लोकशाही टिकवायची, तर..

लोकशाही टिकवायची असल्यास लोकशाहीतले मार्गच पत्रकारांनी अनुसरले पाहिजेत, हा या नोबेल पारितोषिकाचा संदेश दिसतो.

जयदेव डोळे

फिलिपाइन्सची मारिया रेस्सा आणि रशियाचा दमित्री मुरातोव हे दोघेही आपापल्या कार्यालयांत बसून काम करणारे संपादक असले, तरी त्यांची पत्रकारिता ही कार्यकर्तेपणाला नकार न देणारी, चळवळीची अपरिहार्यता स्वीकारणारी आहे..  शांततेचं ‘नोबेल पारितोषिक’ यंदा या दोघांना मिळालं, तेव्हा ‘पत्रकारिता ही चळवळच’ या अर्थाचं मारियाचं विधानही पुन्हा चर्चेत आलं!  समाजमाध्यमं, ‘फेक न्यूज’चे आणि विदा-शास्त्राचे धोके हे सारं आजचं असेल, पण पत्रकारितेला इतिहास आहे, परंपरा आहे.. त्या परंपरेनंच कार्यकर्ता व पत्रकार यांतला फरकही दाखवून दिलेला आहे. मग पत्रकारितेबद्दलच्या धारणा या सन्मानामुळे बदलतील का? या दोन्ही बाजूंचा परामर्श घेणारे, पत्रकारितेतील अनुभवींचे हे दोन लेख..

कोविड-१९ने अर्धमेल्या अन् अशक्त करून टाकलेल्या जागतिक पत्रकारितेला ९ ऑक्टोबर रोजी एक उत्साहाचा आणि आनंदाचा उद्गार काढता आला. स्वीडनच्या नोबेल पारितोषिक समितीने २०२१ सालचे शांततेसाठीचे ‘नोबेल पारितोषिक’ चक्क दोन पत्रकारांना दिल्याचे जाहीर केले. फिलिपाइन्सची मारिया रेस्सा आणि रशियाचा दमित्री मुरातोव हे दोघे यंदाचे नोबेल विजेते म्हणून समजताच जो तो या दोघांची माहिती मिळवू लागला. त्यांची एकेक गोष्ट प्रत्येकाला थक्क करू लागली. केवढय़ा प्रतिकूल परिस्थितीत ही दोघे आपली पत्रकारिता करीत आहेत ते पाहून कौतुकासह आदर अन् अभिमान वाटू लागला. मारिया तिच्या देशात ‘रॅपलर’ ही वेबसाइट चालवते तर मुरातोव ‘नोवाया गॅझेता’ या वृत्तपत्राचा संपादक आहे.

 या दोघांबद्दल नोबेल पारितोषिक समितीने म्हटले की, लोकशाही व शांतता यांच्या चिरंतन अस्तित्वास आवश्यक असलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपण्यासाठी या दोन पत्रकारांनी जे प्रयत्न चालवले आहेत, त्याची दखल समिती घेते. ते अत्यंत धैर्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संघर्ष करीत आहेत. फिलिपिन्स आणि रशिया या देशांचे ते असले तरी ते लोकशाही व अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांची जपणूक वाढत्या प्रतिकूल परिस्थितीत करीत असणाऱ्या जगभरच्या पत्रकारांचेही प्रतिनिधी आहेत.

भारतातल्या वाचकांना, प्रेक्षकांना या दोघांच्या या पुरस्काराची वार्ता तेवढी कळली, तीही अतिशय कोरडय़ा निरिच्छ शब्दांत. एकाही वृत्तवाहिनीने त्या दोघांच्या कार्यकर्तृत्वाचा ना मागोवा घेतला, ना त्यांच्या निमित्ताने अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे हालहवाल विचारले. तीन वर्षांपूर्वी एनडीटीव्हीच्या रवीश कुमारला मॅगसेसे पुरस्कार मिळाला तेव्हाही अशीच त्याची उपेक्षा केली गेली. समव्यावसायिक म्हणून किंवा सहप्रवासी म्हणून तरी रवीशकुमारचे कौतुक करायला हवे होते. पण छे! त्यानेच रूढ केलेल्या ‘गोदी मीडिया’ नावाच्या त्याच्या स्पर्धकांनी त्याला खडय़ासारखे वगळले. जणू नाव सार्थ केले.

मारिया आणि मुरातोव मात्र ज्यांच्या दडपशाहीशी ते टक्कर देत होते त्या नेत्यांकडूनही तोंडदेखले गौरविले गेले. मादक पदार्थाच्या व्यापाराच्या नियंत्रणानिमित्ताने अनेकांच्या हत्या, तुरुंगवास, खटले यांचे आरोप असलेले फिलिपाइन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते काय म्हणाले असतील? ते म्हणाले, हे नोबेल म्हणजे ‘एका फिलिपिना महिलेचा विजय’ असून मला त्याचा आनंद होत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा प्रवक्ता मुरातोव ‘एक धाडसी व गुणी माणूस’ असल्याचे म्हणाला. ‘आपल्या आदर्शानुसार सातत्यपूर्ण कामगिरी करणारी ही व्यक्ती आहे,’ असेही त्याने म्हटले.

पत्रकारितेस नोबेल पारितोषिक दिले गेल्याची उदाहरणे १९०७ पासूनची आहेत. अगदी अलीकडचे म्हणजे २०११चे पारितोषिक येमेनची पत्रकार तवक्कुल कारमन हिला तिच्या देशातल्या महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या कामाबद्दल मिळाले. या पुरस्कारप्राप्त पत्रकारांनी जे सार्वजनिक  कार्य केले त्याचाही समावेश त्यांच्या गौरवात करण्यात आला. थोडक्यात, पत्रकारिता हा काही स्वतंत्र, तुटके अन् अलिप्त असा व्यवसाय नसून तो लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक असल्याने त्याचे जनतेशी नाते अतूट आहे, असे नोबेल समिती मानत आली.

मारिया रेस्सा अगदी हेच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बोलली. ती म्हणाली होती, वस्तुस्थिती आणि सत्य यांच्या लढाईत, पत्रकारिता कार्यकर्त्यांसारखीच करावी लागते. नॅशनल पब्लिक रेडिओला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, आमच्या देशात पत्रकाराला गुन्हेगारासारखेच वागवले जाते. लोकशाहीचा विपर्यास असा होत जातो. हा असा मृत्यू म्हणजे ‘डेथ बाय थाऊंजड कट्स’ असतो. टोचून टोचून घायाळ करून मारण्यासारखा. असेच काहीसे अमेरिकेतही घडले आहेत. प्रभाव उत्पन्न करण्याच्या अथवा माहिती पुरवण्याच्या कामात द्वेष पेरला जातो, त्याचा पुनरुच्चार केला जात राहतो आणि अखेरीस भडका.. जित्याजागत्या लोकांचा विचार असा बदलला जातो आणि त्याचा जगावर फार परिणाम होतो. हे साऱ्या जगभर घडले आहे. आज ज्याला ‘सोशल मीडिया’ म्हटले जाते ती मानवीवर्तन फेरफार करणारी एक व्यवस्था म्हणून उरली आहे. त्यातच अनेक मंच असून ते अवघे अमेरिकन आहेत. तशीच एक फिलिपाइन्समध्ये आहे. या मंचाकडे तुमची सगळी माहिती असते. ते तुमच्यापेक्षा अधिक तुम्हाला जाणतात. तुमचा अत्यंत नाजूक क्षण ते एक संदेश समजून अधिकाधिक किमतीत जाहिरातदाराला अथवा सरकारला विकून टाकतात. एकदा का हे असे देणेघेणे झाले की तुम्ही विचार कसा करता ते बदलणे शक्य होईल, तो बदलेल, तुम्ही कोणते निर्णय करता ते बदलेल.. म्हणून या सोशल मीडियाच्या मंचांना जबाबदार धरण्याची मागणी आपण केली पाहिजे. माहितीचे (विदेचे म्हणजेच ‘डेटा’चे) असे संकलन किंवा तिचा वापर प्रभाव पाडण्यासाठी करणे त्यांना सहजसाध्य आहे. माणसांचा असा गैरवापर करण्यापासून त्यांना जे अभय मिळत आहे, ते थांबवले पाहिजे.

मारियाला फेब्रुवारी २०१९ला इंटरनेट-आधारित बदनामीच्या (सायबर लायबेलच्या) गुन्ह्य़ात अटक झाली. ही अटक, त्यासाठी केला गेलेला बदनामीचा आरोप म्हणजे सत्तेच्या गैरवापराचाच एक प्रकार असल्याचे जाणवून तिने आपल्या पत्रकारितेच्या भूमिकेत बदल करायचे ठरवले. ती म्हणते, मला जे जमत नव्हते ते मी करू लागले. म्हणजे व्याख्याने, जाहीर संवाद मी करू लागले. सुटकेनंतर मग मारिया कार्यकर्ती झाली. देशाचा कायदा पत्रकारांवर हत्यारासारखा उगारला जात असल्याचे ती सांगू लागली. सरकारच्या टीकाकारांचीही अशीच गत केली जाऊ लागली. तिने तीही चव्हाटय़ावर आणली. मात्र ती एक गोष्ट मान्य करते, पत्रकारच बातमीचा आशय बनतो हे एक मोठे आव्हान आहे, असे ती म्हणते. ५७ वर्षांच्या मारियावर गेल्या वर्षी ‘अ थाऊजंड कट्स’ हा एक माहितीपट निघाला आहे.

पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चासत्रातच तिला नोबेल मिळाल्याची वार्ता कळली. गदगदून गेलेल्या आवाजात मारिया म्हणाली, सध्या पत्रकार असणे केवढे जिकिरीचे झालेय हेच या पुरस्काराने सिद्ध केले. पण सत्याचा संघर्ष विजयी करण्यासाठी आशादायक वातावरणातही त्यामुळे तयार झाले आहे. ‘वस्तुस्थिती’जिंकली पाहिजे. आम्ही आमची तयारी ठेवली आहे.

दमित्री मुरातोव ज्या ‘नोवाया गॅझेता’ या वृत्तपत्राचा मुख्य संपादक आहे, त्याचे संस्थापक सोव्हिएत रशियाचे शेवटचे राष्ट्रपती मिखाइल गोर्बाचेव्ह हे आहेत. गंमत म्हणजे तेही १९९०चे नोबेलचे मानकरी. याच वृत्तपत्राशी संबंधित अ‍ॅना पोलित्कोवस्काया हिचा खून ६ ऑक्टोबर २००६ रोजी केला गेला. विशेष प्रतिनिधी म्हणून ती पुतिन राजवटीतला भ्रष्टाचार, दहशतवाद, अत्याचार उघडकीस आणत होती. ‘पुतिन्स रशिया’ हे तिचे पुस्तक रशियाबाहेर प्रकाशित झाले. त्यात रशियन सैन्यातल्या जवानांची उपासमार, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि जवानांचा गैरवापर याचा कमालीचा भेदक वृत्तांत आहे. चेचन्या या रशियाजवळच्या प्रांतात पुतिनने चालवलेल्या कारवाया अ‍ॅनानेच जगाला सांगितल्या होत्या.

अशा ‘नोवाया गॅझेता’च्या संपादकाचा नोबेलगौरव होताच पुतिन सरकारने सात अन्य पत्रकारांना परकी हस्तक – ‘फॉरीन एजंट्स’ – म्हणून जाहीर केले. रशियातली उरलीसुरली स्वतंत्र पत्रकारिता या विशेषणाने राष्ट्रद्रोही ठरवण्याचा पुतिनचा हा जुनाच डाव आहे. परंतु तो केवढा जगन्मान्य आहे बघा! भारतातही मोदी सरकारचे टीकाकार आणि अनेक राजकीय विश्लेषक याच राष्ट्रद्रोही विशेषणाने अपमानित व बदनाम केले जातात. हुकूमशाही राजवटी आणि तिचे संधिसाधू लाभार्थी अशाच चापलुसीमधून आपले स्वार्थ साधत असतात. गोदी मीडिया हे म्हणूनच प्रतिविशेषण!

 रशियातल्या या सत्ताविरोधी वृत्तपत्राचे पत्रकार ठार मारले गेले आहेत. त्यातलीच एक अ‍ॅना. तिच्या स्मृतिदिनालाच लागून या पुरस्काराची घोषणा झाली. काळाने केवढा सूड उगवला. मुरातोव यांनी या सर्व दिवंगत सहकाऱ्यांना आपले नोबेल अर्पण केले आहे. ते म्हणाले की, हे पारितोषिक मरणोत्तर दिले जात नसते. पण माझ्या हातून अप्रत्यक्षपणे अ‍ॅनालाच ते मिळाले आहे. तिच्या खुनाचे मूळ कटवाले अजून मोकळेच आहेत.

अशा कमालीच्या कुंद, घुसमटलेल्या अन् घातकी वातावरणात पत्रकारिता करणे आता दूरदेशीच्या निर्मम छळकथा राहिलेल्या नाहीत. आपला देश अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकार याबाबतीत फार बदनाम होत चालला आहे. अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय संस्था स्वातंत्र्य, मोकळीक, सहिष्णुता, प्रतिपक्षाचा सन्मान याबाबतीत भारताला दरवर्षी खालच्या-खालच्या क्रमांकाची जागा देत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत अनेक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या बंद पडल्या. हजारो पत्रकार बेकार झाले. कित्येक अर्धपगारी काम करीत आहेत. काही अर्थव्यवस्था कोलमडल्याने तर काहींना कोविड-१९चा दणका बसल्याने ही दुर्दशा सोसत आहेत. पण गेल्या सात वर्षांच्या काळात राजकीय असहिष्णुता आणि व्यावसायिक सतावणूक यामुळेही असंख्य पत्रकार आपला कामधंदा गमावून बसले. हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले म्हणून डाव्या, पुरोगामी पत्रकारांनी खच्चून भरलेली माध्यमे म्हणे भक्तांनी ‘सरळ’ केली. रिकामी केली. ज्यांना आपल्या विचारांचे राजकीय पक्ष अन् संस्था धड चालवता आल्या नाहीत ते बरे या तमाम भांडवलदार, नफानिष्ठ मालकांची धन करू लागतील? आणि या माध्यमांचे मालक काय वैचारिक मोजपट्टय़ा लावून नोकरभरती करतात की काय? काही तरीच!

तिच्या खुनाच्या आधी १३ महिने गौरी लंकेश या संपादिकेने तिच्या घटस्फोटित पतीस- चिदानंद रजघट्टा यास एक ई-मेल केला होता. ती लिहिते, ‘‘भारतमाता की जय! अधिक काय म्हणू? आता हे जग केवळ असह्य़ होऊ लागलेय. खरंच, मला एक छान, सुरक्षित अन् पटकन एग्झिट घेता आली पाहिजे. त्या फॅसिस्ट शक्तींशी संघर्ष करता करता मी दमून गेलेय.

इथे (कर्नाटक, ऑगस्ट २०१६ मध्ये) काँग्रेस पक्षाचे सरकार असूनसुद्धा भिंतीवर डोके आपटून मी खचून गेले आहे. मुळात.. पुरे झाले हे सगळे असे वाटतेय. सारे निराश करणारे आहे. मोदीमॅनिया एक लोकप्रिय मंत्र बनलाय, रोजच्या चर्चाविश्वात फॅसिस्ट त्वेष माजलाय, विपर्यस्त बातम्या प्रस्थापित माध्यमांचा मंत्र बनत चाललाय, धार्मिक मूलतत्त्ववाद लोकांना अंध करत सुटलाय.. तेव्हा माझा मोहभंग होतो, माझा असंतोष वाढतो, मी अस्वस्थ बनते.. पण खोलवर कुठे तरी माझ्यात आशा जिंदा आहे. अखेरीस आपण कन्नडिग लोक हे बसवण्णा, कुवेणू, शिशुनाल शरीफा, कुडमले रंगा राव, बी. बी. कृष्णप्पा, पी. लंकेश यांची लेकरे आहोत. आमचा वारसा सामाजिक सलोखा, सामाजिक न्याय आणि आर्थिक समानता याबाबतीत केवढा महान आहे. माझ्या नैराश्यातसुद्धा मला खात्री आहे की, सध्याचे आव्हान आपण पेलू शकू.-   जी. एल.’ (इल्लिबरल इंडिया, पृष्ठ ७, २०१८)  गौरी नुसती पत्रकार नव्हती. ती कार्यकर्तीसुद्धा होती. हुकूमशाहीचा खात्मा करायचा असेल तर लेखणीला वाणी, रस्ता/चौक-सभा, संमेलने यांची जोड द्यायला हवी, हे तिला समजले होते. मारियाने ते प्रत्यक्षात उतरवले आहे. मुरातोव तसे कार्यकर्तेच. अखेर लोकशाही टिकवायची असल्यास लोकशाहीतले मार्गच पत्रकारांनी अनुसरले पाहिजेत, हा या नोबेल पारितोषिकाचा संदेश दिसतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Russian journalist dmitry muratov nobel peace prize winner journalist role to maintain democracy zws

Next Story
देणगीदारांची नावे
ताज्या बातम्या