डॉ. राजेंद्र कुंभार

ऊस हे महाराष्ट्राचे पीक. शेकडो वर्षांपासून होत असलेल्या या पिकाच्या लागवड, पीक पद्धतीत आता कालपरत्वे बदल झाले आहेत. यातील काही बदल हे उसाच्या चांगल्या उत्पादनासह शेतीच्या शाश्वत आयुष्यासाठीही आवश्यक आहेत.

साला वर्षभर, वारंवार आणि भरपूर पाणी दिल्याशिवाय ऊसपीक चांगले उत्पन्न देऊ शकत नाही, असा एक समज आहे. या समजामुळे मीठ फुटून शेती (क्षारपड) खराब होत आहे. पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे व उत्पादन कमी होत आहे. मृत जमिनीमधून उत्पादन वाढविण्यासाठी महागडी खते, संजीवके, तणनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये अशा महागड्या वस्तूंचा मारा केला जातो आहे. त्यामुळे ऊसशेतीचे अर्थशास्त्र गडबडते. यासाठी ऊसपिकाचे मूळ समजावून घेण्याची खरी गरज आहे.

ऊस भारतीयांना फार प्राचीन काळापासून माहीत असलेले पीक आहे. सूर्यफुलाची सुरुवात मरिचीचा मुलगा विवस्वान, विवस्वानचा मुलगा वैवस्तमनू आणि त्याचा मुलगा इक्ष्वाकू त्याच कुळात राम जन्मला. इक्ष्वाकू हा शब्द इक्षू आणि वाकू यापासून निर्माण झाला आहे. इक्षू म्हणजे ऊस, वाक म्हणजे बोलणे. म्हणून उसासारखे गोड बोलणारा अशी याची व्युत्पत्ती आहे. रामायणाच्या अयोध्या कांडात आणि अरण्यकांडात उसापासून बनवलेल्या ैमैरेयै या मद्याचे (दारूचे) उल्लेख आहेत. महाभारतात प्रभास नावाच्या बेटावर यादवांनी उसापासून बनवलेली मैरेय नावाची दारू प्यायल्याने भांडणे होऊन यादव कुळाचा नाश झाला. उसाच्या दारूचे अनेक औषधी उपयोग चरकसंहितेमध्ये व इतर आयुर्वेद ग्रंथांत सापडतात.

याचा अर्थ असा की, ऊस व त्यापासून निर्माण होणारे अल्कोहोल प्राचीन काळापासून माहीत आहे. उसापासून दाणेदार शुभ्र साखर निर्माण केली जात होती. त्या संबंधीचे अनेक उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आणि तुकाराम गाथेमध्ये आढळतात. प्राचीन काळी ऊस कसा पिकवला जात होता, त्याची साखर कोण बनवत असे, त्याचे कारखाने कोठे होते या सर्वांची उत्तरे आज आपल्याकडे उपलब्ध नाहीत.

काही पुराव्यांवरून असे दिसून येते की, गूळ व साखरेची निर्मिती कुंभार करत असावेत. आजही कुंभारच उत्तम गुळवी म्हणून काम करतात. कर्मकांड, मंत्रतंत्र व त्याची मक्तेदारी ब्राह्मणांकडेच राहिल्याने शेतकरी व शुद्रांचे विज्ञान व तंत्रज्ञान आज घडीला माहिती होत नाही. ऊस हा एक गवताचा प्रकार आहे. ऊस, भात आणि भरडधान्यांचे उत्पादन शेतीच्या उदय काळापासून आहे. पाणी उपसण्याची यांत्रिक सोय नसताना बहुतेक सर्व पिके मोसमी पावसावरच घेतली जात.

हेही वाचा

मोसमी पाऊस वर्षातून केवळ चार महिने असतो आणि आज शेतकरी असे समजतात की, बारमाही पाणी असल्याशिवाय ऊस येणारच नाही. मग शेतकरी ऊस कसा पिकवित असतील? ऊस साधारणपणे १० ते १२ महिन्यांत पक्व होतो. तो बांबूप्रमाणे बेटाच्या स्वरूपात वाढतो. ऊस या पिकाच्या खोडामध्ये अन्न साठविले जाते. वनस्पती शास्त्राच्या तत्त्वाप्रमाणे ज्या पिकाला पाण्याची ओढ सहन करावी लागते, ती पिके आपल्या खोडात किंवा मुळात अन्न साठवून ठेवतात. उदा. झ्र रताळी, बटाटा, हळद, आले, बीट इत्यादी.

याचा अर्थ असा की, ऊस हे पाण्याचा ताण सहन करू शकणारे पीक असावे. परंतु इंजिन, वीज व पाण्याची मोटार यांचा शोध लागल्यानंतर ऊर्जेच्या आधारावर खोल पाणी उपसणे शक्य झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना विपुल पाण्यात जगण्याची सवय लावली. जेव्हा जमिनीत पाणी भरलेले असते तेव्हा हवा नसल्याने ऊस वाढत नाही आणि जेव्हा जमीन पूर्ण कोरडी होते, तेव्हा आर्द्रता नसल्याने ऊस वाढत नाही. म्हणजे वर्षातून केवळ ५ ते ६ महिनेच उसाची वाढ होते.

संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, उसाच्या उगवणीसाठी केवळ २० ते २५ टक्के आर्द्रता उत्तम आहे. उसाची पाने वाढण्यासाठी ४० टक्के आर्द्रतेची गरज असते. कांड्याची लांबी वाढण्यासाठी वाढीच्या काळात ८० ते ८५ टक्के आर्द्रता गरजेची आहे. ऊस पक्व होण्याच्या काळात पुन्हा आर्द्रतेची गरज कमी होते व ४५ ते ६५ टक्के आर्द्रतेवर ऊस पक्व होतो. त्याचबरोबर तापमानाचा मोठा वाटा उसाच्या वाढीमध्ये आहे. उसाच्या उगवणीच्या काळात जास्त उष्णतेची गरज असते. तसेच खेळत्या हवेची गरज असते.

उसाची उगवण उत्तम हवी असेल तर कमी आर्द्रता आणि जास्त उष्णता याची गरज आहे. उसाचे बियाणे वाड्यांच्या बाजूचे असेल तर केवळ १५ टक्के आर्द्रतेवर उगवण छान होते. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आर्द्रता मापकाची गरज आहे आणि खतापेक्षा जमिनीत हवा खेळती ठेवण्याची गरज असते. कांड्या लावून उसाची लागवड करत असल्यास किमान दीड महिना उसाला फारशी पाण्याची गरज नसते. कारण कांडीतील पाणी घेऊन कोंब वर येतात. मात्र कांड्यांच्या वाढ होण्याच्या काळात उसाला जास्त प्रमाणात पाणी लागते. हा काळ सर्वसामान्यपणे चार महिन्यांचा असतो. (८० ते ८५ टक्के आर्द्रता) आर्द्रता मापकाने आर्द्रता मोजून केवळ भिजवणीचे पाणी दिल्यास ऊस उत्तम वाढतो.

भिजवणीचे पाणी म्हणजे उसाच्या पिकात पाणी साठून राहता कामा नये, अन्यथा मुळे गुदमरतात. सध्याच्या उसाला अनेक पिढ्यांपासून जास्त पाण्याची सवय लागली आहे, परंतु हळूहळू प्रायोगिक पद्धतीने ताण सहन करणारे पण उत्पादन कमी न होऊ देणारे बियाणे (वाण) तयार करणे शक्य आहे. यासाठी फार तर चार वर्षे लागू शकतात. ऊस जर हवा आणि पाण्यातून साखर तयार करत असेल तसेच चिपाडे आणि पाने करत असेल तर त्याला लागणारा नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश सिलिका, सल्फर इत्यादी मूलद्रव्ये जेवढी उसाच्या चोयटीतून शेताच्या बाहेर जातात, तेवढीच बाहेरून पुरवल्यास काम भागते. शेतकऱ्यांच्या पारंपरिक खत वापराच्या केवळ १० टक्के एवढेच हे प्रमाण असू शकते.