..तर माणूस कधीही बेकार राहणार नाही

समाजसुधारक, प्रभावी लेखक, पत्रकार, नेता, विचारवंत असलेल्या केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांची प्रभावी वक्ता म्हणूनही ओळख होती.

समाजसुधारक, प्रभावी लेखक, पत्रकार, नेता, विचारवंत असलेल्या केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांची प्रभावी वक्ता म्हणूनही ओळख होती. ‘माझी जीवनगाथा’ आणि ‘ऊठ मराठय़ा ऊठ’ या पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या मृत्यूच्या दोन महिने अगोदर झाले. त्या वेळी केलेल्या भाषणात प्रबोधनकारांनी आपल्या जीवनाचे सार मांडले. त्या प्रसिद्ध भाषणाचा संपादित भाग.
vv13सज्जन हो! भाषणाच्या बाबतीत मैदान मारणारा तो ठाकरे आज नाही. प्रकृती क्षीण झालेली आहे. चार पिढय़ांचा काळ मी पाहिला. अनुभवला. पूर्वीचा काळ आणि आजचा काळ यात फार बदल झालेला आहे. विशेषत: महिलावर्गाच्या बाबतीत! महिलांनी फारच सुधारणा केलेली आहे. मला वाटतं, त्या काळी रूढी, धर्म परंपरेच्या नावाखाली जे अनंत अत्याचार झाले, त्याचा सध्याच्या महिलांनी चांगला सूड उगवला आहे. सध्याच्या महिलांना पुष्कळ लोक नावं ठेवतात. मी म्हणतो, तुम्ही आणखी सुधारणा करा. खूप सुधारणा करा.
आयुष्यात येणाऱ्या अनेक गोष्टींतून आपण घडत असतो. आमच्या घराण्यात व्रत घेणारे लोक फार. माझी आजी, म्हणजे वडिलांची आई. तिने वयाच्या विसाव्या वर्षी सुरू केलेलं मोफत प्रसूतिकार्य तब्बल साठ वर्षे अखंड चालवलं. तिचे नाव सीता असले तरी घरादारात ती ‘बाय’ म्हणून ओळखली जात असे. बाय अडली आहे, चला म्हणताच जेवणाचे ताट सारून ती चटकन जायची. पनवेलच्या क्षेत्रामध्ये हजारो बालकांची तिने सुटका केली. मुलगा झाला तर नारळ नि साखरेची पुडी आणि मुलगी झाली तर, नुसती साखरेची पुडी. यापेक्षा चुकून कधी कुणाकडून तिने तांब्याचा छदामही घेतला नाही. हे काम ती धर्म मानून करायची आणि ते करीत असताना जातपात, धर्मगोत, स्पृश्य-अस्पृश्य, हिंदू-मुसलमान असले भेद कधी मनात आणले नाहीत.
आमच्या मातोश्रींचं व्रत वेगळं. मुलांना शिस्त लावण्याच्या कामात ताईसारखी आई कुणाला मिळायची नाही. अभ्यास झालाच पाहिजे. इतके मार्क्स मिळालेच पाहिजेत.
अहो चौथी इयत्तेत इंग्रजी विषयात मला शंभरापैकी नव्वद मार्क्स मिळाले. आता आनंद व्हावा ना! पण ताईने फाडकन दिली माझ्या मुस्कटात, म्हणाली, शंभर का नाहीत सांग? म्हणायची, मुलांचे खाण्यापिण्याचे लाड करावेत. पण त्यांनी इकडची गोष्ट तिकडे ठेवली की मला खपत नाही. सवय वाईट असते. तिथली वस्तू तिथेच ठेवली पाहिजे. अशी तिची शिस्त.
आमचाही एक संप्रदाय आहे. सत्यशोधनाचा, सामाजिक बदल घडवून आणणाऱ्या प्रबोधनाचा. बाळनीही आपला एक संप्रदाय काढलाय. तो शिवसेना घेऊन हिंदुत्वासाठी झगडतोय. मागच्या चार पिढय़ांचं आणि तुमचं माझ्यावर उपकारांचं ओझं आहे, तेवढेच ज्यांनी मला विरोध केला, प्रतिकार केला त्यांचेही माझ्यावर उपकार आहेत. कारण त्यांनी जर प्रतिकार केला नसता तर माझ्या वाणी लेखणीला धार कशी चढली असती! (हशा) दांभिकता, अस्पृश्यता आणि खोटं बोलणं याची मला भयंकर चीड आहे. ती आली आणि लेखणी हातात असली, मग समोर कुणीही असो, त्याला मी उभा चिरलेला आहे. (टाळ्या) काय होणार काय? तुझा-माझा संबंध तुटेल! जातो कोण तुझ्याशी संबंध जोडायला! (हशा) मला एवढंच सांगायचंय, तुझं चुकतंय.
कोल्हापूरच्या शाहू महाराजांचा आणि माझा मोठा स्नेह. पण त्यांनी एकदा चूक केली. अंबाबाईच्या देवळामध्ये मराठय़ांची मुलं गेली आणि त्यांनी देवीची पूजा केली. महाराजांनी ताबडतोब तेथील एका हायस्कुलातील काही मराठा विद्यार्थ्यांना पकडून लॉकअपमध्ये डांबल्याची बातमी आली. इतका कडक लेख लिहिला की, लोक म्हणायला लागले, ठाकरे तुमचा आणि कोल्हापूरचा आता संबंध तुटला. मी म्हटलं, बरं झालं. बला गेली! कोण संबंध जोडायला जातोय. पुढे मुंबईला मला महाराज भेटले. म्हणाले, काय रे वांड! एकदम आमच्यावर कोसळून पडलास. म्हटलं, हो पडलो कोसळून! अरे हो, त्याची मी सुधारणा करणार आहे.  सुधारणा करायची तेव्हा करा. पण हा मार्ग चुकीचा आहे. हे तुम्हाला कुणी तरी सांगायला पाहिजे. उगाचंच आपलं म्हणायचं नाही. मी मराठय़ांसाठी असं करतो नि अस्पृश्यांसाठी तसं करतो. सुधारणेसाठी सहा पोरं काय लॉकअपमध्ये टाकायची? त्या पोरांनी काय समजायचं? तुम्ही सुधारणा पुष्कळ कराल हो! पण आजची परिस्थिती काय? सत्य सांगताना स्नेहही आडवा आणला नाही तो असा. कोल्हापूरच्याच नाही तर अनेक राजे-महाराजांशी माझा कामानिमित्ताने स्नेह जमला. मी नेहमी बोलत असे, राजे महाराजांच्या ताटाला ताट आणि पाटाला पाट भिडून जेवलेला हा ठाकरे, आज भाडय़ाच्या खोलीत राहतो. कारण मी सगळ्यांचा अनुभव घेतलाय. जो तो आपल्याला कामापुरता असतो. सत्य, स्पष्ट बोललं की संबंध सुटला.
आजकाल काय, एकदा एसएससी झाले की नोकरी पाहिजे. अरे, इतर काय गुण आहे का तुझ्यात? काही नाही. केवळ सुरक्षित पगाराची नोकरी पाहिजे, हे अलीकडच्या तरुणांनी सोडलं पाहिजे, मला काय करता येईल, ते मी स्वतंत्र करीन! आपल्याला काय पाहिजे आणि त्यासाठी आपण काय करावं, याचाच ध्यास असावा.
अशा हुन्नरामुळे मी काही करू शकलो. ज्याच्या अंगात हुन्नर आहे, हिंमत आहे, जिद्द आणि स्वाभिमान आहे, असा माणूस कधीही बेकार आढळायचा नाही, हा माझ्या जीवनाचा साक्षात्कार आहे, सिद्धांत आहे.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
(‘प्रबोधनकार डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळावरील ‘समग्र साहित्य’ या विभागातील ‘अखेरचं भाषण’ यावरून साभार)
(संकलन- शेखर जोशी)    

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prabodhankar thackerays speech on unemployment