– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

‘सदैव प्रवाशांच्या सेवे‘साठी असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटीने करोनाकाळात ते खरे करून दाखवले. श्रमिकांसाठी मोफत प्रवास, मुंबई महानगरात अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सेवा दिल्यानंतर एसटीने राज्यात आपली सेवा पुन्हा हळूहळू सुरू केली. मात्र करोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या एसटीसमोर वेतनप्रश्न, दैनंदिन खर्च यांसह अनेक समस्या उभ्या राहिल्या.

* आर्थिक संकटात असलेली एसटी करोनामुळे आणखी खोलात रुतली. सध्या एसटीसमोर कोणती आव्हाने आहेत?

एसटीसमोरील पहिले आव्हान खर्चात कपात करणे आणि दुसरे उत्पन्न वाढवणे. त्यासाठी करोनाकाळातही एसटीचा प्रवास सुरक्षित आहे हे पटवून दिले जात आहे. गाडय़ांची स्वच्छता, निर्जुकीकरण, मास्कचे बंधन इत्यादी उपाय केले जात आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या ४० टक्क्यांवर गेली आहे, तर उत्पन्न ७ कोटींवर. प्रवाशांच्या सोयीसाठी व्हीटीएस म्हणजे व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम आणत आहोत. डिसेंबरपासून राज्यात ही यंत्रणा सर्व एसटी गाडय़ांमध्ये कार्यान्वित होईल. यामुळे बसची सद्य:स्थिती समजेल. त्यासाठी बस आगार, स्थानकात माहिती देणारे टीव्ही बसवण्यात येतील. नाशिक, ठाणे, पालघर यांसह अन्य दोन विभागांत ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. याशिवाय बसची सद्य:स्थिती देणारी माहिती मोबाइल अ‍ॅपवर दिली जाणार आहे.

* आर्थिक काटकसर, उत्पन्नवाढीसाठी कोणत्या उपाययोजना करणार?

कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने वेतनावर खर्च जास्त होतो. ती कमी करण्यासाठी ५०हून अधिक वय असलेल्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणत आहोत. याचा अर्थ कर्मचाऱ्यांमध्ये कपात नाही. एसटीत इंधनावरही खर्च अधिक होतो. एसटी डिझेलवर धावते. त्याऐवजी एलएनजीवर (लिक्विफाइड नॅचरल गॅस) चालवण्याचा प्रयत्न आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात १८ हजार बस असून त्यावर इंधनावर होणारा खर्च वर्षांला १ हजार कोटी रुपये आहे. तो कमी होईल. एकाच मार्गावर एसटीच्या अनेक बस धावतात. असे मार्ग व त्यावरील बसगाडय़ांना मिळणारा प्रतिसाद पाहून काही फे ऱ्या बंद के ल्या जातील. यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही.

* करोनामुळे एसटीपासून दुरावलेला प्रवासी पुन्हा मिळवण्यासाठी किती वेळ लागेल. एसटीने यासाठी उद्दिष्टही ठेवले आहे का?

करोना साथ आणखी किती दिवस राहील हे सांगणे कठीण आहे. परंतु यातही एसटीची सेवा सुरक्षित व चांगली देण्याचा प्रयत्न आहे. सध्या १८ हजारपैकी ९ हजार बसगाडय़ा धावत आहेत. ४० टक्के  प्रवासी भारमानही झाले आहे. नोव्हेंबपर्यंत १५ लाखांपर्यंत प्रवासी संख्या नेण्याचे उद्दिष्ट आहे. आता हीच संख्या १३ लाख आहे. प्रवासी नाहीत, म्हणून बस बंद के ल्या, असे एसटीत नाही. प्रवासी हळूहळू वाढत आहेत. पूर्वी दररोज ६० ते ६५ लाख असणारी प्रवासी संख्या आणि २१ ते २२ कोटी रुपये असलेल्या उत्पन्न उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यास थोडा कालावधी लागणार हे मात्र नक्की.

* टाळेबंदीत एसटी महामंडळाने मुंबई महानगरात आपली सेवा अविरतपणे सुरू ठेवली. मुंबईत बेस्टप्रमाणेच एसटीची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न असेल का?

सामान्यांसाठी लोकल बंद असल्याने सर्व भार बेस्ट व एसटीवर होता. बेस्ट उपक्र माला गाडय़ा अपुऱ्या पडत असल्याने मागणीनुसार एक हजार बस देण्याची तयारी दर्शवली आणि बाहेरून एसटीसह चालक, वाहक व तांत्रिक कर्मचारी मागविले. सध्या एक हजार एसटी बेस्टच्या सेवेत असून चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचारी यांची संख्या ४ हजार आहे. एसटीने उत्तम सेवा दिली असून प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी एसटीची सेवा वाढवली जाईल. मुंबई महानगरात काही नवीन मार्गावर वातानुकू लित शिवशाही सुरू केली. त्याचीही मागणी असेल तर नक्की वाढवू.

* वातानुकू लित शिवशाही बसची संख्या वाढवताना शिवनेरीकडे दुर्लक्ष झाले असे वाटत नाही का?

मुंबई ते पुणे मार्गासह अन्य काही मार्गावर शिवनेरी बस गाडय़ांची सेवा उत्तम ठरली व ती आजही आहेच. एसटीत शिवनेरी बस भाडेतत्त्वावर असून त्यांचे भाडे अधिक आहे, तर भाडेतत्त्वावरील शिवशाही बसचे दर मात्र कमी असून ते एसटी महामंडळाला परवडणारे आहे. त्यामुळे वातानुकू लित शिवशाही बसची संख्या वाढवण्यावर अधिक लक्ष दिले. शिवशाही बसही प्रवाशांच्या पसंतीस पडत आहेत. ही बाब खरी आहे की भाडेतत्त्वावरील शिवशाही बस उभ्या राहिल्याने त्यांच्या मालकांचेही आर्थिक नुकसान झाले. टाळेबंदी शिथिल  झाल्यानंतर प्रथम एसटीच्या ताफ्यातील स्वमालकीच्या ५०० हून अधिक शिवशाही बसच चालवण्याचा निर्णय घेतला. प्रवासी संख्या कमी असल्याने त्या बसही जास्त धावत नाहीत. भाडेतत्त्वावरील शिवशाही बस चालवल्यास एसटी महामंडळाला त्याचे भाडे कं त्राटदारांना द्यावे लागेल. त्यामुळे करोनाकाळात भाडेतत्त्वावरील बस सध्या तरी चालवणे शक्य नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. करोना जाताच भाडेतत्त्वावरील बस चालवल्या जातील. परंतु नुकसान होत असल्याने काही कंत्राटदारांनी एसटीच्या  ताफ्यातून भाडेतत्त्वावरील बस काढण्यास सुरुवात केली असून त्यांची संख्या फार कमी झाली आहे. एसटीत जुन्या बसही बऱ्याच आहेत. त्या काढून टाकल्यास जवळपास २ हजार बस कमी पडतील. त्यामुळेच पुढील काही महिन्यांत शिवशाही बस कमी पडू नये आणि येत्या एक वर्षांचे नियोजन म्हणून आणखी ४०० शिवशाही बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय झाला आहे.

* एसटीचे रुग्णालय, अभियंता महाविद्यालये, बस तळ, बस स्थानकांचे आधुनिकीकरण यांची नुसतीच चर्चा झाली. या प्रकल्पांचा विचार होणार की नाही?

या प्रकल्पांचा विचार सोडलेला नाही. अनेक सोयीसुविधांयुक्त असे बस तळ १३ ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला होता. यातील पनवेल व औरंगाबादमध्ये एसटीचे बस तळ उभारणीचे काम सुरू झाले आहे.  बस तळ प्रकल्पात पनवेल व औरंगाबादमध्ये काम सुरू झाले आहे. राज्यात अन्य ठिकाणी त्याला गती मिळालेली नाही. पण तीही लवकरच मिळेल.

मुलाखत – सुशांत मोरे

sushant.more@expressindia.com