Premium

सर्वकार्येषु सर्वदा : आशादायी भूतदया

संस्थेने उभारलेले ‘फ्रीडम फार्म’ हे निवारागृह भूतदयेचे आश्वासक, आशादायी उदाहरण ठरते.

CITIZENS FOR ANIMAL PROTECTION FOUNDATION
सिटिझन्स फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशन

निखिल अहिरे/ पूर्वा साडविलकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचा अधिवास तसा सुरक्षित. अपघातग्रस्त, आजारग्रस्त प्राणी मात्र बव्हंशी उपेक्षित राहतात. त्यांना आसरा देऊन त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम ठाण्यातील ‘कॅप’ ही तरुणांची संस्था करते. संस्थेने उभारलेले ‘फ्रीडम फार्म’ हे निवारागृह भूतदयेचे आश्वासक, आशादायी उदाहरण ठरते.

कोण्या निर्दयी व्यक्तीने उकळते तेल फेकल्याने जखमी झालेले मांजर..भुंकण्याच्या आवाजाचा त्रास होतो म्हणून माथेफिरूने सळईने मारहाण केलेले श्वान..बहिरेपणामुळे मोठय़ा वाहनाखाली येऊन पाय गमावलेला श्वान..ठाण्यातल्या प्राण्यांसाठीच्या ‘फ्रीडम फार्म’मधले हे चित्र. इथल्या प्रत्येक प्राण्याची कथा वेगळी अन् सुन्न करणारी. या प्राण्यांवर औषधोपचार करून त्यांच्यावर मायेची फुंकर घालण्याचे काम सुशांक तोमर हा तरुण आणि त्याचे सहकारी ‘सिटिझन्स फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन’ (कॅप) संस्थेद्वारे करत आहेत़  दोन वर्षांत या तरुणांनी संस्थेच्या माध्यमातून शेकडो जखमी प्राण्यांना नवजीवन दिले आहे.

सुशांक तोमरचे वडील भारतीय वायुसेनेत उच्चपदावर होते. त्यामुळे बालपणीच देशभ्रंमती केलेल्या सुशांकला अनेक राज्यांतील विविध जंगलांत वावरण्याची संधी मिळाली़  त्यातूनच पुढे त्याला प्राण्यांचा लळा लागला. मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयातून ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण केलेल्या सुशांकला एखाद्या मोठय़ा कंपनीत गलेगठ्ठ पगाराची नोकरी करता आली असती. मात्र, वडिलांच्या निवृत्तीनंतर ठाण्यातील बाळकूम येथे स्थायिक झालेल्या सुशांकला प्राणीप्रेम स्वस्थ बसू देत नव्हते. त्याने काही मित्रांसह डोंबिवली येथील प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेकडमून भटक्या प्राण्यांची सुटका कशी करावी, त्यांना कसे हाताळावे आणि त्यांच्यावर कोणते प्रथमोपचार करावेत, याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर प्राण्यांसाठी काहीतरी सकारात्मक काम करण्याच्या इच्छेतून त्याने सात मित्रांसह अपघातात जखमी झालेले, मारहाण झालेले आणि आजारग्रस्त प्राण्यांसाठी मदतकार्य करण्यास सुरुवात केली. जखमी प्राणी आढळून आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करणे, त्यांना प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये नेणे, यांसारखी कामे सुशांक आणि त्याचे सहकारी करीत होते. 

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : कर्करुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर

ठाणे आणि आसपासच्या उपनगरांत अशा प्राण्यांची संख्या जास्त असल्याने ठाणे शहरातही प्राण्यांसाठी एक स्वतंत्र निवारागृह असावे, अशी जाणीव त्यांना झाली. यासाठी त्यांनी जागेचा शोध सुरू केला. मात्र, प्राण्यांबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने जागा मिळण्यात  अडचणी येत होत्या. ठाण्यासारख्या महानगरात प्राण्यांच्या निवारागृहासाठी कमी पैशात जागा उपलब्ध होणे कठीणच होते. जागेचा शोध सुरू होता तेव्हा ठाणेस्थित कन्हैया पाटील या गृहस्थांनी एका जखमी श्वानाला मदत करण्यासाठी सुशांकशी संपर्क केला. या वेळी सुशांकला प्राण्यांच्या निवारागृहासाठी जागा हवी असल्याचे पाटील यांना समजले. पाटील हे स्वत: प्राणीप्रेमी असल्याने त्यांनी त्यांच्या मालकीची ठाण्याच्या पश्चिमेला असणाऱ्या वाघबीळ गावातील सहा हजार ६६० चौरस फूट जागा तात्पुरत्या निवारागृहासाठी बाजारभावापेक्षा कमी किमतीत भाडेतत्त्वावर देण्याचा पर्याय सुचवला. ही जागा नागरी वस्तीपासून दूर असल्याने आणि आर्थिकदृष्टया परवडणारी असल्याने सुशांकने त्याच जागेवर निवारागृह उभारण्याचे ठरविले. ही जागा पडीक आणि चिखल -मातीच्या ढिगाने व्यापलेली होती. सुशांक आणि त्याच्या प्राणीप्रेमी सहकाऱ्यांनी महिनाभर श्रमदान करून जमिनीचे सपाटीकरण केले. त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर सप्टेंबर २०१९ मध्ये अखेर ‘फ्रीडम फार्म’ उभे राहिले. त्यानंतर रस्त्यावरील प्राण्यांना अधिक मदत मिळावी, यासाठी या तरुणांनी २०१९ सालच्या अखेपर्यंत ‘सिटिझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन’ (कॅप) नावाने संस्था स्थापन केली. जागा मिळवली, संस्था स्थापन केली, मात्र खरा प्रश्न होता तो प्राण्यांसाठी पक्के निवारागृह उभारण्याचा, जखमी प्राण्यांच्या मदतीसाठी लागणाऱ्या रुग्णवाहिकेचा आणि प्राण्यांवरील उपचाराच्या खर्चाचा. ‘कॅप’च्या सदस्यांनी स्वखर्चातून मोकळय़ा जागेवर जखमी, आजारी असलेल्या श्वान आणि मांजरींसाठी पत्र्याचे शेड उभारले. प्रामुख्याने पिसाळलेल्या श्वानांना आणि मांजरींना स्वतंत्र ठेवण्यासाठी काही िपजरेही घेतले. त्यातून प्राण्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटला. मात्र, त्यांच्या औषधोपचाराचा आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रश्न होताच.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : कचरावेचक ते ज्ञानवेचक !

त्यावेळी या प्राणीप्रेमींनी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करत देणग्या गोळा करण्यास सुरुवात केली. समाजमाध्यमांतून त्यांनी जखमी प्राण्यांची छायाचित्रे, चित्रफिती तसेच प्राण्याला कोणती गरज आहे, याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. समाजमाध्यमांतील या आवाहनानंतर ‘कॅप’ला नागरिकांकडून मदत मिळू लागली. या मदतीमधून प्राण्यांच्या उपचाराचा काही टक्के खर्च निघू लागला. तसेच प्राण्यांच्या रोजच्या आहारासाठी आणि निवाऱ्यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी सुशांक यांनी काही सधन आणि प्राणीप्रेमी नागरिकांकडून मदत मिळवली. त्यातून निवारागृहात काम करण्यासाठी आणि प्राण्यांची काळजी घेण्यासाठी चार जणांना पगार देऊन कामावर रुजू करून घेतले. समाजमाध्यमांतून संस्थेला जशी आर्थिक मदत मिळत होती तशी रस्त्यावरील अपघातग्रस्त प्राण्यांची माहिती देण्यासाठी अनेक नागरिक त्यांच्याशी संपर्क करू लागले. संस्थेचे काम वाढत होते. ठाण्याबरोबरच मुलुंड, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या शहरांबरोबरच मुरबाड, शहापूर यांसारख्या ग्रामीण भागांतूनही मदतीसाठी संस्थेकडे संपर्क करण्यात येत होता. मात्र, स्वयंसेवकांच्या अभावी निश्चितस्थळी पोहोचणे शक्य होत नव्हते. त्यातही संस्थेला समाजमाध्यमांचा मोठा फायदा झाला. समाजमाध्यमांद्वारे संस्थेचे काम अनेक तरुणांपर्यंत पोहोचले. यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी संस्थेबरोबर स्वेच्छेने काम करण्याच्या तयारी दर्शविली. यामुळे अनेक तरुण संस्थेशी जोडत गेले. सद्य:स्थितीत ‘कॅप’ संस्थेच्या ‘फ्रीडम फार्म’ या निवारागृहात ५५ प्राणी आहेत. त्यात रेल्वे अपघातात अपंगत्व आलेले, त्वचेच्या आजाराने ग्रस्त असलेले, जन्मत: बहिरेपणा आलेले, तर फटाक्यांनी जखमी झालेले श्वान संस्थेच्या निवारागृहात उपचार घेत आहेत.

 गेल्या वर्षी चिपळूण येथे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत अडकलेल्या अनेक भटक्या प्राण्यांची संस्थेच्या वतीने सुटका करण्यात आली. नवी मुंबई येथे प्राण्यांसाठी शासकीय निधीतून एक मोठे रुग्णालय उभे राहात आहे. ठाण्यातही प्राण्यांसाठी असेच एक मोठे रुग्णालय असावे, यासाठी संस्था पाठपुरावा करत आहे. तसेच मुलांमध्ये प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण व्हावे, पाळीव तसेच भटक्या प्राण्यांना कसे हाताळावे, याबाबत सुशांक आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शिबिरे, प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. या सर्व गोष्टींसाठी आर्थिक जुळवाजुळव करताना संस्थेला कसरत करावी लागत आहे. सद्य:स्थितीत ‘फ्रीडम फार्म’मध्ये भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी दिवसभरात ७० ते ८० फोन येतात. मात्र मूलभूत सोयीसुविधा नसल्याने आणि प्राण्यांना स्वतंत्र पद्धतीने ठेवण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने संस्थेची मोठी अडचण होत आहे. निवारागृहाची सध्याची जागा प्रशस्त आहे. मात्र, तात्पुरत्या निवाऱ्यामुळे तेथे राहणाऱ्या प्राण्यांना ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करावा लागतो. रस्त्यावरील जखमी श्वान, मांजर, काही मोठे प्राणी तसेच सुटका करण्यात येणारे काही पक्षी यांच्या निवाऱ्यासाठी संस्थेला एक सुसज्ज असे निवारागृह उभारायचे आहे. त्यात सर्व प्राण्यांसाठी किमान एक स्वतंत्र विभाग असेल. तसेच त्या निवारागृहात प्राण्यांच्या उपचारासाठी एक छोटेखानी बाह्यरुग्ण विभागही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी या संस्थेला दानशूरांकडून आर्थिक पाठबळाची गरज आहे

सिटिझन्स फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशन

CITIZENS FOR ANIMAL PROTECTION FOUNDATION

संस्थेपर्यंत कसे जाल?

ठाणे स्थानक सॅटिस पुलावरून आनंद नगर बस उपलब्ध असत़े  आनंद नगर बस स्थानकावर उतरून पाच मिनिटांच्या अंतरावर न्यू होरायझन पब्लिक शाळेजवळ संस्थेचे ‘फ्रिडम फार्म’ हे प्राण्यांसाठीचे निवारागृह आहे.

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र नाही.

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्र. 0400501076924 (कॉसमॉस बॅंक – नौपाडा, ठाणे (पश्चिम)

आयएफएससी कोड : COSB0000040

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-६९१८९९२५

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sarva karyeshu sarvada 2022 citizens for animal protection foundation zws

First published on: 08-09-2022 at 01:33 IST
Next Story
सर्वकार्येषु सर्वदा : कर्करुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर