तत्त्वचिंतक वैज्ञानिक

‘मानवजात देऊ शकेल त्या सर्व सन्मानांचे मानकरी असू शकतील असे प्रेषित!’ असा ‘द गार्डियन’ने ज्यांचा गौरव केला होता, त्या डॉ. जेम्स लव्हलॉक यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला.

तत्त्वचिंतक वैज्ञानिक
डॉ. जेम्स लव्हलॉक

अतुल देऊळगावकर 

‘मानवजात देऊ शकेल त्या सर्व सन्मानांचे मानकरी असू शकतील असे प्रेषित!’ असा ‘द गार्डियन’ने ज्यांचा गौरव केला होता, त्या डॉ. जेम्स लव्हलॉक यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. त्यांच्यासारखा माणूस शतकातून एखादाच जन्माला येतो..

‘‘तुम्हाला सत्य कधीही गवसत नाही. प्रत्येक वेळी तुम्ही सत्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकता. आपण प्रयत्नांची पुनरावृत्ती करत आहोत, हेही तुमच्या ध्यानात येत नाही.’’ असा आत्मसंवाद आणि लोकसंवाद करणाऱ्या, रसायनशास्त्र, आरोग्यविज्ञान व पर्यावरणशास्त्र क्षेत्रांत अनन्यसाधारण योगदान देत जगाची समज वाढवणाऱ्या डॉ. जेम्स इफ्रम लव्हलॉक यांनी २६ जुलैला त्यांच्या जन्मदिवशी, वयाची १०३ वर्षे पूर्ण करून जगाचा निरोप घेतला. ‘विज्ञान क्षेत्रातील तत्त्वज्ञ’ असे त्यांचे वर्णन करता येईल. 

ब्रिटनमधील सॅलसबिरीजवळ निसर्गसान्निध्यातील खेडय़ात, एकांतवासप्रिय लव्हलॉक शांत आयुष्य व्यतीत करीत होते. त्यांचे विचार ऐकण्यासाठी अनेक वैज्ञानिक व पत्रकार त्यांच्याकडे जात असत. ‘सध्याच्या विज्ञान जगताच्या उद्देश व पद्धती दोन्ही कालबाह्य आहेत.’ असंच त्यांचं मत होतं. ते म्हणत, ‘‘ विज्ञानाच्या शाखांना सीमा वा मर्यादा नाहीत. विज्ञान हे समग्ररीत्या समजून घेतलं व शिकवलं जाणं आवश्यक आहे. स्वत:चं नियंत्रण टिकविण्यासाठी प्राध्यापकांनी व संस्थांनी विज्ञानाला कप्पेबंद केलं आहे. विज्ञानाला तज्ज्ञांचे गट आणि कोंडाळय़ांमध्ये नेऊन ठेवलं आहे. परंतु ते कधीही ठाम का नसतात? त्यांना जगाचं समग्र भान कधीही का येत नाही?’’ असे सहसा कोणालाही न पडणारे प्रश्न विचारणं व त्यांच्या उत्तरांच्या शोधाची प्रक्रिया चालू ठेवणं ही त्यांची खासीयत होती.

खुलेपणा व समग्रता हा मागील ७४ वर्षे जगाच्या विज्ञान जगतावर स्वत:ची मोहोर उमटविणाऱ्या लव्हलॉक यांच्या जीवनाचा गाभा होता. ते, अठराव्या शतकात स्थापन झालेल्या ‘क्वेकर’ पंथाचे पाईक होते. ख्रिश्चन धर्मातील ढोंगीपणावर कडाडून हल्ले चढवून जगाला प्रेम अर्पिणाऱ्या क्वेकरांनी गुलामगिरीसह अनेक जुनाट प्रथा मोडण्यात पुढाकार घेतला.  अपंग, जखमींची सेवा करण्यात कित्येक क्वेकरांनी आयुष्य वेचलं. त्यामुळे त्यांना आदरानं ‘समाजमित्र’ हे संबोधन प्राप्त झालं होतं. १९४७ साली ‘ब्रिटिश फ्रेंड्स सव्‍‌र्हिस’ आणि ‘अमेरिकन फ्रेंड्स सव्‍‌र्हिस’ या क्वेकरांच्या प्रातिनिधिक संस्थांना शांततेचा नोबेल बहाल करून त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला होता. प्रतिभावंत वास्तुशिल्पी लॉरी बेकर, अभिनेते बेन किंग्जले, दिग्दर्शक डेव्हिड लीन आणि कॅडबरी उद्योगाचे अध्वर्यू जॉर्ज कॅडबरी हे क्वेकर विचारसरणीचे होते. संपूर्ण हयातभर ‘एकला चलो रे’ या त्यांच्या भूमिकेमधून त्यांच्यावरील या क्वेकर विचारांचा प्रभाव जाणवतो.

१९४८ साली त्यांनी प्रयोगात वापरल्या जाणाऱ्या उंदरांना शून्यापेक्षा खालील तापमानात जतन केलं. यातून कोणत्या अवयांवर कसा परिणाम होतो, हे सांगितलं. या प्रयोगातील निष्कर्षांचा निम्नतापी विज्ञानाला (क्रायोजेनिक) तसेच कृत्रिम गर्भधारणेसाठी खूप उपयोग झाला. १९५८ साली ‘नासा’(नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन)ने  त्यांच्यावर ‘मंगळावर सजीवसृष्टी आहे काय?’ या शोधमोहिमेचीही जबाबदारी सोपवली तेव्हा, कोणत्याही बाबीकडे पाहताना पठडीतील विचार बाजूला सारणारे लव्हलॉक म्हणाले, ‘‘कोणत्याही ग्रहावरील वातावरणाची पाहणी करण्यासाठी मानवाला तिथे धाडण्याची काहीही गरज नाही. तसेच तिथली माती तपासण्याचीही आवश्यकता नाही. समजा पृथ्वीची पाहणी करण्यासाठी कोणी आलं आणि ते अंटाक्र्टिकावर अथवा सहारच्या वाळवंटात उतरले तर सभोवतालचा परिसर पाहून त्यांचं पृथ्वीविषयी होणारं आकलन हे समग्र असेल काय? ग्रहाच्या समग्र आकलनाकरिता तेथील वातावरण समजून घेतलं पाहिजे.’’ ग्रह मृत आहे की सजीव हे समजून घेण्यासाठी त्यांनी काही भौतिक व रासायनिक तपासण्या घेण्याचं ठरवलं.  मंगळ ग्रहाचा अवरक्त दूरदर्शक दुर्बिणीच्या (इन्फ्रा रेड टेलेस्कोप) साहाय्याने अभ्यास केला. त्यांना मंगळ व शुक्र या ग्रहावर वायूंचा रासायनिक समतोल (इक्विलिब्रियम) आढळला. याचा अर्थ तिथे कुठलाही सजीव नव्हता. ग्रहावर सजीव सृष्टी असेल तर वातावरणातील वायूंचा तोल व रासायनिक रचना (काम्पोझिशन ) बदलून जाईल. पृथ्वी, मंगळ व शुक्र यावरील वातावरणाच्या अभ्यासाचं श्रेय लव्हलॉक यांनाच जातं. मंगळ व शुक्र यांवरील वातावरण हे समतोलाच्या जवळपास आहे. परंतु पृथ्वीवर वायूंचा असमतोल असून कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण अधिक आहे. मुबलक नायट्रोजन व ऑक्सिजन व मिथेन हे मृत ग्रहावर आढळणं शक्य नाही. त्यामुळे एकेकाळी मंगळ व शुक्र हे सजीव असतीलही. मात्र मंगळावर सध्या जीव नाही आणि तो ग्रह मृतवत आहे, असा निष्कर्ष त्यांनी तेव्हा काढला होता.

१९६० च्या सुमारास रॅचेल कार्सन यांना डी.डी.टी.मुळे पक्ष्यांचे बळी जात आहेत, हे दिसून आलं. परंतु ते सिद्ध करायचं कसं, ही गंभीर समस्या त्यांच्यापुढे होती. त्या वेळी लव्हलॉक यांनी शोध लावलेल्या इलेक्ट्रॉन हस्तगत व शोधक यंत्रामुळे (इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टर) कार्सन यांचा मार्ग सुकर झाला. वनस्पतीवर फवारलेलं रसायन हे डी.डी.टी. हेच आहे, हे सिद्ध करता आलं. मातेच्या दुधात व पेंग्विनच्या मांसामध्ये डी.डी.टी.चे अंश आहेत, हा निष्कर्ष ‘सायलेंट प्रिंग’मध्ये मांडला गेला आणि त्याला विज्ञानाचा भक्कम आधार असल्यामुळे हे दावे कोणत्याही वैज्ञानिक संस्थेलासुद्धा नाकारता आले नाहीत. लव्हलॉक यांच्याशी झालेल्या विचारविनिमयातून कार्सन यांची ‘पर्यावरण’विषयक मांडणीस घनता प्राप्त झाली. लव्हलॉक यांनी पृथ्वीवरील सजीव यंत्रणांमधील परस्परावलंबनाची जाणीव करून दिली. याच काळात लव्हलॉक यांच्या वायूविषयक संशोधनामुळे रक्त गोठणं, हवेचं र्निजतुकीकरण, श्वसनाचे विकार यांवरील संशोधन व उपचार यांना चालना मिळाली.

‘२००० साली जगासमोरील महत्त्वाच्या समस्या कोणत्या असतील?’ याचा भविष्यवेध करण्याची योजना ‘नासा’ने आखली होती ते साल होतं, १९६५!  त्या वेळी जगाला अण्वस्त्रं हाच सर्वाधिक धोका वाटत होता. मात्र लव्हलॉक यांना वातावरणातील कर्ब वायूंचं वाढतं प्रमाण आणि त्याचे दुष्परिणाम याचा अंदाज तेव्हाच आला होता. ‘‘संपूर्ण जग हे पर्यावरणीय संकटांच्या खाईत असेल व त्यामुळे मानवजातीचे सर्व आडाखे व गणिते चुकतील,’’ असं त्यांनी सांगून टाकलं होतं. तेव्हापासूनच त्यांना ‘विलक्षण द्रष्टा वैज्ञानिक’ आणि ‘पर्यावरणीय विचारवंत’ अशी ख्याती लाभली. पर्यावरण पत्रकार व लेखक जॉर्ज मॉनिबॉट म्हणतात, ‘‘जगाला तापमानवाढ ही संकल्पना लव्हलॉक यांच्यामुळेच समजली. त्यांच्यामुळे पृथ्वी आणि पर्यावरण यांचे व्यापक आकलन होऊ शकलं.’’ या प्रतिपादनाची प्रचीती जगाला वारंवार आली. लव्हलॉक त्यांनी १९७१ सालीच क्लोरोफ्लुरोकार्बन (उाउ)चं प्रमाण वाढत असल्याचा इशारा दिला होता. १९७४ साली मारिओ मोलिना व फ्रँक रोलँड या वैज्ञानिकांना, अंटाक्र्टिकावरील वातावरणात ओझोनच्या थराला भगदाड पडत असल्याचं जाणवलं होतं. त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी लव्हलॉक यांचा ‘इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टर’ उपयोगी आला. २६ ऑगस्ट १९८७ रोजी, माँट्रियल येथे जगातील १९७ देशांनी ओझोन थराचा विध्वंस करणाऱ्या क्लोरोफ्लुरोकार्बन रसायनांना हद्दपार करण्याचा निर्धार केला. क्लोरीन, फ्लोरीन व कार्बन ( उाउ) यांच्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय संयुगास ‘फ्रीऑन’ असंही म्हणतात. अमेरिकेतील ‘डय़ु पाँट’ या बलाढय़ कंपनीकडे ‘फ्रीऑन’चे स्वामित्व हक्क होते. १९३० पासून जगभरातील शीतकपाट व वातानुकूल यंत्रणेत या संयुगाचा वापर केला जात होता. जागतिक मक्तेदारीला हादरा बसणार असल्यामुळे ‘डय़ु पाँट’ने माँट्रियल करारात अडथळे आणण्याचे अनेक खटाटोप केले. त्यांनी ‘जबाबदार क्लोरोफ्लुरोकार्बन उद्योगांची आघाडी’ उघडली. अमेरिकेतील सिनेटसमोर, ‘‘क्लोरोफ्लुरोकार्बन आणि ओझोन थर यांचा कार्यकारणभाव अजूनही सिद्ध झालेला नाही. हे भ्रामक विज्ञान आहे,’’ असा हल्ला चढवला. परंतु त्याच वेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण प्रकल्प संस्थेने (वठएढ) ओझोन थर कमी होण्याविषयीचे पुरावे सादर केले. ‘ओझोन कमी होण्यामुळे अमेरिकेतील २८ कोटी लोकांना त्वचेचे कर्करोग व ४.५ कोटींना मोतीबिंदू होऊ शकतील’ असा अहवाल सादर केला. यामुळे ‘डय़ु पाँट’ला पाय मागे खेचावे लागले आणि क्लोरोफ्लुरोकार्बनच्या अंताचा आरंभ झाला.  ओझोनच्या थराला पडलेलं भगदाड हळूहळू बुजू लागलं आहे, हे अनेक निरीक्षणांतून सिद्ध होत गेलं. तेव्हा जगद्विख्यात दैनिक ‘द गार्डियन’ने लव्हलॉक यांचा, ‘मानवजात देऊ शकेल त्या सर्व सन्मानांचे मानकरी असू शकतील असे प्रेषित!’ असा गौरव केला होता.

 पृथ्वीवरील जीवोत्पत्तीपासून आजवर सूर्याकडून येणाऱ्या ऊर्जेत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली तरीही पृथ्वीचे तापमान त्या प्रमाणात न वाढता ते बऱ्यापैकी स्थिर राहिलं. पृथ्वीवरील वातावरणात ७९ टक्के नायट्रोजन, २०.७ टक्के ऑक्सिजन व ०.३ टक्के कार्बनडाय ऑक्साइड आहे. ऑक्सिजन हा अतिशय क्रियाशील आहे. वातावरण व पृथ्वीच्या कवचातील इतर वायू व खनिज यांच्याशी ऑक्सिजनचा संयोग घडून येत नाही. मिथेनचे स्वतंत्र अंश का दिसावेत? ऑक्सिजन जवळ येताच मिथेनचे ज्वलन होणे साहजिक आहे. परंतु ते होत नाही. थोडक्यात वायूंचं असंतुलन न होता संतुलन कसं साधलं जात असेल? पृथ्वीवरील सागरांची क्षारयुक्तता (सॅलिनिटी) ही दीर्घकाळापासून ३.४ टक्क्यांवर स्थिर असणं हेही गूढच आहे. या वास्तवाचा विचार करून जेम्स लव्हलॉक यांनी १९७२ साली ‘गाया’ सिद्धांत मांडला. ग्रीक संकल्पनेत पृथ्वीदेवता ‘गाया’ ही स्वयंपूर्ण व स्वयंशासित मानली जाते. त्यांनी ‘‘संपूर्ण पृथ्वी हीच एक स्वयं नियंत्रण (सेल्फ रेग्युलेशन) करू शकणारी सजीव संस्था (लिव्हिंग ऑर्गेनिझम) आहे. त्यामध्ये भौतिक, रासायनिक, जैविक आणि मानव हे घटक आहेत. या सर्वामधील जटिल आंतरक्रिया व त्यांना मिळणारा प्रतिसाद यातून पृथ्वीवरील समतोल साधला जातो.’’ अशी मांडणी केली. ते गाया ही संज्ञा  भावनिक वा धार्मिक अर्थाने वापरत नाहीत. हा जिवंत प्राणी नाही हे वारंवार स्पष्ट करतात. पृथ्वीकडे समग्र दृष्टीने पाहावे. ती एक एकसंध सजीव संघटन आहे, असा आपला समज व्यापक व स्पष्ट व्हावा आणि पृथ्वीवर होणारे बदल लक्षात यावेत, यासाठी ते गाया हे रूपक वापरतात. यावर जगातील अनेक जीवशास्त्रज्ञांनी कडाडून टीका केली. परंतु काळाच्या ओघात त्यांच्या गाया सिद्धांताला मानणारेही वाढत गेले. २००१ साली एक हजार वैज्ञानिकांनी तसेच अनेक पर्यावरणशास्त्रज्ञांनी गाया ही संकल्पना स्वीकारून मांडणी चालू केली.

काळाचं व समाजाचं अचूक मर्म सांगणाऱ्या मोजक्या प्रज्ञावंतांमध्ये लव्हलॉक यांचा समावेश होतो. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीविषयी ते म्हणत, ‘‘विचार करताना तार्किकता व रेषीयता (लिनियारिटी) यांच्या पलीकडे जाऊन अंत:प्रेरणा व अंतज्र्ञान यातूनही आकलन होऊ शकतं.’’ वैज्ञानिक संशोधन हे एकटय़ाने करण्यासारखं आहे काय, असं विचारलं गेल्यावर ते मिश्कीलपणे हसून म्हणाले होते, ‘‘कलावंत, कवी वा साहित्यिक यांनी त्यांच्या घरातूनच काम केल्यास कोणालाही वावगं वाटत नाही. परंतु वैज्ञानिकाला मात्र मोठमोठय़ा प्रयोगशाळांतूनच काम करावं लागतं असा समज दृढ आहे. घरी राहून २५ वर्षे स्वतंत्रपणे संशोधन करणारा मी एकमेव असू शकेन.’’ ते वेळोवेळी पुस्तकांतून जगाला इशारे देत राहिले. ‘‘थोडय़ा अंतरावरील धोका ओळखून वागण्याचं शहाणपण जगानं कधी दाखवलं आहे? हवामान बदलाच्या महासंकटाच्या तावडीत असूनही आपलं वर्तन बदलत नाही. वाळवंटीकरण सोपे व वननिर्माण महाकठीण आहे. महामूर्ख मानवजातीला हवामान बदल रोखणं शक्य नाही. त्यांनी पर्यावरणीय संकटाचं स्वरूप अतिशय नेमकेपणाने सांगून ठेवलं आहे’’, ‘‘पर्यावरणाचं स्वरूप जागतिक असून त्याचं आव्हान मात्र सामाजिक व राजकीय आहे. आपला समाज काळानुरूप सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळे संपूर्ण पृथ्वी धोक्यात आली आहे.’’  धर्म आणि विज्ञान दोन्हींची परखड चिकित्सा करणाऱ्या लव्हलॉक यांनी, ‘‘पर्यावरण जपण्यासाठी अणुऊर्जा व जनुकीय स्थानांतर तंत्रज्ञान यांची गरज आहे. हे झापडबंद व सोवळय़ातील पर्यावरणवाद्यांच्या लक्षात येत नाही. पर्यावरणीय विचारांचा पंथ वा धर्म होत आहे.’’ असं बजावून ठेवलं होतं. टीका सहन करूनही त्यांनी स्पष्टवक्तेपणा सोडला नाही. जगाला विज्ञान समजावून सांगण्यासाठी लव्हलॉक सातत्यानं लिहीत गेले. त्यांच्या १५ पुस्तकांपैकी ‘नोव्हिसन- द किमग एज ऑफ हायपरइंटेलिजन्स’ हे पुस्तक त्यांनी वयाची शताब्दी साजरी करताना लिहिलं आहे. लव्हलॉक यांच्या विचारांचा प्रभाव, जगातील अनेक पत्रकार, लेखक व शास्त्रज्ञांवर आहे. त्यांची तल्लख बुद्धी अखेपर्यंत शाबूत होती. २०१० साली एका मुलाखतीत त्यांनी, ‘‘हवामान बदलासारखी युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी लोकशाहीची प्रक्रिया ही काही काळ स्थगित ठेवावी लागेल.’’ असं सांगितलं होतं. मागील वर्षी ग्लासगोमध्ये भरलेल्या जागतिक हवामान परिषदेकडे लव्हलॉक फिरकलेसुद्धा नाहीत. त्या वेळी सद्य परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, ‘‘आपण पृथ्वीला संपवण्याआधी ती आपल्याला संपवेल. हवामान बदल आणि निसर्ग विनाश या दोन भिन्न समस्या आहेत, असाच विचार पुढे करत राहिलो तर आपलं जगणं अशक्य आहे.’’  

सातत्यानं नवनवीन व अधिक जटिल समस्यांना सामोरं जाताना संपूर्ण जग चक्रावून जात असतं. त्या वेळी बाजारपेठेपासून कटाक्षानं दूर राहणारे शास्त्रज्ञ व कलावंत हाच ठेवा जगाच्या कामाला येत असतो. कठीण प्रसंगांत निरपेक्ष मत मांडून दाट धुकं दूर करणाऱ्या दुर्लभ महानुभावांना मुकल्यावर वर्तमान अधिक अस्वस्थ करू लागतो.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
रम्य ही स्वर्गाहुनी लंका?
फोटो गॅलरी