कोकणातील ग्रामीण तसेच दुर्गम भागात आजही चांगल्या शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे. पुस्तकी अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, निसर्गप्रेम निर्माण करणे-वाढवणे, सामाजिक जाणीव आणि आत्मनिर्भरतेची भावना निर्माण करणे हे काम चिपळूण येथील सेवासाधना प्रतिष्ठान गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी देणे, यावर संस्थेच्या भर आहे.

विनीत वाघे यांनी २०११ मध्ये चिपळूण तालुक्यातील केतकी या गावी सेवासाधना प्रतिष्ठानची स्थापना केली. संस्थेची अधिकृत नोंदणी ३ सप्टेंबर २०१६ रोजी झाली. केतकी गावातील ‘आरण्यक’ हे संस्थेचे शिबिरस्थळ. २०१८ पासून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी निवासी शैक्षणिक शिबिरे आयोजित केली जातात. आजपर्यंत अशी ३५ हून अधिक शिबिरे झाली आहेत. विज्ञान, पर्यावरण, निसर्ग, हस्तकला अशा विविध विषयांवर आधारित या शिबिरांमधून विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण दिले जाते. योग, पक्षीनिरीक्षण, निसर्गभ्रमण, विज्ञान प्रयोग, गटचर्चा, हस्तकला, तारांगण निरीक्षण तसेच आरोग्य व आहार यांसारख्या विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला जातो.

‘ओळखू स्वत:ला’ या सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार्‍या दिवाळी शिबिरात ग्रामीण भागातील तसेच वंचित शाळांतील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. आत्मशिस्त, स्वावलंबन, चिकित्सक विचार, लैंगिक समानता आणि सांघिक भावना यांसारखी जीवनमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न या शिबिरातून केला जातो. शिक्षण अधिक रंजक आणि जीवनाशी जोडलेले असावे यासाठी सेवासाधनाने विविध दृकश्राव्य कार्यक्रम विकसित केले आहेत.

‘आपण कोठून आलो?’, ‘विज्ञानाचा अद्भूत प्रवास’, ‘विश्वास-आंधळा विश्वास’, ‘भारताची जडणघडण’, ‘आनंदाचे डोही’ अशा विषयांवरील संवादात्मक सादरीकरणांमधून विद्यार्थ्यांना विश्वाची निर्मिती, उत्क्रांती, विज्ञानाचा इतिहास, अंधश्रद्धा, भारतीय इतिहास आणि मानवी मेंदूतील आनंदाशी संबंधित रसायने यांची ओळख करून दिली जाते. सादरीकरणानंतर चाचणी, चर्चा आणि संवाद यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक वाढतो.
विज्ञान शिक्षणासाठी संस्थेने मोबाईल सायन्स लॅबचा उपक्रमही राबविला आहे. पुण्यातील विज्ञानवाहिनीच्या सहकार्याने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष प्रयोगांवर आधारित सत्रे घेतली जातात. त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ते सातवीसाठीही अभ्यासक्रमाशी संबंधित प्रयोग, उपकरणे आणि प्रतिकृतींच्या माध्यमातून विज्ञान शिकविले जाते. विज्ञान, भूगोल आणि पर्यावरण कार्यशाळेत खडक-जीवाश्म प्रदर्शन, सूर्य-पृथ्वी-चंद्राची मॉडेल्स, हवामानाची उपकरणे, सूक्ष्मदर्शक, सौर कुकर आणि पश्चिम घाटावरील माहितीपट अशा विविध माध्यमांचा वापर केला जातो.

संस्थेचा खडक, जीवाश्म आणि खनिजांचा संग्रह हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. भारतातील विविध भागांतून संकलित केलेले नमुने विद्यार्थ्यांना पृथ्वीचा इतिहास, जीवनाची उत्क्रांती आणि भूविज्ञानाचे व्यावहारिक महत्त्व समजावून देतात. महाराष्ट्राचे तसेच वशिष्ठी नदी खोर्‍याचे थ्रीडी नकाशे वापरून भूगोल शिकविण्याचा उपक्रमही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रभावी ठरतो.

आकाशदर्शन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विश्वाची ओळख, नक्षत्रांची माहिती आणि दुर्बिणीतून खगोलीय वस्तू पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. १६ इंची वैज्ञानिक दुर्बिणीद्वारे रात्रीचे आकाश न्याहाळण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी संस्मरणीय ठरतो. रत्नागिरी जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांसाठीही संस्थेने विशेष तारकादर्शन कार्यक्रम आयोजित केले आहेत.

शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीवरही सेवासाधना प्रतिष्ठान भर देते. केतकी गावातील तरुणांना नारळाच्या करवंटीपासून विविध पर्यावरणपूरक वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याच्या आधारे काही तरुणांनी छोटे व्यवसाय सुरू केले आहेत.

‘शोधयात्रा ज्ञानाची’ हा संस्थेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही याच व्यापक दृष्टिकोनातून निवडक शाळांमध्ये विविध टप्प्यांत राबविला गेला. शैक्षणिक कार्यासोबतच संकटाच्या काळात मदतीचा हात देण्याची परंपराही संस्थेने जपली आहे. कोविड-१९ महासाथ आणि २०२१ च्या चिपळूण पूरस्थितीत मदतकार्य करण्यात आले. दुर्गम आदिवासी वस्त्यांमध्येही जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि महिलांसाठी आवश्यक साहित्याचे वाटप दरवर्षी करण्यात येते. या कार्याची दखल घेऊन संस्थेला विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले. अनेक संस्था आणि व्यक्तींच्या सहकार्याने उभे राहिलेले हे कार्य भविष्यातील संवेदनशील, चिकित्सक आणि जबाबदार पिढी घडविण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल आहे.

मदतीचा हात का हवा ?

आगामी काळात ग्रामीण आणि दुर्गम भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान, भूगोल, पर्यावरण आणि खगोलशास्त्राचे अनुभवाधारित शिक्षण पोहोचविण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि मनुष्यबळाची गरजही वाढत आहे. त्यासाठी आर्थिक सहकार्य गरजेचे आहे.

स्वत:चे वाहन : सध्या विज्ञान, भूगोल, खडक-जीवाश्म प्रदर्शन, थ्रीडी प्रतिकृती, मोबाईल सायन्स लॅब आणि आकाशदर्शनासाठी लागणारे साहित्य दुर्गम भागातील शाळांपर्यंत नेण्यासाठी भाडेतत्त्वावरील वाहनावर अवलंबून राहावे लागते. संस्थेकडे स्वत:चे वाहन असल्यास दुर्गम भागात अधिक नियमितपणे आणि कमी खर्चात फपक्रम राबवता येतील.

पूर्णवेळ प्रशिक्षकांची गरज : उपक्रमांची संख्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच वाढविण्यासाठी प्रशिक्षित पूर्णवेळ प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. प्रशिक्षक उपलब्ध झाल्यास वर्षभर अधिक शाळांमध्ये सातत्याने विज्ञान व अनुभवाधारित शिक्षण देता येईल.

शाळांसाठी प्रयोगसाहित्य : अनेक ग्रामीण शाळांमध्ये स्वतंत्र विज्ञान प्रयोगशाळा किंवा पुरेसे प्रयोगसाहित्य उपलब्ध नसते. अशा शाळांना मूलभूत प्रयोगसाहित्य उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना ‘पाहून आणि करून शिकण्याची’ संधी मिळू शकते.

थ्रीडी प्रतिकृती आणि शैक्षणिक मॉडेल्स: विज्ञान आणि भूगोलातील अवघड संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या व रंजक पद्धतीने समजावून सांगण्यासाठी त्रिमितीय प्रतिकृती आणि विविध शैक्षणिक मॉडेल्स अत्यंत उपयुक्त ठरतात. मात्र, त्यांची निर्मिती खर्चिक असल्याने सध्या त्यांची संख्या मर्यादित आहे. निधी उपलब्ध झाल्यास संस्थेला अधिकाधिक मॉडेल्स विकसित करता येतील.

संस्थेपर्यंत कसे जाल?

चिपळूण एसटी स्थानकातून ‘भिले केतकी’ ही बस केतकी गावापर्यत जाते. खासगी वाहनाने गुहागर मार्गावरील करबंवणे (कोंड्ये) या फाट्याच्या उजव्या हाताला वळून केतकी गावापर्यत पोहोचता येते. चिपळूण एसटी बस स्थानकापासून १६ किमी अंतर असून अर्धा तासात पोहोचता येते.

सेवासाधना प्रतिष्ठान Sevasadhana Pratishthan या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८० जी करसवलत पात्र आहे.

ऑनलाइन देणगीसाठी तपशील

कॉसमॉस को ऑप. बँक लिमिटेड

चालू खाते क्रमांक : १४४१००१०६७५

आयएफएससी : सीओएसबी००००१४४

भारतातील विविध भागांतून संकलित केलेले खडक-जीवाश्म आदींचे नमुने विद्यार्थ्यांना पृथ्वीचा इतिहास, जीवनाची उत्क्रांती आणि भूविज्ञानाचे व्यावहारिक महत्त्व समजावून देतात. महाराष्ट्राचे तसेच वशिष्ठी नदी खोर्‍याचे थ्रीडी नकाशे वापरून भूगोल शिकविण्याचा उपक्रमही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रभावी ठरतो.

विज्ञान जाणिवा विस्तारण्याचे अथक प्रयत्न

सेवासाधना प्रतिष्ठानच्या कार्याचा तीन जिल्ह्यांमध्ये विस्तार असून ८९ शाळा, महाविद्यालये व संस्था आणि १०,८०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत संस्थेचे १५ पेक्षा अधिक प्रकारचे उपक्रम पोहोचले आहेत. ‘ओळखू स्वत:ला’ या सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार्‍या दिवाळी शिबिरात आत्मशिस्त, स्वावलंबन, चिकित्सक विचार, लैंगिक समानता आणि सांघिक भावना यांसारखी जीवनमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. ‘आपण कोठून आलो?’, ‘विज्ञानाचा अद्भूत प्रवास’, ‘विश्वास-आंधळा विश्वास’, ‘भारताची जडणघडण’, ‘आनंदाचे डोही’ अशा विषयांवरील संवादात्मक सादरीकरणांमधून विद्यार्थ्यांना विश्वाची निर्मिती, उत्क्रांती, विज्ञानाचा इतिहास, अंधश्रद्धा, भारतीय इतिहास आणि मानवी मेंदूतील आनंदाशी संबंधित रसायने यांची ओळख करून दिली जाते. पुण्यातील विज्ञानवाहिनीच्या सहकार्याने प्रत्यक्ष प्रयोगांवर आधारित सत्रे घेतली जातात. विज्ञान, भूगोल आणि पर्यावरण कार्यशाळेत खडक-जीवाश्म प्रदर्शन, सूर्य-पृथ्वी-चंद्राची मॉडेल्स, हवामानाची उपकरणे, सूक्ष्मदर्शक, सौर कुकर आणि पश्चिम घाटावरील माहितीपट अशा विविध माध्यमांचा वापर केला जातो. संस्थेचा खडक, जीवाश्म आणि खनिजांचा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे.

धनादेश येथे पाठवा…

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणार्‍यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय: लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय: संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय: संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२

पुणे कार्यालय: संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय: संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, ॲडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय: संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००