सुनील नवले

गेल्या काही दिवसांपासून कडधान्याकडे त्यातही मटकी पिकाकडे शेतकरी पाठ फिरवू लागले आहेत. पीक येण्यासाठी लागणारा मोठा कालावधी आणि मिळणारे कमी उत्पन्न हे त्यामागचे मुख्य कारण. त्यावर उपाय म्हणून संगमनेरचा कृषी विभाग आणि आत्मा यांनी अल्पकालावधीत येणारे आणि भरघोस उत्पन्न देणारे मटकीचे बियाणे थेट राजस्थानवरून आणले. संगमनेरच्या माळरानावर आता राजस्थानची मटकी बहरली आहे.

Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
South Mumbai Redevelopment plans
आमचा प्रश्न दक्षिण मुंबई : नियोजनाअभावी रखडलेल्या ‘झोपु’ योजना

पीक येण्यासाठी लागणारा मोठा कालावधी आणि मिळणारे कमी उत्पन्न यामुळे गेल्या काही दिवसांपासून कडधान्याकडे त्यातही मटकी पिकाकडे शेतकरी पाठ फिरवू लागले आहेत.  अभ्यासांती पूर्वापार चालत आलले कमी उत्पन्न देणारे बियाणे यासाठी कारणीभूत असल्याचे समोर आले. त्यावर उपाय म्हणून संगमनेरचा कृषी विभाग आणि आत्मा यांनी अल्पकालावधीत येणारे आणि भरघोस उत्पन्न देणारे मटकीचे बियाणे थेट राजस्थानवरून आणले. संगमनेरच्या माळरानावर आता राजस्थानची मटकी बहरली आहे.

मटकी हे तसे उष्ण आणि कोरडवाहू भागात येणारे पीक आहे. देशातील प्रामुख्याने उत्तर आणि पश्चिम भारतात मटकीची लागवड होते. पीक पद्धतीमध्ये मटकी पिकाला अनन्यसाधारण महत्त्व असून कोरडे आणि उच्च तापमान सहन करण्याची क्षमता या पिकात आहे. देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात जास्त मटकीचे क्षेत्र राजस्थान आणि त्या खालोखाल गुजरात राज्यात आहे. महाराष्ट्रात देखील मटकीचे क्षेत्र मोठे असून कमी पावसाच्या आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या कोरडवाहू भागात हे पीक घेतले जाते. परंतु बहुतांश शेतकरी स्थानिक वाण वापरून मटकीची शेती करतात. पारंपरिक वाणाच्या मटकीची देशाची उत्पादकता सरासरी २९९ किलो प्रति हेक्टर एवढी कमी आहे. मात्र या नवीन बियाणाची सरासरी उत्पादकता साधारण ६०० ते ८०० किलो प्रति हेक्टर एवढी, म्हणजे पारंपरिक वाणाच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे.

मटकी हे विशेषत: शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून गणले जाते. मटकीची भाजी, मिसळ, पापड, भजे असे वेगवेगळे पदार्थ मटकी पासून तयार होतात. मोड आलेली मटकी सर्वाधिक पौष्टिक असते. मटकीमध्ये साधारणपणे १९ ते २७ टक्के प्रथिने आणि ४९ ते ५८ टक्के कबरेदके असतात. याशिवाय लोह, िझक, मँगनीज यांसारखी खनिजेही भरपूर प्रमाणात असतात. मटकीचा सुकवलेला चारा अर्थात भुसा जनावरांच्या विशेष पसंतीचा असतो. शेंगा भरल्यानंतर मटकीची हिरवी पाने घोडय़ांसाठी आणि शर्यतीच्या बैलांसाठी उत्तम खुराक मानला जातो. मुख्य पीक अथवा मिश्र पीक म्हणून बाजरीसोबत मटकी लागवड करता येते.

संगमनेरचा पठार भाग आणि तळेगाव पट्टय़ातील काही गावांमध्ये पूर्वापार परंपरेनुसार सर्वाधिक कडधान्यांचे उत्पादन घेतले जात असे. कमी पावसाच्या पठार भागातील शेतकरी बाजरी पुलीत याबरोबर मटकी ही मिश्र पीक घेतात, त्याला ‘इरवड’ असे संबोधले जाते. कडधान्यांमध्येही शेतकऱ्यांचा त्यातही मटकी पिकाकडे शेतकऱ्यांचा जास्त कल होता. परंतु आपल्याकडील स्थानिक मटकीचा वाण शेतकरी पूर्वापार वापरत आले आहेत. त्या वाणाचे उत्पन्न तुलनेने अत्यंत कमी मिळते. शिवाय पीक येण्यासाठी साधारण दीडशे दिवसांचा कालावधी लागतो. त्याचाच परिणाम म्हणून संगमनेर तालुक्यात पूर्वी होणारी मटकीची लागवड घटत चालली असल्याचे कृषी विभागाच्या लक्षात आले.

संगमनेरचा कृषी विभाग आणि आत्मा यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना पुन्हा मटकी पिकाकडे वळविण्यासाठीचा विचार सुरू केला. त्या दृष्टीने कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या मटकीच्या नवीन वाणावर कुठे कुठे संशोधन होते, त्याचे बियाणे कुठे मिळेल याबाबत मोठा पाठपुरावा केला गेला. अखेर भारतात मटकीचे सर्वाधिक क्षेत्र राजस्थान राज्यात होत असल्याचे समोर आले. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी राजस्थान येथील केंद्रीय शुष्क क्षेत्र अनुसंधान संस्था जोधपूर यांच्याशी संपर्क केला असता मटकी पिकाचा नवीन व सुधारित वाण स्वामी केशवानंद कृषी विद्यापीठ बिकानेर येथे असल्याचे समजले. मग बिकानेर येथून ‘आरएमओ २२५१’ नावाचा वाण मिळविण्यात आला. साधारण दोन क्विंटल बियाणे प्राप्त झाले. हा वाण तुलनेने अत्यंत अल्प कालावधीत म्हणजे फक्त ६७ दिवसांत परिपक्व होतो. तसेच या मटकीचे वाण उभट वाढणारे असून इतर मटकीसारखे पसरट वाढणारे नाही.

राजस्थानसारख्या अत्यंत कमी पावसाच्या ठिकाणी या मटकीचे हेक्टरी ५ ते ८ क्विंटल येते. आपल्या येथे असणारी चांगली जमीन आणि उपलब्ध असलेले आवश्यकते एवढे पाणी यामुळे आपल्याकडे राजस्थानपेक्षाही चांगले उत्पन्न येऊ शकते असाही कयास आहे. सदरचा वाण परिपक्व झाल्यानंतर त्याची पाने हिरवीच राहतात. या पानांचा उपयोग जनावरांसाठी उत्तम चारा म्हणून होतो, शिवाय त्यापासून हिरवळीचे खतही चांगल्या प्रकारे तयार होते. मटकीचे हे नवीन वाण पूर्णत: नैसर्गिक रीत्या आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करण्यात आले आहे. लागवडीच्या वेळी उत्तम प्रतीचे शेणखत हेच मुख्य खत म्हणून वापरले गेले. काही ठिकाणी गरज पडली तिथे फॉस्पेट वापरले गेले. नवीन वाणावर अळी अथवा इतर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव देखील झाला नसल्याचे समोर आले. त्यामुळे कीटकनाशक फवारण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. पुढे काही दिवसांतच संगमनेरच्या माळरानावर आता राजस्थानची मटकी बहरली. काही शेतकऱ्यांचे हे पीक काढूनही झाले आणि त्यातून या नव्या वाणामुळे उत्पादन प्रति हेक्टरी तब्बल दुप्पट ते अडीच पटीने वाढल्याचे लक्षात आले आहे. हा प्रयोग सर्वत्र झाल्यास मटकीचे देशाचे सरासरी उत्पन्न सध्यापेक्षा दुपटी होऊन अधिक होण्यास मदत होणार आहे. उत्पादित होणारी मटकी मिसळ तयार करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांना  करार पद्धतीने देण्याचा कृषी विभाग आणि आत्माचा मानस आहे.

जुलै महिन्यामध्ये भोजदरी, पेमरेवाडी, माळवाडी, देवकौठे आदी गावांच्या परिसरातील सुमारे ४० एकर क्षेत्रात मटकी लागवड केली गेली. आता हे पीक काढणीला आले आहे. यातून उत्पादित होणाऱ्या मटकीचा वापर भविष्यात बियाणे म्हणून देखील करता येणार आहे त्यामुळे भविष्यात मटकी अंतर्गत क्षेत्र वाढवता येईल. आपल्याकडे लोप पावलेले क्षेत्र वाढविण्यासाठी आणि नवीन वाण शेतकरी बंधूंना देऊन उत्पन्न वाढविण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. – प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी, संगमनेर.

आम्ही आजवर पारंपरिक बियाणे वापरून बाजरीसोबत मिश्र पीक म्हणून मटकी पीक घेत आलो आहोत. पण या बियाणाला खूप कालावधी लागायचा आणि उत्पन्नही कमी यायचे. या वर्षी कृषी विभागाने सुचवल्यावरून नवीन बियाणाची लागवड केली. मटकी पीक काय असते ते खऱ्या अर्थाने या नवीन वाणामुळे आता आम्हाला कळले. आमची पारंपरिक मटकी जमिनीला समांतर पसरायची, परंतु हा नवीन वाण मात्र सरळ उंच वाढतो. साधारण ७१ दिवसांत हे पीक काढणीला आले आहे. आपण वीस गुंठय़ांत नवीन बियाणाची लागवड करण्याचा प्रयोग केला. या वर्षी थोडा जास्त पाऊस झाला, तरी त्याचा पिकावर काही परिणाम झाला नाही. पहिलाच प्रयोग असूनही साधारण पाच क्विंटल उत्पादन नक्की मिळणार आहे. पुढील वर्षी हेच बियाणे वापरून सरी पद्धतीने पीक घेण्याचा प्रयोग करणार आहोत. त्यातून अधिक अधिक उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. – राजेंद्र कहांडळ, शेतकरी, देवकौठे (ता. संगमनेर)