|| दिनेश गुणे

अभ्यासू लोकप्रतिनिधी, कुशल संघटक,  विवेकी राजकारणी म्हणून ओळख असलेल्या रामभाऊ म्हाळगी यांच्या जन्मशताब्दीची सांगता ९ जुलै रोजी झाली. त्यानिमित्ताने..

परिपूर्ण आणि आदर्श जीवनपट म्हणून रामभाऊ म्हाळगी हे नाव संघ परिवारालाच नव्हे, तर सुसंस्कृतता आणि विनयशीलपणाविषयी आदर असलेल्या प्रत्येक नागरिकास जगण्याचा आदर्श मार्ग दाखविणारा दीपस्तंभ ठरेल. विवेचक आणि अभ्यासू वृत्तीच्या रामभाऊंनी आपल्या आयुष्याचा, जगण्याचा मार्गदेखील अत्यंत विचारपूर्वक निवडला असल्याने प्रत्येक पाऊल निश्चित दिशेने आणि ठरल्यानुसारच पडत गेले, आणि एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्या नावाचा ठसा इतिहासावर उमटला. संघाचे स्वयंसेवक, प्रचारक, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, देशाच्या राजकीय पटलावर दाखल झालेल्या भारतीय जनसंघाचे संघटक व सारी वैधानिक आयुधे पणाला लावून जनहिताचे प्रश्न न्याय्य निष्कर्षांप्रत घेऊन जाणारे कुशल संसदपटू असलेल्या रामभाऊ म्हाळगी यांच्यासारख्या राजकीय नेत्याच्या संस्कारांची सावली महाराष्ट्राच्या राजकारणावर पडली, म्हणून येथील राजकारणही सुसंस्कृत झाले.

सप्टेंबर १९५१ मध्ये कायद्याची पदवी प्राप्त झाल्यावर वकिली व्यवसायाकडे वळण्याच्या विचारात असतानाच पुण्याच्या विद्यार्थी परिषदेच्या प्रधानमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर पडली, आणि नव्यानेच स्थापन झालेल्या या संघटनेच्या विस्तारासाठी जे जे काही करणे आवश्यक असते, ते करण्यासाठी रामभाऊंनी स्वत:स झोकून दिले. याच काळात त्यांनी एम.ए.ची पदवीही संपादन केली, आणि १९५२ मध्ये संघाच्या प्रशिक्षण वर्गात मोरोपंत पिंगळे यांनी त्यांच्यासमोर एक नवा प्रस्ताव ठेवला.. संघाच्या संघटनात्मक कामातून बाहेर पडून राजकीय क्षेत्रात पदार्पणाचा! अखिल भारतीय जनसंघ या नव्यानेच स्थापन झालेल्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या कार्यवाहपदाची जबाबदारी घेण्याचा संघाचा प्रस्ताव स्वीकारून रामभाऊ जनसंघाच्या कामात दाखल झाले.

राजकारणातून खरे देशहित साधावयाचे असेल तर केवळ निवडणुकांचा विचार न करता जनतेच्या सुखदु:खांशी समरस व्हावयास हवे, त्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाशी नाते जोडावयास हवे, हा रामभाऊंच्या पक्षकार्याचा गाभा होता. हे करावयाचे असेल तर समाजाची अगोदर नीट ओळख करून घ्यावयास हवी. ती झाली की राजकीय पक्षाची बांधणी करणे सोपे होईल, असे ते म्हणत असत. त्याच दृष्टिकोनातून रामभाऊंनी पक्षात किसान आघाडी, महिला आघाडी, नागरी आघाडी, मजदूर आघाडी व बेरोजगार आघाडीही स्थापन करून पक्षाच्या संघटनात्मक कामाची आखणी केली. या विविध आघाडय़ांनी पुणे शहरात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना चालना दिली. पक्षसंघटनेसाठी अविश्रांत मेहनत करणाऱ्या रामभाऊंना मावळ मतदारसंघातून संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने विधानसभेची उमेदवारी पक्षाने दिली. संघ, जनसंघाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी रामभाऊंच्या विजयासाठी ही निवडणूक कमालीच्या प्रतिष्ठेची केली, आणि रामभाऊ पहिल्याच निवडणुकीत सात हजार मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर जनसंपर्काचे व्यापक अभियानच रामभाऊंनी सुरू केले. पहिल्याच अधिवेशनात त्यांच्या संसदपटुत्वाची साक्ष राजकीय क्षेत्रास घडली. विधिमंडळात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून जनहिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेगवेगळी वैधानिक आयुधे मोठय़ा खुबीने वापरावी लागतात. कुशल लोकप्रतिनिधीचे ते खरे लक्षण असते. रामभाऊंकडे ते कौशल्य होते.

रामभाऊंची संसदीय कारकीर्द हा स्वतंत्र ग्रंथाचा विषय होऊ शकेल. सार्वजनिक कामाचा एक आगळा आदर्श त्यांनी आपल्या कार्यकाळात निर्माण केला. प्रत्येक पत्रास उत्तर देणे, आपल्या कामाचा अहवाल जनतेसमोर मांडणे अशा अनेक साध्या, पण दुर्मीळ बाबी रामभाऊंच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनल्या होत्या. मतभेद असतील तर न पटणारे विचार पुसून टाकावेत, पण त्या विचाराची माणसे आपल्या आयुष्यातून पुसून टाकू नयेत, अशी धारणा असल्यामुळेच रामभाऊंना पक्षभेदाच्या वैचारिक भिंतीपलीकडील अनेकांचा सहवास आणि मैत्र लाभले.

सामान्य जनतेला भेडसावणारी अशी एकही समस्या नाही, जिला वाचा फोडून तिची तड लावण्यासाठी रामभाऊंनी आंदोलनाबरोबरच वैधानिक आयुधांचाही कुशल वापर केला नाही. म्हणूनच ‘जनतेचा प्रतिनिधी’ आणि ‘अलौकिक लोकनेता’ ही रामभाऊंची प्रतिमा आजही महाराष्ट्राच्या मनात कायम आहे.

dineshgune@gmail.com

Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!