scorecardresearch

‘पुरुषोत्तम करंडका’ची पन्नाशी!

पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पध्रेशी या ना त्या नात्याने संबंध आलेल्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात व्यक्तीला आनंदाचे आणि अभिमानाचे भरते यावे अशी घटना घडते आहे.

‘पुरुषोत्तम करंडका’ची पन्नाशी!

पुण्यात ‘पुरुषोत्तम’ करंडक ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सुरू झाली १९६३ मध्ये. अनंत काणेकर, विजय तेंडुलकर,  रत्नाकर मतकरी यांसारख्या मातब्बर लेखकांच्या एकांकिका सुरुवातीच्या काळात येथे सादर झाल्या.  पुण्यामध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळ यशस्वी होण्यात या स्पर्धेचे योगदान महत्त्वाचे आहे.  विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या या स्पर्धेने पन्नाशीची उमर गाठली. त्या निमित्ताने..

पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पध्रेशी या ना त्या नात्याने संबंध आलेल्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात व्यक्तीला आनंदाचे आणि अभिमानाचे भरते यावे अशी घटना घडते आहे. पुरुषोत्तम करंडक या फक्त दोन शब्दांनी अवघ्या मराठी रंगभूमीच्या कौतुकाचा विषय ठरलेली ही स्पर्धा अनेक अडीअडचणी पार करून सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.
आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धा महाराष्ट्राला काही नवीन नाहीत. पन्नासच्या दशकात मुंबईच्या  भारतीय विद्या भवनने आयोजित केलेल्या स्पर्धामुळे तर आधुनिक प्रायोगिक मराठी रंगभूमीचा पाया घातला हे आज कित्येकांना माहीत नसेल. आण्णासाहेब किर्लोस्करांचे शब्द घेऊन म्हणायचे तर ‘रचिला ज्याचा पाया त्याची उभारणी बरी झाली,’ अशी कृतकृत्यतेची भावना पुरुषोत्तम करंडक स्पध्रेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त नाटय़प्रेमी महाराष्ट्राची असणार आहे.
पण भारतीय विद्याभवनच्या स्पर्धा मुख्यत:  विद्यार्थी प्रेक्षकांच्या अतिउत्साहामुळे बंद पडल्या. इंडियन नॅशनल थिएटर या मुंबईच्या प्रसिद्ध  संस्थेच्या नाटय़स्पस्पर्धा आजही सुरू आहेत.
मुंबईमध्ये शैक्षणिक-सांस्कृतिक वर्तुळात त्यांचे विशेष महत्त्व आहे. पण पुरुषोत्तम करंडकसारखी विद्यार्थीप्रियता आणि प्रतिष्ठा नि प्रदीर्घ परंपरा त्या दोन्ही स्पर्धाना लाभली नाही हे खरेच आहे.
पुण्यातल्या विद्यार्थी-विद्याíथनी ‘पुरुषोत्तम’बद्दल जे काही बोलतात, ते वर्षांनुवष्रे एकच आहे. अगदी काडीमात्र फरक त्यात पडलेला नाही. म्हणजे असे की ‘पुरुषोत्तम’ची  विश्वासार्हता अगदी पहिल्या वर्षांपासून ते आजपर्यंत टिकून आहे. सत्तर, ऐंशी व  नव्वदच्या दशकात आणि त्यानंतरही याबद्दल कधीच कोणाचे दुमत नव्हते. या स्पध्रेची विश्वासार्हता  संयोजनातल्या पारदर्शकतेत आहे. म्हणजे, स्पध्रेचे लॉट्स पाडले जातात ते स्पर्धक संघांच्या प्रतिनिधींच्या समोर. स्पध्रेच्या दिवशी प्रत्यक्ष प्रयोगापूर्वी तयारीला जो वेळ दिला जातो तो अगदी काटेकोरपणे मोजला जातो आणि प्रत्येक संघाला नेमका तेवढाच वेळ मिळतो. तिथे संशयाला जगच नसते. स्पध्रेचा निर्णय ठरविण्यासाठी सगळे परीक्षक चर्चा करतात, त्या वेळी कलोपासकचा प्रतिनिधी उपस्थित असला तरी तो चकार शब्दही बोलत नाही. कलोपासकचा  एखादा कार्यकर्ता एखाद्या स्पर्धक संघाशी संबंधित असेल, तर त्याला स्पध्रेच्या आयोजनापासून दूर ठेवले जाते. आयोजानातली शिस्त उत्कृष्ट असते, पण तिथेही अतिरेक नसतो. त्यामुळे स्पर्धक आणि प्रेक्षक सगळ्यांनाच पुरुषोत्तमबद्दल आदर वाटतो. मुख्य म्हणजे ज्यांच्याबद्दल प्रेम व आदर वाटावा अशा व्यक्ती या स्पध्रेसाठी परीक्षक असतात. (आणि सगळ्यात कहर म्हणजे जी पारितोषिके जाहीर केलेली असतात ती बक्षीस समारंभात चक्क दिली जातात! नाही तर कुठकुठल्या स्पर्धाकडून आमचे किती येणे आहे!)! .        
महाराष्ट्रीय कलोपासक या पुण्याच्या संस्थेने सतत बारा वष्रे आंतरशालेय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. माझ्यापुरते बोलायचे तर त्या स्पध्रेत पारितोषिके मिळाल्यामुळेच संगीतकार केशवराव भोळे यांनी माझे नाव ‘श्यामची आई’ चित्रपटासाठी सुचविले. संस्थेने बारा वष्रे ती स्पर्धा आयोजित केल्यानंतर जिल्हा परिषदेने तोच उपक्रम सुरू केला आणि ‘कलोपासक’ने आपल्या बाजूने शालेय स्पर्धा बंद केल्या. तोपर्यंत स्पध्रेचे शैक्षणिक-सांस्कृतिक महत्त्व सिद्ध झाले होते. म्हणून तर संस्थेचे संस्थापक सभासद आणि चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र वझे यांनी आग्रह धरला की संस्थने आंतरमहाविद्यालयीन नाटय़ स्पर्धा सुरू कराव्या. पण राज्य नाटय़ स्पर्धेत भाग घ्यायचा, दुसरीकडे, शालेय पातळीवर नाटय़ अभ्यासक्रम तयार करायचा, नाटय़लेखन स्पर्धाही घ्यायच्या अशा काही इतर कामांमुळे आंतरमहाविद्यालयीन नाटय़ स्पध्रेचा विषय मागे पडला.
१ ऑगस्ट १९६२ला पुरुषोत्तम रामचंद्र वझे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते पर्यवेक्षक असलेल्या नूतन मराठी प्रशाळेला आणि कलोपासकलाही तो मोठाच धक्का होता. कोणी तरी वझे कलोपासकमध्ये पाहिजे म्हणून कार्यकारिणीने मला सामावून घेतले. त्यांचे उचित स्मारक म्हणून आणि त्यांनी आग्रह धरला होता म्हणून आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा लगेचच सुरू करण्याचा निर्णय घेतला.
प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली ऑगस्ट १९६३ मध्ये. पण त्या आधीचे वर्ष धामधुमीचे गेले. आता राजा नातू चिटणीस झाले होते. कलोपासकच्या नाटय़ प्रयोगांची जबाबदारी तोपर्यंत राजाभाऊ सांभाळायचे. कुठलेही काम स्वत:ला झोकून देऊन करण्याचा त्यांचा स्वभाव होता. ते स्काऊट होते याचा इथे विशेष उल्लेख करायला पाहिजे. ते कल्पक होते. खानदानी घराण्यातले होते. त्यामुळे त्यांची वृत्ती उदार आणि अभिरुची अभिजात होती. त्यांनी मला हाताशी धरले. स्पध्रेचे आवाहनपत्र, स्पध्रेचे नियम, पारितोषिकांचे स्वरूप, स्पध्रेचे नामकरण, अशा एक की दोन, असंख्य गोष्टींबद्दल आम्ही रात्रंदिवस बोलत असायचे. नटवर्य केशवराव दाते, के. नारायण काळे यांचा आदर्श समोर असल्यामुळे आणि आपली संस्था प्रायोगिक आहे यांचे भान ठेवून, स्पध्रेत नाटय़लेखन आणि अभिनय यांना सर्वाधिक महत्त्व द्यायचे ठरले. नेपथ्य, प्रकाशयोजना यांचे महत्त्व आम्ही नाकारत नव्हतो. पण महाविद्यालयीन पातळीवर त्यांना अवाजवी महत्त्व नसावे, असा विचार करून एकांकिका एकाच रंगाच्या पडद्याच्या पाश्र्वभूमीवर होतील, असा नियम आम्ही काहीसा विरोध असतानाही केला. एक दिवस राजाभाऊ आणि मी चित्रकार सुधाकर खासगीवाले यांच्या स्तुडिओत गेलो. त्यानं स्पध्रेची कल्पना सांगितल्यावर म्हणाले, हास्य आणि कारुण्यभाव चेहऱ्यावर कोरले आहेत असे दोन पारंपरिक मुखवटे करंडकावर असावेत. त्यांनी इंग्रजी-फ्रेंच अशी चांगली तीस-चाळीस मासिके आमच्या समोर ठेवली आणि म्हणाले, यामध्ये अनेक चित्रे आहेत. तुम्हाला कोणते योग्य वाटते ते पाहा आणि त्यावर आपण नंतर चर्चा करू. आम्ही दोघे तास-दीड तास. मासिकांची पाने उलटत राहिलो आणि दोन-तीन चित्रे आम्ही निवडली आणि  खासगीवाले यांच्याशी विचारविनिमय करून आता आहेत ते मुखवटे नक्की केले. नंतर दोन-चार दिवसांत गेलो खडकमाळ आळीजवळ पानघंटी यांच्याकडे. ते सगळे कुटुंबीय हसतमुख आणि काही तरी नवे करायला उत्सुक. खासगीवाले यांनी करून दिलेली मुखवटय़ांची रेखाचित्रे आम्ही पानघंटी यांना दाखविली आणि त्यावरून साचा तयार करून, मुखवटे बनवून ते एका सुबक लाकडी फळीवर पक्के करण्याची कल्पना त्यांना सांगताच, त्यांचे डोळे चमकले. लाकडी फळीसाठी लाकूड कोणते वापरणार, मुखवटय़ांना तजेला कसा देणार, पॉलिश कसे करणार असे सगळे काही त्यांनी ऐकवायला सुरुवात केली. आणि त्या पुढच्या आठवडय़ात लाकडी तक्त्यावर सुंदर कोन साधून मुखवटे बसविलेला ‘पुरुषोत्तम करंडक’ तयार झाला होता. आम्ही करंडक निरखत खूप वेळ उभे होतो. आणि एकदम राजाभाऊंनी सुचविले. करंडकावर लाल रंगाचा गोंडा सोडावा.
विजेत्यांना देण्यासाठी प्रशस्तीपत्रके करताना मजाच झाली. आम्ही तयार केलेले प्रशस्तीपत्र राजाभाऊ यांच्या स्वभावाला धरून चांगले ऐसपस झाले होते. आणि कागद हँडमेड होता त्यावर फिक्या हिरव्या रंगातील चित्रांची किनार होती. एक नमुना घेऊन आम्ही कलोपासकचे अध्यक्ष महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्याकडे गेलो कौतुकाने त्यांनी प्रशस्तीपत्र पाहिले आणि मग मिश्कील हसत म्हणाले, छान आहे रे! पण एवढे मोठे प्रशस्तीपत्र लावायला इतक्या मोठय़ा िभती घरात असणार आहेत का? आम्हालाही हसू आवरेना. पण आम्ही प्रशस्तीपत्रात बदल केला नाही.
फक्त आपल्याच महाविद्यालयाची एकांकिका पाहून नाटय़गृहातून बाहेर न पडता, मुला-मुलींनी इतरांच्याही एकांकिका पाहाव्यात म्हणून स्पध्रेच्या सुरुवातीपासून ‘अंतिम निर्णय अंदाज स्पर्धा’
 कलोपासकने सुरू केली. संपूर्ण स्पध्रेचे तिकीट घेणाऱ्या प्रेक्षकाला एक फॉर्म मिळायचा. स्पध्रेतली शेवटची एकांकिका संपताच अध्र्या तासात त्याने त्या फॉर्मवर त्याच्या मताने असलेला स्पध्रेचा निकाल लिहायचा आणि फॉर्म तिथे असणाऱ्या पेटीत टाकायचा. ज्या प्रेक्षकाचा अंदाज परीक्षकांनी दिलेल्या निर्णयाशी तंतोतंत जुळेल त्याला एक रोख रकमेचे पारितोषिक कलोपासक देऊ लागले.
कलोपासकचे त्या वेळचे कार्यवाह प्रा. प्रभुदास भुपटकर वेळेच्या बाबतीत फार आग्रही असायचे. त्यांनी राजा नातू यांना सुचविले की प्रयोग सुरू झाल्यावर उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना प्रेक्षागृहात प्रवेश दिला जाऊ नये आणि त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या प्रयोगांची साक्ष काढली. पुल तर वृत्तपत्रात तसे जाहीरच करीत असत. आम्हा सर्वानाच वाटले की आपली म्हणून काही एक जबाबदारी असते याची जाणीव प्रेक्षकांनाही करून द्यायला हवी. संस्थेने ती सूचना स्वीकारली आणि अमलात आणली. दोन-तीन प्रसंगी स्पर्धक महाविद्यालयाचे प्राचार्यच प्रयोगाला उशिरा आले. पण आम्ही नम्रपणे त्यांना नियम सांगितला आणि प्राचार्यानीही ते मान्य केले. (त्या महाविद्यालयाने पुरुषोत्तम करंडक मिळविला आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या दिवशी प्राचार्याना प्रयोग पाहता आला!).
पहिल्या वर्षी फक्त दहा स्पर्धक संघ होते. पुढेपुढे ती संख्या वाढत गेली आणि स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये आयोजित करावी लागली. आता तर प्राथमिक फेरीमध्ये स्पर्धक संघांची संख्या इतकी वाढली आहे की आठ-दहा दिवस चालणाऱ्या स्पध्रेसाठी परीक्षक मिळवायचे आणि तेही योग्य असे, यामध्ये कलोपासकचीच परीक्षा होत असते.
पुरुषोत्तम करंडक स्पध्रेच्या पहिल्या काही वर्षांतच, तेंडुलकर, वसुधा पाटील, अनंत काणेकर, रत्नाकर मतकरी यांच्या आणि इतर काही लेखकांच्या सकस जीवनानुभव असणाऱ्या गंभीर प्रकृतीच्या एकांकिका सादर झाल्यामुळे, स्पध्रेला एक दर्जा प्राप्त झाला. एक सूर मिळाला. त्याचा एक फायदा असा झाला की, फुटकळ विनोद असलेल्या एकांकिका फारशा कोणी केल्या नाहीत. विनोदालाही एक दर्जा असला पाहिजे अशी जाणीव नकळत निर्माण झाली आणि एक-दोनदा तर विनोदी एकांकिकेने पुरुषोत्तम करंडक मिळविला. सुरुवातीला काहीशा भावुक एकांकिका स्पध्रेत झाल्या हे खरे; पण एकंदरीने त्या त्या दशकातल्या राजकीय-सामाजिक व कौटुंबिक संवेदनेशी नाते सांगणाऱ्या एकांकिका स्पर्धेत होत राहिल्या. मला तर आजही १९९८ हे वर्ष थक्क करते. त्या वर्षी एक एकांकिका होती दोन मित्रांमधील समिलगी संबंधांविषयी; दुसरी होती एका स्त्रीच्या विवाहबाह्य़ संबंधाविषयी आणि तिसरी होती, प्रत्येक वेळी स्त्रीलाच का निरनिराळ्या संधींची दारे बंद केली जातात, असा प्रश्न उपस्थित करणारी. आणि या तीनही एकांकिका लिहिल्या होत्या अर्चना दीक्षित, मधुराणी गोखले आणि विभावरी दीक्षित या विद्याíथनींनी.
आज महाविद्यालयीन युवा-युवती, कौटुंबिक नाते संबंधाबद्दल काही म्हणू पाहत आहेत. दुसरीकडे त्यांना दहशतवाद अगदी दररोजच्या आयुष्यात उतरलेला जाणवतो आहे. भ्रष्टाचार हा त्यांना अतोनात छळणारा विषय आहे, उद्याची चिंता त्यांचे आजचे जगणे अशक्य करीत आहे.. असे लेखन अनेकदा  प्रतिक्रियात्मक असते हे खरे. विश्लेषण करावे, एक समग्र अवलोकन साधावे यासाठी आवश्यक ती उसंत त्यांच्यापाशी आत्ता नाही. पण पुरुषोत्तममधला अनुभव त्यांची सोबत करील. एक नवी उमेद देईल.
पुरुषोत्तममध्ये असा नाही तसा भाग घेऊन बाहेर पडलेल्या त्यांच्या अनेक  मित्र-मत्रिणींना निरनिराळ्या क्षेत्रांत आपापली पुढची वाट सापडली आहे.
तर मग हे खरेच आहे की ‘रचिला ज्याचा पाया त्याची उभारणी बरी झाली’!

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-05-2014 at 12:07 IST

संबंधित बातम्या