scorecardresearch

केवळ शाळेवर विसंबून चालेल?

शाळा सुरू होणार होणार म्हणताना पुन्हा लाट आलीच.. आता तर या लाटांच्या पलीकडे जाऊन, दीर्घकालीन नियोजन करायला हवं, शाळांप्रमाणेच पालक, समाज यांनीही या शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवं, अशी गरज वाटते आहे..

अनिल कुलकर्णी

शाळा सुरू होणार होणार म्हणताना पुन्हा लाट आलीच.. आता तर या लाटांच्या पलीकडे जाऊन, दीर्घकालीन नियोजन करायला हवं, शाळांप्रमाणेच पालक, समाज यांनीही या शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवं, अशी गरज वाटते आहे..

‘Destiny of the nation is being shaped in the four walls of class room’ देशाचे भवितव्य शाळाशाळांतून, वर्गाच्या चार भिंतींआड घडत असते- हे खरंच आहे. आज याची वास्तविकता कधी नव्हे इतकी पटत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचं व्यक्तिमत्व झाकोळलं जात आहे. प्रार्थना नाही, प्रतिज्ञा नाही, खेळणं नाही.. शाळेत मुलं इतकी व्यक्त होतात की हाताची घडी तोंडावर बोट असं म्हणावं लागत असे. घरामध्ये याच मुलांची अशी गत होते आहे की मोबाइल, घरातील इतर माणसे व लॅपटॉप तोंड उघडायची संधीच देत नाहीत. संवादाशिवाय व्यक्तिमत्व घडतच नाही. व्यक्तिमत्व पोकळीत घडवत नाही. ऑनलाइन मध्ये केव्हाही शिक्षकांना नजरेआड करता येतं. शाळेतील शिक्षकांचा धाक, प्रेम विद्यार्थ्यांना घडविण्यास पुरेसं होतं. आपण कोणत्या बौद्धिक पातळीवर बोलण्यात, वागण्यात आहोत यासाठी मित्र हवेतच. मनात येईल ते, वाटेल ते बोलण्यासाठी काही जागा हव्या असतात, त्या मित्र पूर्ण करतात. मन मोकळं करायला समवयस्कच हवे असतात. ती महत्त्वाची  पोकळी शाळा भरून काढते.  घरातून शाळेत जाणं हे सुद्धा शिक्षण आहे तो एक सामाजीकरणाचा भाग आहे. घरातून शाळेत जाताना अनेक माणसांशी संबंध येतो, रिक्षा, स्कूल बस, यांमधले संवाद हे शिक्षणच असतं. रस्त्यातून प्रवास करताना आपोआप निरीक्षण/ ग्रहण होत असतं.  गृहपाठाच्या धाकानं एक पिढी घडली होती. शिक्षकांच्या धाकानंच काही व्यक्तिमत्त्वं घडली होती. प्रतिज्ञा यांत्रिक पद्धतीने जरी मुलं म्हणत होती तरी त्यातील  वाक्यावाक्यानं त्यांच्या मनात घर केलं होतं, तसं वागण्याचा प्रयत्नसुद्धा काहीजण करू लागायचे. प्रतिज्ञा म्हणजे शिस्तीत स्वत:ला गुंफणं. पाठांतराने अनेक गोष्टी केवळ पाठच होत नाहीत तर अनेक वाईट गोष्टी कडे पाठही फिरवली जाते.  राम रक्षा, श्लोकां चे पाठांतर यांनी व्यक्तिमत्त्वं घडलेलीच आहेत.

पण गेल्या जवळपास दोन वर्षांत मैदानी खेळ नाही, स्पर्धा नाही, हसणं नाही, भांडणं नाही, वादविवाद नाही .. मग व्यक्तिमत्त्व घडणार कसं? एक खरं की, आतासारख्या आपत्तींच्या शाळेबरोबरच  दुसऱ्या पर्यायांचाही विचार करणं क्रमप्राप्त आहे. जिथे पालक साक्षर आहेत तिथे होम स्कूलिंग रुजवायला हवं. त्यासाठी पालकांचं प्रशिक्षण, मेळावे घ्यावेत. व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षक- विद्यार्थी विद्यार्थी- विद्यार्थी असे गट करून माहितीचं आदान प्रदान आजही काहीजण करताहेत. नांदूरच्या रोहिणी लोखंडे या शिक्षिकेने मोबालच्या साह्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांना रोज काही तास शिकवून  मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, ही बातमी उत्साहवर्धकच आहे. करोना च्या काळातही रमेश पानसे यांच्या रचनावादी शिक्षण पद्धतीवर आधारित गटातलं शिक्षण व्यवस्थित चालू आहे. असे बरेच नाविन्यपूर्ण अध्यापन करणारे शिक्षक आहेत.  शिक्षकांसाठी अनेक वर्षांपासून जिल्हा पातळीवर नवोपक्रम स्पर्धा राबवण्यात येते त्यात नावीन्यपूर्ण  उपक्रमाच्या साह्याने कसं शिकवावं याचेही धडे मिळालेले आहेत. ते उपक्रम जिल्हा राज्य पातळीवरील राबवता येतील का याचा विचार आता राज्यभर न्यावा लागेल, प्रत्यक्षात आणावा लागेल. हे नवोपक्रम धूळ खात पडण्यासाठीच आहेत कां?अनेक पर्यायांचा वापर, अनेक प्रकारचे प्लॅन एव्हाना दोन वर्षांपासून शिक्षण तज्ञाच्या टास्क फोर्सच्या सहाय्याने तयार हवे होते. आज दोन वर्ष झाली तरीही मूल्यमापनाच्या संदर्भात संभ्रमित अवस्थेत राहून कसे चालेल याचा विचार कोण करणार आहे की नाही?

शिक्षणाच्याआपत्तीकालीन व्यवस्थापनाबद्दल कोणतेच नियोजन नाही हे दुर्दैवीआहे. शाळा उघडणारच नसतील अशा परिस्थितीत शाळेला पर्याय देण्यासाठीची मूल्यमापन व्यवस्था आता नव्यानं रुजवावी लागेल, तरच व्यक्तिमत्वं येणाऱ्या काळात तग धरू शकतील. ऑनलाइन शिक्षणांमध्ये अध्यापनाबरोबर अनेक उपक्रम मुलांना दिले जातात, पण त्यातून मूल्यं रुजतात का? मुलांनी केवळ व्हिडिओ करून पाठवला म्हणजे झालं कां?  वळण आणि शिस्त हा परिणाम हवा असेल तर सातत्य हवं. योगाचा पाच मिनिटाचा व्हिडिओ काढून योग येत नसतो. ऑनलान शिक्षण हे फोटोपुरतं सीमित झालं आहे का?  जर एखादी  कृती सातत्यानं झाली तरच कौशल्यं रुजतील. एका दिवसात वा फोटो काढून मूल्यांवर प्रभुत्व मिळत नाही. कृतीनंच व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणावा लागतो.

अध्यापन, मूल्यमापन योग्य रीतीनं न झालेली मुले, उद्या देशाचा आधारस्तंभ ठरणार आहेत, याचा विचार व्हायला हवा. ऑनलाइन  शिक्षणामुळे संस्कार करणारे घटक कमी झाले आहेत, निरीक्षणाला वाव कमी झाला आहे, सणजिकीकरण कमी झालं आहे, शारीरिक हालचाल कमी झाली आहे, परिपाठ नाही, मैदानी खेळ नाहीत, स्क्रीन टाईम वाढला आहे, हे मान्यच करावं लागेल. ज्यांच्याकडे नेट आहे तेच अभ्यासात थोडेफार सेट होत आहेत. ग्रामीण भागात सगळं अधांतरी आहे. नेट नसल्यामुळे ना ऑनलाइन ना ऑफलाइन अशा परिस्थितीत असंख्य मुलं आहेत त्यांचं काय करणार ? शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या, काही वर्गापुरत्या सुरू झाल्या, याकडे बोट दाखवून भागेल का?

  या दीर्घकाळच्या आपत्कालीन  परिस्थितीमध्ये शाळेनं काय करावं ? कुटुंबानं काय करावं, समाजानं काय करावं याचं नियोजन कुठे आहे?  पालक आता साक्षर आहेत, मुलं आपणच घडवायची ही जबाबदारी आता पालकांनी स्वीकारायला हवी. केवळ प्रवेश व परीक्षा घेणं याचं नियोजन असू  नये तर, विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संसाधनातून शिक्षण मिळेल, कसं मिळेल याचे नियोजन  करायला हवं. जिथे शाळा भरणारच नाही तिथे अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा याचे नियोजन जर करता आले तर प्रश्न उरणार नाही.  पण पाठय़पुस्तकाला केवळ महत्त्व  न देता आता मूल्य रुजवणं यावरही भर द्यावा लागेल आणि शिक्षणाचं अंतिम ध्येय मूल्य रुजवणं हेच आहे. वर्क फ्रॉम होम प्रमाणे विद्यार्थ्यांना आता ‘लर्न फ्रॉम होम’चा सराव करावा लागेल. जे शिकायचं ते पालक, भावंडं, मित्र यांच्या कडूनच शिकावं लागेल, समाजाकडून शिकावं लागेल. शाळेच्या बाहेरच मुले आता घडणार आहेत, अशा काळाचं नियोजन करावं लागेल. व्यक्तिमत्व चांगले घडवायचे असेल तर  केवळ अभ्यासक्रमावर अवलंबून चालणार नाही. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त असे काही जीवनानुभव, मुल्यांचे अनुभव त्यांना द्यावे लागतील की ज्यामधून ते घडतील. केवळ केवळ अभ्यासक्रमाच्या मूल्यमापनवरून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करता येणार नाही.

आता मुलांचे शिक्षक हे आई-वडील, मित्र, समाजातील घटक, समाजमाध्यमं असणार आहेत.  विद्यार्थ्यांवर आता संस्कार करायचे आहेत, ते वेग वेगळय़ा घटकांनी. ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाच्या समन्वयानेच सगळं सुरळीत होणार आहे. नियोजनानुसार  व शिस्तीत चालणारे समाजच विकसित म्हणून ओळखले जातात. त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. ऑफलाइननं पोपट तयार केले तसे ऑनलाइन ने रोबोट तयार होतील. या दोन्हीचा समन्वय झाला तरच, केवळ शाळेवर विसंबून राहण्याचे दिवस राहणार नाहीत. विद्यार्थ्यांलाही आता एकलव्य होऊन शिकावे लागणार आहे.

anilkulkarni666@gmail.Com

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: School students corona wave patients ysh

ताज्या बातम्या