कृषी क्षेत्रात शेती कसण्याबरोबरच त्यातील विविध संशोधनासही मोठे महत्त्व आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये या कृषी क्षेत्रातील संशोधकांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या याच कार्याविषयी…
एकेकाळी भारतासारख्या खंडप्राय देशास परदेशातून अन्न आयात करावे लागायचे. त्यातून कोट्यवधी लोकांची भूक भागवण्यास मदत व्हायची. भारतीय हरितक्रांतीचे जनक मानले जाणारे एम. एस. स्वामिनाथन यांनी १९६०-७० च्या दशकात गहू व तांदळाचे उच्च उत्पादन देणारे वाण विकसित करून देशाला दुष्काळातून मुक्त केले. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून त्यांनी नॉर्मन बोरलॉग यांच्या सहकार्याने गव्हाच्या सुधारित वाणांचा भारतात परिचय करून दिला. पुढे हा वारसा अनेक कृषी संशोधक, शास्त्रज्ञांनी चालवला.
मागील अर्धशतकाहून अधिक काळ शेती क्षेत्रातील उत्पादन व उत्पन्नवाढीचे श्रेय हे शासनाच्या पीकवाढीच्या विविध योजना, हरितक्रांतीसारखे उपक्रम, प्रशिक्षण व भेट योजना, वैयक्तिक संपर्क, गटचर्चा, बैठका, प्रशिक्षण, शेतीशाळा, सहली, शिवार फेर्या, प्रदर्शने, प्रसिद्धी याद्वारे होत राहिले. तद्वत, कृषी तंत्रज्ञान शोधणारे, ते शेतकर्यांच्या शेतापर्यंत पोहोचले पाहिजे, शेतीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या हेतूने कार्यरत राहणार्या शास्त्रज्ञांना जाते. कृषी संशोधन आणि विकासात गुंतलेल्या पाच वरिष्ठ शास्त्रज्ञांना पीक सुधारणा, जैवविविधता संवर्धन, कृषी शिक्षण आणि पशुधन विकासात त्यांच्या दीर्घकालीन योगदानासाठी पद्मश्रीसाठी निवडण्यात आले आहे. त्यांच्या अनमोल कार्याचा हा परिचय.
डॉ. अशोककुमारसिंह हे भारतातील आघाडीच्या कृषी शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. डॉ. अशोककुमारसिंह हे बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसीचे माजी विद्यार्थी. तेथे त्यांनी वनस्पती अनुवंशशास्त्र आणि प्रजनन या विषयात विशेषीकरणासह कृषी विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी भात पिकासाठी केलेले काम जागतिक पातळीवर पोहचले आहे. विशेषत: बासमती जातींमध्ये त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी ओळखले जातात. भारतीय कृषी संशोधन संस्थेत (आयएआरआय) त्यांच्या नेतृत्वाखाली, उच्च-उत्पादन देणार्या, रोग-प्रतिरोधक आणि उच्च-गुणवत्तेच्या बासमती जाती विकसित करण्यात आल्या. यायोगे बासमती तांदळाच्या निर्यातीत भारताची जागतिक प्रतिष्ठा वाढीस लागली. त्यांच्या संशोधनामुळे शेतकर्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढले. बारामतीची निर्यात क्षमता वाढली. भात प्रजननावरील संशोधनासाठी त्यांना भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्लीकडून डॉक्टरेट मिळाली आहे. डॉ. सिंह यांचे तांदूळ अनुवंशशास्त्र, आण्विक प्रजनन आणि धान्य गुणवत्ता यावर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय जर्नलमध्ये १२० हून अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत.
भारतीय कृषी शास्त्रज्ञ, जनुकशास्त्रज्ञ आणि वनस्पती पैदासकार असा लौकिक असलेले डॉ. प्रेम लाल तथा डॉ. पी. एल. गौतम हे एक प्रख्यात शास्त्रज्ञ आहेत. भारतातील जैवविविधता संवर्धन आणि वनस्पती विविधता संरक्षण संस्थात्मक करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूरच्या कांडलाया येथील यू. एस. परमार विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या गौतम यांनी जेनेटिक्समध्ये एम. एस्सी. आणि पीएच. डी. प्राप्त केली आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (एनबीए) आणि वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेतकर्यांच्या बियाणे हक्कांचे रक्षण करण्यासाठी, पारंपरिक वाणांची नोंदणी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, जैविक संसाधनांचा शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी बहुमूल्य काम केले. गहू, बाजरीसह सुधारित पीक वाण विकसित करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकर्यांच्या हक्कांसाठी आणि जैवविविधतेसाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या संशोधन आणि नवोपक्रमांनी देशाच्या कृषी प्रगतीमध्ये खूप मदत झाली आहे.
या यादीतील आणखी एक कर्तृत्ववान नाव म्हणजे डॉ. के. रामास्वामी. त्यांनी तमिळनाडूमध्ये कृषी शिक्षणाच्या आधुनिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय कृषी संशोधन परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय स्तरावरील विविध समित्यांवर काम केले आहे. तमिळनाडू कृषी विद्यापीठामधील (टीएनएयू) त्यांच्या कार्यकाळात, हवामान-लवचीक शेती, माती आरोग्य व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर प्रमुख उपक्रम सुरू करण्यात आले. त्यांनी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांचा विस्तार केला. शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद मजबूत करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ३० हून अधिक संशोधन प्रकल्पांचे नेतृत्व करून आणि विज्ञानाला प्रयोगशाळेतून जमिनीवर, मातीत रुजवण्याचा त्यांच्या नवोपक्रमामुळे शेतकर्यांचे जीवन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कशी बदलू शकते, हे कृतिशीलपणे दाखवून दिले आहे.
माळेतील चौथे पुष्प असलेले डॉ. गोपाळ तथा जी. एल. त्रिवेदी यांनी पूर्व भारतातील कृषी संशोधन आणि उच्च शिक्षण मजबूत करण्यात अनन्यसाधारण योगदान दिले. डॉ. त्रिवेदी यांना बिहारमध्ये लिची लागवडीतील क्रांतिकारी शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. त्यांनी ‘रीजुव्हेनेशन कॅनोपी मॅनेजमेंट’ तंत्राचा वापर करून जुन्या, खराब झालेल्या लिची बागांचे पुनरुज्जीवन केले. या तंत्रामुळे हजारो शेतकर्यांचे उत्पन्न वाढले. मुझफ्फरपूरच्या लिचीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. त्यांनी राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करताना पीकविविधता, शाश्वत शेती प्रणाली आणि कृषी शिक्षणात ग्रामीण तरुणांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढवला. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक कृषी आव्हानांवर लक्ष केंद्रित केलेल्या संशोधनावर भर दिल्याने स्थानिक शेतकर्यांना थेट फायदा झाला.
पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. नटेसन तथा एन. पुन्नीमूर्ती यांचाही सन्मान झाला आहे. तमिळनाडू पशुवैद्यकीय आणि प्राणिविज्ञान विद्यापीठ (तनवासू) येथे त्यांनी पशुआरोग्य, दुग्ध उत्पादकता आणि आधुनिक पशुधन व्यवस्थापन पद्धतींना प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्याने पशुधनावर आधारित उपजीविकेसाठी आणि पशुपालकांमध्ये सुधारित उत्पादकतेसाठी वैज्ञानिक पाया रचला गेला. पशुवैद्यकीय पद्धतींचे दस्तऐवजीकरण आणि प्रमाणीकरण त्यांनी केले. चार दशकांहून अधिक काळ जडीबुटीच्या सिद्ध परंपरेच्या ज्ञानाची त्यांनी आधुनिक विज्ञानाशी सांगड घातली. याचा शेतकर्यांना खूप फायदा झाला. भारतातील पशुधनाचे आरोग्य सुधारले आहे. त्यांच्या योगदानामुळे दूध, मांस आणि अंड्यांमधील प्रतिजैविकांचे अवशेष कमी झाले आहेत. शेतकर्यांचा खर्च कमी झाला आहे. ग्रामीण उपजीविका सक्षम झाली आहे.
dayanandlipare@gmail. com
