महाराष्ट्रात साठोत्तर काळापासून बाळासाहेब ठाकरे विरुद्ध दलित किंवा नवबौद्ध किंवा शिवसेना विरुद्ध दलित पँथर वा आंबेडकरी संघटना, असा थेट राजकीय-सामाजिक संघर्ष झडत राहिला आहे. हा संघर्ष वैचारिकही आहे. आरक्षण, नामांतर, रिडल्स किंवा हिंदुत्व अशा प्रत्येक मुद्दय़ावर हा संघर्ष झडत गेला. बाळासाहेबांनी त्यांच्या अखेरच्या जीवनखंडात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकोप्याची संकल्पना मांडून किमान राजकीय संघर्ष तरी कमी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात बाळासाहेबांनी या पूर्वीही आंबेडकरी संघटनांबरोबरच्या वादात व संघर्षांत अनेकदा सामंजस्याची भूमिका घेतली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीच्या विचाराने प्रेरित झालेल्या आंबेडकरी समाजाबद्दल किंवा भीमशक्तीबद्दल बाळासाहेबांना आव्हान वाटत होते की आकर्षण?..

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या म्हणजे १९६० ते ७०च्या दशकात दलितांवरील अत्याचाराचा कहर झाला होता. त्याला सामाजिक तसेच राजकीय संदर्भही होते. जातदांडग्या आणि धनदांडग्यांकडून दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी, जातीयवाद्यांशी दोन हात करण्यासाठी दलित पँथरच्या नावाने दलित तरुण संघटित होत होता. त्या वेळचे राजकीय वातावरण सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध डावे-उजवे पक्ष असे होते. नव्याने जन्माला आलेल्या शिवसेनेची नक्की राजकीय भूमिका अजून समजायची-उमगायची होती. निवडणुकीत काँग्रेसबरोबर आणि रस्त्यावरील संघर्षांत विरोधकांबरोबर, अशी काही तरी सेनेची सुरुवातीच्या काळात राजकीय कसरत सुरू होती.

prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष
chhatrapati sambhajinagar, Chandrakant Khaire, Imtiaz Jaleel, Eid, lok sabha election 2024
औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागातही शिवसेनेचा राबता वाढला, खैरे आणि इम्तियाज जलील यांची गळाभेट
Prakash Ambedkar, North Indians,
“भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”

दलितांवरील अत्याचाराच्या विरोधात त्या वेळी समाजवादी, कम्युनिस्ट, जनसंघ, असे डावे-उजवे प्रासंगिक स्वरूपात का असेना किंवा काँग्रेसविरोधी राजकारणाचा भाग असेल पण एकत्र आले होते. सवर्णाकडून दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणा किंवा प्रायश्चित म्हणून १५ जून १९७२ रोजी हुतात्मा चौकात डाव्या-उजव्या पक्षांनी एक दिवसाचे धरणे उपोषण केले. त्या वेळी बाळासाहेब ठाकरेही उपस्थित होते. बावडा दलित अत्याचाराचे प्रकरण त्या वेळी गाजत होते. बाळासाहेबांनी त्या वेळी आपल्या ठाकरी शैलीत भाषण केले. बौद्धांवरील अन्याय निपटण्यासाठी एक समिती स्थापन करावी व त्यात माझे शिवसैनिक भाग घेतील, अशी घोषणा त्यांनी केली होती (संदर्भ-आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ, खंड-४, लेखक- ज. वि. पवार). हे सामंजस्य पुढे राखले गेले नाही. किंबहुना पुढे शिवसेना आणि दलित पँथर असा अविरत संघर्ष सुरू झाला. दोन्ही संघटनांचा लढाऊ बाणा. त्या वेळचे पँथर नेतृत्व राजा ढाले व नामदेव ढसाळ यांनी साहित्य, समाज, संस्कृती आणि राजकीय क्षेत्रातही एक वैचारिक दहशत निर्माण केली होती. ढाले यांनी तर शिवसेनेला खुले आव्हान देऊन शिवाजी पार्कवर गीतादहन केले. पुढे हा संघर्ष आणखी तीव्र होत गेला. वरळीची दंगल हे त्याचे अत्युच्च टोक होते. दोन समाजात कटुता निर्माण झाली. दलित समाजाचे त्यात मोठे नुकसान झाले.

शिवशक्ती-भीमशक्ती : एक मृगजळ

शिवसेना व आंबेडकरी संघटना यांच्यातील संघर्षांला जीवघेण्या संघर्षांचे स्वरूप येऊ लागल्याचे दिसताच पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याचे दिसते. १९७४ला वरळी व नायगाव दंगलीने होरपळून निघू लागले त्या वेळी दंगलग्रस्त भागातून सर्व पक्षीय नेत्यांनी सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांती मोर्चा काढला होता. त्यात त्या वेळच्या रिपब्लिकन नेत्यांबरोबर बाळासाहेब ठाकरेही सहभागी झाले होते आणि त्यांनी दोन्ही समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले होते (संदर्भ- वरळी-नायगाव दंगलीचा भस्मे आयोगाचा अहवाल).

शिवसेनेचा खऱ्या अर्थाने राजकीय कालखंड १९८० पासून सुरू होतो. परंतु तरीही दलितांचे काही प्रश्न, त्यांच्या मागण्या, त्यांची आंदोलने, यावर शिवसेनेची कायम विरोधी प्रतिक्रिया राहिली. मुळात शिवसेनेने दलितांसंबंधाचे अनेक वाद अंगावर ओढून घेतले आणि चूड लावणारे नामानिराळेच राहिले. उदाहरणार्थ १९७८ मध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा वाद पेटला. त्या वेळी शिवसेना मुंबई-ठाण्याच्या बाहेर गेली नव्हती. मराठवाडय़ात दंगली झाल्या, दलितांची घरे बेचिराख करण्यात आली. दंगली माजविणारे, नामांतराला विरोध करणारे कोण होते, कोणत्या राजकीय पक्षाचे होते, त्यात समाजवादाची झूल पांघरलेलेही काही लोक नव्हते का, हे सगळे नंतर मागे पडले आणि नामांतरावरून शिवसेना विरुद्ध दलित पँथर किंवा दलित संघटना असाच संघर्ष सुरू झाला.

विश्लेषण: शिवशक्ती-भीमशक्ती युती शक्य, पण मित्रपक्षांचे काय?

मध्येच १९८७-८८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथावरून वाद पेटला. हा वाद पेटवला मराठा महासंघाने पण अंगावर घेतला शिवसेनेने. पुढे शिवसेना-दलित संघर्ष पेटला. रिडल्सच्या समर्थनार्थ आणि विरोधात लाखा-लाखांचे मोर्चे रस्त्यावर उतरले. आव्हान प्रतिआव्हाने देऊ लागले. प्रचंड असा सामाजिक तणाव निर्माण झाला. दोन्ही संघटना मागे हटायला तयार नव्हत्या. पुस्तकावर बंदी घाला ही शिवसेनेची मागणी होती. तर बंदीच्या विरोधात आंबेडकरी समाज सर्वशक्तीनीशी मैदानात उतरला होता. शेवटी हा वाद मिटविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी मध्यस्थी केली. आपल्या बंगल्यावर त्यांनी दलित संघटना व शिवसेना तसेच इतर राजकीय पक्ष, संघटनांच्या नेत्यांना पाचारण केले. त्या वेळी स्वत: बाळासाहेब ठाकरे बैठकीला जातीने उपस्थित राहिले. त्या वेळी या वादाला मूठमाती देण्यासाठी बाळासाहेबांची भूमिका सामंजस्याची होती. पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी मागे घेतली. त्यांनी दाखविलेला प्रगल्भपणा, संयम व सामंजस्य, त्यामुळेच एक वेगळे वळण घेऊ पाहणारा संघर्ष लोप पावला. बाळासाहेबांनाही त्या वेळी भीमशक्तीचे खरे दर्शन घडले. रिडल्सचा वाद मिटल्यानंतर त्यांनी ‘मार्मिक’मध्ये विशेष लेख लिहिला. मुखपृष्ठावरच त्याचे शीर्षक होते, वाद संपला आता संवाद साधूया. खरे म्हणजे शिवशक्ती-भीमशक्ती ऐक्याची त्यांनी घातलेली ती पहिली साद होती.

रिडल्सचा वाद मिटला परंतु नामांतराचा संघर्ष सुरूच होता. त्यातही पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांनी बौद्ध आणि बौद्धेतर दलित अशी सामाजिक फाळणी करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी पार्कवर हिंदुअभिमानी दलितांचा मेळावा भरवून नवबौद्धांना अलग पाडण्याचाही प्रयत्न झाला. मात्र रिडल्सप्रमाणेच नामांतराचा वाद संपविण्यासाठी बाळासाहेब पुढे आले. नामांतराऐवजी नामविस्तारावर तडजोड झाली. १६ वर्षे चाललेला सामाजिक संघर्ष संपला, त्यातही बाळासाहेबांची भूमिका निर्णायक ठरली.

“नातेवाईकांचं राजकारण वाढल्याने भांडवलशाही आणि लुटारूंची सत्ता…”, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं विधान

आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात मात्र त्यांनी शिवसेनेबद्दल दलित समाजात असलेली कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना त्यांनी बरोबर येण्याचे आवाहन केले. त्यातूनच शिवशक्ती-भीमशक्ती ऐक्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. हा राजकीय एकोपा आहे, वैचारिक नाही, याची त्यांनाही जाणीव होती. विधान भवनावर भगवा आणि निळा झेंडा फडकविण्याचा त्यांनी संकल्प केला होता. परंतु त्या आधीच बाळासाहेबांचे निधन झाले.

खरे तर शिवशक्ती व भीमशक्ती हे दोन वेगवेगळे विचार आहेत किंबहुना ते एकमेकांच्या विरोधातील विचार प्रवाह आहेत आणि म्हणूनच ते एक आव्हान आहे. बाळासाहेबांचे वारसदार आणि रिपब्लिकन नेतृत्व हे आव्हान पेलतील का, हा या पुढचा खरा प्रश्न आहे.

बाळासाहेबांनी त्यांच्या अखेरच्या जीवनखंडात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकोप्याची संकल्पना मांडून किमान राजकीय संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवशक्ती व भीमशक्ती हे दोन वेगवेगळे विचार आहेत, किंबहुना ते एकमेकांच्या विरोधातील विचारप्रवाह आहेत आणि म्हणूनच त्यांचा एकोपा हे एक आव्हान आहे. बाळासाहेबांचे वारसदार आणि रिपब्लिकन नेतृत्व हे आव्हान पेलतील का, हा या पुढच्या काळातील खरा प्रश्न आहे..