‘दुर्मीळ’ बाळासाहेब

शिवसेनाप्रमुख म्हणून सर्वज्ञात असलेले बाळासाहेब ठाकरे हे एकेकाळी राष्ट्रीय पातळीवरील एक अग्रगण्य व्यंगचित्रकार होते. घटना-प्रसंगांतील विसंगती, विरोधाभास टिपण्यातली त्यांची विचक्षणता, रेषांवरील कमालीची हुकूमत, व्यंगचित्राचा विषय ठरलेल्या व्यक्तींचा गाढा अभ्यास आणि आपल्या विलक्षण कल्पनाशक्तीने त्यांची व्यंगचित्रे त्याकाळी खूप गाजली. ‘व्यंगचित्रकार बाळासाहेबां’चं हे रूप..

बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र काढतांना…

शिवसेनाप्रमुख म्हणून सर्वज्ञात असलेले बाळासाहेब ठाकरे हे एकेकाळी राष्ट्रीय पातळीवरील एक अग्रगण्य व्यंगचित्रकार होते. घटना-प्रसंगांतील विसंगती, विरोधाभास टिपण्यातली त्यांची विचक्षणता, रेषांवरील कमालीची हुकूमत, व्यंगचित्राचा विषय ठरलेल्या व्यक्तींचा गाढा अभ्यास आणि आपल्या विलक्षण कल्पनाशक्तीने त्यांची व्यंगचित्रे त्याकाळी खूप गाजली. ‘व्यंगचित्रकार बाळासाहेबां’चं हे रूप…

बाळासाहेबांच्या कुंचल्यातून रेखाटलेली त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणा-या व्यंगचित्रांचा लोकसत्ता फेसबुक पेजवरील अल्बम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एक जेमतेम १९-२० वर्षांचा मुलगा, एका मराठी वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणीसाठी कथाचित्रं काढत असतो. लेटरिंग, सजावट वगैरेत कितीतरी दिवस गुंतलेला असतो. एके दिवशी एका इंग्रजी वर्तमानपत्राचे एक अधिकारी त्या मुलाच्या चित्रांकडे उत्सुकतेने पाहतात. म्हणतात, ‘इकडे काय करतो आहेस? आमच्याकडे ये.’ त्यानंतर तो मुलगा संपादकांना एक राजकीय व्यंगचित्र काढून देतो. संपादक ते पाहतात व पुन्हा त्या मुलाकडे कटाक्ष टाकतात. ते चित्र दुसऱ्या दिवशी त्या इंग्रजी वर्तमानपत्रात मोठय़ा आकारात छापलं जातं. त्या वर्तमानपत्राचं नाव ‘फ्री-प्रेस जर्नल’ आणि त्या जेमतेम विशीतल्या, चष्मेवाल्या मुलाने काढलेल्या व्यंगचित्राखाली सही होती, बी. के. ठाकरे अर्थातच बाळ केशव ठाकरे. हा प्रसंग मला भारतीय वृत्तपत्रांच्या इतिहासातला एक महत्त्वाचा प्रसंग वाटतो. कारण त्यातून एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा व्यंगचित्रकार जन्माला आला. त्याचबरोबर त्या संपादकांचंही कौतुक. कारण त्यांनी अत्यंत नवख्या, वयाने फारच लहान अशा चित्रकाराला व्यंगचित्रकार होण्याची संधी दिली. गुणग्राहकता म्हणतात ती हीच!
फ्री- प्रेसमधल्या बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांबद्दल मी फक्त ऐकून होतो. प्रत्यक्ष जेव्हा यातली बरीचशी चित्रं पाहायला मिळाली, तेव्हा एक दुर्मीळ खजिना हाती लागल्याचा आनंद झाला. या व्यंगचित्रांनी जुन्या कालखंडातील दुर्मीळ बाळासाहेबांचं दर्शन घडवलं. त्याचाच हा धावता आढावा..
‘फ्री-प्रेस’ १९५९ मध्ये सोडताना ते देशातील एक प्रमुख राजकीय व्यंगचित्रकार होते. फ्री-प्रेस मध्ये त्यांनी अक्षरश: हजारो मोठी राजकीय व्यंगचित्रं काढली. त्याशिवाय ‘चाचाजी’ या नावाने पॉकेट कार्टुनचं सदरही चालवलं.
फ्री-प्रेसमधल्या या व्यंगचित्रांत बहुसंख्य व्यंगचित्रं ही आंतरराष्ट्रीय विषयांवरची होती. त्या काळातील जगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या व्यक्तींची कॅरिकेचर्स त्यांनी व्यंगचित्र रेखाटताना काढली आहेत. (एक शक्यता अशी आहे की, बऱ्याच वेळेला या कॅरिकेचर्सवरूनच सामान्य लोक या नेत्यांना नंतर ओळखत असतील!!) त्यात इंग्लंड, अमेरिका, चीन, रशिया यांच्या प्रमुखांपासून व्हिएतनाम, इजिप्त, सिलोन, इस्रायलपर्यंतचे सगळे आंतरराष्ट्रीय चेहरे त्यांनी रेखाटले आहेत.
नेमकं, थेट भाष्य, अप्रतिम कॅरिकेचरिंग, काळ्या-पांढऱ्या रंगाचा बॅलन्स, परिणामकारक काँपोझिशन आणि महत्त्वाचं म्हणजे ह्य़ुमर! यामुळे बाळासाहेब ठाकरे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे राजकीय व्यंगचित्रकार ठरले यात नवल नाही. त्यांच्या अनेक व्यंगचित्रांचा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये समावेश केला गेला, यातच काय ते आलं. ‘दुर्मीळ’ बाळासाहेबांच्या या कालखंडाचं दर्शन एक व्यंगचित्रकार म्हणून मला खूप समाधान देऊन गेलं यात शंका नाही.
राजकीय व्यंगचित्रकाराच्या कामाचं स्वरूप असं असतं की, त्याला रोजच्या रोज ‘प्रॉडक्ट’ तयार करावंच लागतं. शिवाय महत्त्वाचं म्हणजे वृत्तपत्रीय क्षेत्रात काम करत असताना एक प्रकारची ‘सिनिकल’ वृत्ती आपोआप बळावत असते. शिवाय व्यंगचित्रकाराचं काम संपादक किंवा इतर पत्रकारांप्रमाणे टीका करण्याचं. फरक इतकाच, की राजकीय व्यंगचित्रकार कलेच्या- चित्रकलेच्या माध्यमातून ही टीका करत असतो. शिवाय त्याला त्याची विनोदबुद्धी शेवटपर्यंत ताजीतवानी ठेवायची असते. या पाश्र्वभूमीवर पाहिलं तर हे लक्षात येईल की, पत्रकार आणि कलावंत यांचं अद्भुत मिश्रण राजकीय व्यंगचित्रकारामध्ये असावं लागतं. त्यामुळे तो नेहमीच निर्मितीच्या तणावाखाली कळत-नकळत असतो हे लक्षात येईल. शिवाय त्याला स्वत:च्या निर्मितीखाली स्वत:ची सही करायची असते.
या साऱ्यांचा विचार केला तर रोजच्या रोज बिघडत चाललेल्या समाजकारण व राजकारणाचा साक्षीदार होताना विनोदाच्या माध्यमातून टोकदार भाष्य करणं हे किती आव्हानात्मक आहे, हे लक्षात येईल. ३०-४०-५० र्वष वृत्तपत्रांसाठी काम करणाऱ्या व्यंगचित्रकारांबद्दल म्हणूनच नेहमी आदर वाटायलाच पाहिजे.
भारतातल्या प्रमुख राजकीय व्यंगचित्रकारांची कामगिरी डोळ्यांसमोर आणली तर ठाकरे यांचं वेगळेपण, किंबहुना मोठेपण सहज स्पष्ट होणारं आहे.
कॅरिकेचरिंगमधले बारकावे दाखवताना ते अनेक भावभावना, उदा. त्वेष, भीती, कंटाळा, अगतिकता, संताप वगैरे सहज दाखवतात. पेहेरावातले बारकावेही अचूकपणे टिपतात. एकूण रचना किंवा कॉम्पोझिशन कॉमिक पद्धतीने रेखाटण्यात ते वाक्बगार आहेत. पण तेवढय़ावरच थांबता येणार नाही. त्यांनी केलेली काही भाष्यं किंवा कॉमेंट्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
उदाहरणच द्यायचं तर पब्लिक सेक्टर वि. प्रायव्हेट सेक्टर यांच्यातील संघर्षांचं देता येईल. देशाची आर्थिक घडी नीट बसण्याच्या काळात असे वाद उपयोगाचे नाहीत, हा नेहरूंचा साधा, पण महत्त्वाचा विचार ठाकरे यांनी व्यंगचित्रकलेची सगळी ताकद एकवटून मांडला आहे. त्यातल्या चित्रकलेच्या सौंदर्यामुळे चित्र उठावदार झालेलं आहेच, पण महत्त्वाचं आहे ती कल्पना व भाष्य! जिवावरच्या संकटातसुद्धा प्रतिष्ठित लोक स्वत:चं मानपान विसरत नाहीत, हा विचार आणि खवळलेल्या समुद्रातून तराफ्यावरची जीव वाचवणारी माणसं व्यंगचित्रकाराच्या मनामध्ये एकाच वेळी अवतरली असतील. तराफ्यावरच्या त्या श्रीमंत माणसाने असल्या परिस्थितीत कसं वागलं पाहिजे याची कानउघाडणी खरं तर नेहरूंच्या रूपातून ठाकरे यांनीच करून त्या मागणीतली हास्यास्पदता दाखवली आहे.
देश संकटात असताना असल्या विपरीत मागण्या करणं हे हास्यास्पद आणि परिस्थितीचं गांभीर्य न ओळखणारं आहे असं स्पष्ट मत त्यांनी मांडलय. खरं तर हे भाष्य खूप महत्त्वाचं आणि कालातीत आहे. त्यामुळे ठळक रेषा व स्पष्ट भाष्य हेच त्यांचं बलवैशिष्टय़ मानावं लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rare balasaheb thackeray