सुजाता नरसाळे
दर पंधरा दिवसांनी बाहेरून रक्त द्याव्या लागणार्‍या थॅलेसेमिया आजाराविरुद्ध जनजागृती, बालरुग्णांच्या आजन्म उपचारांची जबाबदारी आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन असे त्रिपदरी काम गेली १८ वर्षे सुजाता यांनी अविरतपणे चालू ठेवले आहे. रक्त ही थॅलेसेमियाग्रस्त मुलांची जीवनवाहिनी असते हे लक्षात घेऊन सुजाता यांनी आत्तापर्यंत १०० हून अधिक रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. २८० थॅलेसेमियाग्रस्त मुलांना दत्तक घेत त्यांना आयुष्यभराची ‘साथ’ देणार्‍या, त्यांना त्यांच्या पायावर उभ्या करणार्‍या, ‘थॅलेसेमिया-मुक्त’ भारताचे स्वप्न पाहणार्‍या सुजाता रायकर आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा.’

वर्ष २००८, ‘थॅलेसेमिया’ या आजारापायी घरातून हाकलून दिलेली एक मुलगी आणि तिची  आई सुजाता यांच्याकडे आल्या. तोपर्यंत ‘थॅलेसेमिया’ हा शब्दही न ऐकलेल्या सुजाता त्यांची कहाणी ऐकून हादरून गेल्या. त्यांनी या आजाराची नीट माहिती घेतली आणि मुलीच्या आजन्म उपचारांची जबाबदारी घेत त्या मुलीचा हात तेव्हापासून जो घट्ट धरला तो प्रवास आज कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांच्या मदतीने २८० मुलांपर्यंत पोचला आहे.

याच व्यापक कामाला न्याय देण्यासाठी २०१२ मध्ये त्यांनी ‘साथ’ ट्रस्टची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून जनजागृती, बालरुग्णांच्या आजन्म उपचारांची जबाबदारी आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन – असे त्यांचे ‘थॅलेसेमिया’साठीचे अत्यावश्यक त्रिपदरी काम गेली १८ वर्षे अविरतपणे चालू आहे आणि ते अधिकाधिक वाढवण्याचा त्यांचा मानस आहे.

थॅलेसेमिया हा रक्ताचा आनुवंशिक आजार दोन प्रकारचा असतो – ‘मायनर’ आणि ‘मेजर’. मायनर हे फक्त वाहक असतात, परंतु दोन मायनर व्यक्तींना होणारी संतती मात्र ‘मेजर’ होण्याचे प्रमाण २५ टक्के इतके असते. या रुग्णांच्या शरीरात हिमोग्लोबिन तयार होत नाही. त्यामुळे अशा बालकांना आयुष्यभर दर १५ दिवसांनी बाहेरून रक्त द्यावे लागते, ज्यामुळे शरीरात लोहाचे साठे वाढतात. त्यांचा निचरा केला नाही तर प्लीहा (spleen) आणि मूत्रपिंड (kidney) निकामी होऊ शकतात.

लग्नाआधी आपण ‘थॅलेसेमिया मायनर’ आहोत की नाही हे एका साध्या रक्तचाचणीने जाणून घेऊन हा आजार पूर्णपणे टाळता येतो.  आज देशात सुमारे पाच कोटी लोक ‘थॅलेसेमिया मायनर’ आहेत आणि एक ते दीड लाख ‘थॅलेसेमिया मेजर’ आहेत, त्यात दरवर्षी सुमारे १५ हजार बालरुग्णांची भर पडते. या पार्श्वभूमीवर त्यासाठी लग्नपत्रिका जुळवण्यापेक्षाही ही रक्तचाचणी जास्त महत्त्वाची आहे, हाच सुजाता यांच्या जनजागृतीचा महत्त्वाचा सल्ला असतो.

गुजरातमधून ‘कॉम्प्युटर सायन्स ॲंण्ड ॲप्लिकेशन्स’मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न होऊन  सुजाता मुंबईत आल्या आणि २००८ पासून त्यांनी थॅलेसेमियाग्रस्त बालरुग्णांसाठी काम करण्यास सुरुवात केली. ‘आजपासून तुमच्या मुलाची चिंता माझी,’ असं म्हणून जेव्हा त्या मुलांना मायेने जवळ घेतात, तेव्हा त्या जवळजवळ उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या आयुष्यात उभारी येते.

आज सुजाता तब्बल २८० बालरुग्णांच्या आई आहेत. त्यांना त्यांनी दत्तकच घेतलं आहे जणू, कारण त्या मुलांच्या संपूर्ण औषधोपचारांची जबाबदारी तर त्या आयुष्यभरासाठी घेतातच, प्रसंगी त्यांच्या शाळेची फी भरणे, महिन्याचा शिधा देणे, रुग्णांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी धडपड करणे अशा सगळ्याच गोष्टी त्या जबाबदारीने पार पाडतात. थोडक्यात, त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे जीवनप्रवाहात आणण्यासाठी सुजाता प्रयत्न करत असतात.

थॅलेसेमिया हा आजार केवळ अज्ञानापोटी होतो असे लक्षात आल्यावर त्यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली. महाराष्ट्रभर ठिकठिकाणी फिरून आणि सामाजिक माध्यमांद्वारे त्यांनी गेल्या १८ वर्षांत ३० लाखांहून अधिक लोकांना शिक्षित केले आहे. यात वायुसेनेच्या अधिकार्‍यांचाही समावेश आहे. रक्त ही थॅलेसेमियाग्रस्त मुलांची जीवनवाहिनी असते. हे लक्षात आल्यावर सुजाताताईंनी १०० हून अधिक रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत.

त्यांच्या असामान्य समर्पणाचा अनेक सन्मानांनी गौरव झाला आहे. यात महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल रमेश बैस, अण्णा हजारे यांच्या हस्ते मिळालेले पुरस्कार आणि ‘सुषमा स्वराज मेमोरियल पुरस्कार’ यांचा समावेश आहे. त्यांनी दोन वेळा ‘ ळएऊ७’ वक्त्या म्हणून, तसेच ‘ऑल इंडिया रेडिओ’ व अन्य प्रतिष्ठित व्यासपीठांवर आपला प्रवास मांडला आहे. आज सुजाता यांच्या प्रयत्नांमुळे पंखात बळ आलेली मुले शिकत आहेत, विविध संस्थांमध्ये उच्च पदावर काम करीत आहेत. आपल्या प्रयत्नांतून ‘थॅलेसेमिया-मुक्त भारताचे स्वप्न पाहणार्‍या सुजाता रायकर यांना ‘लोकसत्ता’चा सलाम.