आता मात्र ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार महाराष्ट्र सहकार कायदा (सुधारणा) अधिसूचना २०१३ नुसार गृहनिर्माण संस्थांसाठी नवा उपविधी नियम अमलात आला आहे. त्यानुसार आता सदस्यसंख्या कितीही असली तरी दोन जागा महिलांसाठी आरक्षित ठेवाव्याच लागणार आहेत.
याशिवाय मागासवर्गीय जाती/ जमाती, आर्थिकदृष्टय़ा मागास जाती, भटक्या विमुक्त तसेच विशेष मागासवर्गीसाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. हा उपविधी मान्य केल्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांना आता व्यवस्थापकीय समितीची निवड करताना आरक्षण ठेवणेच नव्हे तर त्यानुसार निवड करणेही आवश्यक आहे.
आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध नसल्यास त्या जागा रिक्त ठेवाव्यात, असे नव्या उपविधीत नमूद करण्यात आले आहे. बऱ्याच वेळा गृहनिर्माण संस्थांना आवश्यक ते उमेदवार मिळत नाहीत. अशा वेळी पूर्वी या जागा सर्वसाधारण गटातील उमेदवारांतून भरल्या जात होत्या. आता मात्र नव्या उपविधीनुसार ते बंधनकारक करण्यात आले आहे.
