकाचा आहे, हे दाखवण्यासाठी ती फुले मुलींपेक्षा तुलनेने मोठय़ा प्रमाणातील आकारात लहानग्या भानुमतीने दाखवली होती.

मात्र वयाच्या नवव्या किंवा दहाव्या वर्षी, कागद कातरून गांधीजींचे जे चित्र भानुमतीने साकार केले, ते थक्क करणारेच ठरते. कदाचित कुणा मोठय़ा माणसाने रेखाटन आदी मदत केली असेल का, अशी शंका यावी इतपत कौशल्य या कातरकामात आहे.

अर्थात, भानुमती यांची चित्रकला वयाच्या मानाने फारच चांगली असल्याचा शेरा शाळेतूनही मिळाला होता. त्यामुळेच कमी वयात एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट या चित्रकला परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या. त्या काळात जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेशासाठी, एवढय़ा परीक्षा पार करणे आणि पश्चिम भारतातील त्या एकमेव सरकारी कलाशाळेतील शिक्षकांच्या पसंतीला उतरणारे काम करणे, एवढय़ाच अटी असत. भानुमती तर रीतसर शालेय शिक्षण पूर्ण करून मगच मुंबईत, जे जे स्कूलमध्ये प्रवेशासाठी आल्या. तो सहज मिळाला, पण राहण्यासाठी त्या काळी मुलींची वसतिगृहे कमी. म्हणून काळा घोडा परिसरात, वायडब्ल्यूसीए होस्टेलमध्ये त्या राहू लागल्या. तेथील वातावरण आवडेना म्हणून आणखी दूर, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकासमोरील चर्चला जोडून जो महिलाश्रम होता तिथे त्यांनी मुक्काम हलविला. या मुक्कामात तमिळनाडू आणि श्रीलंका येथून आलेल्या मुलींचे निराळ्या पद्धतीने साडी नेसणे कुतूहलजनक होते, अशी हस्तलिखित नोंद भानु यांनी केली आहे. ती वेशभूषेकडे अभ्यासूपणे व गांभीर्याने पाहण्याची त्यांची सुरुवात मानता येते. एरवीही जे जे स्कूल ऑफ आर्टच्या यथातथ्यवादी पाश्चात्त्य चित्रणात, तसेच त्या काळात जगन्नाथ अहिवासी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या भारतीय कला वर्गात चित्रामधील मानवाकृतींच्या वस्त्रांकडे लक्ष देण्याचे संस्कार केले जात.

अहिवासींच्या वर्गात भानु राजोपाध्ये दाखल झाल्या, त्या वेळची चित्रे ही क्लासवर्क या प्रकारातील आहेत. अहिवासींच्या या वर्गात पौराणिक चित्रांप्रमाणेच समाजजीवन दाखवणारी चित्रेही काढवून घेतली जात. समाजजीवनाच्या चित्रामध्ये भरपूर मानवाकृती, त्याही अर्थातच भारतीय लघुचित्रे आदींपासून पुढे सुचलेल्या शैलीने साकारल्यासारख्या अलंकारिक रेखाटलेल्या असाव्यात आणि चित्रचौकटीच्या अवकाश विभाजनातूनही लय दिसावी असा कटाक्ष असे. वरच्या उजव्या कोपऱ्यापासून, मधोमध असलेल्या चित्रविषयाला प्राधान्य देण्यासाठी नागमोडी वळण घेऊन तळाच्या मधोमध या चित्रांतील मानवाकृती पोहोचत. हीच लय, पुढे अमूर्त चित्रकार म्हणून प्रख्यात झालेले व्ही. एस. गायतोंडे यांच्याही तत्कालीन वर्गचित्रांत दिसली होती. ती भानु राजोपाध्ये यांनीही सांभाळली. त्यात प्रावीण्यही मिळवले. सोबत स्केचिंगचा सराव सुरू ठेवून पावडर शेडिंग किंवा ग्राफाइटने हुबेहूब व्यक्तिरेखाटने केली. या प्रगतीमुळे भानु यांना जे जे कलाशाळेचे सुवर्णपदक न मिळते तरच नवल.

सुवर्णपदक मिळवण्यापूर्वी जेजेच्या अभ्याससहलींतून जी अनेक रेखाटने भानु यांनी केली, त्यांचे संच आता प्रिन्सेप्सच्या लिलावात आहेत. लिलावांच्या भाषेत, एक वस्तू काय किंवा वस्तूंचा संच काय, दोहोंना ‘लॉट’ असेच म्हणतात. तेव्हा या लिलावात ३२ लॉट असले, तरी प्रत्यक्षात रेखाटने त्याहून अधिक आहेत. या मजकुरासोबत त्यापैकी काही रेखाटने पाहता येतील, त्यातून भानु यांची रेषेवरची हुकमत आणि लयदारपणाकडे त्यांचे असलेले लक्ष, हे दोन्ही दिसून येते. मात्र ही अखेर अभ्यास-रेखाटने आहेत. लेण्यांमधील शिल्पांच्या यथातथ्य नोंदी करण्याचा तो प्रयत्न आहे. तरीही, भानु अथय्यांच्या पुढील प्रवासात ‘आम्रपाली’, ‘सिद्धार्थ’ आदी चित्रपटांच्या वेषभूषांची पायाभरणी या नोंदींमधून झाली होती, हे महत्त्वाचे.

जेजेच्या पुढली झेप भानु यांनी घेतली, ती त्याच काळात, १९४८ मध्ये स्थापन झालेल्या ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’ या चित्रकार गटाशी त्यांचा संपर्क आल्यामुळे. एफ. एन. सूझा, सदानंद बाकरे, हरी अंबादास गाडे, एस. एच. रझा, के. एच. आरा आणि एम. एफ. हुसेन हे या गटाचे मूळ सदस्य. पण लोकांपर्यंत कला पोहोचवण्याच्या ध्येयाची व्याप्ती वाढवण्यासाठी या प्रोग्रेसिव्हांनी तरुण चित्रकारांचेही स्वागतच केले. या गटापर्यंत भानु यांना नेले ते गाडे यांनी. पण इथे केवळ चित्रकारच नव्हे, तर साहित्यिक व कलाचिंतक मुल्कराज आनंद, पुढे नाटय़गुरू म्हणून नावाजले गेलेले इब्राहीम अल्काझी अशीही मंडळी होती. त्यातच वासुदेव ऊर्फ व्ही. एस. गायतोंडेही होते.

गायतोंडे यांनी अहिवासींच्या वर्गातून पॉल क्ली यांच्या आदिमतावादी किंवा आदिबंधात्मक भूमिती शोधणाऱ्या चित्रांकडे केलेला प्रवास आणि अनेक प्रभावांखाली का होईना, भानु यांचा झालेला प्रवास यांत कमालीचे साम्य भानु यांच्या ‘प्रेयर्स’ या चित्रामधून दिसते. या चित्रावर जरी तत्कालीन सूझा, रझा आणि गाडे यांचा प्रभाव असला तरी खरी जातकुळी पॉल क्लीपर्यंत भिडणारी आहे. या चित्रात एक जोगीण क्रूसापुढे उभी आहे, पार्श्वभूमीला कमानदार खिडक्या आहेत. विविधरंगी काचांचे मोझाइक त्या कमानदार खिडक्यांवर असले, तरी प्रार्थनागृहात गंभीर अंधार आहे. जोगीण मनापासून, काहीशी झुकून प्रार्थना करीत आहे आणि तिच्या अंगावर खिडक्यांतून विविध कवडसे पडत आहेत, असे ते चित्र. ही मी कुणा पाश्चात्त्य चित्रकाराची कॉपी केलेली नाही, असे भानु यांनी त्या वेळी सांगितल्याची नोंद आहे. पण तसे सांगावे लागले, हेही खरे.

भानु यांच्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टपणाची साक्ष मिळते ती ‘लेडी इन रिपोझ’ या १९५२ सालच्या चित्रातून. रंगांची उधळण, ठसठशीत रेषा, अवकाशाला विभागणारी चौकटी जाळी, अशी या चित्राची रचना आहे. चित्रातील स्त्री चादरीवर पहुडली आहे, त्या चादरीने स्त्रीच्या हालचालींनुसार घेतलेला आकार इथे त्या चौकटी जाळीच्या विक्षेपांमधून दिसतो. कलाशाळेत स्त्रीदेहाची नग्नचित्रे अभ्यास म्हणून करावीच लागत, ती भानु यांनीही केली होती. पण हे चादरीवरले नग्नचित्र वेगळे आहे. त्यात देहसौष्ठव थेट दिसत नसून संवेदनांचे सूचन आहे.  प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपमध्ये शोभणारी महिला चित्रकार स्त्रीजाणिवेने स्त्रीचित्रे करील, हे भानु यांनी या चित्रामधून दाखवून दिले. अर्थात, स्त्रीजाणिवेने स्त्रीदेहचित्रांची जेजेची परंपरा रतन वडके यांच्यापर्यंत नेता येते हे खरे असले तरी भानु यांनी त्यात आधुनिक शैलीचा उन्मुक्तपणा आणला, हे विशेष. या उन्मुक्तपणापासून आता पुढे जाऊन आपले सगुणसाकार शैलीरूप शोधायचे आहे, अशा टप्प्यावरच भानु यांनी ‘ईव्हज् वीकली’मध्ये नोकरी पत्करली आणि त्या फॅशन स्केचेस काढू लागल्या. त्याही स्थितीत, त्यांच्या चित्रांचे एकल प्रदर्शन क्रिशन खन्ना यांच्या पुढाकाराने भरवले गेले होते. पण लिलावात त्या प्रदर्शनातील चित्रे नाहीत. ‘ईव्हज् वीकली’ची काही छापील पाने मात्र आहेत. ही सर्व चित्रे सध्या इंटरनेटवर,  https://prinseps.com या संकेतस्थळवर पाहायला मिळत आहेत; पण लवकरच रणजित होस्कोटे लिखित प्रदर्शन पुस्तिकेच्या स्वरूपात त्याचे पुस्तकरूपही होणार आहे.

abhijit.tamhane@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Oscar winning costume designer bhanu athaiya zws

ताज्या बातम्या