|| संदीप नलावडे

पंजाब राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एके काळी एकत्र संसार करणाऱ्या अकाली दल आणि भाजपचा आता काडीमोड झाला असला, तरी या पक्षांनी या राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला सुरुवात केल्याचे दिसते. विशेष म्हणजे, या राज्यात सत्तारूढ असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र उघडपणे वादनाटय़ रंगले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिरदर सिंग आणि निवडणुकीतील ‘स्टार प्रचारक’ म्हणून ओळख असलेले माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून बेबनाव आहे. काँग्रेसमधील हे दोन्ही बडे नेते एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करत असून विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्याचे मोठे आव्हान काँग्रेस नेतृत्वापुढे आहे.

jaiswal
जैस्वालला सूर गवसणार? राजस्थान रॉयल्ससमोर आज गुजरात टायटन्सचे आव्हान
Nirmala Sitharaman
कर्नाटकात घराणेशाही काँग्रेससाठी अडचणीची? आठ मंत्र्यांची मुले रिंगणात
Katchatheevu Island
पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे, ब्रिटिशांकडून भारताकडे, भारताकडून श्रीलंकेकडे… कचाथीवू बेटाचा वादग्रस्त प्रवास!
Sangli Friendly fight will be decided by congress in Delhi tomorrow
सांगलीतील मैत्रीपूर्ण लढतीचा उद्या दिल्लीत निर्णय

भारतीय क्रिकेटमधील तडाखेबाज फलंदाज ही नवज्योतसिंग सिद्धू यांची पूर्वीची ओळख. भाषिक प्रभुत्व आणि खिळवून ठेवणारी वक्तृत्वशैली असणाऱ्या सिद्धू यांची पावले क्रिकेटमधील निवृत्तीनंतर राजकारणाकडे वळली नसती तरच नवल ठरले असते. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांत अमृतसरमधून भाजपच्या तिकिटावर ते निवडूनही आले. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्याने नाराज सिद्धू आधी आम आदमी पक्षाकडे आणि नंतर काँग्रेसकडे वळले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमिरदर सिंग आणि सिद्धू यांच्यात वेळोवेळी खटके उडू लागले होतेच; आता या दोहोंतील वाद विकोपाला गेला आहे.

त्याचे कारण पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका. पण मुख्यमंत्री अमिरदर सिंग यांच्या कार्यपद्धतीविषयी सिद्धू यांच्यासह काही आमदारांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. कोणताही निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप अमिरदर सिंग यांच्यावर करण्यात आला आहे. गुरू ग्रंथसाहब अवमानप्रकरणी आलेले अपयश, बादल कुटुंबाशी असलेले सौहार्दाचे संबंध यांवर बोट ठेवत सिद्धू आणि इतर टीकाकार मंडळींनी- अमिरदर सिंग २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यातही अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याच्या खांद्यावरून गोळीबार करणे सोडून द्यावे,’ अशी टिप्पणी सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. सिद्धू यांना पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी पंजाब सरकारमधील सात मंत्र्यांनी केल्यानंतर सिद्धू यांनी ही टिप्पणी केली होती. खरे म्हणजे, सिद्धू यांना पक्षात मोठय़ा पदाची अपेक्षा होती. ते न मिळाल्याने सरकारमध्ये मोठी जबाबदारी, म्हणजेच उपमुख्यमंत्रिपद तरी मिळावे ही सिद्धू यांची मनीषा लपून राहिलेली नाही. सिद्धू यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यास मुख्यमंत्री अमिरदर सिंग तयार असले, तरी उपमुख्यमंत्रिपद देण्यास मात्र त्यांचा विरोध आहे. आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यासाठी सिद्धू प्रयत्नरत आहेत. आताच प्रयत्न केले तर प्रदेशाध्यक्ष हाती लागेल हे जाणून सिद्धू यांनी उभी-आडवी फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. ‘गेल्या विधानसभा निवडणुकीत कॅ. अमिरदर सिंग यांनी माझा वापर करून घेतला. निवडणुका आल्या की त्यांना माझी आठवण येते. ते दररोज असत्य बोलत आहेत. पंजाबमध्ये दोन शक्तिशाली कुटुंबांची सत्ता असून स्वहितासाठी त्यांनी राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी राज्याला लुटले असून माझी लढाई या दोन्ही कुटुंबांशी आहे,’ अशा शब्दांत सिद्धू यांनी अमिरदर सिंग आणि बादल कुटुंबावर टीकास्त्र सोडले होते, हा त्याचाच एक भाग.

मुख्यमंत्री अमिरदर सिंग यांच्या काही जमेच्या बाजू असल्याने त्यांना दूर करण्याचा प्रयत्न सध्या तरी काँग्रेस नेतृत्वाकडून होण्याची शक्यता नाही. ते काँग्रेसमधील जुनेजाणते नेते आहेत. स्वत:च्या क्षमतेवर निवडून येण्याची ताकद त्यांच्यात आहे. ‘मोदी लाट’ असतानाही आणि अनेक राज्यांत ‘भगवे’ झेंडे फडकले असतानाही २०१७ मध्ये अमिरदर सिंग यांनी स्वबळावर अकाली दल आणि भाजपला नमवून पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन केले. काँग्रेस नेतृत्वाला अमिरदर सिंग यांच्या क्षमतेची जाणीव असल्याने त्यांची नाराजी ओढवून घेतली जाईल ही शक्यता धूसर आहे. मात्र, वाढते वय आणि नव्या नेतृत्वाची गरज यांमुळे त्यांना पक्षांतर्गत विरोध होत आहे. सहकारी मंत्री, नेते यांच्यापेक्षा नोकरशहांवर अमिरदर सिंग यांचा अधिक विश्वास आहे, असा आरोप त्यांच्यावर होतो. हा पक्षांतर्गत विरोध शमवण्याऐवजी तो अधिक बळकट करण्याकडेच जणू त्यांचा कल दिसतो.

पंजाब काँग्रेसमधील वादाचे गुऱ्हाळ मिटता मिटत नसून गेल्या महिनाभरापासून अनेकांच्या दिल्लीवाऱ्या सुरू आहेत. कधी आमदार, कधी सिद्धू, तर कधी मुख्यमंत्री अमिरदर सिंग दिल्लीत जाऊन काँग्रेस नेतृत्वाची भेट घेत आहेत. गेल्याच आठवडय़ात सिद्धू यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस नेतृत्वाची भेट घेतली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्याचे सिद्धू यांच्याकडून सांगण्यात आले. सिद्धू यांना महत्त्वाचे पद दिले जाईल असे संकेत देण्यात आले आहेत. दोन्ही नेत्यांमधील वाद कमी करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडून करण्यात येत आहे. तत्पूर्वी अमिरदर सिंग यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पंजाबमधील बंडखोरी रोखण्यासाठी त्रिसूत्री फॉम्र्युला तयार करण्यात येत आहे. त्यानुसार नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार असून दोन कार्याध्यक्ष निवडण्यात येण्याची शक्यता आहे. उत्तम वक्तृत्व आणि जनतेला भावनिक साद घालण्याची कला अवगत असल्याने सिद्धू यांच्याकडे प्रचारप्रमुखपद येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

२०१४ पासून देशात नरेंद्र मोदी लाट अवतरल्यानंतर अनेक राज्यांत भाजपची सत्ता आली. देशात प्रदीर्घ काळ सत्ता भोगलेल्या काँग्रेसकडे सध्या केवळ साडेतीन राज्यांचा कारभार आहे. पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांत आणि महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने काँग्रेसने सत्ता मिळवली असली, तरी पक्षांतर्गत धुसफुस आणि बडय़ा नेत्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान काँग्रेस नेतृत्वापुढे आहे. भाजपकडे सध्या पंजाबमध्ये नेतृत्व नाही. त्यामुळे इतर पक्षांतील नेते गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न असणार. सिद्धू यांच्यासारखा हुन्नरी नेता आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. आम आदमी पक्षासही सिद्धू यांचे वावडे नाहीच. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील वादाकडे काँग्रेसजनांपेक्षा अन्य पक्षांचेच जास्त लक्ष असेल, हे निश्चित!

sandeep.nalawade@expressindia.com