नाचणी हा एक भरड धान्याचा प्रकार आहे. आरोग्यासाठी सर्वांत उपयोगी, औषधी, आरोग्य सत्त्व नाचणी आहे. कोकण आणि डांग प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो. नाचणीला काही भागांत नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा ‘फिंगर मिलेट’ म्हणतात. साताऱ्यातील व कोल्हापुरातील पश्चिम घाटात वाई, जावली, कास पठार, पाटण व कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पीक खरीप हंगामात घेण्यात येते. नाचणी आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यवर्धक आहे. परंतु सध्या दुर्लक्षित खाद्यापदार्थ आहे. तरीही ग्रामीण व दुर्गम भागात औषधी पदार्थ म्हणून तिचा नियमित वापर होत असतो. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, गोवा व बिहार या राज्यांमध्येही नाचणी पिकविली जाते. नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकाराने मोहरीसारखे बारीक असतात. नाचणीच्या गडद विटकरी रंगामुळेच नाचणीपासून बनविलेल्या पदार्थांना वेगळा रंग येतो. त्यामुळे बऱ्याचदा नाचणीचा आहारात समावेश केला जात नाही. नाचणीचा रंग जरी गडद तपकीरी असला तरी चव मात्र उग्र नसते त्यामुळेच गहू, ज्वारी, तांदळाचे जसे गोड आणि तिखट पदार्थ बनविता येतात त्याप्रमाणे नाचणीचे सुद्धा गोड व तिखट पदार्थ बनविता येतात, तसेच पारंपरिक पदार्थांचे पोषणमूल्य वृद्धिंगत करण्यासाठी नाचणीचा उपयोग करता येतो. नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तांदूळ, गहू आणि ज्वारीपेक्षा कितीतरी पटीने जास्त पोषकद्रव्ये नाचणीमध्ये असतात. नाचणीचे लाडू, भाकरी, पापड अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून नाचणी खाता येते. हेही वाचा.खरिपाचे स्वागत करताना… लागवड तंत्र नाचणीची पाभरीने पेरणी केल्यास हेक्टरी दहा किलो बियाणे लागते. पुनर्लागवड पद्धतीने बियाणे पेरणी केल्यास पाच किलो प्रतिहेक्टरी बियाणे पुरेसे ठरते. जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात गादी वाफ्यावर बियाणे पेरून त्याची पुनर्लागवड केली जाते. नाचणीची लागवड करताना जमिनीची नांगरट करून पुरेसे शेणखत मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खत देण्याची गरज पडत नाही. जमिनीतील पूर्वीच्या पिकाची धसकटे, पालापाचोळा गोळा करून गाडून टाकावा, त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव होत नाही. भारतात नाचणी पिकाखाली ११.१० लाख हेक्टर इतके क्षेत्र लागवडीखाली असून त्यापासून १५.९० लाख टन उत्पादन मिळते. भारताच्या एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक (६५.९३ टक्के) वाटा हा कर्नाटक राज्याचा आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तराखंड राज्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. देशाची एकूण उत्पादकता हेक्टरी १४३२ किलो इतकी आहे. महाराष्ट्रात नाचणी पिकाखाली १.१२ लाख हेक्टर क्षेत्र असून एकूण उत्पादन १.१९ लाख टन आहे. राज्याची उत्पादकता ही सरासरी १०६७ किलो प्रति हेक्टरी आहे. नाचणी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून त्याचे शरीराला नेमके काय फायदे असतात हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. तांदूळ आणि गहू आणि ज्वारीपेक्षा कितीतरी पटीने जास्त पोषकद्रव्ये नाचणीमध्ये असतात. हेही वाचा.देशी बीज बँक! राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळ्याच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. नाचणीत असणाऱ्या कॅल्शियमच्या विपुल साठ्यामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढती मुलं यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात. नाचणी पौष्टिक आणि शक्तिदायक समजली जाते. यात ६ ते १११ टक्के प्रथिने, कॅल्शिअम, लोह, स्फुरद पुरेशा प्रमाणात असतात. मधुमेह, अशक्त व आजारी माणसांना नाचणीचा आहार उपयुक्त व गुणकारी मानला जातो. यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल तसेच मधुमेहाचे प्रमाण कमी होते. नाचणीचे लाडू, भाकरी, पापड अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून नाचणी खाता येते नाचणीचे फायदे - -शरीरासाठी आवश्यक असणारी प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात मजबूत राहतात. गर्भवती महिलांसाठीही नाचणी अतिशय पौष्टिक समजली जाते. त्यामुळे अर्भकाची वाढ चांगली होण्यास मदत होते. -तसेच लहान मुलांसाठीही नाचणी खाणे अत्यंत लाभदायक असते. वाढीचे वय असल्यामुळे त्यांचे पोषण चांगले होण्यास मदत होते. -मधुमेही व्यक्तींना रोज नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.-तसेच शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉलही नाचणीमुळे नियंत्रणात राहायला मदत होते. विशेष म्हणजे नाचणीने प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. त्यामुळे नाचणीच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही आहारात घेऊ शकता. -नाचणी खाल्ल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते, म्हणून ज्याला रक्ताची कमतरता आहे अशांनी रोज नाचणीची भाकरी खायला हवी.-सध्या वजनवाढीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी नाचणीचा आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. -पोटात गॅस धरणे, पोटदुखी, अपचन या तक्रारींवर नाचणी गुणकारी असते. -नाचणी पचायला हलकी असते, त्यामुळे आजारी व्यक्तीला नाचणीची खीर, नाचणीचे धिरडे दिले जाते. हेही वाचा.मेंढीपालन व्यवसाय : चालना आणि विस्तार नाचणीवर प्रक्रिया करून अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये वापर करणे गरजेचे आहे. नाचणीपासून टिकाऊ पीठ किंवा सुजी तसेच त्याच्यावर प्रक्रिया करून इतर पदार्थ तयार करण्याचे उद्याोग उपलब्ध झाल्याने त्याचा वापर वाढला आहे, तर अनेक ठिकाणी नाचणीचा वापर मर्यादित गरीब लोकांचे खाद्याअन्न म्हणूनच राहिलेला आहे. सध्याच्या संशोधनावरून असे आढळून आले आहे की, नाचणीमध्ये असणारी पौष्टिक द्रव्ये, अन्नघटक, मानवी शरीराचे बरेचसे आजार कमी किंवा बरे करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. नाचणीपासून न्याहारीचे पदार्थ, गोड पदार्थ, स्नॅक फुड्स, बेकरी पदार्थ आणि व्यावसायिक पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात, त्याला मागणीही खूप चांगली आहे. नाचणीतील पोषणतत्त्वे (प्रति १०० ग्रॅममध्ये) पुढील प्रमाणे आहे : ऊर्जा (कि.कॅलरी) ३३६, कर्बोदके ७२ मिलिग्रॅम, प्रथिने ७.७ मिलिग्रॅम, तंतुमय पदार्थ ३.६ मिलिग्रॅम, स्निग्ध पदार्थ १.३ मिलिग्रॅम, कॅल्शिअम ३४४ मिलिग्रॅम, लोह ६.४ मिलिग्रॅम, फॉस्फरस २८३ मिलिग्रॅम, नायसिन २.१ मिलिग्रॅम, थायमीन ०.४२ मिलिग्रॅम, रायबोल्फेवीन ०.१९ मिलिग्रॅम. वृद्धापकाळात हाडांची झीज भरून काढण्यासाठी किंवा हाडांचे आजार (ऑस्टीओपोरोसीस, ऑस्टीओपेनिया -ठिसूळपणा) टाळण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे. ज्यामुळे आपली हाडे आणि दात एकदम मजबूत राहतात. नाचणीमध्ये कोलेस्टेरॉल आणि सोडियम नसतात आणि म्हणूनच हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी मुख्य पदार्थ म्हणून नाचणी योग्य आहे. हे हृदयाच्या वाहिन्यांमध्ये प्लेक आणि फॅटी जमा होण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंचे कार्य आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. हेही वाचा.लेख: नक्षलींच्या नावावर विरोधाचं राजकारण… मधुमेहाचे रुग्ण नाचणीच्या अनेक पदार्थांचे सेवन करू शकतात. रागी उथप्पम, रागी डोसा, रागी ढोकळा, नाचणीचा हलवा, नाचणी इडली, नाचणी रोटी किंवा भरलेला पराठा, नाचणी लापशी, सेंद्रिय गूळ आणि ए -२, बिलोना गाईच्या तुपापासून बनवलेले रागी ओट्स लाडू, सेंद्रिय गूळ घालून लोक ते शेक किंवा कांजीसारख्या पेयांच्या रूपात देखील घेऊ शकतात. याचे सेवन करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळची, कारण यामुळे भूक कमी होते आणि तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. काही भागात सफेद नाचणीची लागवड पारंपरिक रागीसारखीच केली जाते. हेही वाचा.पेरणीपूर्व मशागत : काही प्रश्न आणि काही भूमिका नव्याने आलेल्या हायब्रीड पिकांमुळ नाचणीच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. नाचणीचे क्षेत्र निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मात्र आयुर्वेदातील औषधी गुणधर्म आणि वाढत्या मागणीमुळे भाताबरोबर नाचणी लागवडीला वेग येत आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात नाचणीचे पीक घेतले जाते. त्यातून शेतकऱ्यांनाही मोठा फायदा मिळत आहे. वाई तालुक्यातील जोर येथील शेतकरी विलास आनंदा जाधव यांनी नाचणी पिकाचे विक्रमी हेक्टरी ७०.४० क्विंटल इतके उत्पादन घेऊन राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे चाळीस हजाराचे बक्षीस कृषी आयुक्त स्तरावरून घोषित केलेले आहे. यामुळे वाई तालुक्याची ओळख राज्यस्तरावर झाली आहे. - प्रशांत शेंडे, वाई तालुका कृषी अधिकारी