प्रशांत देशमुख

सीताफळामध्ये माधुर्य आणि आरोग्यदायी गुण असले तरी प्रत्येक बीसोबतचा गर खाताना कंटाळा येणे किंवा हात खराब होणे यातून हे फळ थोडेसे दुर्लक्षित राहते. यावरच विचार करत हिंगणघाट तालुक्यातील कात्री गावी एका खास वाणातून बियांचे प्रमाण कमी करत फळाचा आकार आणि गर वाढवला आहे. या गावातील सीताफळांना आता थेट इंग्लडमधून मागणी येऊ लागली आहे.

painganga river three drowned marathi news
नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
drowned
साताऱ्यातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू
soil dumping in Pavana
पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पात्रात राडारोडा, महापालिकेकडून दंडात्मक कारवाई

सध्या सीताफळाचा हंगाम जोरात आहे. वर्षांतून एकदाच उपलब्ध होत असल्याने त्याचा पुरेपूर आस्वाद घेतला जातो. मात्र हे फळ खाताना हात खराब होत असल्याने अनेक जण सीताफळ खाणे टाळतात. मात्र कात्री गावची सीताफळं थेट चमच्याने खाता येत असल्याने त्यावर अनेकांच्या उडय़ा पडतात. सव्वा किलोच्या एकाच फळात केवळ दोन ते तीन बिया व उर्वरित लोण्यासारखा मऊसूत गर चमचाने सहज चाखला जातो.

अवैध दारूच्या हातभट्टय़ामुळे चर्चेत राहणारे हिंगणघाट तालुक्यातील कात्री हे गाव आता सीताफळाची कात्री म्हणून ओळख निर्माण करीत आहे. त्यातही शंकरराव पाटील यांची अकरा एकरातील सीताफळाची शेती पंचक्रोशीत प्रसिध्दीस आली आहे. एक ते सव्वा किलोचं झाडाला लगडलेलं फळ चटकन लक्ष वेधून घेते. पूर्णपणे सेंद्रिय पध्दतीने लागवड केल्या जाते. मुख्य म्हणजे पाटलांच्या दोन्ही सूनांनी ही फळशेती जोपासली आहे. सासऱ्यांच्या मार्गदर्शनात भारती महेश पाटील व रूपाली प्रफुल्ल पाटील यांची मशागत या सीताफळाची कीर्ती पसरण्यास कारण ठरते.

चार वर्षांपासून त्यांची ही शेती बहरू लागली. पोलाद प्रकल्पातील नोकरी मनस्ताप देणारी ठरू लागल्यावर महेश पाटील यांनी गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. चुलत्याच्या गावी सीताफळाची शेती पाहून त्यांनीही गावातल्या २६ एकरावर शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अकरा एकरावर झाडे लावली. सीताफळाच्या झाडाचे बी चुलत्याकडूनच आणले. त्यामागे इतिहास आहे. प्रगतीशील शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यातून भारतात परतताना त्यांना विमानात बिया आढळल्या. त्या जपून घरी आणल्या. वेगवेगळय़ा पद्धतीने त्याची लागवड केली. कमी खत, कमी पाणी, ऊन सावली अशा वेगवेगळय़ा पद्धतीने रोपं तयार केली. आणि स्वत:चे वेगळे वाण विकसित केले. तेच वाण आता पाटलांची शान ठरत आहे.

या फळास परत एकदा विदेशी हात लागला. जिल्ह्यातील एका अभियंता लेखकाने पुस्तकाच्या मुखपृष्ठावर या फळाचा फोटो टाकला. पुस्तक एका इंग्लंडच्या नागरिकाच्या हाती लागल्यावर त्याने कुतूहलापोटी फळाची चौकशी केली. एका कंपनीला ते फळ इंग्लंडला आणने शक्य होईल का, म्हणून विचारणा केली. कंपनीने फळाची चव, आकार, वजन व अन्य चौकशी केली. या फळातील गोडवा अठरा टक्के असल्याचे त्यांना दिसून आले. इतर सीताफळातील सर्वसाधारण दहा टक्क्यापेक्षा आठ टक्के अधिकचा हा गोडवा त्यांच्या पसंतीचे कारण ठरला. त्यांनी लगेच पंचवीस टनाची मागणी केली. मात्र एकाच वेळी एवढा माल देणे शक्य नसल्याचे पाटील कुटुंबाने कळविले. मात्र इंग्लंडला आपले फळ पाठवायचेच असा चंग बांधला. एकटय़ाच्या शेतीवर शक्य नसल्याने भारतीताईंनी गावातील काही महिलांना प्रोत्साहित करीत सीताफळ लागवड सुरू केली आहे. त्यांच्याही शेतातील झाडे वाढविण्याचा त्या विचार करीत आहे. मात्र संपूर्ण फळे शुध्द सेंद्रिय उत्पादनातूनच काढण्यावर त्यांचा कटाक्ष असतो.

 यासाठी शेतातच खत निर्मितीवरही त्यांनी भर दिला. शेतातच तीन हजार पक्ष्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय चालतो. त्याचे खत सीताफळाच्या झाडासाठीच नव्हे तर भाजीपाला व अन्य पिकांनाही पुरेसे ठरते. गोबरगॅसच्या मळीचाही फायदा होतो. रासायनिक फवारणी अजिबात नाही. गोमूत्र व अन्य पाल्यापासून तयार झालेले जिवामृत द्रव्य कीटकनाशक म्हणून वापरल्या जाते. त्यामुळे हे सीताफळ चवीत गोड व आरोग्यदायी असल्याचा विश्वास भारती पाटील व्यक्त करतात. घरातील लहान सून रुपाली प्रफुल्ल पाटील या वध्र्याला नोकरी करीत असल्या तरी रविवारी त्या पण पूर्ण दिवस शेतीची देखभाल करतात. या व्यवसायात सर्वात आनंदाचा क्षण सांगताना भारतीताई म्हणतात की चंद्रपूरला एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांना सीताफळ भेट देण्यासाठी गेलो होतो. त्यांनी फळाची चव चाखत भरभरून प्रशंसा केली होती. अशी पावती प्रोत्साहन देणारी ठरत असल्याचे त्या सांगतात.

या यशातूनच पुढे पाऊण एकरावर स्ट्रॉबेरी लावण्याचे ठरविले. दहा हजार रोपे लावली आहे. जिल्ह्यात या स्ट्रॉबेरी फळाचे उत्पादन घेणारे आम्ही पहिलेच असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. या खेरीज शेतात मिरची, वांगे, टमाटर, कांदा सेंद्रिय पध्दतीनेच उत्पादित केला जातो. पण मुख्य उत्पादन सीताफळाचेच आहे. विदेशात हे फळ पाठविण्याचा पक्का निर्धार पाटील कुटुंबाचा आहे. अर्धा किलो ते सातशे ग्रॅम व सातशे ग्रॅम ते सव्वा किलो अशा दोन वजनगटात विक्री होते. ७० टक्के विक्री ऑनलाइनच होत असल्याने बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची फारशी गरज नाही. संगणकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त असलेल्या भारती पाटील विक्रीचा कारभार स्वत:च सांभाळतात. शिक्षणातील प्रावीण्य वाया जात नसल्याचे हे या खेडेगावात राहणाऱ्या दक्ष महिलेने सिध्द करून दाखविले आहे. सासरे शंकरराव पाटील म्हणतात की सूनेने लक्ष घातल्यावर माझे ओझे कमीच झाले. मला अभिमान वाटतो!

prashantdesh11@gmail.com